07 July 2020

News Flash

हास्य आणि भाष्य : दक्षिणोत्तर!

सुधीर दार यांचं व्यंगचित्रकलेतलं थोडं वेगळं काम खूप महत्त्वाचं आहे

प्रशांत कुलकर्णी prashantcartoonist@gmail.com

बोलता बोलता मूर्ती अचानक थांबतात. त्यांचा शांत, सौम्य, गंभीर आवाज थांबतो. समोरचं पॅड ते उचलतात आणि स्केचपेनने रेखाटन सुरू करतात. पहिल्यांदा काढतात त्या दोन तिरक्या रेषा. ठळक, स्वच्छ. पण कशाचा अंदाज येत नाही. हात वारंवार हवेत गोल गोल फिरवणं नाही.. पेन्सिलीने रेखाटन, कच्चं-पक्कं  असले प्रकार नाहीत. काही नाही. झटपट पेन खाली येत राहतं. रेषा उभ्या, आडव्या, तिरक्या, वेडय़ावाकडय़ा, मोडक्यासुद्धा काढतात. क्वचित एखाद् दुसरा बिंदू. चित्र बहुधा पूर्ण होत आलं असावं. तरी नेमकं काय चालू आहे हे कळतच नाही. पुन्हा स्केचपेनने काही भागाला ते शेडिंग करतात. हळूहळू आपल्याला कळू लागतं की हा कोट, ही छत्री, हे बूट, हे धोतर. अरेच्चा! हा तर मूर्तीचा कॉमन मॅन! मग आता आपण ज्याला डोळे समजत होतो तो चष्मा होता, आणि डोळे त्याच्याही मागे दोन ठिपक्यांच्या रूपात. आणि हात जिथे क्षणभर रेंगाळला होता, त्या जाड भुवया होत्या तर!

दक्षिण भारतातला.. त्यातही खास कर्नाटकातला- अगदी दीनवाण्या रूपातला साधा नागरिक.. बी. व्ही. राममूर्तीचा ‘मिस्टर सिटीझन’! या कॉमन मॅनचं वैशिष्टय़ म्हणजे पाहताक्षणीच तो दुबळा वाटतो.. चार्ली चॅप्लिनसारखा!

‘खूप पूर्वी बंगलोर-म्हैसूरमधले अनेक लोक डोक्यावर पगडी घालायचे. अंगात कोट, उपरणे व खाली लुंगी किंवा पांढरा पायजमा असायचा. ही त्रिकोणी आकाराची पगडीच माझ्या ‘मिस्टर सिटीजन’साठी मी निवडली. लुंगीऐवजी त्याला धोतर नेसवलं. छत्री अर्थातच हवी.’ ..मूर्ती ‘मिस्टर सिटीजन’च्या जन्माची कथा ऐकवत असतात!

मूर्तीच्या चित्रांमध्ये काळ्या-पांढऱ्या रंगाची एक जबरदस्त रचना आहे. चित्रातले लोक, घरं, झाडं, देऊळ, झोपडय़ा, फोटोफ्रेम्स, खुर्ची, पडदे, गाडय़ा या साऱ्यातून एक विलक्षण ‘आर्ट फॉर्म’ ते तयार करतात. कमीत कमी रेषा हे तर मूर्तीच्या चित्रांचं वैशिष्टय़ आहेच, पण त्यांच्या चित्रांतील मोकळ्या जागेने रेषांचं सौंदर्य वाढतं, हेही तितकंच खरं!

एक पॉकेट कार्टून रेखाटायला त्यांना केवळ दहा मिनिटं पुरतात. बहुतेक वेळेला ते टाक शाईत बुडवून कागदावर थेट चित्र काढायला सुरुवात करतात. चित्र जमलं नाही तर ते फेकून देऊन दुसरं नवीन काढतात. चित्रातील उत्स्फूर्तता व सहजता जपण्यासाठी मी हे करतो असं ते सांगतात. अर्थात त्याआधी व्यंगचित्राची कल्पना सुचण्यासाठी त्यांना कितीही वेळ लागू शकतो असं त्यांचं म्हणणं. त्यांच्या चित्रांकडे पाहून त्यांना प्रमाणबद्ध चित्र काढणं जमत नसावं असा काहींचा समज होतो. पण त्यांनी काढलेली तैलरंगातील पोट्र्रेट्स पाहिली की त्यांची चित्रकलेवरची हुकूमत लक्षात येते.

