रा. ना. चव्हाण यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले होते. त्यांचे वैचारिक साहित्य रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांनी गेल्या दशकात प्रकाशित केले आहे. त्या कार्याचा एक भाग म्हणून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ – एक मागोवा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. चव्हाण यांचे २०१२-१३ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षांत ‘दलित चळवळ’ या विषयावरील नवे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘दलित प्रश्न’ हा सामाजिक असण्याबरोबरच तो भौतिकही आहे. किंबहुना राजकीय स्वरूपाचा आहे. या मुद्दय़ाची चर्चा प्रस्तुत पुस्तकात केली गेली आहे. यात एकंदर चोवीस लेख आहेत. शिवाय संशोधक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांची प्रस्तावना आणि डॉ. बाबा आढाव यांचा अभिप्राय या पुस्तकात आहे.
रा. ना. चव्हाणांनी १९६९ ते १९९३ या दोन दशकांत लिहिलेले हे लेख आहेत. ‘लोकराज्य’, ‘नवभारत’, ‘अस्मितादर्शन’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘साप्ताहिक संग्राम’, ‘रयत शिक्षण पत्रिका’, ‘महाराष्ट्र मित्र’, ‘मराठा जागृती’, ‘सुगावा’, ‘साधना’, ‘राष्ट्रवीर’ इत्यादी नियतकालिकांतून/मासिकांतून पूर्वी प्रकाशित झालेले हे लेख आहेत.
सत्तर व ऐंशीच्या दशकातील हे लेख एका वा एकत्र समस्येभोवती गुंफलेले नाहीत. या लेखांच्या मध्यभागी एक मध्यवर्ती सूत्र आहे. ‘दलित समस्या’ कशी सोडवावी याबाबतची एक तात्त्विक भूमिकादेखील या पुस्तकातून स्पष्ट होते. दलितांचा प्रश्न सोडवण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन इतर दृष्टिकोनांपेक्षा जास्त क्रांतिकारक आणि व्यवहारीदेखील आहे. म. फुले व आंबेडकरांविषयी आदर व निष्ठा ठेवून त्यांच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन महर्षी वि. रा. िशदे यांनी मांडला. ‘दलितांची समस्या’ सोडवण्याची चौकट आंबेडकरवाद असण्याऐवजी ‘िहदूधर्माची चौकट’ असावी असे वि. रा. िशदे, म. गांधी, रा. ना. चव्हाण यांचे मत आहे. आंबेडकरवादाच्या चौकटीत जातीचा प्रश्न विषमतेशी जोडला गेला आहे. जातीय विषमतेला ठाम विरोध हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. ‘िहदूधर्माची चौकट’ जातीच्या सोबत धर्माच्या मुद्दय़ाची चर्चा करते. म. फुले व डॉ. आंबेडकरदेखील ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ व ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात धर्माचा मुद्दा मांडतात, असे वरवर दिसते. मात्र म. फुले व डॉ. आंबेडकर धर्माऐवजी व्यक्ती-व्यक्ती आणि व्यक्ती व समाज यांच्यातील संबंधाच्या संदर्भातील नीतीचा मुद्दा मांडत होते. चव्हाण िहदू धर्माच्या चौकटीत प्रश्न सोडवण्याचा विचार या पुस्तकामध्ये मांडतात.
दलितांनी त्यांचे स्वत:च प्रतिनिधित्व करण्याचा मुद्दा गाभ्याचा आहे. त्याचे ‘प्रतिनिधित्व’ हा मध्यवर्ती मुद्दा भारतीय राजकारणात कळीचा प्रश्न ठरतो. प्रादेशिक व राष्ट्रीय राजकारणात केवळ प्रतीकात्मक स्वरूपात दलितांचे प्रतिनिधित्व असावे की, दलितांचे सामाजिक हितसंबंध आणि सामाजिक चौकटीत सार्वजनिक धोरण निश्चिती दलितांनी करावी असा मुद्दा उपस्थित होतो. मतपरिवर्तन हा समन्वयाचा दलित प्रश्न सोडवण्याचा मार्ग बाजूला आणि दलितांची राजकीय शक्ती उभी करून थेट अंतरायाचे राजकारण करण्याची भूमिका दुसऱ्या बाजूला असा फरक हिंदू चौकटीत आणि आंबेडकरवादी चौकटीत दिसतो. या व्यापक आंतरविरोधाची चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून घडू शकेल असे वाटते.
