ऑरलीच्या विमानतळावर मी उतरले. उत्सुकतेने चौफेर दृष्टी वळवली. नवागतांचे स्वागत करायला तऱ्हतऱ्हेच्या नावांच्या पाटय़ा उंचावून स्वयंसेवक उभे होते. माझ्या नावाची पाटी कुठे दिसेना. मग निदान मला आमंत्रण करणाऱ्या Centre National या संस्थेचा झेंडा कुणी फडकावतो आहे का, ते मी न्याहाळून पाहिले. पण नाही. मला घ्यायला कुणी काळं कुत्रंसुद्धा आलं नव्हतं. माझ्या येण्याचे पॅरिसला काही अप्रूप नव्हते, हेच खरे. वास्तविक मी माझ्या येण्याची तारीख, वेळ, विमान तपशील सर्व काही रीतसर कळवलं होतं. तरीही मी ही अशी बेवारशी उभी. कुणीही कब्जा घ्यायला तयार नसलेल्या लगेजसारखी. जिनीव्हा आणि पॅरिसच्या स्वागतामध्ये केवढा हा फरक! मी कुठे जायचे, कुठे राहायचे, काही काही ठरले नव्हते. माझे सगळे अवसान गळाले. मी रडायच्या बेताला आले. आणि मग एक काळासावळा तरुण इसम समोर उभा येऊन ठाकला. ‘नमस्कार.’ तो म्हणाला, ‘तुम्ही भारतीय ना?’ अनावश्यक प्रश्न. ‘साडीवरून दिसत नाही का?,’ असं मी एरवी खरमरीत उत्तर दिलं असतं, पण बुडत्याला काडीची अवहेलना करून कसं चालेल? ‘हो, हो..’ मी उत्साहाने सांगितले. ‘मी हरवले- म्हणजे गोंधळून गेले आहे.’
माझी कैफियत समजल्यावर सतिंदरने माझा ताबा घेतला. माझे सामान उचलून तो मला मेट्रोने Centre National des Oevres Universitair च्या इमारतीपर्यंत घेऊन गेला. संध्याकाळ झाली असल्यामुळे ऑफिस बंद होते. पण सुदैवाने शेजारीच मुलींचे एक हॉस्टेल होते. फ्रान्समध्ये शिष्यवृत्ती मिळवून आलेल्या मुलींना तिथे राहण्याची सोय होती. आठ दिवस फक्त. त्यांची दुसरी सोय होईपर्यंत. मी या हॉस्टेलमध्ये आठ दिवसांसाठी नाव नोंदवले.
सतिंदर गेली पाच वर्षे फ्रान्समध्ये होता. तोही शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून आला होता. त्याचे फ्रेंच अगदी निदरेष होते. म्हणजे व्याकरण. पण उच्चार म्हणाल तर तो पंजाबीमधून फ्रेंच बोलतो आहे असे वाटावे. लुधियानी फ्रेंच! मी त्याचे मन:पूर्वक आभार मानले. तो म्हणाला, ‘आभार कसले? भावाचे कुणी आभार मानतात का?’ मी जरा चरकले. हा ‘बहीण-भाऊ’ मामला मला नेहमीच अवघड आणि अस्वाभाविक वाटतो. जी नाती निसर्गाने (किंवा आई-वडलांनी) मुक्रर केली नाहीत ती चिकटवण्याचा हव्यास कशापायी? एखाद्या मुलीने ‘हा माझा मित्र’ म्हणून ओळख करून दिली तर आभाळ कोसळणार आहे? की अवघ्या समाजाची नीतिमत्ता नष्ट होणार आहे? पण एकदा भाऊ-बहीण हा शिक्का मारला की ‘आमची जवळीक अगदी शुद्ध आहे.. उगीच गैरसमज नको!’ हे प्रस्थापित होतं. पण ही केविलवाणी धडपड कशासाठी? हेतू ‘उदात्त’ आहे, हे सांगण्याची गरजच काय? खोल कुठेतरी चोरटेपणाची भावना दडलेली असते की काय? मी अनेकदा ‘बहीण’ व्हायला नकार दिल्यामुळे (कॉलेज, आकाशवाणी, दूरदर्शन) गैरसमज उद्भवले आहेत. (अरेच्चा! बहीण व्हायलाही तयार नाही म्हणजे..?) हे गैरसमज निस्तरता निस्तरता मी हैराण झाले आहे. तेव्हा आता पॅरिसला आल्या आल्या नेहमीचा गुंता नको म्हणून मी सतिंदरला हटकले नाही.
