पगारवाढीपासून प्रेयसीपर्यंतच्या विविध बाबी या वाट पाहण्याच्या मान्यताप्राप्त गोष्टी!
पण गेल्या काही दिवसांची वृत्तपत्रीय रद्दी नुसती चाळली तरी हे ध्यानी येईल, की या प्रतीक्षायादीत अग्रक्रम द्यावा लागेल तो निवडणूक आचारसंहितेलाच!
कित्ती आणि कोण्णी कोण्णी म्हणून वाट पाहायची त्तिची?  
आता मा. ना. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा. मुख्यमंत्री (स्वयंघोषित भावी) नारायण राणे, झालेच तर आमचे रा. रा. अजित पवार आदी मंडळींनी आचारसंहितेची वाट पाहणे आपण समजू शकतो. त्यांना एकमेकांशी लढता लढता विरोधकांशी लढायचे असते!
(राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी : भारतीय राजकारणाच्या मैदानातील ‘आघाडी कावा, आघाडी कावा’ म्हणतात तो हाच! अंहं, ‘गनिमी कावा’ वेगळा! त्यात स्वपक्षीय उमेदवाराला कोकणचा घाट दाखविला जातो! संदर्भासह स्पष्टीकरणासाठी इच्छुकांनी कृपया रा. रा. राणेसाहेबांशी संपर्क साधावा. त्यांचा अनुभव ओल्या जखमेसारखा ताजा आहे!)
आमचे तरुण, तडफदार आणि लाडके नेते मा. देवेंद्रजी फडणवीस, मा. विनोदजी तावडे, मा.  एकनाथजी खडसे (होय! तरुण, तडफदारच! डॉक्टरचे सर्टिफिकेट आहे! दाखवू काय? आं?) यांनीही डोळ्यांत प्राण आणून आचारसंहितेची वाट पाहिली तर ते समजण्यासारखे आहे.
बरे, या वाट पाहण्याला काही सुमार? तुम्हांस सांगतो, गेल्या काही दिवसांपासून मा. विनोदजींना एका जागी बसणे अवघड झाले होते! गैरसमज नको! एअर इंडियासमोरची मसाला इडली एवढी काही बाधत नाही. त्यांना एका जागी बसणे कठीण झाले होते ते सत्तेच्या बाळाची चाहूल लागल्याने. अशावेळी कोणीही येरझाऱ्याच घालतो!
येरझाऱ्यांचे काय घेऊन बसलात? आमच्या नाथाभौंनी तर इस्पितळातला हिरवा गावून उतरवल्याबरोबर लाल लंगोट कसला आहे म्हणे! कधीपासून पेपरांतून शड्डू ठोकून राहिलेत! (आणि त्याने तिकडे देवेंद्रभौ भौचक्के झालेत. हे शड्डू कोणाविरुद्ध, तेच त्यांना कळेनासे झाले आहे.)
मंत्रालयातील बाबूजी मंडळींनी आचारसंहितेच्या वाटेवर डोळ्यांची निरांजने लावली तरीसुद्धा आपण समजू शकतो. आमचे काही मंत्रालयग्रस्त पत्रकारू तर या बाबू मंडळींच्या कामाच्या वेगावरून आचारसंहिता कुठवर आलीय, ते सांगू शकतात! आजकाल तर मंत्रालयात या बाबूजींना बोलण्याससुद्धा वेळ नाही. आमचे परमस्नेही व राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय परवा भेटले. त्यांची आणि आमची थेट बीएमसीमधली ओळख. तेव्हाच्या सवयीने म्हटले, ‘चला, तुमच्या केबिनीत चहाबिस्कुटे खाऊ.’ तर कपाळावरचा केसांचा कोंबडा मागे सारत ते म्हणाले, ‘आता अजिबात वेळ नाही. खूप कामे आहेत. आचारसंहिता येऊ दे, मग भेटू!’
तर या अशा मंडळींनी आचारसंहितेच्या प्रतीक्षेत हयात घालविली तरी आपण समजू शकतो.
पण आमच्या हिनेसुद्धा तिची वाट पाहावी?
परवापर्यंत चांगली होती! म्हणजे चांगली दूरचित्रवाणी वाहिनीवर चांगली मालिका चांगली मन लावून पाहत होती. (तुम्हांस सांगतो, या एवढय़ा प्राइम टायमात आमुच्या घरात केवढे नंदनवन नांदून जाते! नंतर पुन्हा त्याचे ‘आजच्या सवाला’च्या सेटमध्ये रूपांतर होते! असो.) तर मध्येच तिला काय चावले कोण जाणे! अचानक तिने विचारले, ‘अहो, ती आचारसंहिता की कायशी कधी येणार आहे हो?’
ठसकाच लागला हो! म्हटले ऐकण्यात घोळ झाला की घोळात ऐकले? हिला आचारसंहिता की कायशी याऐवजी अंगारकी की एकादशी, असे तर म्हणायचे नसेल? पण तिला प्रतीक्षा होती ती आचारसंहितेचीच!
तिला म्हटले, ‘सखये, तुला गं का काळजी आचारसंहितेची?’
तर ती लाजली. ‘इश्श्!’ म्हणाली.
आम्हांस काहीच समजेना!
म्हटले, ‘प्रिये, अशे कशे? अशे कशे? शांग ना काहीतरी!’
तर ती म्हणाली, ‘आपल्यालापण आणा ना एक आचारसंहिता. घरातल्या घरात!’
हे म्हणजे भल्तेच मागणे झाले. एरवी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर का कमी बंधने असतात? पदोपदी आज्ञावल्या झेलत तर जगत असतो आपण. तुम्हांस सांगतो, आम्हांस या आज्ञा आणि सूचनांची एवढी सवय झालेली आहे ना, की मालगाडीच्या डब्यावरचे ‘लूज शंटिंग ना करें’  हे वाक्यसुद्धा आपणांसच उद्देशून लिहिले आहे की काय, असे वाटून आम्ही नेहमी कावरेबावरे होतो! अशात आणखी एका संहितेची भर कशाला?
तर ती म्हणाली, ‘असूं दे. नाय तर आम्हाला कधी सुट्टी मिळणार?’
अरे? सुट्टीचा आणि आचारसंहितेचा काय संबंध?
तर आमच्यातच काहीतरी जेनेटिक प्रॉब्लेम आहे अशा नजरेने पाहत ती म्हणाली, ‘आचारसंहिता म्हणजे काय असते, हे माहीत तरी आहे का तुम्हाला?’
‘काय असते?’
‘ती असते निवडणूक काळात कोणतेही काम न करण्याचे वैधानिक कारण!’
आत्ता आम्हाला समजले- गावातल्या पंचायतीपासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत सगळीकडचे नेते तर नेते, पण बाबू मंडळीसुद्धा निवडणुकीपेक्षा निवडणुकीच्या आचारसंहितेचीच एवढी वाट का पाहत होते ते!    

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब