25 January 2021

News Flash

हास्य आणि भाष्य : अश्वारूढ थेलवेल

घोडा हा थेलवेल यांचा अत्यंत आवडता प्राणी. या प्राण्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काढलेली शेकडो चित्रं ही विलक्षण प्रेक्षणीय आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

इंग्लंडमधल्या यॉर्कशायरमध्ये नॉर्मन थेलवेल यांचं बालपण गेलं. हिरवीगार कुरणं, वळणावळणाचे रस्ते, कौलारू, दगडी-विटांची घरं.. धुरांडी, फुलझाडं, मोठे वृक्ष, मेंढय़ा घेऊन जाणारे मेंढपाळ, त्यांच्यासोबतचे कुत्रे, घोडय़ावर बसलेले शिकारी, निळं आकाश अशी एकापेक्षा एक उत्तम लँडस्केपिंग असणाऱ्या कंट्रीसाईड इंग्लंडमध्ये ते रमले नसते तरच नवल!

सतत चित्रं रेखाटावीत, पेंटिंग करावीत आणि नर्मविनोदी शैलीतील व्यंगचित्रं काढत आयुष्य निवांत घालवावे असे त्यांना वाटत असतानाच, दुसऱ्या महायुद्धाने एकूणच शांतता नष्ट झाली आणि थेलवेल यांच्या कानावर पक्ष्यांच्या किलबिलाटाऐवजी तोफांचे, बंदुकांचे आवाज पडू लागले. हाताचा संबंध ब्रश ऐवजी बंदुकीशी आला. थोडक्यात, त्यांना वयाच्या अठराव्या वर्षी लष्करात दाखल व्हावं लागलं. त्यातल्या त्यात सुदैव म्हणजे ते नवी दिल्लीच्या ‘आर्मी मॅगझिन’चे काम पाहू लागले आणि त्याचे कला संपादक झाले. व्यंगचित्रांची आवड स्वस्थ बसू देत नव्हतीच. त्यांचे पहिले व्यंगचित्र हे ‘लंडन ओपिनियन’ या नियतकालिकात प्रकाशित झालं.

युद्धानंतर स्थिरावलेल्या वातावरणात त्यांनी कलेचं रीतसर शिक्षण घेतलं. १९५२ पासून त्यांची व्यंगचित्र ब्रिटनच्या ‘पंच’ मासिकात नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागली. घोडा हा थेलवेल यांचा अत्यंत आवडता प्राणी. या प्राण्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काढलेली शेकडो चित्रं ही विलक्षण प्रेक्षणीय आहेत.

त्यांच्या पहिल्या व्यंगचित्र संग्रहाचं नावच ‘एंजल्स ऑन हॉर्सबॅक’ असं आहे. त्यांचं हे व्यंगचित्रातील अश्वप्रेम इतकं वाढलं की कॉमिक स्ट्रिप, पुस्तकांची रेखाटनं, व्यंगचित्र या साऱ्यातून त्यांचे अश्व दिसू लागले. पोनी म्हणजे छोटे, बुटके घोडे- जे साधारणपणे किशोरवयीन मुलं रपेट मारण्यासाठी वापरतात, त्याबद्दल थेलवेल यांची असंख्य चित्रं आहेत.

थेलवेल यांच्या चित्रांचे वैशिष्टय़ म्हणजे अप्रतिम रेखाटन, नेत्रसुखद रंगसंगती आणि नर्मविनोद! जातिवंत लँडस्केपिंग करणारे ते होते. त्यामुळे एखाद्या पेंटिंग प्रमाणे ते चित्र रेखाटतात. असंख्य बारीक-सारीक तपशील ते निगुतीने भरतात. मुख्य म्हणजे अनेक प्रकारचे प्राणी त्यांच्या चित्रात एखाद्या अंगणात किंवा परसदारी असावेत इतक्या सहजतेने वावरत असतात. तीन-चार प्रकारचे कुत्रे, कोंबडय़ा, बदक, घोडे, डुक्कर, मेंढय़ा, गाई, पक्षी या साऱ्यांनी त्यांच्या चित्रातील तपशील भरून जातो. ज्याला आपण अ‍ॅनाटॉमी म्हणतो ती मनुष्याबरोबरच या सर्व प्राण्यांची अ‍ॅनाटॉमीही ते उत्तम रेखाटतात. जरूर तर त्यांना विनोदी पद्धतीने उभे राहायला, पळायला किंवा उडायलाही लावतात. मोठय़ा माणसांबरोबरच लहान मुलांची रेखाटने थेलवेल खूप गोड रंगवतात.

