12 August 2020

News Flash

‘हम पंछी एक चॉल के’

नुकतंच एक कात्रण सापडलं. १९८५ सालचं. त्यात त्या सुमाराला प्रकाशित झालेल्या किंवा होणाऱ्या टी. व्ही. मालिकांचा आढावा घेतला होता. ‘खानदान’, ‘बुनियाद’, ‘यह जो है जिंदगी’,

| October 19, 2014 12:43 pm

नुकतंच एक कात्रण सापडलं. १९८५ सालचं. त्यात त्या सुमाराला प्रकाशित झालेल्या किंवा होणाऱ्या टी. व्ही. मालिकांचा आढावा घेतला होता. ‘खानदान’, ‘बुनियाद’, ‘यह जो है जिंदगी’, ‘पेइंग गेस्ट’, ‘अपराधी कौन?’, ‘तमस’, ‘बॅरिस्टर विनोद’, ‘मिस्टर और मिसेस’ अशा अनेक मालिका त्या काळात बहरल्या होत्या. त्यांची lok01संख्या दिवसेंदिवस वाढत होती. राजश्री चित्र, दुर्गा खोटे प्रॉडक्शन्स, कमलेश्वर, जलाल आगा, पी. कुमार वासुदेव (दिल्ली दूरदर्शनवरच्या पहिल्या चार प्रोडय़ुसर्सपैकी एक. माझ्याबरोबरचा.), गोविंद निहलानी, परीक्षित साहनी असे अनेक नामवंत मैदानात उतरले होते. ‘वागळे की दुनिया’ किंवा ‘रजनी’सारख्या काही दर्जेदार मालिका अमाप लोकप्रिय झाल्या. हिरवं कुरण पाहून अनेक नवशिके पण पुढे सरसावले. कोणत्याच प्रसार वा रंजन माध्यमाशी संबंध नसलेले पानवाले, बिल्डर, विमा एजंट यांसारख्या होतकरूंचा त्यात समावेश होता. ‘प्रकाशवाणी’ हे एक दृक्माध्यम आहे, त्याची स्वत:ची अशी एक खास भाषा आहे याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. ती भाषा सराईतपणे तर सोडाच, पण बोबडी बोलणंसुद्धा त्यांच्या आवाक्यातलं नव्हतं. साहजिकच असंख्य निकृष्ट दर्जाच्या मालिकाही छोटय़ा पडद्यावर झळकल्या. टेलिव्हिजनला गमतीनं दिलेलं नाव या होतकरू मंडळींनी सार्थक केलं- ‘द इडियट बॉक्स’ किंवा ‘रेम्या डोकं खोकं!’ अशा काही मंडळींना टी. व्ही. कार्यक्रम बनवायलाच काय, पण पाहायलासुद्धा कायद्याने बंदी घालायला हवी होती. असो.
एव्हाना माझ्या दोन मालिका छोटय़ा पडद्यावर झळकल्या होत्या आणि दर्शकांच्या पसंतीचा शिक्का त्यांच्यावर उमटला होता. त्यामुळे दूरदर्शनकडून आता तिसऱ्या ‘अध्र्या’साठी मागणी आली. विषयही त्यांनीच सुचवला. शेजाऱ्यांचे स्नेहबंध आणि त्यांच्या आपसातल्या उखाळ्यापाखाळ्या यांचा मार्मिक समाचार घेणारी ‘मिष्किलिका’ (माझा शब्द!) त्यांना हवी होती. ‘शेजारी’ या विषयाचा मक्ता माझ्याकडे आला होता की काय, न जाणे! आपल्याकडे लेबलं चिकटायला वेळ लागत नाही. (‘शेजारसंबंध- सर्व जाणकारी. चौकशी करा- सई परांजपे.’) ‘अडोस पडोस’ची कथा जरी वेल्हाळ शेजाऱ्यांच्या साक्षीनं उकलत गेली, तरी खरं तर तिच्यात एका तरुण बापाची प्रेमकथा मध्यवर्ती होती. पडोसी आपले शोभेला, पूरक म्हणून होते. ती मालिका संपूर्णपणे नव्यानं लिहिलेली, स्वयंसिद्ध होती. आता मात्र या नव्या उद्योगात खुद्द शेजारीच मध्यवर्ती होते. त्यांना हुडकण्यासाठी दूरवर जायची गरजच नव्हती. ते खरोखरच शेजारी होते. अगदी हाकेच्या अंतरावर.
