09 July 2020

News Flash

शंभर वर्षांची मॅरेथॉन!

चिनी राजकारण्यांच्या कृत्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आधी चिनी प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास नाही, तरी परिचय असणे गरजेचे ठरते.

चीनचे सर्व राज्यकर्ते या प्राचीन सूचककथांच्या आधारेच आपले राजकारण आजही करतात.

गिरीश कुबेर – girish.kuber@expressindia.com / @girishkuber

चिनी राजकारण्यांच्या कृत्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आधी चिनी प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास नाही, तरी परिचय असणे गरजेचे ठरते. याचे कारण म्हणजे भ्रमतंत्राचा चिनी राज्यकर्त्यांकडून केला जाणारा चतुर वापर. त्याची मुळे या देशाच्या पुराणकालीन साहित्यात आढळतात. चीनचे सर्व राज्यकर्ते या प्राचीन सूचककथांच्या आधारेच आपले राजकारण आजही करतात.

काही महिन्यांपूर्वी आपल्या एका माजी केंद्रिय संरक्षणमंत्र्यांशी अनौपचारिक गप्पांत चीनचा विषय निघाला. त्यावेळी चीनची ही गलवानमधली घुसखोरी व्हायची होती. त्यामुळे त्या गप्पांना संरक्षण विषयाची पाश्र्वभूमी नव्हती. ती होती संबंधित व्यक्ती संरक्षणमंत्री असताना त्यांचा झालेला चीन दौरा. त्यात उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांची तर चर्चा झालीच; पण अन्य काही नेत्यांशीही त्यांना संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यावर भारत-चीन संबंधांचा विषय ओघाने आलाच. त्याबाबत चिनी उच्चपदस्थाने व्यक्त केलेले मत लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच्या मते, पुढची २५ वर्षे चीन हा भारताचा विचारसुद्धा करणार नव्हता. त्या देशाचे एकच लक्ष्य होते त्यावेळी.. जपान! जगातल्या तेव्हाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जपानी अर्थव्यवस्थेस मागे टाकणे चीनच्या प्राधान्यक्रमावर होते. ‘‘भारत हा काही आमच्या मार्गातला अडथळा नाही. आधी जपानवर मात करणे आणि मग अमेरिकेशी दोन हात करणे हे आमचे उद्दिष्ट असेल. जपानला आडवे करीत नाही तोपर्यंत- म्हणजे साधारण पुढची २५ वर्षे आम्ही भारताकडे पाहणार पण नाही..’’ असे तो चिनी उच्चपदस्थ आपल्या त्यावेळच्या संरक्षणमंत्र्यांस मोठय़ा अभिमानाने सांगत होता.

गलवानची घुसखोरी झाली आणि हा संवाद आठवला. आणि हा संवाद होऊन किती वर्षे झाली ते मोजून पाहिले. बरेच काही खरे होते. मधल्या काळात जपानला चीनने मागे टाकले आहे. त्यानंतर आपल्यासमोर नवीन आव्हान उभे करून त्या देशाचे नेतृत्व जणू काही घडलेच नाही असे नामानिराळे राहताना दिसत आहे. चीनच्या या ताज्या घुसखोरीनंतर काही प्रश्न नव्याने चर्चेत आले आहेत. चीनने हे असे का केले? गेली सहा वर्षे आपल्या पंतप्रधानांनी चीनला वश करण्यासाठी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या दीड डझनाहून अधिक भेटी घेतल्या. त्यांचा साबरमती किनारी, महाबलीपूरम्च्या अंगणात पाहुणचार केला. २०१४ पासून चीनमधून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीची गती वाढली.. तरी चीनने असे का केले?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची तुलना दृष्टिहीनांच्या हत्तीचा आकार ठरवण्याच्या प्रयत्नांशी करता येईल. ते सोडून त्यापलीकडे चीन समजून घेण्यासाठी अलीकडेच आलेल्या काही पुस्तकांचा परिचय करून देणे रास्त ठरेल. चीनच्या जगावर प्रभाव टाकण्याच्या क्षमतेचा उल्लेख ‘लोकरंग’मधील ‘ओ हेन्री’ (२६ जून २०११) या लेखात केला होता. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व जागतिक कीर्तीचे मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांच्या चीनविषयक पुस्तकाचा तो परिचय. त्यात त्यांनी चीनच्या माओंचा उल्लेख ‘तत्त्वज्ञ राजा’ असा करण्याचा छछोरपणा दाखवला आहे. आपल्याच देशाच्या किमान पाचेक कोटी नागरिकांचे शिरकाण करणारा नेता किसिंजर यांना ‘तत्त्वज्ञ’ वाटतो यातच चीनचे यश सामावले आहे अशा अर्थाचे प्रतिपादन त्या लेखात होते.

