News Flash

गोष्टी माणसांच्या..माणूसपणाच्या!

अनेक लेखकांच्या लेखनाबद्दल आपल्याला कुतूहल असतं. परंतु त्या लेखकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असतेच असं नाही. जी. ए., पुलंसारखे सन्माननीय अपवाद. कवी, लेखक आणि

| March 17, 2013 01:02 am

अनेक लेखकांच्या लेखनाबद्दल आपल्याला कुतूहल असतं. परंतु त्या लेखकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असतेच असं नाही.  जी. ए., पुलंसारखे सन्माननीय अपवाद. कवी, लेखक आणि चित्रपटकार गुलज़ार याच कुळीतले; नखशिखांत शुभ्रवसनी गुलज़ारांबद्दल कुतूहल नसलेला माणूस सापडणं सहसा अशक्यच. ‘आयुष्याकडे रोमँटिक नजरेनं पाहणारा फिल्मकार’ अशी जरी त्यांची प्रतिमा जनमानसात असली तरी त्या पल्याडही हा माणूस अधिक गहन, सखोल आहे याचा प्रत्यय त्यांच्या कथा वाचताना प्रत्यही येतो. नितळ माणूसपणाची ओढ असलेला हा संवेदनशील लेखक आहे. कवी, गीतकार आणि चित्रपटकार ही त्यांची मुख्य ओळख असली तरी त्यांच्या लघुकथाही तितक्याच सधन, समृद्ध आहेत. ‘रावीपार’मध्ये फाळणीचं भळभळतं दु:खं, धर्मानं माणसांच्या केलेल्या चिरफळ्या याचं विदारक चित्र त्यांनी रंगवलं आहे. एकापरीनं फाळणीनं दुभंगलेली मनं आणि माणसांची उखडलेली मुळं आजही त्यांना अस्वस्थ व बेचैन करतात. याचं कारण त्यांची स्वत:ची मुळंही सीमापार रुजलेली आहेत. आपल्या मातीतून आपल्याला जबरदस्तीनं उपटलं गेलं याची भळभळती जखम अश्वत्थाम्यासारखी आजही गुलज़ार तना-मनावर बाळगून आहेत. म्हणूनच अलीकडे आपल्या पाकिस्तानातील जन्मगावी जाताना अस्वस्थ होऊन ते माघारी परतले. कसल्या जीवघेण्या वेदनांनी ते त्यावेळी तगमगले असतील याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. म्हणूनच हे प्राणांतिक दु:खं त्यांच्या कथांतून सतत पाझरत राहतं.. राहिलंय. ‘देवडी’ या त्यांच्या नव्या कथासंग्रहातील काही कथांमधूनही ही जखम स्रवताना दिसते.
गुलज़ारांचं फार कमी साहित्य मराठीत आलंय. ऋतुरंग प्रकाशनाच्या अरुण शेवतेंनी आपल्या हृदयस्थ मैत्रीनं त्यांना मराठीत आणलं. ‘देवडी’ हे त्याचंच फलित. अंबरीश मित्र यांच्यासारखा भावकोमल, शैलीदार लेखक गुलज़ारांना ‘देवडी’द्वारे अनुवादक म्हणून लाभलाय हा आणखीन एक दुग्ध-शर्करा योग!
‘देवडी’तल्या कथा या रूढार्थानं ‘कथा’ या प्रकारात मोडणाऱ्या नाहीत. त्या माणसांच्या, त्यांच्या माणूसपणाच्या ‘गोष्टी’ आहेत, आणि गुलज़ारांनी गप्पा मारता मारता त्या एका उत्स्फूर्ततेनं सह-अनुभूतीनं सहजतेनं सांगितल्या आहेत. त्यात कोणतीही ‘पोझ’ नाही. गुंतलेपण असलं तरीही एक तटस्थ अलिप्तताही त्यात आहे. याचा अर्थ त्या कोरडय़ा आहेत असं नाही. त्यातल्या पात्रांशी गुलज़ार आतडय़ाचं नातं राखून आहेत. पण ऊरबडवेपणा त्यांना मान्य नाही. माणसाचं जगणं समजून घेण्याची आस त्यांना आहे. हे कुतूहल, ही उत्सुकता ते अखंड जपून आहेत, हे ‘देवडी’तल्या कथा वाचताना ठायी ठायी जाणवतं.
