03 August 2020

News Flash

प्रजासत्ताक पोरकं आणि पोरकट

केवळ सदिच्छा हे काही धोरण असू शकत नाही. म्हणजे केवळ चांगलं काही करायची इच्छा आहे म्हणून काही चांगलंच होईल असं मानायची गरज नाही. एखादी व्यक्ती

| January 26, 2014 01:02 am

केवळ सदिच्छा हे काही धोरण असू शकत नाही. म्हणजे केवळ चांगलं काही करायची इच्छा आहे म्हणून काही चांगलंच होईल असं मानायची गरज नाही. एखादी व्यक्ती केवळ सौजन्यमूर्ती आहे, साधी आहे म्हणून तिला निवडून देणे, यात जनतेचा भाबडेपणा तेवढा दिसून येतो. दिल्लीत जे काही झालं आणि अन्यत्रही तसंच होईल असं ज्यांना वाटतं, ते एक तर या वैचारिक बावळटपणात तरी अडकलेले आहेत, किंवा आपल्या या वैचारिक वेंधळेपणाचा गैरफायदा घेण्याइतके लबाड तरी आहेत. यातला फरक आपल्याला कळायला हवा. नाही तर आपलं प्रजासत्ताक ‘पोरकं’ आणि ‘पोरकट’ यांतच झोके घेत राहील.
अब्राहम लिंकन यांची एक गोष्ट आहे. ते अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या गावचा स्थानिक तरुणांचा एक गट त्यांना भेटायला येतो. आपल्या गावचा अध्यक्ष झालाय, तेव्हा अभिनंदन करावं हाही हेतू त्यामागे असतोच. पण मुख्य म्हणजे लिंकन यांच्यामुळे आपलाही चरितार्थाचा प्रश्न मिटतोय का ते पाहावं, हा भेटीमागचा खरा उद्देश! चहापाणी झाल्यावर लिंकन या तरुणांना विचारतात, ‘काय काम काढलंत?’ ती मुलं सांगतात, ‘नोकरी शोधतोय.. तुम्ही शब्द टाकला तर होईल..’ वगैरे. ते ऐकून लिंकन त्यांना म्हणतात, ‘मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला..
एक राजा असतो. शिकारीची भारी हौस. असाच तो एकदा शिकारीला निघतो. त्याआधी राजज्योतिषांना विचारून हवामान कसं काय असेल, याचं भाकीत त्यानं विचारलेलं असतं. राजज्योतिषांनी सांगितलेलं असतं, ‘उत्तम दिवस आहे शिकारीसाठी.. बेलाशक जा.’ मग राजा सर्व तयारीनिशी निघतो. सगळं लटांबर असतंच बरोबर. तर हे सगळे जंगलात शिरणार तोच वेशीवर एक गरीब शेतकरी आडवा येतो. आपल्या गाढवाला घेऊन तो घरी परतत असतो. त्या मंडळींची सगळी लगबग बघून तो विचारतो, ‘काय चाललंय?’ राजाचे सैनिक सांगतात त्याला- ‘महाराज शिकारीला निघालेत.’ त्यावर शेतकरी घाबरून त्या सैनिकाला सांगतो, ‘राजांना सांगा- आजचा दिवस फार वाईट आहे. शिकार तर मिळणारच नाहीच; उलट तुफान पावसात कदाचित जंगलात अडकून पडावं लागेल.’ शिपाई मग हस्ते परहस्ते राजापर्यंत ही बाब कळवतात. राजा संतापतो. आपल्या शिकारी मोहिमेला अपशकुन करणारा हा कोण फडतूस शेतकरी? राजा फर्मावतो.. ‘तुरुंगात टाका त्याला आणि चांगले फटके मारा.’ त्याप्रमाणे शेतकऱ्याला अटक होते. राजाचा लवाजमा पुढे निघतो. मध्यान्ह होते. राजा जंगलात अगदी ऐन गाभ्यात पोचतो- न पोचतो तोच ऊन गायब व्हायला लागतं. बघता बघता आकाशात काळ्या ढगांची दाटी होते आणि चांगलाच पाऊस कोसळू लागतो. साहजिकच राजाच्या शिकारी मोहिमेवरही पाणी पडतं. राजा हात हलवत परत येतो. त्याला आता आपल्या राजज्योतिषाचा राग आलेला असतो. ‘दिवस चांगला असेल,’ असं ज्योतिषी म्हणाले होते. मग अचानक पाऊस कसा आला? त्याचवेळी त्याला हेही आठवतं, की जंगलाच्या आधी भेटलेल्या शेतकऱ्याला मात्र बरोबर पावसाचा अंदाज होता. पण त्याला मात्र आपण तुरुंगात टाकलं. राजा प्रधानाला आज्ञा देतो- ‘त्या शेतकऱ्याची सुटका करा. त्याला माझ्या समोर घेऊन या. आणि राजज्योतिषाला तुरुंगात टाका.’ राजाच्या आज्ञेचं पालन होतं आणि सैनिक त्या शेतकऱ्याला राजासमोर दरबारात हजर करतात. भीतीनं गांगरलेला असतो तो. आता आपल्यापुढे आणखीन काय वाढून ठेवलंय, याची काळजी असते त्याला. त्याची केविलवाणी अवस्था पाहून राजा त्याला अभय देतो आणि म्हणतो.. ‘त्या दिवशी दुपारी पाऊस पडेल, हे तुला कसं कळलं?’
शेतकरी गांगरतो. म्हणतो, ‘खरं सांगतो- ते मला नाही कळलं.’
‘मग तू पावसाचा अंदाज कसा काय वर्तवलास?’ राजा विचारतो.
‘ते माझ्या गाढवाला कळलं..’ शेतकरी म्हणतो.
‘गाढवाला..?’ राजाचा आश्चर्यचकित प्रश्न- ‘ते कसं काय?’
‘पाऊस पडणार असेल तर काही तास आधी गाढवाचे कान खाली पडतात.. लोंबायला लागतात. ते त्या दिवशी तसे होते, म्हणून मी अंदाज व्यक्त केला पावसाचा.’
राजा ते ऐकतो आणि आदेश देतो- ‘आजपासून राजज्योतिषीपदी या गाढवाची नियुक्ती केली जात आहे..’
ही गोष्ट लिंकन सांगतात आणि म्हणतात, ‘तेव्हापासून एक झालं..’
आणि थांबतात.
उपस्थित तरुण साहजिकच न राहवून विचारतात- ‘काय?’
लिंकन म्हणतात, ‘तेव्हापासून प्रत्येक गाढवाला आपली राजज्योतिषीपदी नेमणूक व्हावी असं वाटू लागलं..’
याचा काय तो योग्य अर्थ त्या तरुणांना कळतो. ते मुकाट निघून जातात.
सध्या आम आदमी पक्षाच्या नावानं जो काही आचरटपणा सुरू आहे, तो पाहिल्यावर लिंकन यांच्या या गोष्टीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून देशातल्या प्रत्येक आम आदमीला आता आपण मुख्यमंत्री झालोच/ होणार.. असं वाटायला लागलंय. ते हास्यास्पद आहे. लिंकन यांच्या गोष्टीत राजज्योतिषीपदी गाढवाला नियुक्त करणाऱ्या राजाइतकंच हास्यास्पद!
मग दिल्लीतल्या निकालाचा अर्थ कसा लावायचा? जनतेच्या त्या कौलाचा अधिक्षेप करायचा का?
