संहिता जोशी – 314aditi@gmail.com

चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने सगळे जग आज आपल्या कवेत घेतले आहे. जग ठप्प करणे आजवर नैसर्गिक वा मानवी करणीलाही शक्य झाले नव्हते, जे करोनाने करून दाखवले. देशोदेशी करोनाने माजवलेला हाहाकार आणि तिथले शासन, प्रशासन आणि जनता त्याचा कशा तऱ्हेने सामना करीत आहे याचा प्रत्यक्षदर्शी हालहवाल! चीन, अमेरिका, दुबई, जपान, जर्मनी, नेदरलॅंडस् या देशांतील करोनाच्या सद्य:स्थितीवरील झोत..

तेरा तारखेचा शुक्रवार पाश्चात्त्य लोकांत विशेष कुप्रसिद्ध असतो. १३ मार्चच्या शुक्रवारी सकाळी स्थानिक बातम्यांमध्ये जाहीर करत होते : आमच्या ट्रॅव्हिस परगण्यात (टेक्सास राज्य) करोना व्हायरसचे दोन रुग्ण सापडले. तिशीतली एक स्त्री आणि साठीला टेकलेला एक पुरुष! मी ऑफिसात जाऊन जाहीर केलं.. ‘तिशीतली ती स्त्री म्हणजे मी नाही.’ तिन्ही श्रोते हसले. ऑफिसात गेले काही आठवडे आम्ही चौघं पैजा लावत होतो की, ऑफिसात पहिल्यांदा कुणाला लागण होईल. वरच्या पदांवरचे बरेच लोक कामासाठी फिरत असतात. आम्ही त्यांच्याबद्दल बोलत होतो. करोना व्हायरस तोवर चीन, इटलीत होता; मधे मोठे महासागर होते. ‘कोविड—१९’ हे नावही तेव्हा बातम्यांमध्ये जेमतेम येत होतं.

शुक्रवारी दुपारीच दुकानांतून ठरावीक गोष्टी गायब झाल्या होत्या. साबण, अल्कोहोल, हायड्रोजन पेरॉक्साइड, बूड पुसायचे कागद, वगैरे. तिथे पाव मिळाला नाही म्हणून केक आणून खाल्ला.

जोवर करोना विषाणू दूर होता, अमेरिकी लोक परदेशांत क्रूझ बोटींवर अडकले होते तोवर कुणाला या विषयात काही रस नव्हता. बातम्यांमधूनही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या विषयाचं काही महत्त्व आहे असं दिसत नव्हतं. वंशवादी ट्विट्स करून झाली होती. ऑफिसातही काही चर्चा नव्हती. संकट दाराशीच आल्यावर ऑफिसात जोरदार चर्चा सुरू झाल्या. मी मॅनेजरला म्हणाले, ‘नाहीच मिळाले कागद तर आम्ही भारतीय पद्धत वापरू.’ हातवारे न करता, कुठलीही बीभत्स वर्णनं न करता त्याला बऱ्याच प्रकारे भारतीय पद्धतीने स्वच्छता कशी केली जाते, हे सांगायचा विफल प्रयत्न करून झाला. शेवटी ‘बिडे’ (bidet) म्हणजे काय ते शोधून पाहा, असं सांगून विषय बदलला.

सध्या दुकानं दिवसातून अठराऐवजी बारा तासच उघडी आहेत. सुरुवातीला जिम सुरू होती. तिथे सकाळी लवकर जाणारी मी एकटीच होते. तिथला ट्रेनर २२ वर्षांचा चळवळ्या (hyperactive) मुलगा आहे. त्याला म्हणाले, ‘तुला सुवर्णसंधीच मिळाली आता माझ्याकडून जास्त व्यायाम करवून घेण्याची!’ आम्ही दोघंही हसलो. मंगळवारी बाकीच्या जिम बंद झाल्याच्या बातम्या ट्रेनर सांगत होता. आमची जिम लहान असल्यामुळे सुरू होती. एरवी मी निघताना ‘उद्या भेटू’ म्हणते. आता तो मला म्हणाला, ‘येत राहा. लोक आले नाहीत तर जिम चालू राहणार नाही. माझी नोकरी टिकणार नाही.’ लोकांसाठी व्यायाम करण्याची माझी ही पहिलीच खेप! जिम बंद झाल्यास ट्रेनर महादुकानांत स्टॉकिस्टची (माल भरणारे) नोकरी शोधेन असं म्हणाला होता.

