जागतिक कीर्तीचे सतारवादक पं. रविशंकरजी यांचे वर्णन ‘भारतीय शास्त्रीय संगीताचे राजदूत’ असेच करणे योग्य ठरेल. भारतीय अभिजात संगीताला पाश्चात्य जगामध्ये केवळ मान्यताच नाही, तर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय पं. रविशंकरजी यांच्याकडे जाते. सतार आणि पं. रविशंकरजी हे दोन शब्द इतके एकरूप झाले आहेत, की जगामध्ये कोठेही सतार म्हटले की आपोआपच रविशंकरजींचे नाव घेतले जाते. संगीत क्षेत्रातील दोन ख्यातनाम कलाकारांनी पं. रविशंकरजी यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा..

सतारवादनामध्ये उजव्या हाताची एक भाषा आहे. त्याला ‘सतारीचे बोल’ म्हणतात. उजव्या हाताने सतारीवर या बोलाच्या माध्यमातून नाद निर्माण करता येतो. हा नाद घेऊन डावा हात त्याचे सुरांमध्ये रूपांतर करतो. या दोन्हीचा संगम साधण्यामधून सर्जनशील वादकाची वैशिष्टय़े आढळतात. पं. रविशंकरजी यांनी याचा खुबीने आणि कुशलतेने वापर केला. त्यांच्या वादनामध्ये सतारीचे बोल लयीच्या अंगाने जातात. त्याला संगीताच्या संज्ञेमध्ये ‘तंत अंग’ असे म्हटले जाते. मराठी साहित्यामध्ये पुलंची वेगळी शैली आहे. वपुंची स्वतंत्र शैली आहे. त्याचप्रमाणे संगीतामध्ये तंत अंगाला प्राधान्य देऊन पं. रविशंकरजी यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली. संगीत हे भावविश्वाचे माध्यम आहे. संगीत सादर करणारा कलाकार आणि ते ऐकून त्याचा रसास्वाद घेणारा रसिक हे दोघेही एकाच भावविश्वात प्रवेश करतात.
शास्त्राला धरून सादर होते ते संगीतशास्त्र. हे शास्त्र व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे तंत्र. मात्र, हे संगीत कलेच्या रूपात येते तेव्हा ‘मूड्स’चा परिणाम होतो. संगीतामध्ये निरनिराळे मूड्स निर्माण करता येतात. त्याला ‘नृत्यभाव’ म्हणतात. मनामध्ये भाव निर्माण झाला म्हणजे कलाकारालाही आपल्या कलेचा आविष्कार सादर करताना आनंद होतो. हा नृत्यभाव पंडितजींच्या वादनामध्ये होता.
एकदा दिल्लीला एका लग्नामध्ये माझी आणि त्यांची भेट झाली. पंडितजींच्या शिष्याच्या मुलीचा विवाह माझ्या शिष्याच्या मुलाशी झाला. एका अर्थाने मी वरपित्याचा गुरू आणि पंडितजी वधुपित्याचे गुरू होते. माझ्यासमवेत माझी मुलगी होती. पंडितजींनी तिला ओळखले. ‘ये आपकी बेटी है ना?,’ असे त्यांनी विचारताच मी ‘हो,’ म्हणालो. ‘ये सतार बजाती है के नहीं?,’ अशी त्यांनी चौकशी केली. तेव्हा ‘मुझसेही सिख रही है,’ असे मी त्यांना सांगितले. ‘मेरी बेटी भी बजाती है,’ असे सांगताना पित्याचा रास्त अभिमान आणि त्यांच्यात असलेली बालकाची निरागसता या दोहोचे दर्शन मला घडले. आमची जेव्हा भेट होत असे तेव्हा ते माझ्या कुटुंबातील लोकांविषयी आवर्जून चौकशी करायचे. आमच्यामध्ये आशीर्वादपर चर्चा होत असे. मी सतारवादनाची परंपरा असलेल्या घरातील आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळे मला त्यांचे मार्गदर्शन लाभू शकले नाही.
