25 February 2021

News Flash

पुस्तक परीक्षण : महामानवाशी काव्यात्म संवाद

सध्या देशात परस्पर अविश्वास, द्वेष आणि तिरस्कार यांनी समाजातील सर्व घटक धुमसत आहेत.

अंजली कुलकर्णी

९० नंतरच्या काळात जे कवी वेगळ्या, सजग ऊर्मीसह आणि ठाम वैचारिक भूमिकेसह कविता लिहू लागले त्यात अजय कांडर हे नाव महत्त्वाचे आहे. नुकतीच त्यांची ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घकविता प्रकाशित झाली आहे. ही कविता म्हणजे कांडर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य मध्यवर्ती ठेवून लिहिलेले प्रदीर्घ चिंतनकाव्य आहे. कवी म्हणून आपल्यावर काळाने सोपवलेली नैतिक जबाबदारी असते आणि तिच्याबाबत आपण कायम सतर्क राहिले पाहिजे, ही त्यांची धारणा आहे. ‘युगानुयुगे तूच’ या कवितेच्या निर्मितीचा स्रोत वर्तमान समाजरचनेत निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीतून आलेल्या अस्वस्थतेत आहे; ज्याची उत्तरे शोधण्यासाठी कवीला आंबेडकरांकडे वळावेसे  वाटले.

सध्या देशात परस्पर अविश्वास, द्वेष आणि तिरस्कार यांनी समाजातील सर्व घटक धुमसत आहेत. आज गरज आहे ती पुन्हा एकदा मानवतेच्या मूल्यांचा जागर करण्याची. या कवितेचे स्वरूप निवेदकाने बाबासाहेबांशी केलेल्या उत्कट संवादासारखे आहे. डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेले तत्त्व आणि समाजाने त्या तत्त्वांना दिलेले चुकीचे स्वरूप यांतील अंतरायाने अंतर्यामी व्याकूळ झालेल्या कवीचा हा आत्मसंवाद आहे. या चिंतनकाव्याचा प्रारंभ एक प्रकारच्या आत्मटीकेने होतो. बाबासाहेबांना विभूतीपूजेचा तिरस्कार होता. त्यांनी विज्ञानाच्या कसोटीवर तत्त्व पारखून घेण्यावर भर दिला. बाबासाहेब जनतेसाठी मानवतावादी जीवनमूल्यं घेऊन आले होते. म्हणूनच कवी म्हणतो-

‘तुला भजत राहण्यापेक्षा

इथल्या निसर्गानुसारच जगणं

म्हणजे तूच पुन्हा पुन्हा

विचाराच्या बीजातून रुजून येणं’

बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या रूपानं पाण्यात विषमतेचे विष कालवणाऱ्यांशी संघर्ष केला. तृष्णेचे महत्त्व बाबासाहेब जाणत होते. म्हणूनच त्यांनी दया, करुणा, प्रेम, पंचशील सांगणाऱ्या बुद्धाचा मार्ग अनुसरला. निसर्गनिर्मित पाण्यावर सर्व मानवांचा समान हक्क आहे, हाच संदेश बाबासाहेबांनी या आंदोलनातून दिला.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी स्वातंत्र्याचा आशय इथल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळा लढा लढावा लागणार याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच इथल्या जातीच्या तुरुंगात अडकलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी संघर्ष पुकारला. म्हणूनच अजय कांडर जेव्हा लिहून जातात की, ‘आत्मसन्मान हीच / दु:खापेक्षाही मोठी असते गोष्ट ’- तेव्हा बाबासाहेब नेमके काय सांगत होते याची खूण पटते. बाबासाहेबांनी शोषित, वंचितांमध्ये आत्मसन्मानाने जगण्याची उमेद जागवली. ते फक्त दलितांचे कैवारी होते असे म्हणणे पुरेसे ठरणार नाही. आज अतिरेकी ध्रुवीकरणाच्या युगात जातिधर्माच्या अस्मिताच माणसांच्या दुश्मन कशा ठरत आहेत हे आपण उघडय़ा डोळ्यांनी बघतो आहोत. म्हणूनच जेव्हा कवी म्हणतो की, ‘तू फक्त माणूस वाटलास माणसांसाठी झटणारा/ म्हणूनच तू झालास माझ्यासाठी/ युगानुयुगांचा नायक’- तेव्हा त्यातील  सार्थता अधोरेखित होते. बाबासाहेब कुणाच्याही विरोधात नव्हते, तर ते माणसांच्या आणि मानवतेच्या बाजूने होते. भेदांच्या भिंती उद्ध्वस्त करण्यासाठी समाजात विद्रोहाचा अंगार चेतवताना शोषितांनी स्वत:ला सर्वार्थाने सक्षम बनवले पाहिजे अशी त्यांची धारणा होती अजय कांडर बाबांचे हे विचार मांडताना म्हणतात- ‘प्रगल्भतेसाठी/ अज्ञानातूनही मुक्त व्हावं लागतं..’ पण त्यापुढे जाऊन कवी ‘आम्ही मात्र ग्रंथ म्हणजे केवळ पोकळ प्रतिष्ठेची प्रतीके बनविली’ असल्याचे वास्तव चित्र उभे करतो.