समाजाच्या निरनिराळ्या स्तरांतली माणसं, त्यांचं जगणं आणि त्यांचं प्राक्तन गुलज़ारांचा कथाविषय झालेलं आढळतं. यातली काही माणसं वास्तवातली आहेत, काही त्यांना अवतीभवती भेटलेली, तर काही वर्तमानपत्रांतल्या बातम्यांतून त्यांच्या मनोभूमीत रुजलेली आहेत. आयुष्यात स्वत:ला, इतरांना आलेले अनेकानेक अनुभव- हेही त्यांच्या कथांना मूलद्रव्य पुरवते झाले आहेत. त्यांना जोड मिळालीय त्यांच्या चिंतन, मनन अन् सहानुभूतीची! त्यातून हे छोटेखानी कथा-गुच्छ आकाराला आलेले आहेत.
गुलज़ारांनी स्वत:कडे कापूस पिंजाऱ्याची भूमिका घेऊन आपल्या कथांमधील माणसांची आयुष्यं पिंजून काढली आहेत, उसवली आहेत. त्यातून जे नितळ सत्याचे तुकडे त्यांना गवसले आहेत, ते त्यांनी आपल्यासमोर पेश केले आहेत; कुठल्याही अभिप्रायाविना!
‘देवडी’त २५ कथा आहेत. त्यांचे प्रत्येकी तीन-चार कथांचे छोटेखानी गुच्छ गुलज़ारांनी कथाविषयानुरूप तयार केले आहेत. त्या प्रत्येक विभागाच्या प्रारंभी एखादी शेरसदृश रचना देऊन  त्या कथांचं मर्मच जणू विशद केलंय. पहिलाच विभाग आहे- मित्रांच्या शब्दचित्रांचा! त्याच्या प्रारंभीची रचना आहे, ‘किताबों से कभी गुजरो तो यूँ किर्दार मिलते है। गये वक्तों की ज्योढी में खडम्े कुछ यार मिलते है!’
या विभागात तीन शब्दचित्रं.. शब्दचित्रं म्हणण्यापेक्षा व्यक्तिचित्रं म्हणायला हवं- आहेत. ‘साहिर आणि जादू’मध्ये प्रख्यात शायर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जानेमाने गीतकार साहिर लुधियानवी आणि गीतकार व पटकथाकार ज़ावेद अख्तर यांच्यातील गमतीशीर नाटय़ाबद्दल लिहिलं आहे. आपल्या शायर पित्याशी विळ्या-भोपळ्याचं नातं असलेले ज़ावेद अख्तर साहिरच्या घरीच शांती आणि आसरा शोधत असत. पण आपल्या टम्र्सवर! आपल्या स्वाभिमानाला धक्का लागू न देता! त्यासाठी ते त्यांना मुलावत जपणाऱ्या साहिरशीही अधूनमधून भांडण काढून त्यांच्यावर रुसून बसत. साहिरना मात्र मित्र असलेल्या जां निसार अख्तर (ज़ावेद अख्तर यांचे वडील) आणि पुत्रवत असलेल्या जावेदशी वागताना तारेवरची कसरत करावी लागे. हे चमत्कारिक नातं सांभाळत, जपत त्यांनी ज़ावेदना मोठं होताना पाहिलं. साहिरच्या चटका लावणाऱ्या मृत्यूप्रसंगी त्यांच्यातले हे भावबंध किती गहिरे होते याचा प्रत्यय येतो. गुलज़ारांनी त्यांच्यातले रुसवेफुगवे, प्रेम आणि उत्कट साहचर्य मोजक्या शब्दांत प्रत्ययकारीतेनं जिवंत केलं आहे.