मुळीच नाही. त्यासाठी आधी दिल्लीच्या निकालाचा अर्थ समजून घ्यायला हवा. दिल्लीचा विजय हा काळाच्या ओघात सामान्य माणसाच्या मनात साचून राहिलेल्या वैतागाचा विजय आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपल्या देशातल्या वातावरणात सध्या वैताग ठासून भरलाय. उदाहरणार्थ, राजकीय पक्ष. त्यातला काँग्रेस घेतला तर तो बाहेरच्या भाजपवर भडकलेला आहेच; पण त्यातला एक गट आतल्या निष्क्रिय मनमोहन सिंग यांच्यावर, त्यांना अभय देणाऱ्या सोनिया गांधींवर वैतागलाय. दुसरा गट राहुल गांधी यांच्यावर वैतागलाय. हे दोघे गांधी माय-लेक पक्षाच्या अतिउत्साही कार्यकर्ते/ नेत्यांवर वैतागलेत. या पक्षावर राष्ट्रवादी वैतागलाय. त्या पक्षातले काका-पुतणे एकमेकांवर नाराज आहेत. भाजपमधले शहाणे नितीन गडकरी यांच्यावर वैतागलेत. गडकरी गट अरुण जेटलींवर वैतागलाय. गोपीनाथ मुंडे गडकरींवर वैतागलेत. आणि हे दोघे मिळून उद्धव ठाकरे यांच्यावर वैतागलेत. उद्धव ठाकरे यांच्या वैतागाचं कारण आहे चुलतभाऊ राज. आणि मग भाजप. हे राजकीय पक्ष उद्योगांवर नाराज आहेत. उद्योग रिझव्‍‌र्ह बँकेवर नाराज आहेत. रिझव्‍‌र्ह बँक सरकारवर नाराज आहे.. असं सगळं..
आणि आपण? म्हणजे जनता..
ती तर या सगळ्यांवरच नाराज आहे. आपल्याला जो काही मन:स्ताप होतोय तो या सगळ्यांमुळे असं जनतेला वाटतंय. कारण आपण सोडून सगळेच चोर आहेत, अप्रामाणिक आहेत, असा या जनतेचा ठाम समज आहे. या जनतेची पण गंमतच आहे. चौकात पोलीस नसला तर बिनदिक्कत लाल दिवा ओलांडणाऱ्यांची बनलेली ही जनता स्वत:ला कधीच दोष देत नाही. आणि इतरांना दोष देण्याची संधी मिळाली रे मिळाली, की मेणबत्ती घेऊन आपल्या लबाड नैतिकतेचा उजेड पाडते. या वैतागाचं रूपांतर आणखी एकात होतं. ते म्हणजे- या वैताग देणाऱ्यांत ज्यांचा सहभाग नाही, त्यांना राज्य करण्याची संधी मिळते.
दिल्ली विधानसभा निवडणुकांत आम आदमी पक्षाच्या विजयामागचं कारण हे आहे. कोण कुठला टिनपाट रॉबर्ट वडेरा! त्याच्या मोटारींच्या ताफ्याला पुढे जाता यावं यासाठी इतरांचा रस्ता रोखणारं सरकार, जनतेची सामान्यपणाची म्हणून असलेली एक अस्मिता रोरावत जाणाऱ्या लाल दिव्यांच्या मोटारींखाली चिरडून टाकणारी राजकीय व्यवस्था, ‘दलित की बेटी’ म्हणवून घेत व्यवस्थेची आलिशान पिळवणूक करणारे, सरकारी जागा बळकावून शिक्षणसम्राट बनणारे, टोलच्या रांगेत वेळ घालवाव्या लागणाऱ्या सामान्यांच्या नाकावर टिच्चून एक पै न द्यावी लागता सहज मार्ग काढणारे.. अशा साऱ्या साऱ्यांवरचा वैताग दिल्लीतील मध्यमवर्गीयांनी कोरी पाटीवाल्या आप पक्षाला पाठिंबा देऊन काढला.
घरात मुलांच्या व्रात्यपणाला वैतागून, त्यांना एक रट्टा देऊन ‘मर मेल्या!’ असं करवादणाऱ्या आईचा जसा वैताग व्यक्त होतो, तसा हा मतदारांचा वैताग आहे. घरातल्या आईला पुन्हा विचारलं तर ज्याप्रमाणे तिला पोराने खरोखर मरावं असं वाटत नाही, तसंच या मतदारांना आता विचारलं तर खचितच आधी दिली तशी मतं ते देणार नाहीत. याचं कारण असं की, वैताग ही क्षणिक अवस्था असते आणि त्या अवस्थेतल्या वागण्यात शहाणपणाचा अभाव असतो.
