News Flash

सच्चे ‘शब्दचित्र’

जळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यापासून छायाचित्रे काढणे आणि ती सोशल मीडियावर अपलोड करणे, हा कोणाच्याही हातचा मळ झाला आहे.

| March 1, 2015 01:58 am

जळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यापासून छायाचित्रे काढणे आणि ती सोशल मीडियावर अपलोड करणे, हा कोणाच्याही हातचा मळ झाला आहे. त्यावर शेकडो लाइक्स आणि कॉमेंटमध्ये कौतुकाचे शब्द उमटले की आपल्याला छायाचित्रणकला साधली असाही अनेकांचा गोड समज होऊ लागतो. एखादा चांगला, महागडा विदेशी आणि अद्ययावत स्वयंचलित कॅमेरा आपल्याकडे असला की उत्तम छायाचित्रकार होता येते, हा समज अलीकडे वाढू लागला आहे. पण केवळ महागडा मोबाइल किंवा अद्ययावत कॅमेरा ही भौतिक साधने उत्तम छायाचित्रकार होण्यासाठी पुरेशी नसतात, हे अस्सल छायाचित्रे नीट न्याहाळल्यानंतर लक्षात येते. त्यामध्ये केवळ  छायाप्रकाशाची किमया नसते, तर तो क्षण जिवंतपणे पकडण्याची कला असते. असा क्षण पकडण्यासाठी सौंदर्यदृष्टी असलेले मन असावे लागते. कोणता क्षण पकडायचा हे ठरवणारे जागे मन ज्याच्याजवळ असते तो उत्तम छायाचित्रकार होऊ शकतो. त्याची छायाचित्रे अजरामर होऊन राहतात. अस्सल छायाचित्रकारास नेमक्या क्षणी कॅमेरा खुणावू लागतो आणि अशा संवादातून तो क्षण जिवंत होतो.
अशी कसबी छायाचित्रणकला साधलेल्या कलावंतांपैकी मोहन बने हे नाव मुंबईच्या वृत्तपत्रविश्वात परिचित आहे. वृत्तपत्रसृष्टीत छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्यांना अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे साक्षीदार होण्याचे भाग्य सहज मिळून जाते. मोहन बने यांनी दीर्घकाळ वृत्तछायाचित्रकार म्हणून काम केल्याने त्यांच्या पदरी या भाग्याची मोठी पुंजी आहे. मुंबईच्या प्रत्येक बदलत्या दिवसाचा प्रवास मोहन बने यांच्या कॅमेऱ्याने टिपला, राजकारणाचे रंग त्यांनी अचूकपणे पकडले. क्रीडा हा तर त्यांनी छायाचित्रणकलेसाठी आव्हान मानलेला प्रकार. देशातील अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे साक्षीदार असलेल्या मोहन बने यांनी क्रीडा छायाचित्रणाची नस एवढय़ा अचूकपणे पकडली, की कोणत्याही मैदानावरचा कितीही थरारक क्षण त्यांच्या कॅमेऱ्याने कैद केल्याशिवाय जणू पुढे सरकलाच नाही. क्रिकेट हे मुंबईकरांचे पहिले वेड आहे. मुंबईच्या क्रिकेटजगतात नावाजलेले ई. टी. बिरीड (ब्रीद) हे मोहन बनेंचे मामा असल्याने क्रिकेटचे बाळकडू पचवतच ते मैदानावर वावरले आणि उतरलेदेखील. त्यापाठोपाठ हाती कॅमेरा आल्याने क्रिकेटच्या मैदानावरचे छायाचित्रण हा त्यांचा सर्वात प्रिय छंद बनला. ‘इंडियन एक्स्प्रेस’चे छायाचित्रकार म्हणून मोहन बने यांनी टिपलेल्या छायाचित्रांची कात्रणे अनेक क्रीडाप्रेमींनी सोबत बाळगून भूतकाळातील अविस्मरणीय क्षण जपले आहेत. नागपूरमध्ये १९८७ मध्ये व्हीसीए स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडसोबतच्या सामन्यात चेतन शर्मा या भारताच्या गोलंदाजाने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली आणि तो प्रत्येक क्षण टिपणारे मोहन बने हे सहा देशांच्या छायाचित्रकारांपैकी एकमेव ठरले. या विक्रमाबद्दल त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाला आणि क्रीडाविश्वाची नस सापडलेला छायाचित्रकार म्हणून त्यांचा बोलबालाही झाला. आणीबाणीतील आंदोलने, भिवंडीची दंगल, गिरणी कामगारांचा प्रदीर्घ लढा, १९८४ मधील जॉर्ज फर्नाडिस यांचे आंदोलन, अयोध्येतील आंदोलन, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असे अनेक प्रसंग आजही बने यांच्या छायाचित्रांतून वर्तमानाशी बोलतात.
प्रत्येक छायाचित्र स्वत: बोलके असतेच; पण त्याला शब्दांची साथ मिळाली की त्यामागे दडलेला भूतकाळही बोलू लागतो असे म्हणतात. मोहन बने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘चॅम्पियन्स’ या पुस्तकात बोलक्या भूतकाळाची अनुभूती देण्याची ताकद दिसते. ‘चॅम्पियन्स’ हे बने यांचे तिसरे पुस्तक. याआधी ‘अपूर्ण परिक्रमा- कैलास मानसरोवराची’ आणि ‘ऑलिम्पिकचे सोनेरी सीमोल्लंघन’ ही त्यांची दोन छायाचित्रयुक्त पुस्तके वाचकांशी थेट संवाद साधणारी ठरली आहेत. नजरेने टिपलेल्या छायाचित्रांना तेवढय़ाच समर्थपणे शब्दरूप देण्याचे त्यांचे कसब ‘चॅम्पियन्स’मध्ये पानोपानी दिसते. भारताच्या क्रिडाविश्वात सोनेरी इतिहास रचणाऱ्या नामवंत क्रिडापटूंबरोबरच विविध क्षेत्रांतील सुपुत्रांचा सुयोग्य शब्दांतील सचित्र परिचय हे या पुस्तकाचे वैशिष्टय़. मोहन बने यांनी केवळ माणसेच कॅमेऱ्यात टिपली नाहीत, तर त्यांनी माणसे वाचली आणि जोडलीदेखील. लता मंगेशकर, दिलीप वेंगसरकर, शरद पवार, धनराज पिल्ले, अंजली भागवत, युवराजसिंग, सायना नेहवाल, गगन नारंग, शौनक अभिषेकी, सनदी पोलीस अधिकारी अरूप पटनायक, अभिनेता भरत जाधव आदी नामवंतांच्या परिचयाचा एक सुंदर शोभादर्शक बने यांच्या लेखणीतून साकारला आहे. याशिवाय या सर्वानी आठवणींना दिलेला उजाळा आणि त्यातून उलगडत गेलेली क्रिकेटची कहाणी यामुळे हा एक मौल्यवान दस्तावेज ठरतो.
‘चॅम्पियन्स’, संकल्पना- मोहन बने, प्रकाशक- गौरधन व्हिजन, मुंबई, पृष्ठे- १४४, किंमत- ९९९ रु.                    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2015 1:58 am

Web Title: champions by mohan bane
Next Stories
1 गायतोंडय़ांची कुटुंबप्रमुख
2 मी नाटकाची निवड कशी करतो?
3 दृढ संकल्प जीवी धरावा..
Just Now!
X