‘कुलदीप नय्यर आणि पीरसाहेब’मध्ये विख्यात पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या आयुष्यात घडलेली एक अतक्र्य घटना कथन केलेली आहे. बुद्धिवादी म्हणून सुपरिचित असलेले कुलदीप नय्यर आणीबाणीत तुरुंगात असताना, आपली या कैदेतून कधी सुटका होणार, या विवंचनेत असताना पीरसाहेब त्यांच्या स्वप्नात येतात आणि ‘येत्या गुरुवारी तुझी सुटका होईल’ असा दृष्टान्त देतात. नय्यर यांच्या बालपणी त्यांच्या पाकिस्तानातील जन्मगावी घराशेजारी पीरसाहेबांची कबर होती. त्यांच्या आईची या पीरसाहेबांवर नितांत श्रद्धा होती. बुद्धिप्रामाण्यवादी कुलदीप नय्यर यांचा असल्या भाकड गोष्टींवर विश्वास असणं शक्यच नव्हतं. परंतु आश्चर्य म्हणजे कसलाही आसभास नसताना त्या गुरुवारी नय्यर यांची तुरुंगातून सुटका झाली. हा योगायोगही असू शकतो. पण त्यांच्या आईनं त्यांना पाकिस्तानात जाऊन पीरसाहेबांच्या कबरीवर चादर चढवायला सांगितली. आईच्या इच्छेखातर कुलदीप नय्यर पुढे पाकिस्तानला गेलेही, पण तिथं त्यावेळी ती कबर नव्हती. कालौघात ती पाडली गेली होती. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अशा काही अतक्र्य गोष्टींचा नेमका काय अन्वयार्थ लावायचा? हा किस्सा सांगून गुलज़ार थांबतात. त्यावर कसलीही प्रतिक्रिया देत नाहीत.
बायको आणि सासू यांच्यावर एकाच वेळी तितकंच उत्कट प्रेम करणाऱ्या भूषण बनमाली या अवलिया मित्राचं रेखाटलेलं शब्दचित्र मुळातूनच वाचण्यासारखं आहे.
मुंबईत रौरव नरकातलं जिणं जगणाऱ्या उपेक्षित, वंचितांचं जगणंही गुलज़ारांच्या लेखणीचे कुतूहलविषय ठरले आहेत. फुटपाथवर वास्तव्य करणाऱ्या हिराचा परिस्थितीशी दोन हात करतानाचा कणखरपणा, तिनं तिच्यापुरतं बनवलेलं आयुष्याचं तत्त्वज्ञान ‘फुटपाथवरून’ या कथेत येतं. नैतिकता, माणुसकी या सापेक्ष गोष्टी आहेत हे हिराच्या जगण्यातून कळून येतं. परंतु असंच कचराकुंडीचं जिणं वाटय़ाला आलेल्या माणसांचंही आपल्यापुरतं आपलं असं एक ऊबदार जग असतं, त्यात ते राजे असतात, हे ‘सारथी’ या कथेतील मारुतीच्या रूपात पाहायला मिळतं. ‘वास’ कथेत झोपडपट्टीत ‘सुखेनैव’ जगणाऱ्या माणसांना बिल्डिंगच्या खोक्यात वसवल्यावर त्यांची होणारी घुसमट अनुभवायला मिळते; तर ‘झड’मध्ये मुंबईतल्या जलप्रलयात निसर्गानं गिळंकृत केलेली माणसं आणि तशा प्रलयकाळातही दारूची अखंड साथसंगत करत मृत्यूला सामोरा जाणारा दामू- एक वेगळंच रसायन आपल्यासमोर ठेवतो.
आँखों को वीजा नहीं लगता, सपनों की सरहद होती नहीं
बंद आँखों से रोज मै सरहद पार चला जाता हूँ!..
या शीर्षस्थ रचनेअंतर्गत समाविष्ट कथा भारत-पाकिस्तान फाळणीनं उद्ध्वस्त झालेल्या माणसांची अंतर्यामीची वेदना उघड करतात. घर भारतीय हद्दीत, शेती पाक हद्दीत; कधी जिवाभावाची, रक्ताच्या नात्याची माणसं परक्या भूमीत- अशांनी जगावं कसं? कुठला देश त्यांनी आपला मानावा? नकाशावरच्या विभाजनरेषेनं माणसं एकमेकांपासून तुटतात? असं दुभंगलेपण हृदयात दडपून जगणारी माणसं कशी असतात? प्रसंग येताच बाह्य़ सीमा झुगारून ती कशी एक होऊ पाहतात, याचं चित्रण ‘एल. ओ.सी.’, ‘ओव्हर’, ‘मेंढे’ यासारख्या कथांतून येतं.