त्यांना साद घालताच माझ्या ‘सख्खे शेजारी’ नाटकाच्या तीनही जोडय़ा.. तात्या-कृष्णा, जगन-निर्मळ, राणी-शशांक धावून आल्या. तेव्हा शेजाऱ्यांची तीच टीम कायम ठेवून त्यांच्या करामती मात्र मी नव्यानं नमूद केल्या. नाटकामधला सदाशिव सोसायटीच्या चाळीचा सेट आम्ही आपली कल्पनाशक्ती लढवून उभारला होता. अर्थातच सगळं काही ‘तुम्ही समजून घ्या’च्या चालीवर होतं. वास्तवाचा संबंधच नव्हता. जुजबी बदल करून तिन्ही बिऱ्हाडं क्षणार्धात बदलता येत. त्यात आमचं कौशल्य पणाला लागत असे. प्रेक्षकांना पण या lr03हातचलाखीची गंमत वाटे. त्यात एक वेगळंच आव्हान होतं.. गंमत होती. पण आताची गोष्ट वेगळी होती. आता हातामध्ये सर्वसाक्षी कॅमेरा होता. तेव्हा वास्तवाचं दर्शन घडवणं प्राप्त होतं. हे गणितच वेगळं होतं. आता ‘चाळ’ हेसुद्धा एक महत्त्वाचं पात्र ठरलं. किंबहुना, मालिकेचं शीर्षकही मुद्दाम चाळीच्या सन्मानार्थ आम्ही ठेवलं- ‘हम पंछी एक चॉल के.’
सुयोग्य चाळ शोधण्याबद्दल युनिटमध्ये चर्चा होऊ लागली. माझा एक साहाय्यक होता- अतुल चावरे. पोर्तुगीज चर्चच्या मागे तो एका चाळीत राहत असे. तो जरा भीत भीतच म्हणाला, ‘आमची चाळ एकदा नजरेखालून घालणार का?’ अकलमंद को इशारा काफी है! माझ्या कला-निर्देशकाबरोबर तात्काळ मी अतुलच्या चाळीत दाखल झाले. ‘युरेका! क ऋ४ल्ल ्रि३!! सापडली!!!’ ग्रीक, इंग्रजी आणि मायबोली या तिन्ही भाषांमधून मी माझा आनंद व्यक्त केला. माझ्या मनात होती तशीच- नव्हे, तीच चाळ समोर उभी होती, किंवा त्या चाळीत मी उभी होते. जणू काही मी चित्र काढून नेपथ्य विभागाला दिलं आणि त्याबरहुकूम सर्व काही त्यांनी जुळवलं. चाळ तशी जुनी होती, पण बकाल नव्हती. बिऱ्हाडांच्या कडेनं जाणारा बोळ. दांडय़ांचा कट्टा. लाकडी जिना. वर गच्चीही. गंमत म्हणजे अतुलचा वट एवढी, की तो म्हणाला, ‘ही शेजारची चाळ पण पाहून घ्या. ती पण आपल्याला मिळू शकते.’ साखरेचे खाणार त्याला देव देणार! शेजारची चाळ अतुलच्या चाळीपासून जेमतेम पंधरा-वीस फुटांच्या अंतरावर होती. दोन्ही चाळींचं कंपाऊंड एकच होतं. मला वाटतं, मालक एकच असावा. एका क्षणात मी ठरवून टाकलं- दोन बिऱ्हाडं अतुलच्या चाळीत दाखवायची आणि एक जोडपं समोरच्या चाळीत. म्हणजे आमनेसामनेवाल्यांना आपापल्या कट्टय़ावर रेलून गप्पा मारता येतील.
