|| प्रशांत कुलकर्णी

व्यंगचित्रकार हा असा कलावंत आहे, जो कोणत्याही विषयावर व्यंगचित्रं काढू शकतो. म्हणजे केवळ ‘ऑल सब्जेक्ट्स अंडर द सन’ इतकंच नव्हे, तर ‘आल्सो इन्क्लुडिंग दी सन’ असं म्हणावं लागेल. या विषयांमध्ये अर्थातच  इतर कलाही आल्याच. संगीत, शिल्प, साहित्य, नृत्य, नाटक, पेंटिंग्ज इत्यादी अभिजात कलांपासून ते चित्रपट, टॅटू, जाहिरात, पपेट्री, जादू  इत्यादींसारख्या अभिनव कलाही व्यंगचित्रकाराच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. निव्वळ रोज राजकीय व्यंगचित्रं काढणाऱ्यांपेक्षा जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारे हास्यचित्रकार इथं महत्त्वाचे ठरतात.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

संगीत हा विषय तर जगभरातल्या व्यंगचित्रकारांना सदैव आकर्षून घेणारा. संगीतात इतकं प्रचंड वैविध्य आणि व्यंगचित्रं काढण्यासाठी इतका स्कोप आहे, की तसा क्वचित इतर कलांमध्ये असेल. शेकडो प्रकारची वाद्यं, त्या वाजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ती वाजवणारे कलावंत, त्यांचा रियाज, त्यांचा प्रत्यक्ष परफॉर्मन्स, मैफिली, आपापसातले त्यांचे व्यवहार, संगीतातल्या परंपरा, त्यात शिरलेलं तंत्रज्ञान, चित्रविचित्र रसिक इत्यादी विषयांचा वापर करून हजारो हास्यचित्रं जगभरामध्ये अनेक भाषांमध्ये काढली गेली आहेत. कारण संगीत हा एक अत्यंत आदिम असा कलाप्रकार आहे आणि तो जगभरात हजारो वर्षांपासून  रुजलेला आहे.

प्रतिभावान व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी संगीत या विषयावर बहारदार चित्रमालिका रेखाटल्या आहेत. त्यात त्यांनी चित्र आणि भाष्य यांत परस्परपूरक, पण तरीही विसंगत असा विनोदाचा अभिनव प्रयोग मोठ्या ताकदीने चितारला आहे. उदाहरणार्थ, संगीत म्हणजे काय याची मूलभूत चर्चा, व्याख्या एका मालिकेत त्यांनी केली आहे. त्यात ‘संगीत म्हणजे जे कानावर पडलं असता सुरेलपणाचं महत्त्व ध्यानात येतं’ असं स्टेटमेंट आहे. यासंदर्भात सोबतचं चित्र हे विवाह प्रसंगातील मंगलाष्टकं म्हणतानाचं आहे. त्यात दोन्ही भटजी शिरा ताणून मंगलाष्टकं म्हणताना दाखवले आहेत.  इथं सर्वसाधारणपणे मंगलाष्टकं भसाड्या आवाजात गायली जातात, हे निरीक्षण महत्त्वाचं आहे. त्याशिवाय या चित्रात इतर तपशीलही मजेदारपणे रेखाटले आहेत. दोन्ही भटजींचं तोंड वर करून ओरडणं, एका भटजीचा उजवा पाय किंचित वर उचललेला असणं, त्यांची लांब जानवी, नवरदेवाचं टेन्शन, त्याचा कोट, अंतरपाटावरील स्वस्तिक, नववधूचं बावरणं इत्यादींमुळे कदाचित ‘गंगाऽऽऽ सिंधू सरस्वती च…’ हेही ऐकू येईल असं वाटतं.

सरवटे यांनी हास्यचित्र कलेमध्ये प्रचंड प्रयोग केले आहेत. त्यांची एक मालिका ‘पेंटिंग’ या विषयावरची आहे. यातली चित्रं ही फॅन्टसीच्या अंगाने जाणारी आहेत. संगीतात जशी घराणी आहेत तशीच पेंटिंग्जमध्येही अनेक शैली आहेत. त्यांतील काही जण आधुनिकतेच्या नावावर शैलींची सरमिसळ करतात. त्यावर आधारित त्यांचं हे सोबतचं चित्र दोन चित्रशैलींमधला सुप्त संघर्ष दाखवणारं आहे.