युद्ध, यादवी, नक्षलवाद, दहशतवाद यातही माणसं पोळून निघतात. ज्यांचा या गोष्टींशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही, ज्यांना त्यात काहीच गम्य नाही अशा माणसांना यात अकारण भोगावं लागतं. तरी त्यात भरडली जातात. काही वेळा परिस्थितीच त्यांना अशा कडय़ाच्या टोकावर आणून उभी करते, की आत्मनाश आणि विध्वंसातून सुडाचा प्रवास होत राहतो. ‘हिल्सा’, ‘दि स्टोन एज,’ ‘झडती’, ‘स्वयंवर’, ‘पाठवणी’, ‘अधेल्या’सारख्या कथा हे वास्तव आपल्यासमोर मांडतात. या कथांमध्ये लेखक म्हणून गुलज़ार पीडित, शोषितांच्या बाजूनं उभे ठाकलेले पाहायला मिळतात. परंतु इथंही ते कुठलं ‘जजमेंट’ करत नाहीत. ज्यांनी त्यांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार ते करावं अशीच त्यांची धारणा जाणवते.
‘गार्गी आणि सुपरमॅन’ या कथेत माणसाच्या हतबलतेची, नियतीशरणतेची गोष्ट आहे. आपल्या लाडक्या लेकीला- गार्गीला हाडांचा कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यावरही विकास देसाई आणि अरुणा राजे हे दाम्पत्य या दुर्धर आजाराशी कसे लढतात, आपल्या लेकीचं मनोबल कायम राहावं म्हणून अश्रूंचा पूर कसा थोपवतात आणि तिचे उर्वरित दिवस मजेत, आनंदात जावेत म्हणून कसे धडपडतात, याची ही कहाणी आहे. सुपरमॅनची क्रेझी असलेल्या गार्गीपुढे एका बेसावध क्षणी तिची आई बोलून जाते, की ‘देव सुपरमॅनसारखाच आहे बेटा. पुस्तकातच सगळं काही करणं जमतं त्याला.’
माणसांचे गंड, धारणा, मनोवृत्ती, स्वभाव यातूनही काही घटना-प्रसंग घडतात, ज्यांचे दूरगामी परिणाम हादरवणारे असतात. अशा काही घटना, अशी काही माणसं ‘सांज’, ‘दादाजी’, ‘अ‍ॅडजस्टमेंट’सारख्या कथांतून प्रत्ययाला येतं. गोष्टी म्हटल्या तर क्षुल्लकशा वाटतात, पण त्या माणसाला पोखरत राहतात.. कधी कधी तर त्यांचा जीवनरसच आटवून टाकतात. गुलज़ारांना अशा माणसांत रस आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला, त्यांच्याबद्दल सांगायला त्यांना आवडतं. त्यांच्यात ते मनमुराद रमतात. त्यांच्यासोबतचं जगणं स्वत: अनुभवतात- त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून! माणसांबद्दलच्या या कुतूहलातूनच या कथा आकाराला आल्या आहेत. वाचकालाही त्या समृद्ध करतात, आपल्यासोबत जग हिंडवतात.. माणसं हिंडवतात.
मिताक्षरी, चित्रदर्शी शैली हा या सगळ्या लेखनाचा गाभा आहे. अंबरीश मिश्र यांनी त्यांची ही शैली अनुवादातही अस्सलतेनं पकडली आहे. सतीश भावसार यांचं मुखपृष्ठ आणि मांडणीने ‘देवडी’च्या निर्मितीमूल्यांमध्ये सकस भर घातली आहे.
‘देवडी’ – गुलज़ार, अनुवाद – अंबरीश मिश्र, ऋतुरंग प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १८७, मूल्य – २०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 1:02 am

Web Title: book review of devdi written by gulzar
टॅग : Samiksha
Next Stories
1 चर्चची ‘ती’ भूमिका श्रद्धावंतांच्या धार्मिक भावना दुखावत नाही?
2 सुबत्ता
3 कनचान सोदूलोय मसोटीत गेल्ल्यास काय?
Just Now!
X