चित्रण करायला आम्हाला रीतसर परवानगी मिळाली. चाळीतल्या सगळ्या बिऱ्हाडकरूंनी उत्साहानं आपली मान्यता नोंदवली. दोन चाळी मिळाल्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. दोन्ही चाळींच्या कट्टय़ांना एक जाडजूड भक्कम दोर बांधून एक सरकता पाळणा त्याच्यावर बसवला. त्यातून या चाळीतून त्या चाळीकडे काय हवं ते ‘कुरिअर’ करावं. रेल्वे टाइमटेबल, टायगर बामची डबी, कोथिंबिरीच्या काडय़ा, श्रीखंडाची वाटी, वर्तमानपत्र.. म्हणाल ते. हा ‘पाळणा’ पुढे भलताच लोकप्रिय झाला.
या खेपेला ‘हम पंछी..’साठी बहुतेक सगळ्याच कलाकारांची मी नव्यानं निवड केली. एक विनी काय ती घरची- नेहमीची राहिली. अंजन श्रीवास्तव या कलाकाराला मी ‘वागळे की दुनिया’मध्ये पाहिलं होतं. मला त्याचं काम आवडलं होतं. आतापर्यंतच्या माझ्या नाटक- सिनेमा- दूरदर्शन या कोणत्याच माध्यमासाठी कलाकार lr04ठरवताना ‘मोबदला’ ही बाब अगदी गौण ठरली होती. ‘तुम्हीच ठरवा!’ असं अनेकजण म्हणत असत. त्याबद्दल चर्चा टाळत असत. श्रीवास्तव भेटले तेव्हा वेगळा अनुभव आला. त्यांना कथेमध्ये किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल सुतराम उत्सुकता नव्हती. भेटताच ‘मोबदला काय मिळणार?’ असा त्यांनी रोखठोक सवाल केला. या अनपेक्षित सलामीनं मी क्षणभर गडबडले; पण सावरून उलटा प्रश्न केला, ‘तुमची काय अपेक्षा आहे?’ त्यांची अपेक्षा खूपच मोठी होती. अखेर चक्क घासाघीस करून आमची रक्कम ठरली. बदलत्या काळाची चाहूल मला त्या भेटीत लागली असं म्हणता येईल. ठेंगणी ठुसकी मीनाक्षी ठाकूर ही गुणी नटी कृष्णासाठी ठरली. मीनाक्षी अनेक कलाव्यासंगी मुशाफिरांप्रमाणे (त्यात मीही एक!) मुंबईला आली होती. दिल्लीला तिने ‘हयवदन’, ‘आषाढ का एक दिन’ अशा नाटकांमध्ये नायिकेच्या भूमिका गाजवल्या होत्या. मुंबईला दिनेश ठाकूरच्या ‘अंक’ या ग्रुपमधून ती काम करू लागली. एकत्र काम करण्याचा आमचा योग मुंबईलाच प्रथम जुळून आला. जयंत कृपलानी हा अतिशय तल्लख रंगकर्मी फार पूर्वी मला बऱ्याच वेळा कोलकात्यात भेटला होता. श्यामानंद जालानांचं नाव नाटय़वर्तुळात मोठय़ा अदबीनं घेतलं जाई. श्यामानंदांनी कोलकात्याला ‘पदातिक’ ही नाटय़संस्था स्थापन केली होती. बादल सरकार, विजय तेंडुलकर, मोहन राकेश यांची नाटकं ते प्रायोगिक स्तरावर सादर करीत. त्यांच्या कंपूत जयंत होता. तोही पुढे मुंबईला आला. आमच्या ‘हम पंछी..’च्या फडामध्ये सामील झाला.. जगन म्हणून! त्याची बायको निर्मलची भूमिका एनएसडीची शिष्या रूपल पटेल हिने केली. रूपल गुजराती मंचावर नाव कमावू लागली होती. एनएसडीच्या मुशीतून निघालेला आणखी एक नट शेजारी म्हणून रुजू झाला- आशीष विद्यार्थी. त्याला सत्यदेव दुबेनं माझ्याकडे धाडून दिला होता. पहिल्याच वाचनात आपल्या असामान्य प्रतिभेनं आशीषनं मला सर्द केलं. तो खरोखर मोठय़ा कुवतीचा नट होता आणि हे त्याला पुरेपूर ठाऊक होतं. अशी मंडळी सांघिक प्रयासामध्ये कमी पडतात. प्रकाशझोत कायम आपल्यावरच हवा, असा त्यांचा आग्रह असतो. आशीषनं सहाजणांमधला एक शेजारी म्हणून काही डाव खेळी केली खरी; पण मग तो मालिका सोडून गेला. तत्काळ दुसरा त्याच्या जागी आला. ‘या कडीपासून शशांकचं काम अमुक अमुक नट (नाव आठवत नाही.) करणार आहे,’ अशी सूचना एपिसोडच्या सुरुवातीलाच आम्ही ठळक अक्षरांत दिली. गंमत म्हणून राणी (विनी) वरचेवर त्याच्याकडे रोखून बघून ‘आज तू काहीतरी वेगळा दिसतो आहेस,’ असं म्हणत राहिली. या फेरबदलाबद्दल लोकांची तक्रार येईल म्हणून आम्ही जरा चिंतेत होतो; पण नाही. काहीसुद्धा नाही. एका माणसानंदेखील नापसंतीचा सूर काढला नाही.
