29 October 2020

News Flash

हास्य आणि भाष्य : मॅक : खुसखुशीत विनोद, अप्रतिम रेखाटन

इंग्लंडमध्ये मॅक खूपच लोकप्रिय व्यंगचित्रकार आहेत. मार्गारेट थॅचर, फ्रांक सिनात्रा, बीटल्स इत्यादींशी त्यांचा स्नेह होता आणि त्यांची ओरिजिनल व्यंगचित्रं त्यांच्या संग्रही आहेत.

मॅक यांना ‘मेंबर ऑफ  ब्रिटिश एम्पायर’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मानही मिळाला आहे.

प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

‘‘पन्नास वर्षांपूर्वी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत मी हातात काही स्केचेस, पेन्सिल वगैरे घेऊन एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात राजकीय व्यंगचित्रकार म्हणून मुलाखत देण्यासाठी गेलो होतो. माझ्या सोबत आणखीही तिघे जण होते. राजकीय व्यंगचित्रकार होणं हे  माझं स्वप्न होतं. दोन दिवस आम्हा सर्वाची चित्रं प्रसिद्ध झाली. त्यांनी मला आणखी सहा महिने ‘ट्रायल’ म्हणून चित्रं काढण्यासाठी नेमलं. महत्त्वाचं म्हणजे यासाठी मी कुणालाही लाच दिली नाही!! त्यावेळी मला काय माहीत, की मी याच वर्तमानपत्र समूहासाठी पुढे पन्नास र्वष रोज चित्र काढणार आहे म्हणून!! मी रुजू झालो आणि  यथावकाश हे ‘डेली स्केच’ वृत्तपत्र बंदच पडलं. मात्र, नंतर मला त्यांच्याच भावंडाने- म्हणजे ‘डेली मेल’ने सामावून घेतलं. सुदैवाने संपूर्ण कारकीर्दीत मला अत्यंत चांगले संपादक मिळाले. त्यांची विनोदबुद्धी उच्च दर्जाची होती..’’ ब्रिटिश व्यंगचित्रकार मॅक (जन्म १९३६) यांनी त्यांच्या आठवणींत लिहिलंय.

स्टैनली मॅकमूरट्राय हे अवघड नाव असलेल्या या गृहस्थाने नंतर सर्व ब्रिटिश वाचकांच्या मनात लक्षात राहील असं ‘मॅक’ (Mac)  हे साधं, सोपं नाव घेतलं आणि ते खरोखरच पुढची पन्नास-पंचावन्न र्वष सर्वाच्या मनावर बिंबलं गेलं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते निवृत्त झाले आणि निवृत्त होतानाच्या त्यांच्या भावना त्यांनी सोबतच्या व्यंगचित्रात मांडल्या आहेत. खास व्यंगचित्रकारांसाठी असलेल्या वृद्धाश्रमात जायला मॅक नकार देत आहेत अशा आशयाचं हे व्यंगचित्र आहे. यातून मॅक यांची केवळ विनोदबुद्धी दिसून येत नाही, तर शेवटपर्यंत कार्यरत राहण्याचा त्यांचा सकारात्मक आग्रहही दिसतो. निवृत्त होताना ‘डेली मेल’ने सन्मान म्हणून त्यांची व्यंगचित्रं असलेली आठ पानी पुरवणी काढली. त्यात ‘डेली मेल’ने म्हटलंय की, ‘मॅक यांची व्यंगचित्रं हा ब्रिटिश लोकांच्या ब्रेकफास्टचाच एक भाग होता. त्यांची व्यंगचित्रं क्रूर नक्कीच नाहीत. ती खिल्ली उडवणारी आणि क्वचित सिनिकल असतात. पण ती गालातल्या गालात हसायला लावणारी नक्कीच आहेत.’

इंग्लंडमध्ये मॅक खूपच लोकप्रिय व्यंगचित्रकार आहेत. मार्गारेट थॅचर, फ्रांक सिनात्रा, बीटल्स इत्यादींशी त्यांचा स्नेह होता आणि त्यांची ओरिजिनल व्यंगचित्रं त्यांच्या संग्रही आहेत. ‘‘प्रत्येक नवा दिवस हा नवी बातमी, नवं आव्हान अशा स्वरूपात सामोरा येतो आणि मी स्वत:ला हार्ट अटॅक येऊ न देता ते आव्हान पन्नास र्वष पूर्ण करत आलो,’’ असं ते गमतीने सांगतात. ‘‘वर्तमानपत्रांत येणाऱ्या रोजच्या बातम्या या अतिशय निरस, बेचव आणि निराशाजनक असतात. त्यांना मी हास्याच्या माध्यमातून चटकदार बनवतो,’’ असं ते म्हणतात.