मॉडर्न आर्ट (म्हणजे आधुनिक चित्रकला) आणि अभिजात चित्रकला यांतील संघर्ष तर रसिकांचा खूप लाडका विषय आहे. चित्र कळलं, भावलं पाहिजे ही रसिकांची अपेक्षा मॉडर्न आर्टमध्ये पूर्ण होत नसल्याने काही परंपरावादी रसिकांची चिडचिड होते. एका चित्रात एक पेंटर मॉडर्न आर्ट शैलीतील अगम्य चित्र रंगवतोय आणि तेवढ्यात त्याची म्हातारी आई थोड्या काळजीने आणि रागानेही मुलाला म्हणतेय, ‘‘अरे, काय हे! बाकीचे चित्रकार बघ… आपल्या आईचं पोट्र्रेट करताहेत; आणि तू हे असलं काहीतरी!!’’ बिचारा चित्रकार! घरातसुद्धा त्याला समजून घेणारं कोणी नाही.

पीटर अर्नो हे अमेरिकन व्यंगचित्रकार. त्यांनी एक वेगळीच कल्पना रेखाटली आहे. अनेक चित्रकारांना सेल्फ पोट्र्रेट करण्याची आवड असते. अशावेळी स्टुडिओमध्ये चित्रकाराची बायको आपल्या नवऱ्याला- जॉर्जला  शोधायला येते, तेव्हा तिला त्याचा शोध घेणं जरा अवघडच जातंय हे पीटर यांनी दाखवलं आहे. जॉर्ज हा चित्राच्या बरोबर मध्ये आहे आणि हळूच आपल्याकडे बघतोय असं वाटतं. त्यांच्याच दुसऱ्या एका चित्रात एक मजेशीर कल्पना आहे. गुरांचे कळप घेऊन फिरणाऱ्या दोन मित्रांपैकी एकाला रात्री चंद्रप्रकाशात गिटार घेऊन मोठ्याने गाणी गाण्याची हुक्की येते. तेव्हा दुसरा मित्र त्याला विनंती करतो की, ‘‘रागावू नकोस मित्रा! तू चांगलाच गातोस, पण गाईंना रात्री झोपेची आवश्यकता असते. त्यांची झोपमोड करणं बरं नव्हे!’’ (एखाद्याच्या गाण्याला दाद द्यावी तर ही अशी!)

शिल्पकलेवरही अनेक व्यंगचित्रं आहेत. मॉडेलनुसार शिल्प बनवून देणारे काही शिल्पकार एखादी चूक झाली तर ती काहीतरी क्लृप्ती लढवून दुरुस्त करून देऊ शकतात, हे ‘प्लेबॉय’मध्ये प्रकाशित झालेल्या सोबतच्या व्यंगचित्रातून लक्षात येतं.

सर्जिओ हा अमेरिकेतील ‘मॅड’ मासिकाचा व्यंगचित्रकार. शब्दविरहित आणि खुसखुशीत कल्पनांसाठी सुप्रसिद्ध. त्याचं हे तीन भागांतील चित्र. दोन्ही हातांत दोन वेगवेगळ्या बाहुल्या (पपेट्स) घेऊन त्यांचा खेळ हा कलाकार दाखवतो. या दोन बाहुल्या म्हणजे तलवारबाजी करणारे सरदार दिसत आहेत. त्यांच्यात तुंबळ युद्ध झालेलं (म्हणजे याच्याच डाव्या-उजव्या हातांची एकमेकांशी मारामारी!) दुसऱ्या चित्रात दिसतं. तर तिसऱ्या चित्रात हा कलाकार एका हाताने दुसऱ्या हाताच्या जखमांना बँडेज बांधताना दाखवला आहे. आता म्हटलं तर हा एक गमतीशीर विनोद आणि झकास चित्रही. पण थोडा विचार केला तर या चित्राला तत्त्वज्ञानाचा स्पर्श झालेला दिसतो. चांगल्या व्यंगचित्राची हीच गंमत असते, की त्यातून प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार,आकलनानुसार अर्थ लावत असतो.

prashantcartoonist@gmail.com