05 July 2020

News Flash

हास्य आणि भाष्य : कुत्रा, विदूषक, ऑफिसर वगैरे..

चार्ल्स  बर्सोट्टी यांची आई शिक्षिका होती. तिने थोडे इकडेतिकडे वशिला लावून जरा लवकरच छोटय़ा चार्ल्सला पहिलीत घातलं.

त्यांना चित्रकला विषय अजिबातच आवडत नव्हता. पण पुन्हा आई-वडिलांनीच हट्टाने त्यांना फावल्या वेळामध्ये आर्ट स्कूलमध्ये जाऊन चित्रकला शिकायला धाडलं.

प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

चार्ल्स  बर्सोट्टी यांची आई शिक्षिका होती. तिने थोडे इकडेतिकडे वशिला लावून जरा लवकरच छोटय़ा चार्ल्सला पहिलीत घातलं. त्यामुळे चार्ल्स गंमतीने असं म्हणतात की, ‘मी वर्गातला सगळ्यात लहान, सगळ्यात अशक्त आणि सगळ्यात ढ मुलगा होतो!’ त्यांना चित्रकला विषय अजिबातच आवडत नव्हता. पण पुन्हा आई-वडिलांनीच हट्टाने त्यांना फावल्या वेळामध्ये आर्ट स्कूलमध्ये जाऊन चित्रकला शिकायला धाडलं. पण या चित्रकलेच्या शिक्षणाचा फायदा त्यांना पुढील आयुष्यात जरूर झाला.

पुढे विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेतल्यानंतर काही वर्षे त्यांनी आर्मीसाठी काम केलं. असं सगळं कलाविरहित आयुष्य सुरू असताना त्यांनी कुठेतरी फुटकळ केलेली रेखाटनं पाहून एका ग्रीटिंग कार्ड बनवणाऱ्या कंपनीने त्यांना बोलावलं. नवीन कल्पना, रचना, शब्द आणि चित्र या साऱ्यांना तिथे वाव होता आणि मग चार्ल्सना तिथेच व्यंगचित्रकलेची स्वत:ची शैली सापडली. नंतर यथावकाश त्यांची व्यंगचित्रं ‘सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘न्यू यॉर्कर’, ‘पंच’, ‘अटलांटिक’ वगैरेमध्ये प्रसिद्ध होऊ लागली आणि एक वेगळ्या प्रकारचा व्यंगचित्रकार वाचकांसमोर आला.

चार्ल्स बर्सोट्टी (१९३३-२०१४ ) यांनी एक कुत्र्याचं पात्र तयार केलं. वास्तविक कुत्रा हा प्राणी अनेक व्यंगचित्रकारांनी रेखाटला आहे. अनेकांनी कुत्रा ही आपली एक खास व्यक्तिरेखा बनवली आहे. तरीही बर्सोट्टी यांनी आपल्या कुत्र्याला एक वेगळं रूप दिलं. त्याच्या आयुष्यासोबत मानवी आयुष्य‘ जोडलं. आपल्या या कुत्र्याला त्यांनी ‘लव्हेबल’ केलं. त्याशिवाय बिझनेसविषयक व्यंगचित्रं किंवा विदूषक या विषयाभोवती फिरणारी शेकडो व्यंगचित्रं त्यांनी काढली. (सर्व व्यंगचित्रं ‘दि बेस्ट ऑफ चार्ल्स बर्सोट्टी’, रावेट्टी बुक्स लि. आणि ‘दि असेन्शिअल चार्ल्स बर्सोट्टी’, वर्कमन पब्लिशिंग यांच्या सौजन्याने.)

बर्सोट्टी यांचा कुत्रा इतका लोकप्रिय झाला की चार्ल्स शुल्झ (या जगविख्यात व्यंगचित्रकाराची ‘पीनट्स’ ही कॉमिक्स स्ट्रीप प्रचंड लोकप्रिय आहे आणि त्यात स्नुपी ही कुत्र्याची व्यक्तिरेखाही लोकांची लाडकी आहे.) यांनी या चार्ल्सला पत्र पाठवून त्याची स्तुती केली की, सध्या व्यंगचित्रकलेमध्ये तुझा कुत्रा हा सर्वात लोकप्रिय आहे!

या कुत्र्यासंदर्भातील व्यंगचित्रांचे काही नमुने आपल्याला पाहता येतील. उदाहरणार्थ, कोर्टासमोर एक छोटा कुत्रा गुन्हेगार म्हणून हजर होतो. गुन्हा कोणता ते महत्त्वाचं नाही. न्यायाधीशपदी अर्थातच एक अतिशय सीनियर कुत्रा आहे. हे न्यायाधीश महाराज अत्यंत प्रेमळपणे या छोटय़ाला सांगतात, ‘‘तू निर्दोष आहेस! कारण छोटय़ांकडून अशा गोष्टी होत असतात!’’

हेच लॉजिक पुढे नेऊन आणखीन एक चित्र तसंच आहे. त्यात हे न्यायाधीश या छोटय़ाला दयाद्र्र भावनेने म्हणतात,” तुला आश्र्च्र्य वाटेल, पण एकेकाळी हे कोर्टसुद्धा (म्हणजे स्वत: न्यायाधीश) एक लहान कुत्रा होते, बरं का!’’

कुत्र्याला कोचावर बसायला आवडतं. आणि त्याने कोचावर बसलेलं मालकाला आवडत नाही. अशावेळी एक मोठा कुत्रा छोटय़ा कुत्र्याला उपदेश करतोय आणि सांगतोय, ‘‘अर्थातच आपण माणसाचे बेस्ट फ्रेंड आहोत! पण तरीही आपण कोचावर बसायचं नसतं!’’

एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याकडे ट्रेनिंगविषयी तक्रार करतोय. तो म्हणतो, ‘खरं म्हणजे मला शिकारी कुत्रा व्हायचंय. पण ते कितीतरी दिवस झाले- मला फेकलेला बॉल परत आणायलाच शिकवतात!’

एका चित्रात एक कुत्रा कार्पेट क्लीनरला फोन करून तातडीने घरी बोलावताना दाखवला आहे! यामागचं कारण अर्थातच वाचकांनी स्वत:च्या अंदाजानुसार शोधायचं आहे.

बर्सोट्टी यांचा हा कुत्रा रेखाटायला अतिशय साधा आहे आणि तो कदाचित खूप सिंपलीफाइड वाटू शकेल असा आहे. सवयीने हा कुत्रा खूप ओळखीचा वाटू लागतो आणि त्याच्याविषयी उत्सुकता आणि प्रेमही वाटू लागतं.

बर्सोट्टी यांचा हा कुत्रा इतका लोकप्रिय झाला की एका कंपनीने तो स्वत:चा लोगो म्हणून वापरला, तर इंग्लंडने या कुत्र्याचं पोस्टाचं तिकीट काढून व्यंगचित्रकाराला एक वेगळीच सलामी दिली!

बर्सोट्टी यांची चित्र काढण्याची स्टाईल अतिशय साधी आहे. ठळक स्केचपेनने ते रेखाटन करतात. अगदी ढोबळ म्हणावी अशी त्यांची चित्रशैली आहे. त्याविषयी ते म्हणतात, ‘कल्पना आणि चित्र हे दोन्ही मी गाळून घेतो. त्यामुळे अगदी आवश्यक असेल तेवढाच मजकूर व चित्र कागदावर उमटतं!’

त्यांची ‘विदूषक’ या विषयावरची व्यंगचित्रंसुद्धा खूप लक्षणीय आहेत. विदूषकाकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनच त्यांच्या व्यंगचित्रांतून प्रतीत होतो. विदूषकाने नेहमी हसवावं अशी जगाची अपेक्षा असते. एका विदूषकाला नोकरीवरून काढताना मालक म्हणतो, ‘‘सॉरी, तुला कामावरून काढावं लागतंय! पण तू नेहमी जसं छान धडपडून सगळ्यांना हसवतोस, तसं प्लीज आता जाता जाता धडपडून दाखवून हसवशील का?’’

‘लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन’ असं म्हणून ‘निरोगी राहण्यासाठी औषधाऐवजी हसत राहा, आनंदी राहा!’ असं म्हटलं जातं. पण कधीतरी जेव्हा विदूषकच आजारी पडतो आणि डॉक्टरांचा सल्ला घेतो तेव्हा हा विदूषक अखेरीस डॉक्टरांना विचारतो, ‘‘दुसरं बेस्ट मेडिसिन कोणतं आहे?’’ यातलं कारुण्य काळजाला भिडणारं आहे!!

ऑफिस, ऑफिसर, मॅनेजर, बॉस या विषयावरसुद्धा त्यांनी मजेदार व्यंगचित्रं काढली आहेत. कॉर्पोरेट जगामध्ये एखाद्याला नकार द्यायचा असेल तर तो नेहमी थेट न देता सूचकतेने देतात. बर्सोट्टी यांच्या व्यंगचित्रांतील बॉस हा नकार देण्यासाठी चक्क हॅण्ड पपेटचा वापर करतोय, ही कल्पनाच एकदम अफलातून आहे. एका चित्रात बॉस मॅनेजरचं प्रमोशन झाल्यानंतर त्याला त्याचं नवीन टेबल आणि खुर्ची दाखवतोय आणि म्हणतोय, ‘‘आजपासून हे तुझं नवीन घर!’’

सर्वसाधारणपणे अकाउंटन्सी हा एक नीरस, रुक्ष विषय आणि अकाउंटंट हेही तसेच असतात असा जगभरामध्ये एक (गैर)समज आहे. त्यावरचं हे चित्र! हे चित्र किंवा कल्पना पाहून जातिवंत अकाउण्टटही हसतील, हे नक्की.

चार्ल्स बर्सोट्टी यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी एक वेगळा पैलू आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली होती. व्हिएतनाम युद्धाच्या विरुद्ध त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. कालांतराने ते राजकारणाबाहेर पडले. ‘मला राजकारण आवडतं, पण राजकारणी नाहीत,’ असं ते स्पष्टपणे म्हणायचे. पुढे जाऊन ते असे म्हणायचे की, ‘‘तुम्हाला विचित्र वाटेल, पण एक माणूस राजकारणी आणि व्यंगचित्रकार दोन्ही असूच शकत नाही!’’

आयुष्याच्या शेवटी त्यांना मेंदूविकाराने ग्रासलं होतं तरीही ते कागद-पेन घेऊन चित्र रेखाटण्याचा आग्रह धरत होते!

स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर घडणाऱ्या प्रसंगांविषयी त्यांनी अनेक व्यंगचित्रं काढली. त्याला अनुसरूनच ‘स्वर्गाच्या प्रवेशद्वारातून चार्ल्स बर्सोट्टी हे त्यांच्या कुत्र्यासोबत प्रवेश करत आहेत’ असे चित्र डोळ्यासमोर येतं. कारण चार्ल्स व त्यांचा कुत्रा हे दोघेही वाचकांच्या मनात अमर झाले आहेत!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2020 1:13 am

Web Title: cartoonist charles barsotti hasya ami bhasya dd70
Next Stories
1 खेळ मांडला.. : करोनाअबाधित बुद्धिबळ
2 सरणार कधी रण?
3 आपण असेच असू!
Just Now!
X