आमच्या परगण्यात पहिले रुग्ण सापडल्यावर आठ दिवसांत हा लेख लिहिते आहे तोवर ‘सोशल डिस्टन्सिंग’ किंवा सामुदायिक कवायतीसारखं ‘सुरक्षित अंतर ठेवा’ सुरू झालं आहे. राज्यपालांनी वटहुकूम काढल्यामुळे संपूर्ण राज्यातल्याच जिम बंद झाल्या आहेत. हॉटेल, ढाब्यांसारख्या ‘फूड ट्रकां’वर थांबून खाणं बंद झालं आहे. हवं असेल तर पार्सल घरी मागवायचं किंवा आणायचं. दर आठवडय़ाला शेतकऱ्यांचा बाजार (फार्मर्स मार्केट) असतो तिथे मी जाते. चौदा तारखेला तिथे लोकांची झुंबड उडाली होती. आठवडय़ानं तिथे अगदी मोजकीच माणसं सामुदायिक कवायतीला उभी राहिल्यासारखी अंतर ठेवून रांगांमध्ये उभी होती.

दर शनिवारी आम्ही एका स्थानिक ‘फूड ट्रक’छाप दुकानातून ‘टाको’ आणून खातो. ऑस्टिनात टाकोची स्वतंत्र संस्कृती आहे. हा टेक्सन धाटणीचा, मेक्सिकन मूळ असणारा पदार्थ. तिथे बसून खायला बंदी आहे, म्हणजे टाको लवकर मिळतील असं वाटलं होतं. झालं उलटंच. पैसे घेऊन त्यांनी दुकानाबाहेर उभं राहायला सांगितलं. टाको तयार झाल्यावर बाहेर हातात आणून दिले तेव्हा सार्वजनिक कवायतीसारखे दोघांनी हात लांब केले. ‘तिथे नक्कीच नोकरकपात झाली असणार. कदाचित आमच्याकडेही पगारकपात होईल आणि आठवडय़ाचे कामाचे तास कमी करतील.

दुकानांतून दही, दूध, लोणी वगैरे गोष्टी गायब व्हायला लागल्यात. लोक घरी स्वयंपाक करायला लागले म्हणून घराघरांतले फ्रीज—फ्रीजर ओसंडून वाहत आहेत का, कोण जाणे! बातम्यांमध्ये रेशनिंग, दुकानांच्या मर्यादित वेळा वगैरे सांगत आहेत. पण लोक ज्या भीतीपोटी साठेबाजी करत आहेत, त्यावर फार काही बातम्या नाहीत. मालाचा पुरवठा होत राहील का, सीमा लोकांसाठी बंद केल्या तरी मेक्सिको, कॅनडातून माल येत राहील का, कागदाचा पुरवठा होत राहील का, वगैरे बातम्या पुरेशा नाहीत. आहेत त्या बातम्या करोना व्हायरसच्याच. पण किती आजारी, किती मृत्यू आणि किती रेशनिंग, यापलीकडे उपयोगाचं काही नाही.

अमेरिकी लोकांना व्यक्तिस्वातंत्र्य अत्यंत प्रिय आहे. पण स्वातंत्र्य कुठे संपतं, जबाबदारीच्या अभावातून स्वार्थ कुठे सुरू होतो, हे कपाटं, फ्रीज भरभरून खरेदी करणाऱ्या लोकांना समजतंय असं दिसत नाही. १५ ते २० मार्च अमेरिकेत बहुतेक ठिकाणी ‘स्प्रिंग ब्रेक’च्या सुट्टय़ा होत्या. तेव्हा बरीच तरुण मंडळी सरकारी निर्देशांकडे सरळ दुर्लक्ष करून समुद्रकिनाऱ्यांवर पाटर्य़ा करत होती. या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्रित समाजाचा आणि संपूर्ण जगाचा विचार करण्याशिवाय पर्याय नाही.

हा लेख लिहीत असतानाच न्यूयॉर्क शहराचा महापौर आणि मेरीलँड राज्याचा राज्यपाल यांची चर्चा बघितली. महापौर म्हणत होता, ‘निरनिराळ्या संस्था, आस्थापने, राज्यं, शहरं सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. सध्या ते होत नाहीये.’ राज्यपाल महापौराला निकरानं विरोध करत होता. दोघे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे आहेत. अनेक राज्यांनी अत्यावश्यक सेवांपलीकडे सगळं बंद केलं आहे. टेक्सासमध्ये अजून तरी अशी परिस्थिती नाही. (लेख प्रकाशित होईस्तोवर त्यातही बदल झालेला असू शकतो.) आठवडाभरापूर्वी अमेरिकी लोकांचं सर्वेक्षण केलं त्यात दिसलं की, डेमोक्रॅट पक्षाचे लोक विषाणूला घाबरून आहेत आणि (ट्रम्पच्या) रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना याच्या भीषण संहारक शक्तीची अजिबात जाणीव नाही.