यात एक नमूद करायला हवं, की मतदार आणि ‘आप’चे नेते दोघांच्याही उद्दिष्टांविषयी शंका घ्यायचं कारण नाही. या माणसांमुळे तरी देशाचं नक्की भलं होईल असा भाबडा आशावाद ‘आप’कडे डोळे लावून बसलेल्यांना आहे. आणि या सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आपण देश बदलू शकतो असं ‘आप’ला वाटू लागलंय. परंतु या दोन मुद्दय़ांच्या मध्ये चिमटीत अडकलेल्या एका उपमुद्दय़ावर या दोघांचं भवितव्य अवलंबून असतं आणि आहे.
तो मुद्दा हा की, केवळ सदिच्छा हे काही धोरण असू शकत नाही. म्हणजे केवळ चांगलं काही करायची इच्छा आहे म्हणून काही चांगलंच होईल असं मानायची गरज नाही. म्हणजे केवळ एखाद्याचा वैताग आलाय म्हणून ज्याप्रमाणे परिस्थिती बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे  नुसत्या सदिच्छेने काहीही होत नाही. सदिच्छेला दिशा लागते. धोरण लागतं. आणि त्याप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा लागते. या तिन्ही घटकांशिवाय कोणालाही- मग ती व्यक्ती असो वा व्यवस्था- यश मिळूच शकत नाही. आणि समजा- योगायोगाने ते मिळालंच, तर ते फक्त आणि फक्त तात्कालिकच असतं. हा व्यवस्थेच्या भौतिकशास्त्राचा नियम आहे. तो ना जयप्रकाश नारायण यांना बदलता आला, ना अण्णा हजारे यांना. आणि ना येईल अरविंद केजरीवाल यांना. परंतु आपलं समाजमन हे समजून घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्याच त्या चुका आपल्या हातून घडतात आणि आपला भाबडेपणा काही जाता जात नाही. या मानसिक आजाराचं मूळ कशात आहे?
ते आहे व्यवस्था मजबूत करण्यात आपल्याला आलेल्या सामूहिक अपयशात. निकोप समाजनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा विकसित करण्यावर या देशात कधीही भर देण्यात आलेला नाही. ते झालं नाही याचा काही दोष आपल्या रक्तातही आहे. याचं कारण म्हणजे- राजवर्खी आणि संन्याशाच्या वस्त्रातल्यांना जनसामान्यांचे नियम लागू होत नाहीत, असे आपले संस्कार आहेत. पहिल्याकडे सर्व काही आहे त्यामुळे तो सर्व नियमांच्या वर; आणि दुसऱ्याला कशाचीच गरज नसते असं आपण मानायचं, म्हणून त्याला नियम नाहीत. म्हणजे राजस आणि सालस दोघेही नियमांना अपवाद. यातल्या दुसऱ्या घटकापेक्षा पहिलाच जास्त अनुकरणीय. त्यामुळे एका मोठय़ा वर्गाची स्पर्धा असते ती स्वत:चा समावेश राजघराण्यात कसा होईल, याची. विद्यमान व्यवस्थेत राजघराणं याचा अर्थ सत्ताधीश. मग सर्व प्रयत्न असतात ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ताधीश कसं होता येईल, याचे. त्यामुळे सर्वाचा प्रयत्न असतो- नियम न लागू होणाऱ्यांच्या यादीत स्वत:चा समावेश करून घेण्यासाठी! त्यामुळे याला अपवाद ठरून सत्तेच्या स्पर्धेत असूनही नियमांचं पालन करणारा.. किंवा तसं दाखवणारा आपल्याला आकर्षक वाटतो.
या भावनिक गोंधळामुळे आपली परिभाषाही बदलते. आपण या व्यवस्थेकडे कसं पाहतो, ते कसं व्यक्त करतो, यातून ही संस्कृती झिरपते. उदाहरणार्थ, मनमोहन सिंग ते अरविंद केजरीवाल या टप्प्यातल्यांचं वर्णन करताना आपण म्हणणार- ‘सत्ताधारी असूनही किती साधे आहेत ते!’
