आमच्या काळात मुलांना केवळ चॉकलेट्स नव्हे, तर चहादेखील दिला जात नसे. फार तर कोको दिला जाई. सरकार आणि विरोधक आता अनायासे समाज सुधारण्यासाठी एकत्र आले आहेतच, तर मग सरकारनं वृद्ध आणि मुलांच्या चॉकलेट्स खाण्यावर तर बंदी आणावीच, पण चहावरदेखील बंदी आणावी. अर्थात चॉकलेट्स व चहाबंदीची ही विधेयके येतील तेव्हा येतील, पण तोपर्यंत मंत्रालयात निदान अधिवेशन काळात तरी चहापान बंद करून कोको सुरू करायला काय हरकत आहे? एवीतेवी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांचा चहापानावर बहिष्कार असतोच.
वा ईट सवयी तसेच व्यसनामुळे केवळ त्या व्यक्तीचे आयुष्यच बरबाद होते असे नाही, तर त्या व्यक्तीचे कुटुंब, समाज आणि देश अशा सर्वानाच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. याबाबतीत मुलांना लहानपणापासूनच खूप सांभाळावं लागतं. अन्यथा त्यांना चटकन् चित्रविचित्र सवयी लागू शकतात. परिणामी पुढची पिढी रोगट निर्माण होते. हे पूर्वीच्या लोकांना बरोबर ठाऊक होते. तसे आज मात्र दिसत नाही. उदाहरणार्थ- हल्लीच्या लहान मुलांना चॉकलेट्सशिवाय चालतच नाही. आमच्या काळात असं नव्हतं. लहान मुलांना आम्ही चॉकलेट्स अजिबात देत नसू. आम्हीच नव्हे, त्याकाळी मुलांना चॉकलेट्स कोणीच देत नसत. अर्थातच मुलांना चॉकलेट्स नाकारण्यामागचं कारण म्हणजे त्यामुळे मुलांचे दात किडतात. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, लहानपणी चॉकलेट्स खाणाऱ्या मुलांपकी २९ की ३९ टक्के मुलांचे दात नंतर किडतात. आता ही टक्केवारी किडक्या मुलांची- सॉरी, किडक्या दातांच्या मुलांची की निव्वळ किडक्या दातांची? त्यात २९ टक्के बरोबर की ३९ टक्के- असे बरेच वाद निर्माण होऊ शकतात, ही गोष्ट अलाहिदा! पण गोड खाणं, चॉकलेट्स खाणं यामुळे लहान मुलांवरच नव्हे, तर वृद्धांवरदेखील गंभीर परिणाम होतो, हे निश्चित. मुलांचे दात किडतात आणि म्हाताऱ्यांचे तर पाहायलाच नको. म्हणजे आपण नव्हे; त्यांनीच पाहायला नको. आय मीन, ते पाहूच शकत नाहीत. कारण गोड, चॉकलेट्स खाऊन मधुमेहानं त्यांचे डोळेच जातात. त्याखेरीज किडनी, हृदय वगरेंवर परिणाम आणि पायाला गॅंगरीन होतं, ते वेगळंच! आज देशात मधुमेहींची संख्या इतकी वाढली आहे, की जाऊ द्या.
हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे परवा एका ठिकाणी एक आजोबा आणि त्यांचानातू असे दोघं एका दुकानाबाहेर उभे राहून चॉकलेट्स खाताना पाहिले. आविर्भावावरून त्या आजोबांचे डोळे आणि नातवाचे दात गेलेले वाटत होते. त्या आजोबांचा मुलगा- म्हणजे नातवाचा बाप- असा तो बाप कम् मुलगा हतबल कम् हताशपणे त्या दोघांचे चॉकलेट्चर्वण पाहत उभा होता. दरम्यान, आजोबांनी आणखी चॉकलेट्स विकत घेण्यासाठी खिशातून पसे काढले. एवढय़ात एक गुंड धक्काबुक्की करत नातवाला ढकलून देऊन आजोबांकडील नोटांचे अख्खे बंडल घेऊन पळून गेला. ‘चोर, चोर, पकडा.. पकडा’ असा गिलका करत गर्दी जमा झाली आणि चोर पळून गेल्याच्या दिशेने हातवारे करत सर्वानी त्या तिघांभोवती असं कोंडाळं केलं, की जणू आजोबा म्हणजे एखादी ‘आयटम गर्ल’च असावी! इतक्यात ती गर्दी पाहून एक शुभ्रवस्त्रांकित महाकाय तिथे अवतरले आणि त्यानं त्या गर्दीचं लक्ष त्या तिघांकडून काढून स्वत:कडे वेधून घेतलं. त्याचा गॉगल इतका मोठा होता, की गॉगललाच नाक- ओठ फुटल्यासारखे भासत होते. त्याला पाहून लगोलग चार फूट उंच व दीड फूट व्यासाचा एक कॉन्स्टेबलही अचानक कुठूनतरी तिथे उपटला आणि त्यानं लागलीच मोबाइलवरून अर्धा फूट मिशीवाल्या त्याच्या ‘पीआय’ साहेबालाही बोलावून घेतलं. त्या ‘लक्षवेधी’च्या पांढऱ्याफटक कपडय़ांवरून तो नेता असावा हे कळत होतंच; पण त्याच्या जरबयुक्त स्मितहास्यामुळे तो तेथील लोकप्रतिनिधी असावा हेही सर्वानी ताडलं. गर्दीतला प्रत्येकजण चेहऱ्यावर निखळ ओशाळलेपण आणून त्याच्याशी बोलू लागला. त्या इन्स्पेक्टरनं त्या ‘होल्डॉल’साठी आणि स्वत:साठी त्याच दुकानातल्या खुच्र्या उचलून आणून तिथंच जाबजबाब घेणं सुरू केलं.