‘कार्टूनिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार त्यांना अनेक वेळा मिळाला. इंग्लंडमध्ये राहून त्यांनी खुद्द राणी, राजवाडा आणि तिथल्या प्रथा यांच्यावरही भरपूर व्यंगचित्रं काढली; जी खुद्द ब्रिटिश राजघराण्यानेही एन्जॉय केली. राजवाडय़ाच्या आमंत्रणावरून ते प्रत्यक्ष राणीला जाऊन भेटले आहेत आणि त्यांना ‘मेंबर ऑफ  ब्रिटिश एम्पायर’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मानही मिळाला आहे.

अर्थात या पन्नास वर्षांत त्यांच्या व्यंगचित्रांवरून काही वादही झाले. प्रामुख्याने वर्णद्वेष किंवा स्थलांतरांबाबत अनुदार दृष्टिकोन बाळगणं वगैरे आक्षेप त्यांच्या काही व्यंगचित्रांबद्दल घेतले गेले आणि त्याबद्दल काही वेळेला वृत्तपत्रानेही माघार घेतली.

वृत्तपत्रांत येणाऱ्या अत्यंत क्षुल्लक बातम्या घेऊन त्यावर जबरदस्त व्यंगचित्रं रेखाटणं हे मॅक यांचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. उदाहरणार्थ, एकदा मँचेस्टर युनायटेडचा त्यावेळचा लोकप्रिय फुटबॉलपटू जॉर्ज बेस्ट याची अति मद्यपानामुळे यकृत बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. पण नंतर त्यातून काहीही न शिकता तो पुन्हा अति मद्यपान करू लागला. इतका, की त्याच्या उच्छृंखल वागण्याने त्याचं वैवाहिक जीवनही संकटात सापडलं. या बातमीवर मॅक यांनी  झकास व्यंगचित्र काढलं. एका हॉस्पिटलमध्ये अगदी मरणासन्न अशा अवस्थेतील एका साध्या व्यक्तीला डॉक्टर समजावत आहेत की, ‘तुम्ही अत्यंत प्रामाणिक, सरळमार्गी, निव्र्यसनी जीवन जगला आहात. तर तुम्ही तुमचा मेंदू जॉर्ज बेस्टला अवयवदान कराल का?’ या व्यंगचित्रामुळे इंग्लंडमधले सगळे वाचक, फुटबॉलचे चाहते आणि खुद्द जॉर्ज बेस्ट हाही मोठय़ाने हसला असेल, हे नक्की!!

मॅक यांची चित्रकला अप्रतिम म्हणजे अप्रतिमच आहे. उत्तम चित्रकलेचे सर्व नियम ते काटेकोरपणे पाळतात. वेगवेगळ्या कोनांतून ते एखाद्या प्रसंगाचं चित्रण इतक्या सुंदरपणे करतात की ते पाहतच राहावे. काळा, पांढरा, करडा अशा रंगांतून छाया-प्रकाशाचा प्रभावी वापर ते करतात. पण हे करत असताना आपण व्यंगचित्र काढत आहोत याचं भान ते कधीही सुटू देत नाहीत. चित्रातली सर्व पात्रं ही कार्टून कॅरेक्टर आहेत हे ते लक्षात ठेवतात. सर्व प्रकारचे प्राणी- म्हणजे घोडा, मांजर, कुत्रे, पक्षी ते वेगवेगळ्या कोनांतून रेखाटतात. विशेष म्हणजे शेकडो लोकांची अर्कचित्रंही ते सुंदर पद्धतीने विविध हावभावांसकट काढतात. आणि अर्थातच सोबतीला गालातल्या गालात हसू येईल असं  खुसखुशीत, नर्मविनोदी भाष्यही ते करतात. त्यांच्या चित्रांत आवर्जून पाहत राहावं असं काय असेल, तर ते बारीकसारीक तपशील! उदाहरण म्हणून एक चित्र पाहता येईल. नेल्सन मंडेला यांची दक्षिण आफ्रिकेच्या तुरुंगातून २७ वर्षांनंतर सुटका झाली या बातमीवरचं हे चित्र आहे. ‘‘बरं झालं बाई, घरात पुरुष माणूस असलं की जरा बरं वाटतं!’’ असं नेल्सन यांच्या पत्नी विनी का म्हणताहेत हे चित्रात आलंच आहे. (२७ वर्षांचा पसारा!) चित्रात बारीकसारीक भांडीसुद्धा त्यांनी कशी चितारली आहेत हे बघण्यात आपण गुंग होऊन जातो.

