29 November 2020

News Flash

हास्य आणि भाष्य : दीर्घकाळ सर्वोत्तम

हरब्लॉक अर्थात हर्बर्ट ब्लॉक हे नि:संशयपणे गेल्या शतकामधील अमेरिकेतील अत्यंत महत्त्वाचे व्यंगचित्रकार.

हरब्लॉक यांची व्यंगचित्रं पाहून अमेरिकेतील लोकशाहीचं सामर्थ्य कळतं, इतकं म्हटलं तरी पुरे!

प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

हरब्लॉक अर्थात हर्बर्ट ब्लॉक हे नि:संशयपणे गेल्या शतकामधील अमेरिकेतील अत्यंत महत्त्वाचे व्यंगचित्रकार. त्यांची कारकीर्द जवळपास सत्तर वर्षांची आहे. त्यांच्या राजकीय व्यंगचित्रांचे संग्रह चाळले की ते जणू व्यंगचित्रांच्या माध्यमातून अमेरिकेचा आणि जगाचाही राजकीय इतिहास सांगत आहेत असं वाटत राहतं. अमेरिकेच्या जवळपास तेरा अध्यक्षांची कारकीर्द त्यांनी व्यंगचित्रांद्वारे रेखाटली आहे. अत्यंत प्रतिष्ठेचं पुलित्झर पारितोषिक त्यांना तब्बल तीन वेळेला मिळालं आहे. व्यंगचित्रकार होण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिलं, पण त्याची भरपाई म्हणून नंतर कितीतरी वर्षांनी हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना ‘डॉक्टर ऑफ आर्ट’ हा सन्मान बहाल केला.

कोणत्याही देशात प्रसिद्ध होत असलेली राजकीय व्यंगचित्रं पाहून त्या राष्ट्रात लोकशाही आहे का, किंवा ती किती प्रमाणात आहे हे स्पष्ट होतं असा एक सर्वसाधारण ठोकताळा आहे. हरब्लॉक यांची व्यंगचित्रं पाहून अमेरिकेतील लोकशाहीचं सामर्थ्य कळतं, इतकं म्हटलं तरी पुरे!

शाळेत असताना हरब्लॉक यांनी त्यांच्यातल्या व्यंगचित्रकाराची चुणूक दाखवली होती. पहिल्या महायुद्धाचा तो कालखंड होता. हरब्लॉक यांच्या पहिल्या व्यंगचित्राचा विषय नेहमीप्रमाणे शाळेतले शिक्षक, शेजारी किंवा मित्र हा नव्हता किंवा त्यांनी ते व्यंगचित्र वहीच्या शेवटच्या पानावर, पेन्सिलने किंवा स्केच पेनने काढलेलं नव्हतं. त्यांचं पहिलं व्यंगचित्र जर्मनीचा त्यावेळचा सम्राट कैसर याचं होतं. युद्धखोर कैसर त्यांना अजिबातच आवडत नव्हता. हरब्लॉक यांनी कैसर याचं अर्कचित्र घराजवळच्या फूटपाथवर खडूने रेखाटलं होतं. त्यात त्यांचा सुप्त हेतू हा होता की, काही लोक ते चित्र बघतील आणि व्यंगचित्रकाराचं कौतुक करतील आणि जे बघणार नाहीत, ते त्याच्यावरून चालत जातील.. म्हणजे थोडक्यात- कैसरला पायदळी तुडवल्याचा आनंद!