बाबासाहेबांचे जीवनकार्य महाकाव्यातही मावणार नाही इतके प्रचंड आहे. अर्थशास्त्र-नीतीपासून धर्म, समाज, राज्यशास्त्र, कृषी आणि पत्रकारितेपर्यंत असंख्य विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. दारिद्रय़ाच्या उच्चाटनासाठी लोकसंख्या आटोक्यात ठेवावी लागते, हा विचार मांडून ‘राष्ट्राच्या हितातूनच आपलेही हित घडत असते’ असे त्यांनी सांगितले. देशातील कृषी अर्थव्यवस्थेविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सामुदायिक शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड देण्याचे सूत्र असेल; पण आपण मात्र शेतजमिनी कसण्यापेक्षा तिचे तुकडे करण्यात आणि तिचे रोख पैशात रूपांतर करण्यातच धन्यता मानली.

बाबासाहेब आंबेडकरांच्या विशाल  कर्तृत्वातील शिरपेच म्हणावा असे त्यांचे कार्य म्हणजे संविधाननिर्मिती. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य आणि न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी देशाच्या कारभाराची संरचना तयार केली. शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या तीन यंत्रणांचे सुंदर, सूक्ष्म जाळे विणले. परंतु संविधानही पायदळी तुडवून सांविधानिक मूल्यांपासून दूर जात अराजकाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत, ही खंत या दीर्घ- कवितेत कवीने फार तळमळीने मांडली आहे.

या चिंतनकाव्यात स्त्रीविषयक संवेदन येणे अपरिहार्य होते. कारण बाबासाहेबांनी व्यवस्थेच्या संदर्भात स्त्रियांचा विचार केलेला होता. इथली जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यवस्था एकमेकींना पूरक आहेत. किंबहुना, एकाच  विषमतामूलक व्यवस्थेचे ते दोन कोन आहेत, हे त्यांनी दाखवून दिले. ‘स्त्री हे जातिव्यवस्थेचे प्रवेशद्वार आहे,’ असे सांगून तिच्याद्वारेच जातिसंस्थेला बंदिस्त केले आहे, हे  ऐतिहासिक सत्य त्यांनी प्रकाशात आणले. बाबासाहेबांनी स्त्रियांना ‘तुम्ही स्वत:ला पुरुषांच्या गुलाम समजू नका..’ इतक्या साध्या शब्दांत पुरुषप्रधानतेचे ओझे दूर फेकून द्यायला प्रेरित केले. कवी अजय कांडर लिहितात-

‘एका बाईच्या गुलामीतून

पुढील अनेक पिढय़ान्पिढय़ांना

पत्करावी लागते गुलामी’

या ओळी सावित्रीबाईंच्या ‘एक स्त्री शिकली तर अख्खे कुटुंब शिकते’ या ओळीच्या काऊंटर पार्ट वाटाव्यात अशा आहेत आणि म्हणूनच फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा धागा पुढे नेणाऱ्या आहेत. बाई स्वत: गुलामगिरीच्या चरकातून जन्मापासूनच पिळून निघत असते आणि म्हणूनच बाई माणसाकडे माणूस म्हणून अधिक सहृदयतेने, संवेदनशीलतेने पाहू शकते या वास्तवाला कांडर नेमकेपणाने चिमटीत पकडतात. ‘पण बाईच्या जातीनुसार तिच्या अन्यायाची व्याप्ती वाढत जातेय..’ आणि पुढे ते म्हणतात- ‘मग सर्व स्तरांतील बाईला मात्र एकाच वेळी भोगवस्तू कसे समजले जाते?’ या प्रश्नातून स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषप्रधान व्यवस्थेने स्वीकारलेला सोयीस्कर अंतर्विरोध ते नेमकेपणाने हेरतात.

एकूणच बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे रुजवले, ते ते नेस्तनाबूत करण्यातच आम्ही मग्न राहिलो. अजय कांडर म्हणतात त्याप्रमाणे-

‘लोकशाहीची फळे समतेने चाखायला गेल्यास

ती गोडच लागतात

पण गोड फळांमध्ये विष उतरवायलाच

अधीर झालो आम्ही’

समाजातील विवेकवादी, उदारमतवादी, बहुसांस्कृतिकतेचा आदर करण्याचा मार्ग सोडून द्वेष आणि तिरस्काराची भावनाच आम्ही जपत राहिलो. खरे तर आज बाबासाहेबांनी स्वत: अनुसरून सांगितलेल्या बुद्धाच्या प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांतीच्या मार्गाने जाण्याची गरज आहे. या चिंतनकवितेत कवी आपल्याला बाबासाहेबांकडून बुद्धाकडे आणि परत बुद्धाकडून बाबासाहेबांकडे आणतात.

‘तुला भेटणे म्हणजेच बुद्धाला भेटणे

आणि बुद्धाला भेटणे म्हणजेच

दीनदुबळ्यांवर आयुष्याच्या अंतापर्यंत प्रेम करणे!’

..या ओळी आपल्याला एका प्रगाढ सत्याच्या प्रकाशात ऊर्जस्वल करतात.

युगानुयुगे तूच’- अजय कांडर, लोकवाङ्मय गृह,

पृष्ठे- ६६, मूल्य- १२० रुपये.

anjalikulkarni1810@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 1:05 am

Web Title: book review yuganuyuge tuch by ajay kandar zws 70
Next Stories
1 दखल : वास्तवदर्शी लेखन
2 मोकळे आकाश.. : आभास हा!
3 थांग वर्तनाचा! : ‘आपण’ आणि ‘ते’ची फॉल्ट लाइन
Just Now!
X