गेले काही आठवडे ई-मेलांवर ई-मेल येत आहेत. सगळ्यांचा विषय हाच. जे लोक हे ई-मेल बघून कंटाळत नाहीयेत, ते ई-मेल लिहीत असावेत. ऑफिसातून दिवसाला एक ई-मेल आहेच. कामासाठी आम्ही ‘टॅब्लो’ नावाचं सॉफ्टवेअर वापरतो. या कंपनीतल्या माणसांचा आमच्याशी थेट संबंध येऊन संसर्ग होण्याची काहीही शक्यता नाही. त्या लोकांना कशी आपल्या कर्मचाऱ्यांची आणि जगाची काळजी आहे, ही माहिती माझ्या ई-मेलमध्ये का?

लोकांना काय करावं, हे कळत नाहीये. त्याचं कारण आहे- या विषाणूबद्दल कुणालाच फार काही माहीत नाही. ज्यांना थोडीबहुत माहिती असावी ते राजकीय सत्ताधारी पुरेशी खमकी भूमिका वेळेत घेत नाहीयेत. अज्ञाताबद्दल भीती असतेच. तशात हे अज्ञात जीवघेणं आहे. त्यातून वाचलेल्या लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद या विषाणूमध्ये आहे असं सध्याचं चित्र आहे. सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात तंत्रज्ञानाचा वापर वाढत होताच; पण या विषाणूमुळे तो वेग आता अनपेक्षितरीत्या जास्त वाढेल. ज्यांना त्याचा फायदा घेता येणार नाही त्यांचं काय, हा प्रश्न किमान काही काळ, खूपच तीव्र असेल.

करोना विषाणूमुळे मंदीच्या सुरुवातीची लक्षणं दिसल्यावर ट्रम्प यांनी व्याजदर कमी केला. आता ठरावीक मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना सध्यापुरते काही पैसे तातडीनं देण्याची योजनाही आहे. ट्रम्प सुरुवातीपासूनच या विषाणूची विघातक शक्ती नाकारत होते. त्यांनी काही ठोस भूमिका घेतली नाही; उपाययोजना करणं तर लांबच. इथेही अमेरिकी बाणा दिसतो. नागरिकांचा केंद्र सरकारवर फार विश्वास नसतो. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारांनी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असते. मात्र, अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोगांच्या राष्ट्रीय संस्थेचे प्रमुख अँथनी फाऊची सातत्यानं टीव्हीवर दिसत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ‘आपल्याला वाटत असेल की आपण जरा जास्तच काळजी घेत आहोत, तर याचा अर्थ आपण फार तर जेमतेम काळजी घेतली आहे.’ फाऊची काळजीच्या सुरात हे वारंवार टीव्हीवर बोलत आहेत. कदाचित त्यामुळेच दोन दिवसांत ट्रम्प यांच्या बोलण्याचा रोख किंचित बदललेला दिसला. ट्रम्प यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं मत असं की, अगदी ट्रम्पच्या विश्वासातले लोकही (त्यांना नावं न ठेवता) टीव्हीवर बोलले की मगच ते त्या मतांचा गांभीर्यानं विचार करतात. विज्ञानाशिवाय या संकटाचा मुकाबला करणं शक्य नाही. पण अजूनही ट्रम्प बेधडक अवैज्ञानिक आणि खोटीनाटी विधानं करत आहेत.

शेजारच्या डेबीला मी डील-सम्राज्ञी म्हणते. कुठल्या दुकानात कोणती वस्तू कधी स्वस्त मिळते याची तिला बित्तंबातमी असते. सेल आहे म्हणून वस्तू विकत घेणारी अमेरिकी चंगळवादाचं मूर्तिमंत रूप म्हणजे डेबी. ती म्हणाली, ‘आता मला रांधायला वेळ मिळेल. पण मी मुद्दाम बाहेरचं विकत आणून खाणार आहे. माझी सरकारी नोकरी काही जात नाही. पण तुझ्या जिमसारख्या छोटय़ा, स्थानिक व्यवसायांना ते स्थैर्य नाही. आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांनी त्यांचाही विचार केला पाहिजे.’ ती एरवी मला कुठे भेटली असती तर आमची मैत्री होणं कठीणच होतं असं मला आजवर वाटत होतं. करोना व्हायरस दाराशी आल्यावर मला माझ्या मतामध्ये बदल करावासा वाटला.