या थिएटरचे रंगरूप आता खूपच बदलले आहे. काळाच्या बरोबर पुढे जाण्याचा ते प्रयत्न करीत आहे. थिएटर हे अखेरत: लोकानुरंजनाचे एक व्यापारी ठिकाण असल्यामुळे असा प्रयत्न त्याने करावा हे अपरिहार्यच आहे. पण काही वास्तू अशा असतात, की तेथे नवे कितीही आले, तरी जुने काही तेथून हटत नाही. गतकाळचा वृद्ध बैरागी फक्त दाढीजटा वाढवीत एखाद्या कोपऱ्यात पथारी टाकून कायमचा पडलेला असतो. प्रचलिताशी कोणतेही नाते नसते त्याचे. या थिएटरवरून अथवा मधून जाताना हा बैरागी मला अनेकदा दिसतो. जाणवतो. त्याच्या जुनाट, थिजलेल्या नजरेला नजर मिळाली की मी काहीसा अस्वस्थ होतो आणि एका अंधेऱ्या जिन्याने मी भूतकाळाच्या तळघरात उतरत आहे असा मला भास होतो.
या थिएटरचे नाव- विजयानंद. नाशिक शहरातील सर्वात जुने थिएटर आहे हे. त्याने खूप पाहिले आहे. चार्ली चॅप्लिनचे ‘गोल्ड रश’पर्यंतचे मोठे आणि संपूर्ण चित्रपट याच थिएटरमध्ये मी पाहिले. या काळात मी चित्राच्या पलीकडे गेलो होतो आणि थिएटरच्या व्यवहारातही काही सुधारणा होत होत्या. मारामारीच्या पलीकडे असलेले जग मला जाणवू लागले होते आणि चित्रकथेतून अधिक काहीतरी मिळावे अशी मनाची खटपट सुरू झाली होती. या काळात चार्ली चॅप्लिनने जो विलक्षण अनुभव मला दिला, तो कोणत्याही चित्रपटाने, नाटकाने अथवा पुस्तकाने त्या अथवा पुढच्याही काळात कधी दिला नाही. या युगातील चित्रपटसृष्टीचे कितीतरी श्रेष्ठ कलावंत मी पाहिले. डग्लस फेअरबंॅक्स, एमेल जेनिंग्ज, जॉन गिल्बर्ट, ग्रेटा गाबरे, जोन क्रॉफर्ड, रुडाल्फ व्हॅलेंटिनो, बॅरीमूर, हॅरोल्ड लॉइड इत्यादी. कोणी देखणे आणि अभिनयकुशल होते, तर कोणी रूपाचा अभाव असूनही केवळ अभिनयाच्या बळावर पुढे आलेले होते. ग्रेटा गाबरे ही फारशी सुंदर होती असे म्हणता येणार नाही, पण तिने रूपेरी पडद्यावर जे मनोहर, भावपूर्ण व्यक्तिमत्त्व उभे केले होते ते केवळ अद्वितीय होते. एमेल जेनिंग्ज हा नट ओबडधोबड अंगाचा आणि राठ चेहऱ्याचा. पण राकट, नाठाळ अथवा अरेरावी व्यक्तीच्या भूमिका रंगविण्यात त्याने असाधारण यश मिळविले होते. झारच्या जीवनावर असलेले त्याचे ‘पेट्रियट’ हे चित्र पाहून मी कित्येक दिवस अस्वस्थ झालो होतो. पोट दुखेपर्यंत हसायला लावण्याचे कसब हॅरोल्ड लॉइड, वेस्टर कीटन या नटांजवळ होते.
सारेच जण कोणत्या ना कोणत्या गुणाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत होते. आणि तरीही चार्ली चॅप्लिन हा सर्वापेक्षा वेगळा, सर्वापेक्षा श्रेष्ठ कोटीतील कलावंत होता. ‘झाले बहु, होतील बहु’ हे वर्णन जर कोणत्या कलावंताला सर्वार्थाने लागू पडत असेल, तर ते फक्त चार्ली चॅप्लिनला. चार्ली चॅप्लिनने पडद्यावर उभा केलेला ‘ट्रॅम्प’ (कलंदर) हा शेक्सपीअरच्या सर्वोत्तम व्यक्तिचित्रांइतकाच प्रभावी आहे, हे एका अमेरिकन समीक्षकाचे मत मला पूर्णार्थाने खरे वाटते. नाकाखाली दोन झुरळे बसावीत त्याप्रमाणे दिसणारी फ्रेंचकट मिशी, सभ्यपणाशी व संस्कृतीशी नाते ठेवू पाहणारी डोक्यावरील उंच हॅट, आखूड कोट, ढगळ पोतेवजा विजार आणि हातातील ती काठी. विनोदाला सोयीस्कर म्हणून केव्हातरी शोधून काढलेल्या या सजावटीत मानवी व्यवहारातील सारे कारुण्य पुढे आश्रयाला येऊन राहिले. ‘मनसोक्त हसवता हसवता प्रेक्षकांना रडायला लावणारा नट’ असे चार्ली चॅप्लिनचे वर्णन केले जाते. ते खरे असले तरी अपुरेही आहे. दु:खाचा कडेलोट दाखवून अथवा शोकरसाची तार तुटेपर्यंत खेचून प्रेक्षकांना अथवा वाचकांना रडायला लावणाऱ्या अनेक कलाकृती आपल्या पाहण्यात येतात. चार्ली चॅप्लिनच्या कारुण्याची जात वेगळी होती. संस्कृतीच्या गर्भागाराकडे प्रवास करणाऱ्या, चहुकडून अंगावर कोलमडणाऱ्या विरोधातून आणि विसंगतींतून वाट काढणाऱ्या एका अनिकेत माणसाच्या पराभवाचे ते कारुण्य आहे. माणसाने उत्पन्न केलेल्या व्यावहारिक कोलाहलात ‘माणूस’च किती अगतिक, हास्यास्पद आणि एकाकी झाला आहे याचे ते हृदयस्पर्शी दर्शन आहे. एका चित्रपटात प्रेमासाठी आसुसलेल्या या दरिद्री, उनाड कलंदराला एक बेवारशी मूल सापडते.