माझ्या खोलीत सामान ठेवल्यावर मी निर्धास्त झाले. गळालेले अवसान पुन्हा गवसले. शेजारच्या खोलीतल्या एका टय़ुनिशियाच्या मुलीशी माझी छान दोस्ती झाली. ती दुसऱ्या दिवशी मला आमच्या ‘सांत्र’ला (सेंटरला) घेऊन गेली.
या ‘सांत्र’चा संसार थाटलेला प्रचंड मोठा हॉल देशविदेशच्या विद्यार्थ्यांनी फुलला होता. माझ्या शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या महिलेला मी भेटले. ‘नाटक आणि टेलिव्हिजनचा अभ्यास करायला फ्रेंच भाषेचा पाया भक्कम हवा,’ असं म्हणून तिने ‘अलियान्स फ्रान्सेझ’च्या तीन महिन्यांच्या प्रगत अभ्यासक्रमासाठी माझं नाव नोंदवलं.
‘माझ्या मुख्य कोर्सचं काय? तो कधी, कसा, कुठे सुरू होणार?,’ मी अधीरतेनं विचारलं. ‘कशाचा कोर्स?’ ती डोळे विस्फारून म्हणाली, ‘‘कोर्सबिर्स काही नाही. तुझा अभ्यासक्रम तूच ठरवायचास. आम्ही मदतीला सज्ज आहोत. तुला टेलिव्हिजनचे कार्यक्रम स्टुडिओतून पाहता येतील. तालमी पाहता येतील. ती मंडळी खूप कामात असतात. तेव्हा तुझ्याशी बोलायला त्यांना वेळ नसणार. तूही त्यांना प्रश्न विचारून भंडावू नकोस. दुरून जेवढं पाहता येईल तेवढं पाहा.’
‘आणि नाटकाचं काय?,’ मी विचारलं.
‘नाटकाची जवळजवळ तीच तऱ्हा असेल. तू निवडशील त्या नाटक मंडळीच्या तालमी तुला पाहता येतील अशी आम्ही व्यवस्था करू. तिथेही तुला काहीशी अलिप्त भूमिका निभवावी लागेल. अवलोकन करून त्यांचे तंत्र, त्यांची कार्यपद्धती, त्यांची शिस्त, संशोधन याचा अभ्यास करायचा. तुला निश्चित फायदा होईल. आणि हो..’ असं म्हणून त्या अधिकारी बाईने मला एक कार्ड दिले. ‘हा पास आहे,’ ती हसून म्हणाली, ‘जादूचा पास. तुला पॅरिसमधलं कुठलंही नाटक पाह्यला आता मोकळीक आहे. हा पास बरोबर बाळगायचा. बस्स! बॉन् शान्स (गुड लक)!’
हा पास हाती पडल्यावर माझी कळी खुलली. एरवी अभ्यासक्रम किंवा त्याचा अभाव ही निश्चितच नाउमेद करणारी गोष्ट होती. पण या पासच्या जोरावर पॅरिसच्या कोणत्याही रंगमंचाचे पडदे माझ्यासाठी खुलणार होते. नवी-जुनी, पारंपरिक-आधुनिक, व्यावसायिक-प्रायोगिक सगळी सगळी नाटके मला पाहायला मिळणार होती. पॅरिसची नाटय़देवता मेकअप करून जणू माझी वाट पाहत होती. पास दाखवून म्हणायचे, ‘तिळा उघड.’
पण फुकट नाटकाच्या मोहाला बळी न पडता मी माझा मोर्चा आधी टेलिव्हिजनकडे वळवला. ‘Office de Radioffusion Television Francaise’ किंवा नुसतं ओ. आर. ते. एफ् .! सेन नदी पॅरिसला छेदून जाते. शहराच्या दोन भागांना ‘रीव्ह द्रवात्’ आणि ‘रीव्ह गोश’ म्हणून ओळखतात. म्हणजे नदीची उजवी आणि डावी बाजू. डाव्या इलाख्यात शहराच्या दक्षिण टोकाला टेलिव्हिजनची सुंदर गोलाकार इमारत आहे. तिला वेढा घालणारा व्हरांडा माणसांनी कायम गजबजलेला असतो.
मी काही दिवस ओळीने ओ. आर. ते. एफ् .मध्ये हजेरी लावली. तिथल्या जनसंपर्कवाल्यांनी माझी जेमतेम दखल घेतली आणि मला कुणाला भेटायचं, कुठे बसायचं, कुठे कुठे जायचं (आणि कुठे जायचं नाही!), याची माहिती करून दिली. मग मी रेकॉडिंग्ज आणि काही प्रत्यक्ष प्रक्षेपित कार्यक्रमांना हजर राहू लागले. वाद्यवृंद, नृत्य, प्रेक्षकांच्या हजेरीत निरनिराळय़ा स्पर्धा, चर्चासत्र, मुलाखती, विविधरंगी कार्यक्रम अशा नाना तऱ्हा मी पाहिल्या. एक जाणवलं, की तिथला सामान्य इसमसुद्धा छान आत्मविश्वासाने बोलतो. आपल्याकडच्या मुलाखती त्यामानाने दयनीय वाटतात. इंग्रजी तर सोडाच; पण मातृभाषादेखील आपण परभाषा असल्याप्रमाणे बोलतो. आपल्याकडे आपले विचार अस्खलितपणे मांडणारे मोजकेच पुढारी सापडतील. त्यांचे कार्यक्रम खूप रंजक वाटत. कारण एकतर साध्या साध्या गोष्टींसाठी यथायोग्य खर्च केलेला असे. साधा मुलाखतीचा कोपरादेखील सुसज्ज, प्रसन्न वाटावा याची खबरदारी घेतलेली दिसून येई. त्यांची सामग्री, पोशाख, दृश्यपरिणाम.. सारे काही भव्यदिव्य, नेत्रदीपक असे. पण हे सोडले तर बाकीचा कारभार सगळा तोच. स्टुडिओ, कंट्रोल पॅनेल, हेडफोनद्वारा सूचना, ध्वनी, प्रकाश, संगीत, रंगसज्जा, ओसंडून वाहणारा उत्साह, तंग वातावरण- सगळे तसेच.
नवलाई ओसरल्यावर मला ही ‘बघ्या’ची भूमिका जाचक वाटू लागली. मी करमणुकीच्या क्षेत्रात उतरल्यापासून मला झंझावाती वातावरणाची सवय झाली होती. प्रत्येक नवा कार्यक्रम म्हणजे एका अनोख्या वादळाशी सामना मानून मी काम केले. तर अशा पाश्र्वभूमीवर नुसतीच ‘बघ्या’ची भूमिका मला जाचक वाटू लागली यात नवल नाही. शेतातले बुजगावणेसुद्धा आपल्यापेक्षा अधिक क्रियाशील असते अशी जाणीव सतत टोचू लागली. त्यातून फ्रेंच लोक वृत्तीने तुटक, संशयी आणि स्वत:मध्येच गर्क असल्याची त्यांची ख्याती, इथे टेलिव्हिजनमध्ये प्रकर्षांने जाणवू लागली. सकाळी एकदा एकमेकांना हसून (खोटे खोटे) ‘बाँ जूर’ म्हटले की संपले दिवसाचे संभाषण. तर मी टेलिव्हिजनवरची माझी रोजची हजेरी कमी केली आणि साप्ताहिक वारी ठरवून टाकली.
