म (‘राजगडाला जेव्हा अधूनमधून जाग येते’ या आगामी ऐतिहासिक कादंबरीतील एक थरारक प्रकरण..)
हाराज खलबतखान्यात येरझाऱ्या घालत होते. हातीचा रुमाल वारंवार नाकाकडे जात होता. चेहऱ्यावरील उद्वेग दालनातील अल्प प्रकाशातही दृग्गोचर होत होता. वातावरणात जडशीळ तणाव होता. मसलतीस जमलेल्या मानकऱ्यांच्या मनावरचा ताण वाढत होता.
अचानक महाराज उद्गारले, ‘याचा अर्थ काय होतो? आम्ही गडावर केवळ हाती हात धरून बसून राहावयाचे? याचसाठी केला होता का हा अट्टहास? मां जगदंबेच्या आशीर्वादाने उभारलेली ही मसलत, ती अशी मातीत घालावयाची?’
‘नव्हे महाराज! गरसमज होतोय!’
‘गैरसमज नव्हे बाळाजी. आमची समज चांगली पक्की आहे,’ महाराज कडाडले, ‘ज्यांनी आमुचा गड राखायचा ते गडकरीच तहाची वार्ता करू लागले, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? आम्हीही चार राजकारणे जाणतो, बाळाजी.’
‘अलबत महाराज! आपुल्या जाणकारीबद्दल, समयसूचकतेबद्दल आमुच्या मनी कतई संशय नाही. किंतु महाराज सध्याचा काळ प्रतिकूल दिसतो. केवळ बोलून भागेल ऐसा समय राहिला नाही. तशात टोलिखडीच्या लढाईत आपणांस झालेले घावही भरून आलेले नाहीत..’
‘ऐशा घावांची पर्वा आम्हांस नाही बाळाजी! सुराज्याचे नवनिर्माण करावयाचे तर ऐशा अनेकानेक जखमा झेलाव्याच लागणार! दु:ख याचे, की मातोश्री हसली! खदाखदा हसली!!’
‘राजांनी पराक्रमाची हद्द केली. परंतु चौहानाच्या फौजेने दगा केला. चेंबूराच्या वाटेवर उभ्या गाडीनिशी बसल्या बसल्या साहेबांसी अलगद जेरबंद केले. त्यास कोण काय करणार?  अखेर ईश्वरेच्छा बलियसी!’
त्या प्रसंगाच्या स्मृतींनी महाराजांच्या कपाळी आणखी आठय़ा पडल्या. कडवटपणे ते म्हणाले, ‘आपल्या फौजेनेही ऐन वक्ती कच खाल्ली. जेथे खळ्ळखटॅक व्हावयाचे तेथे गीत गाया पत्थरों ने ऐसे झाले. जाऊ दे. आई भवानीची मर्जी! जगदंब जगदंब!’
‘म्हणूनच सांगतो महाराज, सुराज्याच्या नवनिर्माणाआधी आपल्या शिबंदीचं नवनिर्माण करावं लागणार आहे!’
‘मग ते कोणी करायचं बाळाजी, नितीनजी? किती निळ्या प्रती द्यायच्या आम्ही तुम्हांस? किती रसद पुरवायची? नितीनजी, रसद जातेय ना फौजेत ठरल्या टक्क्यांनुसार?’ राजे कडाडले.
नितीनजींनी नुसतेच मस्तक हलविले. बाळाजी त्यांच्याकडे तोंडाचा आ करून पाहतच राहिले!
क्षणभर दालनात भयाण शांतता पसरली.
मग अंगी उसने धाडस आणून बाळाजी पुटपुटते झाले, ‘परंतु महाराज, दिल्लीची मोहीम हाती घ्यायची म्हटले, तर सगळेच माना टाकू लागले आहेत. भले भले शिलेदार तोंड चुकवू लागले आहेत..’
‘बाळाजी, नांदगावचे नरवीर तुम्ही! तुम्ही उचला विडा!..’
बाळाजींना दरदरून घाम फुटला. कसेबसे ते म्हणाले, ‘पण महाराज, मग मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ या घोषणेचे काय? इथल्या दौलतीचं काय?’
‘हं, आहे ती दौलत राखलीच पाहिजे..’
‘जी महाराज, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यात काही मतलब नाही..’ बाळाजी म्हणाले. आणि पटकन् त्यांनी जीभ चावली! परंतु महाराजांचे ध्यान त्यांच्याकडे नव्हते. ते रुमालाने तोंड पुसत होते.
‘पण आता माघार घेतली, तर मातोश्री आणखी हसेल आम्हांला. आपले गडकरी, शेलारमामा काहीही म्हणोत. त्यांचे ऐकून आम्ही हाती हात ठेवून बसलो, तर लोक म्हणतील गड(करी) आला आणि सिंह गप्प झाला! ते काही नाही. ठरले म्हणजे ठरले!’
‘काय ठरले महाराज?’ बाळाजींनी पुसले. त्यांच्या स्वरात चांगलाच धसका होता.
‘कळेल! लौकरच कळेल!’ असे म्हणत महाराजांनी रुमाल झटकला. दोन्ही हातांच्या मुठी वळवल्या आणि ताडताड पावले टाकीत ते शयनकक्षात निघून गेले.
त्यांचे दोन्ही सरदार जागीच खिळल्यासारखे महाराजांच्या मुठींकडे पाहत राहिले.
त्यांच्या मुखावर एकच सवाल स्पष्ट दिसत होता.
त्या मुठी झाकल्या होत्या की वळवलेल्या?