हरब्लॉक यांची कारकीर्द खरंच खूप प्रदीर्घ आहे. पहिलं महायुद्ध, त्यानंतरचं ग्रेट डिप्रेशन, दुसरं महायुद्ध, त्यानंतरचं शीतयुद्ध, सोविएत युनियनचा अस्त ते अगदी क्लिंटन यांची कारकीर्द.. हे सगळे विषय तर आहेतच; त्याशिवाय दारिद्य््रा, वंशवाद, निरक्षरता, मानवी हक्क हेही त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांची या विषयांवरची हजारो व्यंगचित्रं म्हणजे एक प्रकारची धावती कॉमेंट्री म्हणावी लागेल. त्यांचा दृष्टिकोन हा कधी बोचरा, कधी विनोदी, कधी खिल्ली उडवणारा, तर कधी खूप प्रतिभावान भाष्य करणारा असतो. त्यांच्या नावाने आता हरब्लॉक फाऊंडेशनची स्थापना झालेली आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी ते हजारो डॉलर्सच्या शिष्यवृत्त्या देतात. त्यांच्या एका कार्यक्रमाला बराक ओबामा आले होते. हरब्लॉक यांच्या समाधानी आयुष्याबद्दल ते म्हणाले, ‘‘हरब्लॉक यांचं आयुष्याबद्दलचं तत्त्वज्ञान अगदी साधं, पण महत्त्वाचं होतं. स्वत: चांगले नागरिक बना आणि दुसऱ्यांचाही विचार करा.  इतकं हे साधं तत्त्वज्ञान होतं.’’

उत्तम व्यंगचित्रकला हा हरब्लॉक यांचा विशेष गुण मानावा लागेल. ब्रश, पेन, ठळक काळी पेन्सिल, चारकोल इत्यादीच्या साहाय्याने ते उत्तम शेडिंग करून प्रसंग उभा करतात. अर्कचित्रांवरची त्यांची हुकूमत ही उत्तम म्हणावी अशीच आहे. एखादा विनोदी प्रसंग उभा करून भाष्य करणं हा एक प्रकार त्यांनी वापरलाच, पण काही वेळेस अगदी वेगळाच मार्ग त्यांनी भाष्य करण्यासाठी चोखाळला. एकदा अर्जेटिनामधल्या सत्ताधीशांनी तिथल्या वृत्तपत्रस्वातंत्र्यावर दडपशाही केली. त्याच्या निषेधार्थ हरब्लॉक यांनी चक्क मोकळी चौकट व्यंगचित्र म्हणून प्रकाशित केली. मौन हे काही वेळेला कानठळ्या बसवतं असं म्हणतात, त्याचंच हे उदाहरण.

१९४८ मध्ये मध्यपूर्वेत जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा अमेरिकेचा खरा उद्देश ते व्यंगचित्राद्वारे उघड करतात. अमेरिकेचे राजकीय मुत्सद्दी म्हणताहेत की, ‘ती पवित्र जागा आपण सुरक्षित राखली पाहिजे!’ (अर्थात ही पवित्र जागा म्हणजे त्या भागातील तेलाचे साठे!)

१९२९ मध्ये जेव्हा अमेरिकेला महामंदीने ग्रासलं (दि ग्रेट डिप्रेशन) तेव्हा हरब्लॉक जेमतेम वीस वर्षांचे होते. त्यावेळची त्यांची व्यंगचित्रं अतिशय बोलकी तर आहेतच, पण त्यांची या विषयावरची समजही दाखवतात. योगायोगाने त्यानंतरची- म्हणजे २००८ ची महामंदीही त्यांनी अनुभवली आणि त्यावर चित्रंही काढली. त्यांचं १९२९ सालचं सोबतचं व्यंगचित्र खरं तर आजही लागू पडतं. विशेषत: शेअर बाजाराच्या बाबतीत!

त्या महामंदीच्या काळात रोज हजारो लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. त्या काळावरचं त्यांचं हे चित्र- ‘हल्ली लवकर अंधार पडतो..’- विषण्ण करणारं आहे. चित्रातल्या मुलाचे भाव न दाखवताही तो कुपोषित आहे हे आपण समजू शकतो. खिडकीबाहेरची धूरविरहित धुरांडी आणि खरोखरीच घरावर पडलेली एक कृष्णछाया त्यांनी दाखविली आहे. खूपच प्रभावशाली असं हे चित्र आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या आधी पृथ्वीच्या नकाशावर जर्मनीला ‘युद्धवेडय़ांचे हॉस्पिटल’ असं संबोधणारं व्यंगचित्र त्यांनी काढलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर्मनीने कुरापत काढून पोलंडवर हल्ला चढवला. त्यांची व्यंगचित्रं इतक्या तातडीने प्रकाशित होत, की वाचकांना बातमीबरोबरच त्या विषयावरचं व्यंगचित्र बघण्याची सवय लागली आणि त्याचबरोबर त्यांची उत्सुकताही वाढीस लागली. जर्मनीने फ्रान्सचा ताबा घेतल्यानंतर ब्रिटिश विमानांनी फ्रान्सवर घिरटय़ा घालायला सुरुवात केली. त्यामुळे एक जर्मन सैनिक चिडून आकाशात पाहतोय. आणि पाठीमागे उभ्या असलेल्या सामान्य, असहाय फ्रेंच नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं हरब्लॉक यांनी फार सूक्ष्मपणे दाखवलं आहे. हे चित्र खूप गाजलं आणि त्याला  पुलित्झर पारितोषिकही मिळालं.