िहदू धर्म चौकट, आंबेडकरवादी चौकट या खेरीज ‘िहदुत्ववादी/ समरसतावादी’ हा एक दलित प्रश्न सोडवण्याच्या चौकटीत वि. दा. सावरकर, श्री. म. माटे, बाळासाहेब देवरस यांनी विकसित केली आहे. सामाजिक समरसता मंच हे त्यांचे संघटनात्मक साधन आहे. तसेच पुढे ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ हा प्रयोगही त्यांच्या मार्गावरील एक प्रवास ठरतो. यापेक्षा चव्हाण वेगळे विचार मांडत आहेत. िहदू धर्माची चौकट चव्हाण यांनी मान्य करूनही त्यांचा विचार एकरस िहदू समाज निर्मितीचा नाही. िहदू धर्माची विविधा त्यांनी जपलेली आहे. िहदू मूलतत्त्ववाद किंवा िहदू जमातवाद यांना पर्याय म्हणून रा. ना. चव्हाण यांच्या विचारातून िहदू धर्माची चौकट ‘दलित समस्या’ सोडवण्यासाठी पुढे येते. दलित चळवळीची चर्चा अशा तीन चौकटींमधून प्रस्तुत पुस्तकात केली गेली आहे. याशिवाय दलितांचा प्रश्न भौतिक स्वरूपाचा आहे. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा मार्ग डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये जमिनीचे पुनर्वाटप या स्वरूपात वाढवला होता. भारतात गाव हे एक एकसंध एक नाही. गावाचे स्वरूप हे जमीनमालकांची वस्ती आणि शेतमजुरांची वस्ती असे उत्पादन संबंधावर आधारलेले आहे. हे संबंध पूर्णपणे बदलण्यावरच ‘दलितांचा प्रश्न’ सुटू शकतो. या चौकटीचा स्पष्टपणे उल्लेख पुस्तकाच्या प्रास्ताविकात आहे. त्या मुद्दय़ाचे आकलन चव्हाण यांना होते. यामुळे प्रस्तुत पुस्तक हे केवळ दलित चळवळीचा किंवा आंबेडकरवादी चळवळीचा एक आढावा नाही तर खोलात जाऊन प्रश्न कसा सोडवावा, या मुद्दय़ांची चर्चा करते.
हे पुस्तक सामाजिक चळवळीची अवनती झालेल्या पाश्र्वभूमीवर प्रकाशित झाले आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक चळवळी यांचे संबंध सल सध्या झाले आहेत. सामाजिक चळवळीचे संघटन करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते. राजकीय पक्ष आणि सामाजिक चळवळी यांचे संबंध सार्वजनिक धोरण निश्चितीसाठी आणि समूहांसोबत पक्षांनी कामे कशी करावीत यासाठीही उपयुक्त ठरणारे आहे. चळवळीतील नेतृत्वाने राजकारणाची उपेक्षा करण्यापेक्षा राजकारणात उतरावे. राजकारणाचे क्षेत्र व्यापक सार्वजनिक धोरण निश्चितीचे आहे. यामुळे राजकारणाचे चळवळीकरण आणि चळवळीचे राजकीयीकरण घडण्याची प्रक्रिया राजकीय क्षेत्राचा विस्तार करणारी आहे. म्हणजेच लोकशाही प्रक्रियेचा विस्तार करणारी आहे. यासाठीही हे पुस्तक नवे मुद्दे पुरवते.
मध्यम वर्ग किंवा नागरी समाजातील व्यक्ती राजकारणापासून फटकून होत्या. त्या आम आदमी पक्ष या स्वरूपात पुढे येत आहेत. अशा नवख्या पक्षांनाही या पुस्तकातील मुद्दे सामाजिक पाया विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरावेत असेच आहेत.
चव्हाण यांच्या विचारांची चौकट समजून घेऊनही हे पुस्तक सार्वजनिक धोरण, पक्षांचे चळवळीकरण, चळवळीचे राजकीयीकरण, दलित प्रश्नांची व्यापकता, आंबेडकरवादी चौकटीशी तुलना करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. रा. ना. चव्हाण यांनी संशोधक म्हणून लेख लिहिलेले नाहीत. मात्र समाजात मोठे प्रश्न निर्माण झाल्यावर ते प्रश्न कसे सोडवावेत, यासाठी विविध पर्याय देण्याची गरज असते. चव्हाण या लेखसंग्रहातून ‘दलित प्रश्न’ सोडवण्याचे विविध पर्याय देत आहेत. हे चव्हाण यांचे योगदान आहे. वरवरची चर्चा किंवा संशोधनातील बोजडपणा या पुस्तकात नाही. दलित समस्येबद्दल आस्था असल्यामुळे दलितांविषयीच्या अत्यंत जवळिकीतून हे पुस्तक साकारले गेले आहे. त्यामुळे त्याची भाषा व भाषाशैली वाचनीय आहे. मुद्दय़ांना सरळ स्पर्श केला आहे. शिवाय तौलनिक संबंध स्पष्ट केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ वैचारिक अंतराची स्पष्ट जाणीव करून देणारे आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित चळवळ : एक मागोवा’ – रा. ना. चव्हाण, संपादक-रमेश चव्हाण,
रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई, सातारा
पाने – ४००, मूल्य – ३५० रुपये.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
sanjay raut prakash ambedkar (4)
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”