‘कुठं राहता? कशासाठी आलात इथं? खिशातून पसे बाहेर का काढले?..’ त्यानं प्रश्नांचा गोळीबारच सुरू केला. प्रत्येक प्रश्नानंतर तो मिशीवर बोटे फिरवत त्या पांढऱ्याकुट्ट पेहेरावाकडे दाद मिळवण्याप्रीत्यर्थ पाहत होता. त्यावर तो नेताही स्वत:च्या बोटातील सोन्याची जाड अंगठी फिरवीत नितांत ‘वाणिज्य’ (आय मीन ‘कमर्शियल’!) दाद देत होता. इन्स्पेक्टर अशा आविर्भावात प्रश्न विचारात होता, की गर्दीतल्या नवीन लोकांना ते तिघंजणच चोर वाटत होते.
‘‘त्या चोराला ओळखाल का? त्याला आधी कुठं पाह्य़लं होतं का?’’ या प्रश्नावर तिघांनीही नकारात्मक मान डोलावली. हे पाहताच इन्स्पेक्टरनं चिडून हातातली छडी आपटली. दचकून म्हातारा म्हणाला, ‘‘मी कसं पाहणार? मला दिसतच नाही. माझे डोळे मधुमेहानं गेलेत.’’
‘‘दिसत नाही तर मग घरात बसायचं! इथं कशाला आलात? बरं, आलात ते आलात, वरून एवढय़ा नोटा कशाला बाहेर काढल्या?’’ इन्स्पेक्टरनं म्हाताऱ्याला खडसावलं.
‘‘चॉकलेट्स खरेदीसाठी आलो होतो आणि चॉकलेट्सचे पसे देण्यासाठी बटवा खिशाबाहेर काढला होता..’’ असं म्हाताऱ्यानं सांगितल्यावर इन्स्पेक्टर आक्रसला; पण ते ‘ढवळं गाठोडं’ मात्र विस्कटलं!
‘‘म्हणजे मधुमेहानं डोळे गेले तरी चॉकलेट्स खाताय? अहो आजोबा, तुमचं वय काय आणि खाताय काय? आपल्याला झेपतं तेच आणि तेवढंच खावं माणसानं!’’
‘खावं’ या शब्दांच्या कोटीवर हशा घेत त्याच्या नातवाकडे वळून नेता ओरडला, ‘‘काय रे पोरा? दात किडले तुझे- तरी खातोस का चॉकलेट्स? लाज नाही वाटत का, एवढा गोरा असून काळे दात घेऊन फिरायला?’’ पुन्हा लोक हसले.    
‘‘इन्स्पेक्टरसाहेब, आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. दहा हजार रुपये गेलेत. त्या चोराला पकडा साहेब. तो लांब गेला नसेल अजून..’’ मधली पिढी विनवण्या करायला लागली.