अनेक लटपटी-खटपटी करून (ज्यातून हास्यरसाचे पाणलोट उसळतात), वेळप्रसंगी लहानसहान चोऱ्या करून तो त्या मुलाचे अत्यंत प्रेमाने संगोपन करतो. त्याच्या निर्थक आयुष्याला एक अर्थ सापडतो, एक जीवनकार्य मिळते. मुलाला त्याच्यावाचून आणि त्याला मुलावाचून करमत नाही. शेवटी मुलाच्या श्रीमंत आई-बापांना मुलाचा पत्ता लागतो आणि ते त्याला घेऊन जातात. या ताटातुटीच्या प्रसंगी चार्ली चॅप्लिनच्या चेहऱ्याने आणि डोळ्यांनी दोन-चार मिनिटांत जे सांगितले ते पट्टीच्या लेखकाला डझनभर ग्रंथांतही सांगता आले नसते. सर्वस्व गमावत असल्याचे दु:ख, मुलाला सांभाळायला आपण अपात्र आहोत ही जाणीव, श्रीमंत घरात मुलाला सुख लागेल ही आशा.. प्रेक्षकांच्या छातीतून अकस्मात हुंदका फुटावा असा तो अभिनय होता. सारे काही संपल्यावर कलंदर पाठमोरा होतो आणि एका अपार वैराण माळावरून आपली ध्येयशून्य वाटचाल सुरू करतो. फेंगडे पाय टाकीत, काठी फिरवीत जाणारी त्याची मूर्ती अंधूक होत होत क्षितिजाला मिळून जाते आणि चित्रपट संपतो. चॅप्लिनने निर्माण केलेल्या कलंदराच्या एकटेपणाचे ते अत्यंत परिणामकारक असे प्रतीक होते.
‘गोल्ड रश’ हा चार्ली चॅप्लिनचा मला वाटते, अखेरचा मूक चित्रपट होता. मूक चित्रपटाचे सारे ऐश्वर्य, शब्दावाचून बोलण्याचे सारे सामथ्र्य त्यात प्रगट झाले होते. मुष्ठियुद्धाच्या रिंगणामध्ये चार्ली चॅप्लिन एका प्रचंड देहधारी मल्लाबरोबर सामना करीत आहे.. डोंगररस्त्यावरून कलंदर खांद्यावर गाठोडे घेऊन चालला आहे आणि मागून एक अस्वल त्याच्या नकळत त्याचा पाठलाग करीत आहे.. अनेक दिवसांच्या उपासानंतर चार्लीने व त्याच्या धिप्पाड मित्राने पायांतील बूट उचलून टेबलावर ठेवले आहेत आणि एखादे पक्वान्न पुढय़ात आहे अशा आविर्भावाने काटय़ाचमच्यांनी ते बूट खात आहेत.. सोन्याच्या शोधानंतर श्रीमंत झालेला चॅप्लिन आपल्या मित्रासह बोटीतून खाली उतरतो, शेकडो लोक त्यांचे स्वागत करतात, फोटोग्राफर्स कॅमेरे घेऊन पुढे येतात आणि दोघांना थांबायला सांगतात.. कॅमेऱ्याची कळ दाबायच्या वेळी कोणीतरी फेकलेले सिगारेटचे थोटूक तो उचलीत आहे.. असे कितीतरी त्या चित्रपटातील प्रसंग आजही माझ्या नजरेसमोर उभे राहतात.
पुढे चित्रपट बोलू लागला. पूर्वीच्या जमान्यातील कलावंत धडाधड कोसळून पडले. परंतु चार्ली चॅप्लिनची प्रतिमा अशी लोकोत्तर, की स्वत:ची अबोल भूमिका कायम ठेवूनही त्याने ‘सिटी लाइट्स’, ‘मॉडर्न टाइम्स’, ‘ग्रेट डिक्टेटर’ हे बोलपट कमालीचे यशस्वी करून दाखविले. हिटलरचा पराभव चर्चिलने अथवा स्टालिनने केला, तितकाच चार्ली चॅप्लिनने केला. दोस्तराष्ट्रांनी हिटलरचे लष्कर मोडून काढले, चॅप्लिनने ‘ग्रेट डिक्टेटर’मध्ये त्याच्या महात्मतेची आणि दबदब्याची अगदी चिरगुटे करून दाखविली. पुढचे सांगता येणार नाही, पण आजपर्यंत तरी सिने-नाटकाच्या इतिहासात असा एकही कलावंत झालेला नाही, की जो चार्ली चॅप्लिनच्या शेजारी बसू शकेल. माझे हे भाग्य, की चार्ली चॅप्लिनचे हे अपूर्व कलाविलास मला पाहायला मिळाले.    ल्ल
(शिरवाडकरांच्या ‘वाटेवरल्या सावल्या’ या पुस्तकातील लेखाचा संपादित अंश)