पुराणकालापासून ज्या मंदिराच्या धार्मिक आणि आध्यामिक माहात्म्याचे उल्लेख ठिकठिकाणी आढळून येतात, त्या चेन्नईजवळच्या नटराज मंदिराच्या पारंपरिक तसेच मंदिर स्थापत्यकलेतील वैशिष्टय़ांची ओळख.

चेन्नईपासून २४५ किलोमीटर अंतरावरील चिदम्बरम येथील प्रसिद्ध नटराज मंदिर म्हणजे सुमारे ५० एकर भूभागावर विस्तारलेला पूर्णत: द्रविड स्थापत्यशैलीत उभारलेला प्रेक्षणीय असा मंदिर समूह! ‘कोविलम’(मंदिर) या एकाच शब्दाने या मंदिराचा निर्देश तामिळनाडूत केला जातो. अगदी पुराणकालापासून या मंदिराच्या धार्मिक आणि आध्यात्मिक माहात्म्याचे उल्लेख आढळतात.

मंदिराच्या चारही दिशांना सुमारे १३० फूट उंचीची भव्य गोपुरे असून त्यावर भरतनाटय़म नृत्य करत असलेल्या नíतका आणि अनेक देवदेवता, ऋषिगण, ग्रह-राजे महाराजे इ. मूर्ती कोरलेल्या आहेत.

गोपुरांच्या खाली ४०-४५ फूट उंचीची प्रवेशद्वारे असून त्यामधील देवडय़ांचे विस्तीर्ण चौक, स्वच्छ चिरेबंदी फरशांचे प्रांगण, ऐसपस सभामंडप, पवित्र विहीर, कुंडे आणि सभोवार उंच तटबंदी, सर्वत्र स्वच्छता असे बाह्य़स्वरूप प्रथमदर्शनीच नजरेत भरते.

येथे सुमारे ३५ ते ४० फूट उंचीचे, सुंदर नक्षीकाम केलेल्या दगडी स्तंभांवर तोललेले आणि तीनही बाजू मोकळ्या असलेले सभामंडप असून, मुख्य नटराज मंदिरात सहस्रस्तंभी सभामंडपही आहे.

मंदिरसमूहात प्रमुख अशी पाच-सहा मंदिरे (नटराज मंदिर, आदिमूलनाथ मंदिर, शिवकामिनी मंदिर, उमा मंदिर, विष्णू मंदिर, गणपती मंदिर) असून मंदिराच्या मध्यभागी १० फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेला गाभारा आणि चारही बाजूंनी ओवऱ्यांप्रमाणे बांधलेले सुमारे आठ फूट उंचीचे आणि २० फूट रुंदीचे ओटे आहेत. (अशा प्रकारच्या  ओटय़ांची बांधणी कांचीपुरम, रामेश्वरम, मदुराई येथील मंदिरांतूनही आढळते.) ओटय़ावर उभ्या असलेल्या स्तंभांवरील वेलबुट्टी, नíतका, पौराणिक प्रसंग पाहत असतानाच स्तंभाच्या वरच्या टोकाकडील हत्ती, मगरी, घोडे या प्राण्यांच्या अगदी सजीव दिसणाऱ्या कोरीव कमानी, अधांतरी लोंबणाऱ्या हत्तींची सोंड, लटकणाऱ्या दगडी फुलवेली, दिवे पाहताना आपण थक्क होतो.

मुख्य नटराज मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजे दोन्ही बाजूंना घोडे जुंपलेला अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेला भव्य दगडी रथ आणि गाभाऱ्याच्या रथाला कोरलेली रथाची चाके नजर खिळवून ठेवतात. ही सर्व मंदिरे इतकी भव्य आणि अंतर्गामी असूनही कोठेही गुदमरल्यासारखे होत नाही. सुमारे १२००-१५०० वर्षांपूर्वी आधुनिक यंत्रसामग्री नसताना बांधलेले इतके प्रेक्षणीय मंदिर पाहताना, तत्कालीन कारागिरांनी त्यांच्या आयुष्यातील पूर्ण समर्पण भावनेने वेचलेली कितीतरी वष्रे आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांनी किती जीव ओतून काम केलं असेल याची जाणीव होते. श्रद्धेचा भाग सोडला तरीही एक वेगळेच गूढ पावित्र्य जाणवत राहते हे नक्की!

