News Flash

छापाकाटय़ात अडकलेलं नाटक

एकेकाळी मराठी नाटकांनी रसिकांना समृद्ध जीवनानुभव दिला. परंतु आजचे मराठी नाटक मात्र टीव्हीवरील मालिकांप्रमाणे एपिसोडिक झाले आहे.

| February 1, 2015 03:08 am

एकेकाळी मराठी नाटकांनी रसिकांना समृद्ध जीवनानुभव दिला. परंतु आजचे मराठी नाटक मात्र टीव्हीवरील मालिकांप्रमाणे एपिसोडिक झाले आहे. त्यात झगमगाट व युक्त्याप्रयुक्त्यांनी भुलवण्याचाच प्रयत्न अधिक दिसतो. परिणामी नव्या आवृत्तीतील जुन्या, आशयसंपन्न नाटकांना आज पुनश्च सुगीचे दिवस आलेले दिसताहेत.

बेळगाव येथे होणाऱ्या ९५ व्या नाटय़संमेलना- निमित्ताने आजच्या रंगभूमीचा घेतलेला धांडोळा..
ना टकाची ही गोष्ट आज.. आताची नसली तरी ती फार जुनीही नाही. आज पन्नाशीत असलेल्यांना त्यांच्या पंचविशीतली किंवा त्यानंतरची नाटकं आठवली तर तो काही वृद्धत्वाचा दोष म्हणता येणार नाही. असलाच तर तो गुण आहे त्या- त्या नाटकाच्या अविस्मरणीय प्रभावांचा!
‘नटसम्राट’ कानी पडल्यावर ‘घर देता का घर?’ म्हणणारा बेलवलकरांचा चेहरा व त्यातून दिसणारे डॉ. श्रीराम लागू आठवणारच. साक्षीदाराचा पिंजरा पाहिला की त्यातला गांधी टोपी घातलेला, तिरपी मान करून ‘मी लखोबा लोखंडे. तो मी नव्हेच!’ असे ओठांची वेडीवाकडी हालचाल करीत चावत बोलणारे पंत पणशीकर डोळ्यांसमोर अवतरले नाहीत तर तो प्रेक्षक कसला? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा..’ असं जणू प्रेक्षकांनाच बजावणारी इटुकली वाटणारी भक्ती बर्वे अभिनयाची शहजादी ‘फुलराणी’ म्हणून आठवणारच! आठवते- ती ‘घाशीराम’मधील ‘आम्ही पुण्याचे बामण हरी’ म्हणणारी हलती-डुलती भिंत. एखाद्या दुय्यम नटाला शिवाजी मंदिरच्या आसपास घोटाळताना पाहिलं की ‘बेगम बर्वे’ची चंद्रकांत काळेंच्या डोळ्यांतून उमटलेली करुणा ज्याच्या मनात ठसठसते तो नाटकवेडय़ाशिवाय कोण असणार?.. असे कितीतरी भास, कितीतरी आभास आजही आयुष्याला व्यापून राहिलेले!
त्या दिवसांत साहित्य संघ, गोवा हिंदु असोसिएशन, आय. एन. टी., कलावैभव, चंद्रलेखा, नाटय़संपदा, भद्रकाली, सुयोग अशा तालेवार नाटय़संस्था होत्या. प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, मोहन तोंडवळकर, सुधीर भट, मच्छिंद्र कांबळी, लता नार्वेकर असे नाटक सर्वस्व मानणारे निर्माते होते. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, पु. ल. देशपांडे, बबन प्रभू असे कितीतरी प्रतिभासंपन्न नाटककार होते. या सर्वाना धारेवर धरणारे निर्भीड नाटय़समीक्षक माधव मनोहर होते.
तसं बघायला गेलं तर हे सगळं कालचं नाटक.. पण आजही ते आजचंच वाटतं.
या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांतील परिस्थिती मात्र विशेष उत्साहवर्धक नाही. उलट, भयकारी वाटावी अशीच आहे. दीर्घकाळ सोबत करील असं नाटक बऱ्याच दिवसांत भेटलेलं नाही. नाव पाहून नाटकाला गर्दी होईल असा केवळ नाटकातलाच असा नट उरला नाही. तात्काळ धाव घ्यावी असा नाटककार डोळ्यासमोर येत नाही.
का व्हावं असं?
गेल्या दशकातलं हे चित्र आहे. आजच्या बुकिंग क्लार्कवजा निर्मात्यांना नाटक वाचायची गरज भासत नाही. आपल्या नाटकाचा संपूर्ण प्रयोग बघण्याचे श्रमदेखील ते घेत नाहीत. ते फक्त बुकिंग बघतात. नाटकाच्या lr08गुणवत्तेशी त्यांना देणेघेणे नाही. त्यांना देणेघेणे असते ते नाटय़गृहांच्या तारखांशी आणि गल्ल्याशी.
