सर्वसामान्य वाचकांपासून ते तज्ज्ञ व्यक्तींपर्यंत सर्वाना उपयुक्त ठरेल असा ‘संकल्पनाकोश’ (खंड १ ते ५)
सुरेश वाघे यांनी तयार केला असून तो लवकरच ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने लेखकाने सांगितलेली त्याची निर्मिती प्रक्रिया.
माझा मोठा मुलगा हेमंत काहीच्या बाही शंका विचारत असे. एकदा त्याने विचारले, ‘‘पाचावर धारण बसली तर घाबरगुंडी उडते, मग दहावर बसली तर काय होईल, हो पपा?’’
या अनपेक्षित प्रश्नाने माझीच पाचावर धारण बसायची वेळ आली. उडवून द्यावे का याला काही थातूरमातूर उत्तर देऊन, असे वाटले. पण नकोच ते. मनात विचार आला, खरेच काय होईल?
तिथून या प्रश्नाचे उत्तर धुंडाळण्याचा प्रवास सुरू झाला. कधीतरी उत्तर सापडले. मग मुलाचा पुढचा प्रश्न..‘‘पंचाग्नी म्हणजे पाच अग्नी, मग एक का नाही? दोन का नाही?’’
खरेच की! प्राचीन मराठी व संस्कृत वाङ्मयाचा धांडोळा घेतला तेव्हा तब्बल तेराएक अग्नी सापडले.. पण मुलाचे प्रश्न संपत नव्हते. आणि उत्तर शोधायचे माझे प्रयत्नही थांबत नव्हते.
मग मी मुलाच्याच नव्हे तर स्वत:च्या समाधानासाठी टिपा-टिपणे काढू लागलो. वाचू लागलो. एके दिवशी वाटले की, रोजेच्या इंटरनॅशनल थिसॉरसवर आधारित कोश का तयार करू नये? पण मराठीत अधिकृत शब्दकोश नव्हता. अनेक शब्दकोश असले तरी त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. विज्ञान व अभियांत्रिकी या दोन विषयांतील पदवीधर असल्यामुळे शब्दाची व्याख्या अचूक असली पाहिजे हे मूळ सूत्र मनात पक्के होते.
पण कोश लिहिण्याचा कोणताच अनुभव माझ्याकडे नव्हता. शंभरएक कथा व लेख प्रसिद्ध झाले असले तरी त्या अनुभवाचा कोशलेखनासाठी काहीही उपयोग नव्हता. शिवाय थिसॉरससारखा कोश करायचा तर व्याकरण व शुद्धलेखनाचे नियम पक्के हवेत. मग मी दामल्यांचे ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ कुठून तरी मिळवले. हजारएक पानांचा तो जाडजूड ग्रंथ पाहूनच मनावर दडपण आले, पण कोशाचा विचार येताच हुरूप आला. वाचत गेलो आणि एखाद्या कादंबरीसारखा त्यात गुरफटत गेलो. विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे दामल्यांची विवेचन पद्धती मनाला भिडत होती. शेवटचे पान वाचून संपवले नि मनावरले मळभ दूर झाले. आता राहिला प्रश्न शुद्धलेखनाचा. त्याचे नवे-जुने नियम वाचले.
संकल्पनाकोश करताना रोजेच्या थिसॉरसची तिसरी आवृत्ती डोळ्यांसमोर होती. एखादी संकल्पना, तिचे समानार्थी शब्द, प्रकार वा भाग देऊन नामे, विशेषणे, क्रियाविशेषणे व क्रियापदे देऊन अन्य माहिती पुरवायची, अशी रोजेची पद्धत.
हा संकल्पनाकोश सुरुवातीला दहा विभागांत कल्पिला होता. त्याचे प्रत्येकी दोनशेएक पानांचे आठ खंड होतील असा अंदाज होता. जवळजवळ दोन विभागांचे काम पुरे झाले. पण कधी कोश पुरा होऊन प्रसिद्ध होईल याची खात्री वाटेना.
योगायोगाने ‘ग्रंथाली’च्या दिनकर गांगलांची गाठ पडली. त्यांना मी कोशाबद्दल सांगितले. त्यांनी होकार भरला. ही गोष्ट १९९३ची. तेव्हा वाटले की वर्ष-दीड वर्षांत कोश प्रसिद्ध होईल.  पण परिस्थिती निराशाजनक होत होती. अशात विसावे शतक संपले. पहिल्यावहिल्या खंडाची प्रूफे हाती आली. मन क्षणभर मोहरून गेले. वाटले की, कोशाच्या इतर खंडांची प्रूफेही लवकरच हातात येतील आणि चार-पाच वर्षांत कोश प्रकाशित होईल. पण कसचे काय! असो. अखेर आता हा कोश प्रसिद्ध होत आहे.
पण हा कोश फक्त थिसॉरस नाही. तो त्यापुढे जाणारा आहे. थिसॉरसमध्ये समानार्थी व विरुद्धार्थी शब्द दिलेले असतात. क्वचित प्रकार किंवा भाग दिलेले असतात. इंग्रजीत नानाविध कोश सहज उपलब्ध असल्यामुळे थिसॉरसला त्याच मर्यादेत ठेवले तरी चालते.
हा कोश करताना माझ्या डोळ्यांसमोर वाचक होता, तो शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेला आणि भाषेबद्दल कुतूहल असलेला. म्हणून प्रत्येक संकल्पनेत विस्तृत तक्ते दिले आहेत. उदाहरणार्थ, ‘सोळा संस्कारां’बद्दल माहिती देताना आणखी सोळा संस्कार आढळले, तेव्हा तेही देऊन त्यांचे विवेचन केले. दुसरे, ‘कन्या’ म्हणजे अविवाहित मुलगी. मग ‘पंचकन्या’त सर्व विवाहिता कशा, याचा मागोवा घेत मूळ श्लोक व अन्य पंचकन्या उद्धृत केल्या.
असा कोश प्रसिद्ध करण्याचे स्वप्न केवळ माझेच नव्हते तर आद्य कादंबरीकार बाबा पद्मनजी यांनीही पाहिले होते. १८५१ मध्ये रोजेने पहिला थिसॉरस प्रसिद्ध केला. त्या धर्तीवर पद्मनजी यांनी ‘शब्दरत्नावली’ ही चिमुकली पुस्तिका तयार केली. तिच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘‘सहस्रावधि महाराष्ट्र शब्द आहेत त्यांतील कित्येक निवडून एक लहानशी शब्दरत्नावली नामक वही केली आहे. ही केवळ पुढे उभारायच्या एका मोठय़ा इमारतीची भूमिका किंवा पाया आहे असे समजावे. त्या इमारतीचा बेत इथे सांगवत नाही, व तिचा नकाशा काढून दाखविण्याची गरजही दिसत नाही..’’
या संकल्पनाकोशाच्या माध्यमातून मी पद्मनजी यांचेही स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
जवळजवळ बत्तीस वर्षे केलेल्या श्रमाचे फळ म्हणून हा संकल्पनाकोश आता पाच खंडांमध्ये वाचकांसमोर येत आहे. हे काम शिवधुनष्य पेलण्यासारखे होते, असे मी म्हणणार नाही. मात्र या कोशासाठी अनेकांचा हातभार लागला आहे, एवढे नक्की!