कलाविष्कारासाठी स्वरमंचावर आल्यानंतर पंडितजी श्रोत्यांशी संवाद कसे साधतात, या गोष्टीतूनही बरेचसे शिकण्यासारखे आहे. ते ज्या काळात परदेशामध्ये गेले, त्यावेळी भारतीय संगीत तासभरदेखील ऐकले जात नसे. पाश्चात्य संस्कृती, तिथले देश, भाषा आणि राहणीमान सगळेच वेगळे आहे. त्यामुळे पाश्चात्य लोकांना आपले संगीत कसे आवडेल, या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या संगीतामध्ये बदल करून ते सादर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परदेशात भारतीय शास्त्रीय संगीत रुजविण्यामध्ये पंडितजींचे योगदान खूप मोठे आणि निर्विवाद आहे. त्यांनी केलेल्या कष्टांची फळे आता आम्हाला मिळत आहेत. आज आमच्यासारख्या पुढच्या पिढीतील कलाकारांना परदेशात कला सादर करताना कुठलीही तडजोड करावी लागत नाही. आमचे संगीत आनंदाने श्रवण करणारे श्रोते लाभतात. याचे श्रेय पंडितजींनाच द्यावे लागेल. पाश्चात्य देशांमध्ये अभिजात भारतीय संगीताचा बोलबाला आहे. त्याची सुरुवात त्यांनीच केली. एका अर्थाने पंडितजी हे भारतीय संगीताचे राजदूत होते असे म्हणणे सार्थ ठरेल.
मी १७-१८ वर्षांचा होतो तेव्हा पुण्यामध्येच पंडितजींचे सतारवादन ऐकले होते. त्यांच्या सतारवादनाचा पगडा माझ्यावर इतका बसला, की आपणही त्यांच्यासारखेच वादन करावे अशी प्रेरणा मिळाली. संगीताचे सादरीकरण करताना त्यांनी कधीही सीमा बांधून घेतल्या नाहीत. कलेकडे व्यापकतेने पाहण्याची त्यांची दृष्टी होती. संगीतामध्ये त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग केले. संगीत क्षेत्रातील अनेक युवक कलाकार आज त्यांचे अनुकरण करताना दिसतात. सतारीमधील दोन तारांतील अति मंद्र सप्तकातील तारेला बारीकशी क्लिप लावण्याची अभिनव संकल्पना त्यांनीच अस्तित्वात आणली. त्यामुळे वाद्यातून कला सादर करताना सुरांचा गोंगाट कमी होईल असा त्यांचा होरा होता. हा त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. त्यानंतर अशा स्वरूपाच्या सतारींची निर्मिती झाली आणि या सतारीचे ‘रविशंकर सतार’ असे नामकरण झाले.
सतारवादन करताना पंडितजींनी परंपरा कायम राखली. गतीचा विचार करताना त्यांनी निरनिराळ्या तालामध्ये वाजवण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्याचप्रमाणे लयकारीबद्दलही त्यांनी विस्ताराने विचार केलेला होता. ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांच्यासमवेत त्यांचे सतारवादन खुलायचे. या दोन दिग्गज कलाकारांनी ‘सवाल-जवाब’ची सुरुवात केली. कर्नाटक संगीतातून घेतलेला ‘सवाल-जवाब’ हा विचार या दोघांनी वादनातून रुजवला. आता सवाल-जवाब या प्रकाराचा खेळखंडोबा झाल्याचे दिसते आहे. पंडितजींनी अभिजात संगीत जगभर पोहोचविले.
पंडितजींनी केवळ शास्त्रीय संगीतापुरतेच स्वत:ला बांधून घेतले नाही. सिनेसंगीतामध्येही त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांनी या क्षेत्रात केलेले काम मोजकेच असले तरी त्यातील संगीताच्या अभिजाततेमुळे ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. त्यांच्यातील सृजनशील कलाकार सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत राहिला. संगीत हे अनंत आहे असे जे म्हटले जाते त्याची अनंतता पंडितजींनी अनुभवली. एवढेच नव्हे तर रसिकांनाही त्यांनी या अनंततेची प्रचीती दिली. येहूदी मेन्युहिन आणि बिटल्स यांच्यासारख्या पाश्चात्य कलाकारांसमवेत काम करताना त्या संगीताशी मिळून-मिसळून घेतानाचा बदल त्यांनी मोकळेपणाने स्वीकारला. त्यामुळे जगभरात पंडितजींचे नाव आदराने घेतले जाते.