‘रोजच्या रोज व्यंगचित्रं काढणारा दक्षिण भारतातला कदाचित मी पहिला व्यंगचित्रकार असेन..’ असं मूर्ती सांगतात. तत्कालीन ज्येष्ठ ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांनी त्यांनाही भुरळ घातली. पण चित्रांवर त्याचा प्रभाव येऊ देणं त्यांनी कटाक्षाने टाळलं. ‘माझी चित्रं ही प्रासंगिक विनोद या सदराखाली वर्णनात्मक चित्र काढणं वगैरे प्रकारातली नाहीत. दोन व्यक्तींमधला संवाद आणि त्यानुसार येणारं भाष्य हा प्रकार काही पाश्चिमात्य व्यंगचित्रकार हाताळतात, तोच मला आवडला,’ हे ते स्पष्ट करतात.

सायन्सची पदवी घेतल्यावर ‘डेक्कन हेरॉल्ड’ या बंगलोरच्या इंग्रजी दैनिकाने त्यांना रोजचं चित्र काढण्यासाठी मानाचं आमंत्रण दिलं व पुढे संपादकीय मंडळातही सामावून घेतलं. या वृत्तपत्रातून त्यांनी पॉकेट कार्टून्स, मोठी राजकीय व्यंगचित्रं, अर्कचित्रं, रेखाचित्रं अशी हजारो व्यंगचित्रं काढली. तत्कालीन पंतप्रधान नेहरू एकदा ‘डेक्कन हेरॉल्ड’च्या कार्यालयात आले तेव्हा ‘हे आमचे व्यंगचित्रकार!’ अशी त्यांची ओळख संपादकांनी करून दिली. वीस-बावीस वर्षांचे मूर्ती त्यावेळी पोरसवदाच वाटत होते. ‘‘अरे, तुम्ही माझी ओळख एका लहान मुलाशी करून देताय,’’ असं नेहरूंनी म्हणताच मूर्तीनी काही क्षणांतच नेहरूंचं अर्कचित्र त्यांच्यासमोरच काढून त्यांच्या हातावर ठेवलं आणि पंतप्रधान सर्द होऊन पाहतच राहिले!

सामान्य माणसाला वृत्तपत्रातील व्यंगचित्र पाहण्यात रस निर्माण झाला पाहिजे.. आजूबाजूंच्या घटनांबद्दल त्याने व्यंगचित्र पाहून प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांचा विनोद (किंवा पंचलाइन) हा दंश करणारा नाही, तर नर्मविनोदी, सूक्ष्म आणि बुद्धिवादी आहे. ते अतिशय संवेदनशील आहेत हे त्यांची चित्रं पाहून ध्यानी येतं.

त्या काळात रूढ व्यंगचित्रकलेपासून फटकून स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण करणारे बी. व्ही. राममूर्ती (१९३३-२००४) यांनी कन्नड मनांवर आपली विनोदाची रेघ कायमस्वरूपी उमटवली आहे! ( व्यंगचित्र : ‘मि. सिटीझन’, BAPCO PUBLICATIONS)

साधारण याच कालखंडात तिकडे दिल्लीमध्ये सुधीर दार (१९३४-२०१९) यांची कारकीर्दही आकारास येत होती. मूळचे काश्मिरी असलेले दार यांचा जन्म अलाहबादमधला. त्यांनी तिथूनच भूगोलामध्ये मास्टर्स डिग्री घेतली. त्यांच्या व्यंगचित्रकलेच्या कारकीर्दीची सुरुवात अतिशय मजेदार अनुभवाने झाली. १९६१ साली  दिल्लीच्या ‘स्टेट्समन’ वृत्तपत्राच्या कार्यालयात सोबत पाच ‘शब्दविरहित’ (वर्डलेस) हास्यचित्रं घेऊन त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी त्याचे संपादक एक ब्रिटिश गृहस्थ होते. त्यांनी या तरुणाकडे जरा दुर्लक्षच केलं. चित्रंही बघितली नाहीत, पण ठेवून घेतली. अत्यंत निराश होऊन सुधीर दार घरी परतले. पण दुसऱ्या दिवशीच्या ‘स्टेट्समन’मध्ये आतल्या पानावर ती सर्व व्यंगचित्रं प्रकाशित झाली होती!