‘‘चोराला पकडणं म्हणजे काय सोपं वाटलं काय तुम्हाला.. चॉकलेट्स खाण्यासारखं? चोराला पकडा म्हणे! इथे सबंध एरियासाठी मी एकटाच पीआय! काय काय सांभाळायचं आम्ही?’’ त्या तिघांना झापता झापता तो इन्स्पेक्टर अचानक त्या श्वेतवस्त्रावृताकडे वळून आवाजात मार्दव आणत म्हणाला, ‘‘साहेब, एक जीप तरी र्अजट वाढवून घ्यायला पाहिजे आपल्या एरियासाठी. तुम्ही सांगितलं मंत्रीसाहेबांना तर होऊन जाईल साहेब. तुमच्या सभा-मोच्र्याच्या कामी येईल.’’ थोडं थांबून अतीव लाचारीनं ओथंबलेल्या आवाजात पुढे म्हणाला, ‘‘बदलीचं लवकर बघा ना साहेब. तुमचं ठरलेलं उद्याच पोचवतो. ’’
‘‘उद्या- उद्या करताय नुसतं! प्रत्यक्षात काहीही करत नाही. आमच्या बििल्डगमधले भाडेकरूसुद्धा हुसकले नाहीत अजून!’’ तो गॉगलच्या कोपऱ्यातून इन्स्पेक्टरकडे पाहत म्हणाला.
‘‘साहेब, उशीर झाला तर चोर सापडणार नाही हो..’’ बाप कम् मुलगा आर्जव करू लागला.    
‘‘हो. आम्ही चोरांना पकडायचं आणि पसे परत मिळाले की तुम्ही परत चॉकलेट्स खायची! मग परत तिथे चोर येणार! दुसरं काही कामच नको करायला..’’ इन्स्पेक्टर मिशा पिळत म्हणाला. मग ठेवणीतल्या नम्रपणानं अंगठीवाल्याला म्हणाला, ‘‘अशा लोकांमुळेच चोरांचं फावतं साहेब! चॉकलेट्ससाठी आख्खं बंडल कशाला काढायचं?’’ अंगठीधारकानं गॉगल काढून पुसला आणि खडय़ा आवाजात सर्वाना म्हणाला, ‘‘चॉकलेट्समुळे पसे चोरीला गेले ते गेलेच; शिवाय  डोळेही गेले. त्या पोराचे दात गेले ते आणखी वेगळेच! ’’  
त्यानं संपूर्ण गर्दीकडे पाहून प्रश्नार्थक चेहरा केला. त्या प्रश्नानं सारे थक्क होऊन लोकप्रतिनिधीकडे कौतुकाने पाहायला लागले. त्यानं पुन्हा गॉगल डोळ्यांवर चढवला आणि आवाज वाढवून म्हणाला, ‘‘म्हणजे पुन्हा तुम्ही आम्हालाच म्हणणार- सरकारनं हॉस्पिटल काढावं. मोफत डोळे, दात तपासावेत. काय आजोबा?’’ या प्रश्नानं तर सारे अवाक्च झाले. आता तो उत्तेजित होऊन उभाच राहिला आणि भाषण दिल्यासारखे बोलू लागला-  
‘‘चॉकलेट्समुळे पुढच्या पिढीचं भविष्य किडतंय. हे चॉकलेट्स खाल्ल्यामुळेच आधीची पिढी पाहू शकत नाही!’’ या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक एकमेकांशी कुजबुजत आपापल्या अशाच तक्रारी सांगून त्यामुळे होणाऱ्या समस्यांची व खर्चाची कबुली देऊ लागले. त्याचा आवाज आणखी चढला-
‘‘या दोन्ही पिढय़ांची आज दारुण अवस्था दिसतेय ती फक्त चॉकलेट्समुळेच! हे थांबवायचे असेल तर ते खाणे थांबले पाहिजे! म्हणून मी त्यावर बंदी आणावी यासाठी संबंधित मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून पुढच्या अधिवेशनात ‘बंदी विधेयक’ मंजूर क रून घेईन.’’टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. गर्दी वाढत होती. तो मुलगा अधूनमधून क्षीण आवाजात इन्स्पेक्टरकडे विचारणा करत होता. त्याला टाळून इन्स्पेक्टर गर्दीला छडीने आवरत होता.