सर्वाधिक प्रगत रंगभूमी म्हणून मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे पाहिलं जातं. पूर्वी मराठी नाटक बांद्यापासून चांद्यापर्यंत महाराष्ट्रभर फिरत असायचं. घराघरातून मराठी नाटक येनकेन प्रकारेण जागतं असायचं. आजचं नाटक मुंबई-पुण्यापलीकडे जात नाही. नाटकांचे दौरे निर्मात्यांना परवडत नाहीत. नटालाही फायदेशीर वाटत नाहीत. पूर्वीचा नट नाटकावर आणि फक्त नाटकावरच अवलंबून असायचा. आज तोच नट एकाच दिवशी नाटकाच्या प्रयोगाबरोबरच चित्रपटाचं, मालिकेचं शूटिंग किंवा कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेत असतो. केव्हा कशासाठी त्याला बोलावणं येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे मुंबईबाहेर तो फार काळ राहू शकत नाही. नाव नसलेल्या कलावंतांनाही वाट बघण्यासाठी मुंबईतच थांबावं लागतं. नाटकाच्या तालमीलाही नट उपलब्ध नसतात. पहिला प्रयोग हीच रंगीत तालीम. पूर्वी मुंबईतील वृत्तपत्रे महाराष्ट्रभर जात. त्यांतून प्रसिद्ध होणाऱ्या नाटकांच्या जाहिराती तसेच नाटय़परीक्षणांमुळे प्रत्यक्ष नाही, तरी अप्रत्यक्षपणे नाटक महाराष्ट्रभर पोहोचत असे. आता वृत्तपत्रांच्या स्थानिक आवृत्त्या ठिकठिकाणांहून प्रसिद्ध होतात. त्यांत मुंबईतील नाटकांची गंधवार्ताही नसते. त्यामुळे मुंबईबाहेरचा प्रेक्षक नाटकांबाबत अनभिज्ञच राहतो. अशा परिस्थितीत एखादे चांगले नाटकसुद्धा कुणाच्या स्मरणात येण्याची शक्यता संभवत नाही. आज मुंबईबाहेरच्या नाटय़विद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून वर्तमान नाटकांचा जो काही अभ्यास होत आहे तो त्या संहितेच्या छापील पुस्तकांवरूनच. (अर्थात ती छापली गेली तरच!) बहुसंख्य मराठी नाटकांची निर्मिती मुंबईतच होते. ती नाटकांची मुख्य बाजारपेठ आहे. आणि नाटकाचा अभ्यास प्रयोगसिद्ध झाल्यानंतरच (किंवा अनुभवल्यानंतरच) पूर्ण होतो, या विधानाची सत्यता मुंबईबाहेरच्या नाटय़अभ्यासकांना पडताळून पाहता येण्याची शक्यताच उरलेली नाही.
दूरचित्रवाणीने नाटकाचा प्रेक्षकच कमी केला नाही, तर प्रेक्षकांची अभिरुची खालावण्यातही सर्वतोपरी हातभार लावला. कोल्हटकर-कालेलकरांनी मराठी रंगभूमीवर काही काळ दृढ केलेली ढोबळता, अतिरंजितता, कृतकता, अतार्किकता कमी करण्याचे शिरवाडकर, कानेटकर, दळवी, पु. ल., मतकरी आदी नाटककारांनी निकराचे प्रयत्न केले. विजय तेंडुलकरांनी नाटक गोष्टीतून सोडवून प्रेक्षकांना थेट वास्तव अनुभव देण्यात कमालीचे यश मिळवले. पण हे सर्व प्रयत्न दूरचित्रवाणीने मालिकांच्या बटबटीत दळणाने मातीमोल केले. त्यांनी पूर्वीच्या नाटकांतली ढोबळता, कृत्रिमता व खोटेपणा झगमगीत करून प्रेक्षकांच्या आस्वादनावर आदळत ठेवला. त्यांनाही मग या कलाहीनतेचीच सवय लागली. मराठी नाटकांकडे ते दूरदर्शनच्या खोक्यातूनच बघू लागले. मराठी नाटक एपिसोडिक झाले. जुन्या नाटकांतील तुकडय़ांच्या ‘नांदी’ने तुफान यश मिळवले. चटपटीत संवाद, मुद्दे सांगावेत तसे छोटे छोटे प्रसंग, दोन वा तीन पात्रांचीच नाटकं आणि झगमगाटाने व युक्त्याप्रयुक्त्यांनी प्रेक्षकांना दिपवण्याचा प्रयत्न सुरू झाले. अशाने अस्सल नाटक बाजूला पडले. घटनांचे प्रसंग झाले नाहीत. व्यक्तिरेखांऐवजी फक्त पात्रांचे नमुने तयार झाले. रंगतदार प्रसंगांचे, सशक्त व्यक्तिरेखांचे, गुंतवून ठेवणारे संस्मरणीय नाटक हरवले आणि दोन-तीन पात्रांच्या टाइमपास नाटकांचे पेव फुटले. नाटय़गृहात पाहिलेले नाटक तिथेच राहिले. ते सोबत आलेच नाही. प्रसंगांची प्रतीके झाली नाहीत. संवादांच्या स्मरणमाळा हाती आल्या नाहीत. व्यक्तिचित्रांची नाती जुळली नाहीत. या वस्तुस्थितीला अपवाद ठरावीत अशी काही नाटकं आली; पण ती अपवादच!