अमेरिका आणि चीन संबंधांची कोंडी फोडण्याचे ऐतिहासिक काम किसिंजर यांच्या हातून घडले. १९७१ साली किसिंजर यांना तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला पाठवले आणि या दोन देशांत राजनैतिक संबंध प्रस्थापित व्हायला सुरुवात झाली. या पुस्तकास साधारण दहा वर्षे होत असताना आणि अमेरिका व चीन यांच्यात नव्याने कोंडी निर्माण होत असताना किसिंजर हे आता चीनचा इतका उदोउदो करतील का, हा प्रश्नच. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत अशा प्रश्नांची थेट उत्तरे मिळत नाहीत, पण अंदाज मात्र बांधता येतात.

त्यासाठी मायकेल पिल्सबरी यांचे ‘द हण्ड्रेड इयर मॅरेथॉन’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरते. पिल्सबरी यांनी तब्बल आठ अमेरिकी अध्यक्षांसाठी चीनचा गुंता हाताळण्याचे काम केले आहे. या एकाच मुद्दय़ावरून त्यांचा चीनानुभव किती दांडगा आहे हे कळून येईल. पाच दशकांहून अधिक काळ ते चीनचा अभ्यास करीत आहेत. अमेरिकेतील विख्यात रॅण्ड कॉर्पोरेशन आणि हार्वर्डसारख्या संस्थांतील संशोधनात्मक कार्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. ते सर्व संचित त्यांच्या ‘द हण्ड्रेड इयर मॅरेथॉन’ या पुस्तकात यथास्थित उतरलेले आहे. या पुस्तकात पिल्सबरी ‘पाहा.. मला किती चीन कळला आहे..’ अशा प्रकारचा अभिनिवेश कोठेही आणत नाहीत. माहिती, चीनमधील अनुभव, प्रत्यक्ष चिनी नेत्यांशी झालेले संवाद, प्रसंगी स्वत:च्या चुकलेल्या अंदाजांचीही कबुली आणि या सगळ्यास विश्लेषणाची जोड यामुळे हे पुस्तक एखाद्या रोचक कादंबरीसारखे आहे. अर्थात चीनचे सर्व उद्योगच गूढ असल्यामुळे त्याविषयीचे लिखाण आपोआप वाचनीय होते हा भाग आहेच.

पिल्सबरी यांनी चिनी प्राचीन वाङ्मय, त्यातील बोधप्रद अशा सूचककथा यांचा मुबलक आधार आपल्या मांडणीत घेतला आहे. त्यामुळे चीनचे वर्तमान समजून घ्यायला निश्चितच मदत होते. उदाहरणार्थ- ‘शत्रूला चुकवण्याच्या ३६ क्लृप्त्या’ (३६ स्ट्राटेजेम्स) ही चीनच्या पुराणातील वचने. ‘सर्वाच्या डोळ्यादेखत समुद्र ओलांडा’, ‘महासागर पार करण्यासाठी आकाशाला फसवा’ किंवा ‘सर्वाच्या नजरा असताना लपून राहा..’ अशी काही सूचक वाक्ये लक्षात घ्यावी अशीच. यात अचंबित करणारा मुद्दा म्हणजे चीनचे सर्व राज्यकर्ते या प्राचीन सूचककथांच्या आधारेच आपले राजकारण आजही करतात. ‘लोकसत्ता’च्या विश्लेषण चर्चेत सहभागी झालेले विख्यात चीन अभ्यासक जयदेव रानडे यांनीही हीच बाब अधोरेखित केली. (त्या चर्चेचा सविस्तर वृत्तान्त आजच्या अंकात अन्यत्र आहेच.) याचा दुसरा अर्थ असा की, त्यामुळे चिनी राजकारण्यांच्या कृत्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आधी चिनी प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास नाही, तरी परिचय असणे गरजेचे ठरते.