‘अलियान्स’चा माझा फ्रेंच वर्ग सुरू झाला होता. मादाम दारीक आमची शिक्षिका. तिची विनोदबुद्धी तल्लख होती. ती हसतखेळत शिकवीत असे. वर्गात वेगवेगळय़ा देशांची मुले होती. पहिल्याच दिवशी ओळखींनी सुरुवात झाली. आपले नाव आणि देश सांगायचा. एका बाईने आपली पहचान सांगितली- ‘रिबेका आयझ्ॉक, इस्राइलहून.’ लगेच तिचा शेजारी म्हणाला, ‘जलाल महम्मद, पॅलस्टाइन.’ ‘थांबा, थांबा!’ मादाम दारीक म्हणाल्या- ‘चँग, तू या दोघांच्या मध्ये बस. आपल्याला कोणतीही आंतरराष्ट्रीय दुर्घटना नको आहे.’ माझे फ्रेंच उच्चार वर्गामध्ये सगळय़ात उत्तम असल्याचे त्या म्हणत असत. आणि मग लगेच- ‘पण जर व्याकरणाचा दुष्काळ असेल, तर उपयोग काय?’ असा टोला मारीत. वर्गामधल्या पाठांना पुरवणी म्हणून फ्रेंच शिकायचे माझे स्वतंत्र असे इतर काही मार्ग मी शोधून काढले. एकतर रस्त्यांत एखाद्या भल्या व्यक्तीला अडवून हॉटेलचा पत्ता विचारायचा. (जो मला आधीच ठाऊक असे!) अतिशय ओघवती, अलंकारिक आणि अस्सल बोलीभाषा ऐकायला मिळे. क्वचित थोडय़ा गप्पा होत. ‘पॅरिसमध्ये चुकूनही इंग्रजी बोलू नकोस..’ हा आईचा मंत्र मी कसोशीने पाळला. अडखळत आणि चुकतमाकत का होईना, मी आग्रहाने फ्रेंच बोलत असे. त्यामुळे लोकांना आपलेसे करून घेणे सुकर होई. काही अस्सल फ्रेंच म्हणी, वाक्प्रचारही मी पपाकडून शिकून घेतले होते. उदा. आपल्या वाइनच्या ग्लासमध्ये कुणी वाइन ओतत असेल आणि ‘अगदी थोडी.. थेंबभर’ असे सांगायचे असेल, तर ‘फक्त एका अश्रूएवढी’ म्हणायचे. किती सुंदर वाक्प्रयोग! म्हणजे खराखुरा ‘द्राक्षासव’च- नाही का? माझ्या अशा वाग्विलासाने थक्क झालेल्या मंडळींचा थोडय़ाच वेळात भ्रमनिरास होत असे, ही गोष्ट वेगळी. ऊर्मिला राव या भारतीय मुलीबरोबर एकदा मी चालले होते. तिचे फ्रेंच माझ्यापेक्षाही तकलादू होते. रस्त्यात एका ऑफिसलगतच्या भिंतीवर पाटी होती- ‘Defense d’ afficher‘म्हणजे काय?’ ऊर्मिलाने विचारले. ‘ठाऊक नाही,’ असे थोडेच कबूल करणार? मग मी गंभीरपणे सांगितले, ‘डिफेन्सचं ऑफिस आहे कसलंतरी.’ तिचं समाधान झालं. नंतर मला कळलं, की त्याचा अर्थ ‘काही चिकटवायला (पोस्टरबिस्टर) मनाई आहे.’ थोडक्यात चुकलं!
