26 February 2021

News Flash

दखल : वास्तवदर्शी लेखन

पुस्तकाची सुरुवात होते त्यांचे आजोबा अप्पासाहेब अर्थात सखाराम मराठे यांच्यावरील लेखाने

‘छपाई ते लेखणी’ हा यशवंत मराठे यांच्या लेखांचा संग्रह. लेखकाचा वडिलोपार्जित व्यवसाय मुद्रणयंत्रे उत्पादनाचा. पुढे त्यांनी सामाजिक दायित्वाच्या प्रेरणेतून ‘नीरजा’ ही संस्था सुरू केली. ही संस्था सार्वजनिक जलपुनर्भरणाचे काम करते. हा व्याप सांभाळत असताना लेखकाने आपला हातही लिहिता ठेवला. साधी-सरळ लेखनशैली हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांच्या लेखनातील सच्चेपणा, अकृत्रिमता विशेष भावते.

पुस्तकाची सुरुवात होते त्यांचे आजोबा अप्पासाहेब अर्थात सखाराम मराठे यांच्यावरील लेखाने. यात आजोबांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांची अचूक मांडणी ते करतात. त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि धमक, कराचीतील त्यांचे वास्तव्य, फाळणीनंतरच्या समस्या आणि त्यानंतर कराचीतील मालमत्ता विकून (अर्थात तोटय़ाचाच सौदा!) गाठलेली मुंबई आणि मुद्रण व्यवसायात रोवलेले पाय आणि पुढे वाढवलेला पसारा- जो आजही ‘मराठे उद्योग समूह’ म्हणून सर्वश्रुत आहे..  हे वाचून त्यांच्या आजोबांची धडाडी जाणवते. ‘आनंदी जीवनाचा पाया’, ‘आयुष्याचे ध्येय’ या लेखांमध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याचे विवेचन त्यांनी केले आहे. या चिंतनातून लेखकाच्या मनाचा सच्चेपणा, समाधानी वृत्ती प्रकर्षांने जाणवते. आयुष्याचे ध्येय निश्चित करताना आध्यात्मिक पातळीवर चर्चा रंगते. हाच धागा पुढे ‘ओशो- एक त्सुनामी’ या लेखात विस्तारला आहे. अध्यात्माच्या दुनियेतून पुढे फुलांच्या सुगंधी जगामध्ये लेखक वाचकाला घेऊन जातात. हे लिहिताना संगीत, सूर, सुगंध ते नीलकमल, आंब्याचा मोहोर, शेण,  मूत्र, कच्च्या दुधाचा वास अशी चर्चा रंगत जाते.

‘गावगाडय़ाची कहाणी’मध्ये गावचा विचार करताना गावाचे नाव, रचना, गावचा कारभार,  तेथील फिरस्ते अशा अनेक अंगांचा विचार लेखक करतात. ‘गिरणगाव’ या लेखात गिरण्यांचा इतिहास, गिरण्यांचा उदयास्त, गिरणी संपाचा ऊहापोह लेखात केला आहे.

पुस्तकात विशेष उल्लेखनीय आहेत ती व्यक्तिचित्रे. लता मंगेशकर, वडील सुरेश मराठे, जोशीकाका, डॉ. दीपक यादव, भालचंद्र जोशी यांची व्यक्तिचित्रे उत्तमरीत्या उतरली आहेत. इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी, अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष अशा अनेक विषयांवरचे लेखन लेखकाची बहुश्रुतता अधोरेखित करते.

‘छपाई ते लेखणी’- यशवंत मराठे, ग्रंथाली, पृष्ठे- १८३, मूल्य- २०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 1:04 am

Web Title: chhapai te lekhani by yashwant marathe zws 70
Next Stories
1 मोकळे आकाश.. : आभास हा!
2 थांग वर्तनाचा! : ‘आपण’ आणि ‘ते’ची फॉल्ट लाइन
3 चवीचवीने.. : आफियेत ओऽसून्.. पोटभर जेवा!
Just Now!
X