ग्रीस ऑलिम्पिक २००४ च्या सुमारास काढलेलं हे सोबतचं चित्र एक नमुना म्हणून पाहता येईल. त्याची पाश्र्वभूमी अशी आहे की, ऑलिम्पिक अगदी तोंडावर आलेलं असताना मुख्य स्टेडियमचं बांधकाम अजून अपूर्णच आहे. आणि ऑलिम्पिक ज्योत घेऊन खेळाडू मात्र स्टेडियमच्या जवळपास पोहोचले आहेत. अशा वेळी काय होणार, वगैरे चर्चा सुरू होती. या चित्रात तो खेळाडू ऑलिम्पिक ज्योत हातात तशीच ठेवून एका रेस्टॉरंटमध्ये टाइमपास करतोय. त्याने रिचवलेले अनेक पेले याची साक्ष देत आहेत. दरम्यान, रेस्टॉरंट मालकाला स्टेडियमवरून फोन आलाय आणि तो त्या खेळाडूला सांगतोय की, ‘तुला आता निघायला हरकत नाही. स्टेडियमचं काम पूर्ण झालंय!’ या चित्रातले तपशील पाहण्यासारखे आहेत. टिपिकल युरोपमधल्या रेस्टॉरंटबाहेरचं दृश्य, टाइमपास म्हणून लोक बीयर घेत आहेत. प्रकाश आणि सावली यांचा अप्रतिम परिणाम दाखवलेला आहे. हॉटेल मालकाचा पेहराव, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, अर्धवट बाहेर येऊन निरोप सांगणं.. हे सारं अगदी मनमोहक. निवांतपणा अधोरेखित करण्यासाठी एक नव्हे, तर चक्क दोन मांजरं दाखवली आहेत. अगदी बारकाईने बघितलं तर ज्योत घेऊन धावत येणाऱ्या खेळाडूचं नाकही थोडंसं तिच्या उष्णतेमुळे भाजलेलं त्यांनी दाखवलं आहे.

मॅक यांच्या बऱ्याच चित्रांत एका बाईचं अस्तित्व असतं. ती म्हणजे त्यांची पत्नी लीझ. ती कुठेतरी लपलेली असते. तिला चित्रातून शोधून काढणं हा अनेक लोकांचा छंद असतो. चर्चमधल्या अनेक गैरप्रकारांबद्दलही त्यांनी भरपूर व्यंगचित्रं काढली आहेत आणि ती वाचकांनीही (‘आमच्या धार्मिक भावना प्रचंड दुखावल्या..’असा गळा न काढता!) खेळीमेळीने स्वीकारली आहेत.

१९८२ सालच्या त्यांच्या एका व्यंगचित्राच्या संग्रहाचं मुखपृष्ठही खास पाहावं असं आहे. व्यंगचित्रकार मॅक ड्रॉइंग बोर्डसमोर बसले आहेत. चित्र काढण्यासाठीचा सगळा जामानिमा तयार आहे. पेन्सिल समोर धरून, एक डोळा बारीक करून मॅक कुणाची तरी मापं घेताहेत. ती कुणाची आहेत, हे पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दाखवलं आहे. इंग्लंडमधले सगळे तत्कालीन राजकीय नेते पोझ देऊन उभे आहेत. दस्तुरखुद्द पंतप्रधान मार्गारेट थॅचर या त्यावेळच्या पंतप्रधान असल्याने त्यांच्यासाठी खास कोचची व्यवस्था केलेली आहे. या सर्वाना हुडहुडी भरू नये म्हणून हीटरची व्यवस्थाही आहे. थॅचर सोडल्या तर सगळे नेते हे घाबरलेले दिसत आहेत. असो.

हे असं आक्षेपार्ह (!) व्यंगचित्र काढल्याबद्दल त्या देशाच्या संसदेत गदारोळ, घोषणा, सभात्याग आणि सोबत नैतिकता, संयम, मर्यादा, पूज्य परंपरा, चरित्र इत्यादी शब्दांचा संतप्तपणे वापर करून हक्कभंग प्रस्ताव पारित झाल्याचं ऐकिवात नाही! तसंच तिथल्या रस्त्यांवरही ‘आमच्या पूज्य दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही,’ असं म्हणून निधडय़ा छातीच्या कार्यकर्त्यांनी हे कार्टून ‘लाईक’ करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांना मारहाण केली नाही,  किंवा ‘जला दो, जला दो’ म्हणून व्यंगचित्राची जाळपोळही केली नाही, हे केवढं दुर्दैव!! खरंच, आपल्यासारखी समज, बुद्धी आणि शौर्य त्यांच्याकडे नाहीच म्हणा!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2020 1:19 am

Web Title: british cartoonist mac jokes caricature cartoons stanley mcmurtry hasya ani bhashya dd70
Next Stories
1 विश्वाचे अंगण : सर्वे जन्तु निराशया: की निरामया:?
2 सांगतो ऐका : माझ्या ग्वाल्हेरच्या आठवणी
3 माहिती अधिकार कायदा व्हेंटिलेटरवर!
Just Now!
X