एव्हाना मुलींच्या हॉस्टेलमधली आठवडय़ाची मुदत संपली होती. मला हॉटेल ओव्हियॅटिकमध्ये छानशी खोली मिळाली. डाव्या पॅरिसमध्ये (Rive gauche) विद्यार्थी, विद्यालये (सोबोर्न ही प्रख्यात युनिव्हर्सिटी) आणि चित्रकार, कलाकार अशा लोकांचे वास्तव्य होते. साहजिकच हा भाग अधिक रंगतदार आणि जिवंत वाटे. माझे हॉटेल ‘ऱ्ह्यू व्होजिरार्ड’ या रस्त्यावर होते. हा शहराचा सर्वात लांब रस्ता.
एके दिवशी माझा नवा पत्ता शोधत सतिंदर उगवला. माझ्या पॅरिसच्या मुक्कामात माझ्या कार्यक्रमांची रूपरेखा स्वत: आखण्याची जबाबदारी घेण्याचे ठरवून तो आला होता. त्याच दिवशी पॅरिसमध्ये पिकासोचे प्रदर्शन सुरू झाले होते. ते पाहण्याचे मी ठरवलेच होते. तेव्हा आनंदाने मी सतिंदरबरोबर गेले आणि पस्तावले. प्रत्येक चित्रासमोर त्याचे काही ना काही वक्तव्य चालत राहिले. ‘फाम आसीस’ (बसलेली स्त्री) या पिकासोच्या सुप्रसिद्ध चित्रासमोर उभा राहून तो म्हणाला, ‘सांग. अशी बाई तू कधी पाहिली आहेस का?’ प्रदर्शन पाहून झाल्यावर म्हणाला, ‘हा पिकासो अगदीच बंडल होता. मी तुला लूव्ह्र दाखवीन.’ मी मनातून शहारले. बिचाऱ्या पिकासोची वाट लावली तेवढी पुरे; लूव्ह्रला तरी शाबूत राहू दे.
मग मी सौम्य, पण स्पष्ट शब्दांत यापुढे त्याच्याबरोबर फिरायला मला वेळ काढणं कसं जमणार नाही, ते त्याला समजावून सांगितलं. त्याने थोडी हुज्जत घातली. नाराज झाला. आणि मला ‘देशद्रोही’ ठरवून निघून गेला. पुन्हा दिसला नाही.
अजून मी नाटक पाहायला गेले नव्हते. भाषा थोडी आणखी भक्कम झाल्यावर मग मला नाटकांचा खरा आस्वाद घेता येईल, या भावनेने. शिवाय पॅरिसमध्ये इतर एवढं काही बघण्यासारखं होतं, की दिवस पुरा पडत नसे. सेनच्या काठाकाठाने, मेट्रोमधून, साक्रेकरजवळच्या चित्रकारांच्या मेळाव्यामधून, किंवा नुसतंच बुलव्हार्डस्वरून फिरायला फार मजा यायची. थंडीने मात्र थोडा विरस होई. उन्हाच्या देशातून आलेली मी- ओल्या गारठय़ाला कंटाळून गेले. मीच काय, सगळेच पॅरिसियन्स वसंत ऋतू अवतरण्याची वाट पाहत होते.
झाडंदेखील काकुळतीला आली होती. मोठाल्या रस्त्यांच्या दुतर्फा रांगेने असलेली ही खराटेवजा झाडं आपल्या पर्णहीन फांद्या आभाळाकडे उंचावून बापुडवाणी उभी होती. ही सगळी झाडे नेमकी एकाच उंचीची कशी, याचे मला नेहमी नवल वाटे. नंतर कळले, की तो निसर्ग चमत्कार नसून फ्रेंचांच्या शिस्तप्रिय वृत्तीचा आविष्कार आहे. बापडी झाडं पण फॅशनला शरण! आपल्याकडचा वड पाहा. त्या भव्य कुटुंबवत्सल वृक्षराजाला नियमन शिकवण्याची आहे का कुणाची प्राज्ञा? सुरुवातीला या काळय़ा, काटेरी, किडमिड फांद्या मला आकर्षक वाटत. माझ्या छोटय़ा लेकीने- विनीने निळय़ा कागदावर काळय़ा पेनने (माझ्याच) काढलेल्या वेडय़ावाकडय़ा रेघोटय़ांची आठवण व्हायची. पण एकदा पॅरिसजवळचे  सुप्रसिद्ध शार्त् कॅथ्रिडल पाहायला निघाले, तेव्हा वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना या ओरबडलेल्या बोडक्या झाडांची जंगलेच्या जंगले लागली. झिंज्या पसरून हडळींची पलटणच जणू अंगावर धावून येते आहे. रस्ता संपला तरी ती ओरखडय़ांची झाडे संपली नाहीत. तेव्हा वाटले, आता अति झाले. फूल नाही, तर पान तरी दिसू दे.