‘सख्खे शेजारी’ किंवा ‘पुन्हा शेजारी’ या दोन्ही नाटकांमधून मंचावर लहान मुलं कधी आली नाहीत. पण टी. व्ही. म्हटल्यावर आम्हाला ती मुभा घेता आली. चार-पाच तल्लख मुलांची तुकडी आमच्या सैन्यात दाखल झाली. पैकी ओंकार आणि प्रियरंजन आठवतात. शूटिंग जोरात सुरू झालं. प्रथम उत्साही असलेले चाळीतले मूळ रहिवाशी आमच्या झंझावाती आक्रमणामुळे हळूहळू कंटाळणार नाहीत ना, अशी धाकधूक कायम वाटत राही. पण तसं झालं नाही. त्यांच्या सौजन्याला कधी ग्रहण लागलं नाही. ‘खरे’ आणि ‘उपरे’ चाळकरी यांच्यामधले स्नेहसंबंध अतुल जिवाच्या करारानं जपत होता.
मुलांचे एक-दोन प्रसंग छान आठवतात. एका मोठय़ा मुलाला स्टॅम्प कलेक्शनचं वेड असतं. त्याच्याकडे टांझानिया, चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल अशा विभिन्न देशांच्या दुर्मीळ तिकिटांचा साठा असतो. त्याचं खूप कौतुक होतं. मग आपण पण खूप तिकिटं जमवल्याचं सगळ्यात छोटा जाहीर करतो. लाकडी जिन्यामधल्या त्यांच्या खास अड्डय़ावर तो सवंगडय़ांना आपला खजिना निरागसपणे दाखवतो. सगळीच्या सगळी तिकिटं अगदी आम- म्हणजे भारताची असतात. मोठी मुलं आपल्या संग्रहाला का हसताहेत, हे बिचाऱ्याला कळत नाही.
एकदा पोरांचं आपसात खडाजंगी भांडण होतं. कृष्णाची तीन आणि निर्मलची दोन मुलं असतात. राणीला अद्याप मूलबाळ नसतं. तर मुलांचं जोरदार भांडण विकोपाला जातं आणि आयांपर्यंत येऊन पोचतं. होता होता तंटा आयांच्यात सुरू होतो. विकोपाला जातो. राणी कधी एकीची, तर कधी दुसरीची बाजू घेते. नवरे ऑफिसमधून घरी येतात. आपापल्या बायकांना शांत करता करता परभारे तेही कलहात सामील होतात. पार गुद्दागुद्दीपर्यंत मजल जाते. सोसायटीचं रणांगणात रूपांतर होतं. शेवटी खुद्द मुलांकडून कसला तरी खुलासा हवा म्हणून मुलांसाठी शोधाशोध सुरू होते. खाली कंपाऊंडमध्ये मुलं गोडीगुलाबीनं क्रिकेट खेळत असतात.