‘आयुष्य खंडित झाले आहे, तेव्हा आमचे नाटक तुकडय़ा-तुकडय़ांचेच असणार!’ अशी हाळी नव्या लेखकांनी ठोकली. आपल्या असमर्थतेची ढाल पुढे केली. पण आयुष्य खंडित नव्हते कधी? आज त्या विखंडतेचे प्रमाण वाढले आहे यात शंका नाही. परंतु त्यातूनही एक सलग धागा पकडून प्रभावी नाटक निर्माण करता येऊ शकते. नाटक एकात्म परिणाम घडवू शकणार नसेल तर ते प्रभावी होणारच कसे? दीर्घकाळ स्मरणात राहणार कसे?
या सर्व बदलांचा परिणाम असा झाला की, गेल्या पाच-सहा वर्षांत पूर्वी गाजलेल्या नाटकांच्या नव्या आवृत्त्या रंगमंचावर आल्या आणि प्रेक्षकांनी त्यांना तुफान प्रतिसाद दिला. प्रेक्षकांना ‘नाटक’ हवं आहे, नाटकासारखे काहीतरी नको, हे त्यातून सिद्ध झालं.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांतून नाटय़प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येण्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु मुंबईतील नाटय़निर्मात्यांना नाटय़प्रशिक्षणाशी काही देणेघेणे नसल्यामुळे प्रशिक्षित विद्यार्थ्यांना व्यावसायिक रंगमंचावर स्थान मिळत नाही. त्यांना दूरचित्रवाहिन्यांकडेच वळावं लागतं. त्यावरच्या मालिकांतून काम करणं म्हणजे घाण्याला जुंपलेला, झापडं लावलेला बैलच. या प्रशिक्षितांना अत्यंत सुमार बुद्धिमत्तेच्या व तशाच कुवतीच्या वरिष्ठांच्या निर्बुद्ध सूचना अमलात आणणं ‘पापी पेट के वास्ते’ भाग पडतं. त्यात वेळेचा काही धरबंदच नसतो. त्यामुळे ते नाटकाला वेळ देऊ शकत नाहीत आणि टीव्हीही सोडू शकत नाहीत. त्यांना आपल्या सृजनशक्तीशी आणि शारीरिक शक्तीशी सतत झगडा द्यावा लागतो. प्राप्त ज्ञानाचा वापर करण्याची संधीच मिळत नाही. या साठमारीत साध्य केलेले ज्ञान बोथट होऊन जाते. नाइलाजाने दूरचित्रवाणीचा घाणा ओढत केव्हातरी ‘अच्छे दिन आएंगे’ची वाट बघत बसावे लागते. अशाही परिस्थितीत आपली ऊर्मी टिकवून काहींना वेगळं, कलात्मक असं काही आविष्कारित करावंसं मनापासून वाटतंही; पण त्यासाठी भूमी कुठे आहे? मुंबईत प्रायोगिक रंगभूमीसाठी, तरुण कलावंतांना व्यक्त होण्यासाठी त्यांच्या आविष्कारायोग्य आणि परवडेल असा रंगमंचच उपलब्ध नाही. नाटय़ परिषद दरवर्षी समांतर रंगमंचाची फक्त घोषणाच करते.
या सर्व बदललेल्या परिस्थितीचा साधकबाधक विचार करून त्यातून ठोस मार्ग काढण्यासाठी काही प्रयत्न करावेत असं नाटय़ परिषदेला वाटत नाही. दरवर्षी शासकीय अनुदान घेऊन संमेलने भरवण्यात परिषदेला जेवढा रस आहे, तेवढा अन्य कशातही नाही.
मुक्ता बर्वे, राकेश सारंग हे नव्या विचारांचे अस्सल नाटकवाले नाटय़निर्माते झाल्याची घटना आणि नुकत्याच झालेल्या लोकांकिका व दीर्घाक स्पर्धाच्या फलितांनी आशादायक वातावरणाची चाहूल लागतेय खरी; पण..
अर्थात नाटक करणारा आणि ते बघणारा शिल्लक असेतो मराठी नाटक जिवंत राहील यात शंकाच नाही. पण हे जिवंत राहणारं नाटक कसं असेल व किती टिकेल, हे फक्त नटेश्वरच सांगू शकेल. आज मात्र नाटक करणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची मन:स्थिती ‘छापा-काटा’तल्या आई-मुलीच्या असहायतेसारखी झाली आहे.
– कमलाकर नाडकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2015 3:08 am

Web Title: chapa kata marathi play
टॅग : Marathi Play
Next Stories
1 क्रिकेटचा सत्ता-सारिपाट
2 समीक्षेतला अखेरचा रोमन!
3 भगभगणारी वेदना वागविणारा अश्वत्थामा
Just Now!
X