याचे दुसरे कारण म्हणजे भ्रमतंत्राचा (डिसेप्शन) चिनी राज्यकर्त्यांकडून केला जाणारा चतुर वापर. त्याचीही मुळे त्या देशाच्या पुराणकालीन साहित्यात आढळतात. इसवी सनापूर्वीच्या पाचव्या शतकात होऊन गेलेला आणि अजूनही ज्याचे लिखाण वाचले जाते अशा सन त्झु याचे लिखाण. सर्वसाधारणपणे भ्रमतंत्राचा वापर अन्य देश ज्या पद्धतीने करतात त्या मार्गाने चीन जात नाही. तो सन त्झु याचा सल्ला मानतो. त्यामुळे भ्रमतंत्र हे चिनी मुत्सद्देगिरीचा पाया आहे. आपल्या शत्रूस वा संभाव्य शत्रूस प्रत्यक्ष हल्ला करेपर्यंत कोणत्याही पद्धतीने, मार्गाने वा कृतीने आपल्या मनसुब्यांचा जराही सुगावा लागू द्यायचा नाही, हा यातील एक महत्त्वाचा भाग. आपली प्रत्येक कृती ही आपल्या शत्रूस वा प्रतिस्पध्र्यास धक्का देणारीच हवी असे चीन मानतो. याचा अर्थ आपल्या मित्रास, शत्रूस वा अगदी प्रतिस्पध्र्यासही आपला अंदाज बांधता येणार नाही याची खबरदारी प्रत्येक चिनी राज्यकर्ता घेतो.

त्यात ते किती कमालीचे यशस्वी होतात हे पाहण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. पिल्सबरी  दाखवून देतात की अमेरिकेस याच तंत्राचा वापर करून चीनने पेंगताना पकडले. चीनची वागणूक अलीकडेपर्यंत अशी होती की कित्येक अमेरिकी राजकारण्यांना चीन फसवू शकेल असे वाटलेच नाही. पिल्सबरी त्याचे अनेक नमुने या पुस्तकात देतात. आपण नेहमी ‘गरीब बिच्चारे’ असेच वाटत राहू यासाठी चीनने इतकी उत्तम खबरदारी घेतली, की आर्थिकदृष्टय़ा गळ्याशी येईपर्यंत चिनी कांगावा अमेरिकेसह अन्य अनेकांच्या ध्यानातही आला नाही. त्याचमुळे अमेरिकी आर्थिक मदतीवर चीनने स्वत:चे पोषण करून घेतले आणि योग्य वेळी अमेरिकेवरच गुरकवायला सुरुवात केली. आता तर अमेरिका हे चीनचे सावज आहे.

हरवलेली उंची आपल्या देशास पुन्हा मिळवून देणे, हे चीनचे उद्दिष्ट. ही उंची का हरवली? तर पाश्चात्त्य शोषक आणि अन्यायकारक अशा राजसत्तांमुळे अशी चीनची धारणा आहे. त्यामुळे या पाश्चात्त्य सत्तांना त्यांची जागा दाखवून देण्याइतके मोठे जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत थांबायचे नाही, हा त्या देशाचा वज्रनिर्धार आधुनिक चीनचे उद्गाते माओ झेडाँग- म्हणजे चेअरमन माओ यांनी केला आणि त्याप्रमाणे देशउभारणीचा शिलान्यास केला. ही घटना १९४९ सालची. आजपासून २९ वर्षांनी- म्हणजे २०४९ साली माओंच्या या कृत्याची शताब्दी असेल. म्हणून तोपर्यंत जगात एकमेवाद्वितीय अशी महासत्ता होणे हे चीनचे ध्येय आहे. एकमेवाद्वितीय होणे म्हणजे अमेरिकेस मागे टाकणे. म्हणून ही शंभर वर्षांची मॅरेथॉन. ती १९४९ साली सुरू झाली आणि २०४९ साली तिचे उद्यापन असेल.