उस्ताद अली अकबर खाँसाहेब आणि पं. रविशंकरजी यांच्यामध्ये नाते होते. तसेच ते परस्परांचे गुरूबंधूही होते. या दोन कलाकारांची एक जुगलबंदी फारच गाजली. १९८२ मध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे झालेल्या या जुगलबंदीचा मी एक श्रोता होतो. जुगलबंदीत स्पर्धा नसते. दोघांनी मिळून आपली कलाकृती घडवताना एकमेकांचा मान ठेवून आणि परस्परांविषयीचा आदरभाव व्यक्त करतच हा कलाविष्कार सादर करायचा, याची जाण पंडितजींना होती. त्यामुळे जुगलबंदी सादर करताना केवळ आपणच मुख्य कलाकार नाही याचे भान त्यांना होते. मानवी स्वभावाचे कंगोरे कलेच्या प्रांतामध्ये दिसत नाहीत याची ती ग्वाही होती.     
    
संगीताचे हृदयसम्राट
उस्ताद शाहीद परवेझ
पं. रविशंकरजी यांच्या महानतेचे वर्णन करण्यासाठी माझ्यापाशी शब्दच नाहीत. किंबहुना त्यांच्याविषयी काही बोलण्याची माझी पात्रताही नाही. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद अली अकबर खाँसाहेब आणि उस्ताद विलायत खाँ यांच्यासारखे दिग्गज कलाकारच पं. रविशंकरजी यांच्या संगीताविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात. पण दुर्दैवाने हे दोघेही कलाकार आज आपल्यामध्ये नाहीत. मी पंडितजींचा केवळ अनुयायी आहे. मी त्यांच्याविषयी काय बोलणार?
पं. रविशंकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताचे आधारस्तंभ, आमच्यासारख्या संगीतकारांचे आदर्श आणि संगीताचे हृदयसम्राट! आपल्या संगीताने त्यांनी केवळ भारताचेच नाही, तर आम्हा सर्व कलाकारांचे नाव मोठे केले. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्राची मोठी हानी झाली आहे यात शंकाच नाही. त्यांचे आपल्यामध्ये नसणे ही उणीव कोणीही भरून काढू शकणार नाही. पंडितजींना ‘भारतरत्न’ जाहीर झाले तेव्हा मी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. ‘आप तो भारतरत्न हैही. खाली ये अ‍ॅवार्ड अभी मिला है. ये अ‍ॅवार्ड हम सबको मिला है ऐसी मेरी भावना है,’ असे मी त्यांना म्हणालो होतो. आमच्यासारखे कलाकार आता परदेशामध्ये जाऊन आपली कला सादर करतात. आमच्यासाठी हा रस्ता पंडितजींनीच तयार केला, हे आम्हाला कदापिही विसरता येणार नाही.  
दिल्ली येथे माझ्या सतारवादनाच्या मैफिलीला पंडितजी मला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. ते आले तेच मुळी व्हीलचेअरवर बसून. त्यांच्या नाकाला ऑक्सिजन मास्क लावलेला. मी आदराने त्यांना वाकून नमस्कार केला. ‘बेटा, पैर मत छू. गले लग जा..’ असे म्हणत त्यांनी मला जवळ घेतले. ‘बिमार हूँ, इसलिये तेरी कॉन्सर्ट पुरी तरहसे सुन नहीं पाऊंगा,’ असे ते म्हणाले. ‘एक बार मेरे घर आके बजा,’ असेही त्यांनी मला त्यावेळी सांगितले. ‘तूने परमेश्वरी राग अच्छा बजाया,’ असे एकदा ते मला म्हणाले तेव्हा मी ‘ये राग तो आपही ने बनाया है और सिखाया भी है,’ असे त्यांना म्हणालो. पं. रविशंकरजी यांच्याकडूनच मी सतारवादनाची प्रेरणा घेतली. ते अत्युच्चतेच्या ज्या शिखरावर होते, तेथे कोणीही पोहोचू शकणार नाही असे मला वाटते.