१९५३ मध्ये स्टॅलिन यांच्या मृत्यूवरही त्यांनी असंच एक प्रभावी चित्र काढलं. स्टॅलिन हे जवळपास तीन कोटी रशियन लोकांच्या मृत्यूस युद्ध, उपासमार, रोगराई, राजकीय हत्या वगैरे वगैरेमुळे जबाबदार होते असं बातमीत म्हटलं होतं. त्यामुळे मृत्युदेवता स्टॅलिन यांना सोबत घेऊन जाताना म्हणते आहे की, ‘तू माझा खूपच जवळचा मित्र होतास!’ या चित्रालाही पुलित्झर पारितोषिक मिळालं.

१९७९ साली इराणमधील अमेरिकन वकिलातीमधील ५२ कर्मचाऱ्यांना तेथील अतिरेक्यांनी ४४४  दिवस ओलीस धरून ठेवलं होतं. त्या विषयावरचं त्यांचं हे सोबतचं व्यंगचित्र खूपच प्रभावी आहे. तेलाच्या व्यापाराला महत्त्व देणाऱ्या अमेरिकी धोरणांवरचं हे प्रभावी भाष्य म्हणावं लागेल.

हरब्लॉक यांनी असं म्हटलंय की, एका जुन्या गोष्टीमध्ये ‘राजा नागडा आहे’ हे सत्य सांगण्याचं धैर्य एक लहान निरागस मुलगा दाखवतो. ती भूमिका, तो निर्भयपणा व्यंगचित्रकाराकडे असला पाहिजे. हरब्लॉक यांनी आपल्यातला तो लहान निर्भय मुलगा सदैव जपला. म्हणूनच अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर त्यांनी अक्षरश: शेकडो व्यंगचित्रं काढली. अध्यक्ष झाल्यावर निक्सन यांचं वादग्रस्त वॉटरगेट प्रकरण उघडकीला आलं. निव्वळ या विषयावरती त्यांनी काढलेल्या चित्रांचा संग्रह आहे. त्यातलंच हे सोबतचं चित्र. या वॉटरगेट प्रकरणात ‘टेप’ हा महत्त्वाचा पुरावा मानला जात होता. त्याचा वापर करून त्यांनी चित्रांमध्ये एक विलक्षण ताकद आणली आहे. अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची कारकीर्द समाप्त करण्यात शोधपत्रकारांसोबत अशा व्यंगचित्रकारांचाही ‘हात’ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

हरब्लॉक यांचं एक भाष्य खूप महत्त्वाचं आहे- जे निव्वळ राजकीय व्यंगचित्रकारांसाठीच नव्हे, तर पत्रकारिता करणाऱ्या सर्वासाठी बोधवाक्य म्हणता येईल असं आहे. ते म्हणतात, ‘राजकीय व्यंगचित्र ही प्रकाशमान कालखंड दाखवत नाहीत. खरं तर ती अंधारा कालखंड दाखवतात, ज्यात प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दिसतो!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 1:09 am

Web Title: cartoonist herbert block herblock hasya ani bhashya dd70
Next Stories
1 विश्वाचे अंगण : तीन ध्रुवांचे तीन तेरा
2 सांगतो ऐका : अठराव्या शतकातील भारताचे चाणक्य
3 या मातीतील सूर : संगीतरस सुरस..