शात्र्चे कॅथ्रिडल दोन टप्प्यांमध्ये बांधले गेले. गोथिक आणि रोमन काळामध्ये. त्यामुळे या कॅथ्रिडलचे दोन टॉवर दिसतात. त्यांच्या उंच खिडक्यांना स्टेन्ड ग्लासची तावदाने आहेत. ती केवळ अप्रतिम आहेत. लाल, निळय़ा, नारिंगी काचेच्या तुकडय़ांनी शोभिवंत अशा त्या खिडक्यांवर नजर खिळून राहते. कॅथ्रिडलचा एकूणच डौल मंत्रमुग्ध करणारा आहे.
गंमत म्हणजे या कॅथ्रिडलची माहिती सांगणारे गाइड नाटकप्रेमी आणि गप्पिष्ट होते. गप्पांमधून माझ्या शिष्यवृत्तीसंबंधी मी त्यांना सांगितले. माझ्या फुकट पासबद्दल ऐकून त्यांनी डोळे विस्फारले. ‘ओ ला, ला, केल शान्स.. (अहोभाग्य!)’ ते म्हणाले, ‘मग आतापर्यंत किती नाटके पाहिलीत?’
काहीसं वरमून मी म्हटलं, ‘अद्याप एकही नाही.’
‘काय? अद्याप एकही नाही? मग तुमचा पास जप्त करायला हवा!’
‘पाच-सहाच दिवस झालेत फक्त पास मिळून.’ मी बचाव केला.
‘म्हणजे पाच-सहा दिवस तुम्ही फुकट घालवलेत. उद्याच्या उद्या ही चूक सुधारा..’
आणि मग त्यांनी मला निवडक नाटकांची नावे सांगितली. त्यातले एक ‘ल् सिलान्स’ किंवा ‘शांतता’ (‘कोर्ट’वाले नव्हे!) या नाटकाची मी निवड केली. ते आलिशान ओडियनच्या छोटेखानी थिएटरमध्ये होते. पत्ता : ऱ्हू व्होजिरार्ड. माझाच रस्ता!
दुसऱ्या दिवशी मी थिएटरवर पोचले. कार्ड दाखवले आणि म्हटले, ‘तिळा उघड.’  ल्ल     (भाग १)                     
    
================
‘ध’ चा ‘मा’ :
baba ramdev makes disentangle in current politics
baba ramdev, current politics, disentangl, loksatta lokrang, lokrang, loksatta news, loksatta, marathi news
गुंता!
परमआदरणीय योगगुरू बाबा रामदेवजी महाराज यांस आमुचे हूं हूं हूं हूं फुस्स!..
नाही समजले?.. सांगतो! रामदेव बाबाजी यांस आमुचे पोटापासून, पोटातल्या डायफ्रामपासून दंडवत!
बोला, यूपीएसंहारक, कृष्णधनहारक, भारतभूउद्धारक रामदेव बाबाजी की जै!!
तर वाचकहो, रामदेव बाबाजी हे आमुचे परमदैवत! त्यांनी (त्यांचेच) पोट गदागदा हलवावे, आम्ही अनिमिष नेत्रांनी ते पाहात राहावे! त्यांनी भसाभसा श्वास घ्यावा, आम्ही तो हूं हूं हूं हूं ध्वनी ऐकत राहावा! त्यांनी आपल्याच शरीराच्या असंख्य अवघड अडय़ाघुडय़ा घालाव्यात, आम्ही त्या कशा सुटणार या चिंतेने श्वास रोधून बसावे! त्यांनी उपोषण करावे, आम्ही त्या मंडपी जीव मुठीत धरून बसावे! त्यांनी नमोनम: म्हणावे, आम्ही तत्काल मंडुकासन करावे!