यातून अनेक गोष्टी ध्वनित होतात. एक म्हणजे सत्ताधारी हे फुकाची मिजास करणार असं आपण मानतोच मानतो. त्यामुळे तसं न करणारे आपल्याला थोर वाटू लागतात. आणि खरं तर साधेपणा म्हणजे काय? अमेरिकेच्या अध्यक्षपदी बराक ओबामा यांची निवड झाल्यावर त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना चिंता होती ती वॉशिंग्टनला राहायला गेल्यावर मुलींच्या शाळाप्रवेशाचं काय होणार, याची. हा साधेपणा नाही?  इंग्लंडच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर मार्गारेट थॅचर सर्वसामान्य नागरिकासारख्याच वागत होत्या. हा साधेपणा नाही? अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर अल गोर आपल्या अध्यापनाच्या कामाला लागले. याला साधेपणा नाही म्हणायचं?
तेव्हा मुद्दा असा, की एखादा साधा आहे, सभ्य आहे, हे वेगळं सांगायला का लागतं? कोणाही व्यक्तीकडे- मग ती उच्चपदस्थ असो वा नसो- हे किमान गुण असायलाच हवेत. त्यात विशेष ते काय?
पण आपल्या समाजात हे गुण विशेष मानले जातात, हेच आपलं मोठं सामाजिक अपंगत्व आहे. याचा परिणाम.. खरं तर दुष्परिणाम- असा की, अन्य काही गुण असोत वा नसोत, केवळ प्रामाणिकपणा, सभ्यता वगैरेंवरच एखाद्याला मोठं मानलं जातं. मनमोहन सिंग हे सभ्य आहेत याला महत्त्व द्यायचं, की पंतप्रधान या नात्याने त्यांनी जी कर्तव्यं पार पाडायला हवीत, त्याबाबतच्या त्यांच्या क्षमतेचा विचार करायचा? अरविंद केजरीवाल यांचा साधेपणा महत्त्वाचा, ते साध्या गाडीतून येतात ते महत्त्वाचं, की नेतृत्वगुणांचा समुच्चय, दूरदृष्टी महत्त्वाची? जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री असताना स्वत:चे कपडे स्वत: धुतात हे जास्त महत्त्वाचं, की संरक्षणमंत्री म्हणून त्यांचा धोरणीपणा अधिक मोलाचा? आणि याहीपेक्षा दशांगुळे वर राहायला हवा असा मुद्दा हा, की हे दोन्ही गुण परस्परविरोधीच आहेत, हे आपण किती दिवस मानणार? म्हणजे कार्यक्षमता आणि साधेपणा, नेतृत्वगुण, दूरदृष्टी आणि सभ्यपणा हे सर्व गुण एकाच व्यक्तींत गुण्यागोविंदाने नांदू शकतात, यावर आपला विश्वास कधी बसणार?
या प्रश्नाचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. कारण त्यावर आपलं सामाजिक वय ठरणार आहे. याबाबत आपण प्रौढ, समंजस झालो तर केवळ कोणी साधा आहे, सभ्य आहे म्हणून आपण कुणाला निवडून देण्याचा बावळटपणा करणार नाही. दिल्लीत जे काही झालं आणि अन्यत्रही तसंच होईल असं ज्यांना वाटतं, ते एक तर या वैचारिक बावळटपणात तरी अडकलेले आहेत किंवा आपल्या या वैचारिक वेंधळेपणाचा गैरफायदा घेण्याइतके लबाड तरी आहेत. यातला फरक आपल्याला कळायला हवा. नाही तर आपलं प्रजासत्ताक ‘पोरकं’ आणि ‘पोरकट’ यांतच झोके घेत राहील. आता घेतंय तसं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:02 am

Web Title: childish republic
टॅग Politics
Next Stories
1 अस्वस्थ कवीच्या निर्वाणानंतर…
2 समष्टीचा बंडखोर कवी
3 शून्य टक्के प्राप्तिकर! कसा होणार?
Just Now!
X