तमिळ पुराणांनुसार चिदम्बरम मंदिर हे आकाशतत्त्वाचे प्रतीकरूप शिवमंदिर आहे. या ठिकाणी पूर्वी असलेल्या ‘तिल्लैवनातील’ स्वयंभू शिविलगाची (आदिमूलनाथाची) व्याघ्रपाद, पतंजली, उपमन्यू आदी ऋषींनी घोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या विनंतीवरून स्वत: शंकराने ‘नटराज’ रूपात, सर्व देवदेवता- ऋषिगणांच्या समक्ष याच ठिकाणी प्रसन्नचित्ताने आनंद तांडव नृत्य केले, असे मानतात. आकाशतत्त्वरूप ईश्वराचे प्रतीक म्हणून मंदिरात एका सोन्याच्या बिल्वपत्रमालेची पूजा एका विशिष्ट वेळी (बहुधा प्रात:काळी) केली जाते. एरवी या माळेचे दर्शन होत नाही. मंदिरात ‘नटराजा’ची नर्तनमुद्रेतील रेखीव प्रमाणबद्ध देखणी मूर्ती असून शेजारी पार्वती (शिवकामसुंदरी) आणि मागे शिविलग आहे.

पूज्य ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत पाचव्या अध्यायात अकराव्या ओवीमध्ये उपमन्यू आणि क्षीरसागराचा उल्लेख आहे. व्याघ्रपाद ऋषींनी त्यांच्या लहानशा उपमन्यूसाठी ज्या आदिशंकराची प्रार्थना केली ते ‘आदिमूलनाथ मंदिर’ आणि शंकराने प्रसन्न होऊन निर्माण केलेला ‘क्षीरसागर’ यांचे दर्शन या मंदिरात होते.

दक्षिण भारतात शैव-वैष्णव मतभेद टोकाचे असूनही या प्राचीन मंदिरात मात्र मुख्य नटराज मंदिरानजीक शांत, प्रसन्न भावमुद्रेतील शेषशायी विष्णू आणि विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन होते. भगवान कृष्णाला शिवदीक्षा येथेच दिली गेली, असे भाविक मानतात.

अंतर्यामी असणारा परमेश्वरच या मंदिरात वास करतो, या अपार श्रद्धेपोटी मंदिरातील काही रचना वैशिष्टय़पूर्ण आहेत. मुख्य मंदिरावर म्हणजेच चितसभेवर बसवलेली छोटी छोटी २१,६०० सोन्याची कौले म्हणजे माणसाच्या रोजच्या श्वासोच्छ्वासाइतक्या संख्येची आहेत. सुवर्णकौलांवर असलेले नऊ सुवर्णकलश हे नऊ शक्तींचे प्रतीक आहेत. मानवी हृदयाच्या स्थानाप्रमाणे मुख्य मंदिरातील गर्भगृहही मधोमध नाही. अशा अनेक संकल्पना तेथे सांगितल्या जातात.

ध्वजस्तंभानजीक असलेल्या अवाढव्य घंटेमधून स्पष्ट आणि कर्णमधुर ओमकार ध्वनी ऐकू येतो. मंदिर केवळ भव्य आणि सुंदरच नाही तर मंदिरात फिरताना त्याहीपलीकडे एक पवित्रता मनाला सुखावत राहते.

मंदिराच्या इतिहासानुसार गौंड राजा हिरण्यवर्मा (बहुधा काश्मीर) याने येथे येऊन तपश्चर्या करून रोगमुक्ती मिळवली आणि पुढे इ.स. ५०० मध्ये मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. पुढे चोळ राजे, विजयनगरचा कृष्णदेवराय आदी राजांनीही मंदिराचा विस्तार केला.

मंदिरात पाहण्याजोगे-ऐकण्याजोगे बरेच काही आहे. भरपूर वेळ घेऊन जायला हवं. मंदिर दुपारी एक ते पाच बंद असते. पुजाऱ्यांकडून आणि भाविकांकडूनही मंदिरातील वातावरण अगदी पवित्र राखले जाते. पुजारी आपल्या शंकांचे निरसन करतात, पण िहदीत अजिबात बोलत नाहीत. मंदिरात पशांसाठी अडवणूक होत नाही. तामिळनाडूतील सर्वच प्राचीन मंदिरे, मंदिर स्थापत्यातील व वास्तुकलेतील निपुणता प्रस्थापित करणारी आहेत. पण चिदम्बरमच्या मंदिरात तर हे विशेषत्वाने जाणवते.

तामिळनाडूतील लोकसुद्धा परंपरा जाणणारे आणि श्रद्धाळू आहेत. लहानमोठय़ा सर्वच मंदिरांतून भाविकांचा दिवसभर राबता असतो. या भाविकांनीच ही मंदिरे चतन्यपूर्ण, पवित्र आणि शांत व स्वच्छही ठेवली आहेत.