या अकस्मात प्रकाशझोतामुळे धडपडणाऱ्या तरुण सुधीर दार यांचं जीवन उजळून निघालं आणि त्यांना मार्ग दिसला. जवळपास सात वर्ष ते हा ‘आऊट ऑफ माइंड’ हा नि:शब्द व्यंगचित्रांचा नॉन-पोलिटिकल कॉलम चालवत होते. संपादकांची सक्त ताकीद होती : शुद्ध विनोद पाहिजे, राजकारण नको.

कालांतराने ते ‘हिंदुस्थान टाइम्स’मध्ये गेले. तिथल्या संपादकांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, ‘‘पूर्वी तिकडे काय करत होतास ते इथे चालणार नाही. आपला वाचकवर्ग वेगळा आहे. राजकारण आणि समाजकारण व्यंगचित्रात पाहिजेच पाहिजे. आमची तशी परंपरा आहे.’’ साहजिकच सुधीर दार हे राजकीय व सामाजिक भाष्य करणारी व्यंगचित्रं काढू लागले. राजकीय व्यंगचित्रं काढताना व्यंगचित्रकार आणि संपादक यांची वेव्हलेंग्थ जुळणं अत्यंत महत्त्वाचं असतं असं ते म्हणतात.

प्रामुख्याने शहरातील मध्यमवर्ग हा त्यांच्यासमोरचा वाचकवर्ग होता. या अनुषंगाने त्यांनी हजारो व्यंगचित्रं रेखाटली. मोबाइल फोन, कम्प्युटर्स, ट्रॅफिक जाम, शिक्षण, महागाई, नेत्यांची भाषणं, प्रदूषण, बेकारी, टीव्हीवरचे कार्यक्रम, जाहिराती, संप, झोपडपट्टय़ा वगैरे वगैरे विषय ते हाताळत असत. पॉकेट कार्टूनसाठी आवश्यक असणारी शैली त्यांच्याकडे होती. स्वच्छ, सुबक रेखाटन, ठसठशीत पात्रं आणि त्यांचे प्रसंगानुरूप हावभाव, हाताने लिहिलेला इंग्रजीतला मजकूर आणि नर्मविनोदी भाष्य ही त्यांची वैशिष्टय़ं म्हणता येतील.

पण सुधीर दार यांचं व्यंगचित्रकलेतलं थोडं वेगळं काम खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी काही नि:शब्द व्यंगचित्रं काढली आहेत, जी खूप हसवतात. केवळ भारतीयांनाच नव्हे, तर देशाबाहेरील वाचकांनाही ती हसवू शकतील अशी आहेत. ही व्यंगचित्रं निव्वळ नि:शब्द आहेत असं नव्हे, तर ती अस्सल भारतीय आहेत. भारतीयांमध्ये जी एक प्रकारची ‘जुगाडू’ वृत्ती असते तिचं झकास दर्शन त्यांतून घडतं. उदाहरणार्थ, त्यांच्या एका चित्रात ट्रॅक्टरचा धूर बाहेर पडतो तिथे तवा ठेवून त्या उष्णतेवर ‘रोटी सेकनेवाली औरत’ दिसते, किंवा ट्रकवाल्याने वायपर म्हणून म्हशीच्या शेपटीचा वापर करणे.. अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्यांनी चितारल्या आहेत. (व्यंगचित्रं : दि पेंग्विन बुक ऑफ इंडियन कार्टून्स) त्यांची चित्रं परदेशी नियतकालिकांत तर आलीच, पण त्यांची काही मूळ व्यंगचित्रं इंग्लंडची राणी, हेन्री किसिंजर इत्यादी लोकांच्या संग्रहीसुद्धा आहेत, हे भारतीय  व्यंगचित्रकारांच्या दृष्टीने खूप मानाचं आहे. भारतीय व्यंगचित्रकलेचा हा दक्षिणोत्तर ‘अक्ष’ नक्कीच नोंद घेण्यासारखा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2020 1:07 am

Web Title: cartoonist from the south north of india hasya ani bhasya zws 70
Next Stories
1 इतिहासाचे चष्मे : बळी तो कान पिळी!
2 सांगतो ऐका : कथा एका वादळी बॅलेची!
3 अफसाना लिख रही हूँ.. : ‘रजनीगंधा फूल तुम्हारे..’
Just Now!
X