शूटिंगला नुकतीच सुरुवात होत असतानाच एक अस्वस्थ करणारी अफवा कानावर आली होती. दोन्ही चाळी पाडून त्यांच्या जागी नव्या इमारती बांधायचा घाट चालू होता. आम्ही सोयीस्करपणे या बातमीकडे कानाडोळा केला आणि आपलं काम चालू ठेवलं. पण दरम्यान चाळकरी आणि मालक यांच्यात चर्चा, वाटाघाटी, सल्लामसलती चालूच होत्या. निकालदर्शी काटा ‘हो-नाही’, ‘हो-नाही’, ‘हो-नाही’ असा सतत लंबकाप्रमाणे झुकत होता आणि अखेर तो ‘हो’वर स्थिरावला. आमचा बहुतांशी कार्यभाग उरकत आला होता. दोन ‘कडय़ा’च काय त्या शूट करायच्या बाकी होत्या. पण एकदा पडझड सुरू झाली की काय करणार? मालिका पुरी कशी करणार? लवकरच पक्की खबर मिळाली. चाळी सपाट होणार होत्या. दिग्दर्शकाला ‘बोटीचा कप्तान’ म्हणतात. गलबत वादळात सापडलं की शिताफीनं संकटातून मार्ग काढून प्रवाशांना तडीपार नेणं, ही त्याची कसोटी परीक्षा ठरते. आता आमच्यावर संकट गुदरणार होतं. आमची कर्मभूमीच पायाखालून खिसकणार होती. लोकेशनच नाही उरलं तर शूटिंग कसं करणार? काय क्लृप्ती करावी?
शेवटच्या दोन भागांची तयार संहिता मी बाजूला सारली आणि या नव्या घटनेची दखल घेणारे दोन संपूर्ण नवे एपिसोड लिहून काढले. आमची तिन्ही जोडपी या नव्या भवितव्याला सामोरी जाण्याची तयारी करीत होती. एकमेकांच्या साहाय्यानं पुढचे बेत रचत होती..
चाळी पाडण्याचं काम सुरू झालं. आमचा कॅमेरामन ए. एस. कनल झपाटल्यासारखं समोरचं तांडव नोंदवत होता. कोसळणारे दगड, ढासळणाऱ्या विटा, मातीचे ढीग, उडणारे सिमेंटचे लाटे.. त्याच्या कॅमेरानं सारं काही टिपलं. भोवताली भरपूर नाटय़ घडत होतं. चाळीभोवती उभारलेल्या खांबांवरून कामगार कसरत करीत होते. बोळांमधून श्रमिक महिला डोक्यावर घमेली पेलत जात-येत होत्या.
एक सुंदर शॉट आठवतो. तात्याच्या घराच्या भिंतीला मोठं भगदाड पडलं आहे. त्या भगदाडातून घरात डोकावता येतं. कृष्णा वाढते आहे आणि पोरं शांतपणे जेवताहेत.
मालिकेचा शेवट गच्चीवर झाला. (ती अद्याप शाबूत होती.) शेजाऱ्यांनी आपल्या लाडक्या चाळीला ‘सेंड ऑफ’ दिला.
या पडझड प्रकरणाचा वापर केल्यामुळे शेवट खूप परिणामकारक झाला. चाळीच्या संहारकांडाच्या वास्तव चित्रणाचं भरपूर कौतुक झालं.
‘खूप थरारक शॉट्स होते.’
‘अंगावर शहारे आले.’
‘भिंतींना आडवे-उभे तडे कसे दाखवलेत हो?’
‘हे सगळं जमलं तरी कसं?’
आता अंदर की बात मी कशाला सांगू? ती तुमच्या-आमच्यातच राहू दे.
या मालिकेनंतर गुलज़ारनी मला ‘मिनिस्टर ऑफ चॉल्स’ हा किताब बहाल केला.lok02

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2014 12:43 pm

Web Title: chawl was a character in contemporary tv serials
टॅग Tv Serials
Next Stories
1 निकालाआधीचे काही तास..
2 निकाल लागताना..
3 मन डोले, मेरा तन डोले..
Just Now!
X