ऐशी आमुची भक्ती! ऐशी आमुची आस्था!
त्यामुळेच परवा त्यांनी जेव्हा आमुचे लाडके नेते महामहीम नमोजी यांस पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे, ऐसे वक्तव्य केले, तेव्हा आमुचे दोन्ही मेंदू तिनशेसाठ कोनातून चक्रावले. तोंडात लौकीऐवजी कारल्याचा काढा पडल्यासारखे वाटले! तातडीने आम्ही त्यांच्या भेटीस गेलो..
‘‘बाबाजी, प्रणाम!’’
‘‘हूं हूं हूं हूं फुस्स! बोलिए..’’ बाबाजींनी आमुच्याकडे बारीक नजर करून पाहिले.
‘‘बाबाजी, एक शंका विचारायची होती.’’
‘‘बसा. योगामध्ये सगळ्याचा इलाज आहे! योगाने ब्लडप्रेशर, हार्ट ट्रबल, अॅसिडिटी, कॅन्सर, डायबेटिस किंवा दुसरी कोणतीपण बिमारी दूर होते.’’ बाबाजींनी आस्था वाहिनी लाविली.
‘‘हो पण बाबाजी, शंका..’’
‘‘प्राणायाम! प्राणायाम करा. अनुलोमविलोम करा. कपालभाती करा. भस्त्रिका करा. तुमचा श्वास आणि नाक साफ असेल, तर काहीही होणार नाही..’’
‘‘बाबाजी, िशका नाही हो! शंका.. शंका..’’  त्यांस अधिक समजावे म्हणून आम्ही नाकात सूत घालून दो-चार सटासट िशकाही देणार होतो. इतुक्यात ते म्हणाले,
‘‘अच्छा, डाऊट है?’’
‘‘हो, बाबाजी. तुम्ही म्हणालात की मोदीजींना घाई झालीय.’’ आम्ही पद्मासनातून वीरासनातच आलो.
‘‘बरोबर आहे. घाई होतेय! योगशास्त्रात घाई अजिबात चालत नाही. हूं हूं हूं..’’
‘‘हे काय?’’
‘‘श्वास असा घाईघाईने सोडायचा नसतो! त्यामुळे ब्लडप्रेशर वाढतं. मी मोदींना हेच सांगितलं.’’ बोलता बोलता बाबाजींनी डाव्या पायात उजवा हात अडकवला.
‘‘काय?’’
‘‘..की घाई करू नका. शास्त्रोक्त पद्धतीने योगासनं करा.’’ आता तो पाय त्यांनी असा वर उचलला.
‘‘पण या धावपळीत त्यांना ते कसं जमणार?’’
‘‘जमेल. त्यासाठी त्यांनी फक्त एक गोष्ट केली पाहिजे.’’ तो पाय त्यांनी मानेमध्ये अडकवला.
‘‘कोणती?’’
‘‘आमच्या काही शिष्यांना सतत बरोबर ठेवलं पाहिजे.’’ आता त्यांनी उजव्या पायासही हात घातला.
‘‘पण पंतप्रधान झाल्यावर मोदीजींना ते कसं शक्य आहे?’’
तो पायही मानेत अडकवत ते म्हणाले, ‘‘योगामध्ये सगळं शक्य आहे. मोदीजींनी फक्त एक करायचं, आमच्या शिष्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं!’’
 आम्ही तेथून निघालो, तेव्हा बाबाजींचे दोन्ही पाय त्यांच्या मानेत घट्ट अडकले होते व हात स्वत:च्याच अंगाखाली सापडले होते.
सांगणारे असे सांगतात, की बाबाजींनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केल्यानंतरच तो गुंता सुटला!!