News Flash

मोकळे आकाश… : ब्रोकन क्रेयॉन

शाळेचे दिवस आठवले.

|| डॉ. संजय ओक

परवा एक व्हॉट्सअ‍ॅप गोष्ट वाचनात आली. आयुष्याची तुलना लहानपणीच्या रंगखडू अर्थात क्रेयॉनच्या तुकड्यांशी केलेली… मला ही कल्पना विलक्षण आवडली. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एका अनामिकाने माझ्या विचारांची स्पंदने सुरू झाली.

माझे मन अचानक पाच दशके मागे गेले. शाळेचे दिवस आठवले. दप्तरात वह्या-पुस्तके, कंपासपेटी, याचबरोबर आणखीन एक गोष्ट असायची- रंगीत पेन्सिली किंवा रंगखडू अर्थात् क्रेयॉन्सचा सेट. छोटेखानी, दोन-तीन इंचांची लांबी… त्या खडूंना प्रत्येकाला गुंडाळलेले एक कागदी वेष्टण… त्यातूनही जाणवणारा क्रेयॉनचा मेणचट स्पर्श… नव्याने विकत आणल्यावर त्या बाराही रंगखडूंची केलेली आकर्षक रचना… सर्वांना छान टोके काढलेली. पण एकदा का वापराला सुरुवात झाली, की काही बदल घडायचे. हिरवा, निळा, लाल रंगखडू खूप वापरले जायचे. पांढऱ्याशुभ्र कागदाच्या कॅनव्हासवर कुठे निळे ढग अवतरायचे. राखाडी डोंगर, हिरवी झाडी, निळसर पांढुरकी नदी आणि तिच्या किनाऱ्यावरचे लालचुटुक कौलांचे घर… हे चित्र कागदावर नाही तर उराशी रेखाटत आमचे बालपण आणि यौवन गेले. उत्तरायुष्यात चार पैसे मिळाल्यावर फार्म हाऊसचा शोध घेऊ लागलो तेव्हाही मनात खोलवर हे क्रेयॉन्सच दडलेले होते. काही रंग पुन:पुन्हा वापरले गेले आणि त्यामुळे ते खडू इतरांपेक्षा जास्त झिजले. तर उरलेले काही तुलनेने कमी. पांढऱ्या खडूचा वापर कमी झाला. काळ्या रंगाला तसे आम्ही बालपणात चार हात दूरच ठेवले होते. आयुष्यात सगळे रंग असतात. प्रणयाचा गुलाबी, अमर्याद उत्साहाचा लाल, शांततेचा पांढरा, समृद्धीचा हिरवा, धम्मचक्राचा निळा आणि ‘यलो, यलो, डर्टी फेलो’ म्हणून खिजवलेला पिवळा… हे सारे आम्हाला आमच्या क्रेयॉन बॉक्सने शिकवलं. पण आयुष्यात, नोकरीच्या ठिकाणी आणि नात्यागोत्यात सारेच काही स्पष्ट पांढरे किंवा काळे नसते, तर संदिग्धतेचे द्योतक असलेला ग्रे अर्थात राखाडी रंगही ठायी ठायी अनुभवास येतो याचाही वस्तुपाठ क्रेयॉन्सनेच दिला. क्रेयॉन लपेटणाऱ्या कागदाची गंमत व्हायची. जसजसा रंगखडू वापरला जाई, तसतशी त्याची झीज होई, आणि कागद मात्र मूळच्या लांबीचाच! परिणामत: तो मधे मधे येई, व्यत्यय निर्माण करे. आणि मग एखाद्या दिवशी मी चिडून तो कागद फाडून फेकून देई. आता रंगखडू पूर्णपणे उघडा असे. त्याचा मेणचटपणा हक्काने माझ्या हातावर चढे. कागदावरचे चित्र पूर्ण होईपर्यंत सगळ्या रंगांची पुटे माझ्या बोटावर चढत आणि हाताचे पार इंद्रधनुष्य होऊन जाई. आयुष्याचेही नेमके असेच होते. एखादी कमी गोष्ट लपवण्याचा आटापिटा करताना एक दिवस असा येतो की संकोच आणि लपाछपीचे सारे पडदे विरून जातात आणि उघडपणे आपण आपले आयुष्य जगू लागतो. आता आपल्याला ना आपल्या वैगुण्यांची लाज वाटत, ना आपल्या दौर्बल्याची भीती.

कधी कधी क्रेयॉन्सच्या बाबतीत मोठा बाका प्रसंग यायचा. पांढऱ्या कागदावर आकाशाचे शेडिंग करताना किंवा एखाद्या मनुष्याकाराला चारकोल शेड देताना माझ्या हाताचाच दाब जास्त पडे आणि तो क्रेयॉन तटकन् तुटे. तुकडा झालेला क्रेयॉन माझा सेट विस्कळीत करे. दुकानदाराकडे जाऊन विकत घ्यावा, तर एकच रंग मिळत नसे. परत संपूर्ण सेटचे पैसे घरात मागण्याची प्राज्ञाच नसे. दोन तुकडे पुन्हा जोडणेही शक्य नसे. हे अचानक आलेलं लंगडेपण, हा आघात त्या बालवयात त्रास देई. पण त्यातही तुकडा तर तुकडा- बोटांची चिमूट घट्ट करून त्या तुकड्याने पुन्हा कॅनव्हासवर रंग भरणे सुरू होई. आणि मग लक्षात येई, की तुटला तरी तुकडा आपले काम चोख बजावतो आहे. रंगछटा तशाच आणि तितक्याच देखण्या उतरत आहेत. तुटला म्हणून टाकू नये आणि तुकडा म्हणून मातू नये. Even a broken  crayon is a crayon afterall! आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा धडा या ब्रोकन क्रेयॉनने मला दिला आहे. आयुष्यात आघात झाले, अनपेक्षित दु:ख पदरी आले, म्हणून मूळचा स्वभाव, चांगुलपणा, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती… हे इंद्रधनुष्य टाकून कसे चालेल? अर्धवट आठवली म्हणून गाण्यातली ओळ गुणगुणायला कोणी बंदी केलीय?

अर्धवट तुटलेला क्रेयॉन मला के्रयॉन बॉक्समधून खुणावतो. जीवन आनंदाने जगण्याचा संदेश देतो. आणि रोजच्या सकाळच्या चित्रात उगवतीचे रंग भरता होतो…  Because, even though it is broken… it’s a Crayon!

 sanjayoak1959@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:02 am

Web Title: broken crayons whatsapp school days pencil or crayon akp 94
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : मैत्र जीवांचे!
2 चवीचवीने… : भुकाळी, फँड्री, पंदी, पोर्क…
3 करोना निर्बंध आणि रुग्णघटीचे वास्तव!
Just Now!
X