घोडय़ावर बसण्यासाठी या मुलांना थेलवेल (अर्थातच चित्रातून) ट्रेनिंग देतात. साहजिकच ही सर्व शूर ब्रिटिश मुलं सहजपणे घोडय़ावरून दौड मारून येतात. सुरुवातीला घोडा आणि लहान मूल हे दोघेही घाबरलेले असतात. पुढे दोघांचीही भीड चेपते आणि खरी घोडदौड सुरू होते ती पाहण्यासारखी असते. घोडा एखाद्वेळी उंच उडी मारतो, त्यावेळी हातात लगाम धरलेला छोटा मुलगा बऱ्यापैकी अंतराळात असतो. एखादा फोटो काढावा असे थेलवेल ही चित्रं रंगवतात. यातला विनोद हा फार मोठा नाही, तो मिश्कील आहे आणि तो प्रसंगापेक्षा कॅरेक्टरमधून जास्त व्यक्त होतो.

ज्याला आपण पोनी टेल म्हणतो, म्हणजे घोडय़ाच्या शेपटीप्रमाणे केलेली केशरचना, तर एका मुलीला ती आवडत नसल्याने ती घोडय़ाच्या शेपटीची खरोखरच वेणी घालते. या चित्रातला निरागसपणा वाखाणण्यासारखा आहे आणि तपशील पाहण्यासारखे.

सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचा इंग्लंडचा शांत ग्रामीण भाग पाहायचा असेल तर थेलवेल यांच्या या चित्रांशिवाय पर्याय नाही. गुबगुबीत घोडा, त्याची केसाळ आयाळ, झुपकेदार शेपटी आणि त्यावरून रपेट मारण्यासाठी उत्सुक असलेली छोटी मुलगी यांचं चित्र काढणं हा थेलवेल यांचा आवडता छंदच बनला. ते एके ठिकाणी लिहितात, ‘‘एकदा मी सहजच एक घोडा आणि एक लहान मुलगी यांचं ‘फनी स्केच’ काढलं. ते लोकांना आवडलं. संपादकांकडे जोरदार मागणी झाली, आणखी चित्र छापा म्हणून. पण यात मी आणखी काय करणार होतो? म्हणून मी सहजच मोठय़ा ड्रॉइंग पेपरवर आणखीन काही कल्पना चितारल्या आणि संपादकांना दिल्या पाठवून! पण वाचकांना त्या इतक्या आवडल्या की मला नंतर त्या घोडय़ावरून काही काळ उतरावं असंच वाटेना!’’ त्यानंतर ‘थेलवेल पोनी’ या संकल्पनेचा जन्म झाला.

पण थेलवेल अधून मधून (घोडय़ावरून उतरून) बाकीचेही विषय हाताळत होते. मोटर, मासेमारी, बागकाम, कुत्रे, मांजर, शेती या साऱ्यांची ‘फनी स्केचेस’ काढत राहिले. त्यांचा ‘टॉप डॉग’ या नावाचा फक्त कुत्र्याविषयीच्या व्यंगचित्रांचा संग्रह आहे. त्यात त्यांनी किमान पंधरा प्रकारच्या जातीचे कुत्रे रेखाटले आहेत आणि त्या अनुषंगाने असंख्य चित्रंही आहेत. कुत्र्याचा स्वभाव, सवयी, तो पाळताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे त्यांनी विनोदी पद्धतीने सांगितलं आहे. ‘अप दि गार्डन पाथ’ या नावाचा एक विलक्षण वेगळा व्यंगचित्रांचा संग्रह त्यांचा आहे. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे अनेक वनस्पतींची शास्त्रीय नावं वापरून त्यांनी त्या अनुषंगानं व्यंगचित्रं रेखाटली आहेत, जणू काही ही हँडबुक आहेत! या सर्व संग्रहातून थेलवेल यांचा एकूणच प्राणी-पक्षी, वनस्पतींचा गाढा अभ्यास दिसतो. याचबरोबर स्वत:ला राहण्यासाठी एखादं घर हवं असेल तर ते कसं शोधावं या मोहिमेवर त्यांनी एक व्यंगचित्रांचं पुस्तक काढलं आहे. बागकाम करत असताना शेजाऱ्यांशी संबंध मत्रीचे असावेत असं सांगताना दोघे शेजारी आपल्या बागेतील गोगलगाई हळूच शेजाऱ्याच्या बागेत फेकताहेत असं गमतीशीर व्यंगचित्र ते रेखाटतात.

त्यांची एकूण ३४ पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्याचा एकत्रित खप हा वीस लाखांच्या आसपास आहे. त्यासोबत इंग्लंडचा ग्रामीण भाग हा विषय असणारी पेंटिंग्जही सुप्रसिद्ध आहेत. पण थेलवेल म्हटलं की गुबगुबीत देहयष्टीचा लडिवाळपणे दुडक्या चालीने जाणारा, शेपटी उडवणारा, हसऱ्या, मिस्कील चेहऱ्याचा घोडा आणि त्यावर डोळे मोठे करून घाबरून जाऊन लगाम घट्ट धरलेली बालिका डोळ्यासमोर येते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:20 am

Web Title: cartoonist norman thelwell lokrang hasya ani bhashya article abn 97
Next Stories
1 विश्वाचे अंगण : आहे हरित करार, तरीही..
2 बुद्धी प्रकाशा विठ्ठला!
3 महर्षी शिंदे यांच्या वैचारिक योगदानाची मांडणी
Just Now!
X