म्हणजे सध्या विविध आघाडय़ांवर चीन जे काही करतो आहे तो या दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीचाच भाग म्हणायचा. फिलिपिन्स, तैवान, व्हिएतनाम, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि अर्थातच भारत अशा अनेक आघाडय़ा एकाच वेळी चीन उघडू शकला त्यामागे ही १०० वर्षांच्या स्पर्धेची प्रेरणा आहे, हे आपण विशेषत: लक्षात घ्यायला हवे. पिल्सबरी आपल्या या पुस्तकातून विविध कोनातून चीनच्या या विजिगीषु वृत्तीचे दर्शन घडवतात. या संदर्भातील चिनी शब्द आहे ‘यिंग पाई’.. म्हणजे बहिरी ससाणे. अत्यंत आक्रमक असे. ‘यिंग पाई’ हे चीनच्या परराष्ट्रविषयक धोरणाचे ब्रीद. त्याच्या अंमलबजावणीसाठी चीनने निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना विविध प्रशासकीय पदांवर, मोक्याच्या जागी बसवले आहे. म्हणजे ते मुलकी विषयाकडे लष्करी दृष्टिकोनातून पाहू शकतात. त्याचा म्हणून एक परिणाम होतच असणार. कसे, ते आपण सध्या पाहतोच आहोत. ज्या भागात घुसखोरी होईल असे कोणाच्या स्वप्नातही नसताना नेमकी त्याच भागात घुसखोरी होते यामागे हे ‘यिंग पाई’ धोरण असेल.

मायकेल पिल्सबरी यांच्या या पुस्तकात हे सर्व मुद्दे रसाळपणे समोर येतात. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात, हे खरे; पण त्याहून अधिक मोठे असे काही प्रश्न निर्माण होतात. पण ते अर्थातच चीनविषयी नसतात.

ते असतात आपल्याविषयी. फारच महत्त्वाचे आहे हे प्रश्न पडणे.

काटकोन त्रिकोण

याच्या जोडीला तन्वी मदान यांचे ‘फेटफुल ट्रँगल : हाऊ चायना शेप्ड यूएस-इंडिया रिलेशन्स डय़ुरिंग द कोल्ड वॉर’ हे पुस्तकही काहीएक मर्यादित मुद्दे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. तन्वी वॉशिंग्टनला ब्रुकिंग्ज संस्थेत भारतविषयक अभ्यासक आहेत. वॉशिंग्टनला त्यांच्या कार्यालयात त्यांच्याकडूनच काही वर्षांपूर्वी त्यांचा अभ्यासविषय समजून घेता आला होता. त्यावेळी त्यांचे हे पुस्तक लिखाणाच्या वाटेवर होते. आशियाई-प्रशांत महासागरी देशांतील राजकारणात चीनचे मध्यवर्ती असणे आणि त्याचा या परिसरातील अमेरिकी हितसंबंधांशी होणारा संघर्ष हादेखील त्यांच्या अभ्यासाचा विषय. ताज्या गलवान घुसखोरीनंतर ज्या तत्परतेने अमेरिका भारताच्या बाजूने पुढे आली आहे ते पाहता या संबंधांचा ऐतिहासिक आढावा तन्वी यांच्या पुस्तकातून समोर येतो.

भविष्याला आकार देण्यासाठी इतिहासाचे भान आवश्यक आहे असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी ही दोन्ही पुस्तके निश्चितच उपयुक्त ठरावीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:12 am

Web Title: china india relations need to understand china ancient literature dd70
Next Stories
1 गलवान : काळ्या दगडावरची रेघ
2 हास्य आणि भाष्य : रणभूमीवरची व्यंगचित्रं
3 इतिहासाचे चष्मे : कर्मकांडविवेक
Just Now!
X