तेवढय़ात त्या गर्दीमुळे तिथे एक ‘ओबी’ व्हॅन आली आणि त्यातून एक युवक हातात कॅमेरा व माइकसकट हातवारे करत उतरला. त्याने ‘रोजचा बकवास’कडून आल्याचं सांगून नेत्याला ‘बोला बोला’ म्हणत प्रश्न विचारला, ‘‘साहेब, राजकारण्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, गुंडगिरी कशी थांबवणार, ते बोला! कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे त्याबाबत बोला.’’ कॅमेरा पाहून नेता चेकाळला आणि उच्चरवात म्हणाला, ‘‘आपल्या राज्यात कायदा-सुव्यवस्था ढेपाळली म्हणून काय झालं? लोकप्रतिनिधींचे घोटाळे, भ्रष्टाचार बंद झाले नसले तरी आपल्या सरकारनं आतापर्यंत डान्सबार, हायवेसाइड बार, गुटखा, मावा, खर्रा या सर्वावर बंदी आणली आहे. या बंदीला विरोधी पक्षांनीसुद्धा विरोध न करता एकमतानं त्याबद्दलचं विधेयक मंजूर केलं, हे तुम्ही लक्षात घ्या. गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही काही करू शकलो नसलो तरी सामान्य जनतेला आम्ही निव्र्यसनी आणि नतिक बनवीत आहोत; जेणेकरून भविष्यात आपोआपच त्यांचे प्रतिनिधी नतिक बनतील. ज्यामुळे पुढे कधी ना कधीतरी गुंडगिरी, घोटाळे आणि भ्रष्टाचार यापासून राज्य मुक्त होईल!’’ आता लोक खुशीनं पिसाटून घोषणा देऊ लागले आणि मोठ्ठा कल्लोळ माजला. बाप कम् मुलग्याने छडीपासून बचावण्यासाठी इन्स्पेक्टरचा नाद सोडून नेत्याला गाठून विचारले, ‘‘साहेब, माझे दहा हजार रुपये चोरीला गेलेत. त्याचं काहीतरी करा ना!’’  
नेत्यानं गॉगल काढून त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं, ‘‘अहो, काळजी कसली करताय? ही नवी बंदी आली की तुमचे वडील आणि मुलगा चॉकलेट्स खाऊ शकणार नाहीत. म्हणजे पुढच्या त्यांच्या औषधपाण्यासाठी तुम्हाला खर्चच पडणार नाही. अन्यथा काही दिवसांतच हॉस्पिटल, डॉक्टर, औषधे यांच्यावर तुमचे लाखो रुपये खर्च झाले असते. त्या दहा हजार रुपयांचं काय एवढं घेऊन बसलात?’’
हे सारं पाहून आमच्या काळात राजकारणात भ्रष्टाचार, गुंडगिरी वगरे काही नव्हतं याचं कारण लख्खपणे उमगलं! त्याकाळी डान्स बार, गुटखा, खर्रा वगरे असलं काही नव्हतं. समाज जर नतिक आणि निव्र्यसनी असेल तर त्यांचे प्रतिनिधीदेखील साहजिकच सज्जन असणार. मग भ्रष्टाचार, गुंडगिरी निर्माण होईलच कशी? आमदारांना मानधन, भत्ता, निधी वाढवणे आणि मुंबईत स्वस्त सदनिका देणे- याखेरीज कधीही यापूर्वी सरकार आणि विरोधक एकत्र आले नव्हते. आता सरकार आणि विरोधक वगरे सर्वानी एकमताने समाजाला निव्र्यसनी आणि नतिक बनविण्याचा चंग बांधला आहे, ही किती भाग्याची गोष्ट आहे! समाज सुधारला की पुढे कधीतरी त्यांचे प्रतिनिधीही सुधारतीलच. आणि मग अंतिमत: गुंडगिरी-भ्रष्टाचारदेखील नष्ट होईल.
आमच्या काळात मुलांना केवळ चॉकलेट्स नव्हे, तर चहादेखील दिला जात नसे. फार तर कोको दिला जाई. सरकार आणि विरोधक आता अनायासे समाज सुधारण्यासाठी एकत्र आले आहेतच, तर मग सरकारनं वृद्ध आणि मुलांच्या चॉकलेट्स खाण्यावर तर बंदी आणावीच, पण चहावरदेखील बंदी आणावी. अर्थात चॉकलेट्स व चहाबंदीची ही विधेयके येतील तेव्हा येतील, पण तोपर्यंत मंत्रालयात निदान अधिवेशन काळात तरी चहापान बंद करून कोको सुरू करायला काय हरकत आहे? एवीतेवी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांचा चहापानावर बहिष्कार असतोच. विरोधकांनी अधिवेशनाआधीच या चहाबंदी विधेयकास कृतीद्वारे पाठिंबा दिला असे समजून सत्ताधाऱ्यांनी कोको प्यायला सुरू करावे! आधी विधेयक मांडून नंतर पाठिंबा देण्याची आपल्या इथे पद्धत असली तरी चांगल्या गोष्टीसाठी आधी पाठिंबा आणि नंतर विधेयक असे करण्यात वावगे ते काय?
काही अपरिहार्य कारणास्तव ‘उद्धारपर्व’ हे सदर या अंकात प्रसिद्ध होऊ शकले नाही.