30 March 2020

News Flash

इतिहासाचे चष्मे : वसाहतवाद : युगांतराचा मागोवा

‘दोन वेगवेगळ्या मानल्या गेलेल्या काळांना जोडणारे परिमाण म्हणजे युग’ ही कल्पना या शब्दातून व्यक्त होते.

सर विल्यम जोन्स हिंदू पंडितांकडून संस्कृत ग्रंथांविषयी टिपणे घेत असतानाचा प्रसंग दर्शवणारे ऑक्सफर्ड विद्यापीठातील शिल्प

हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com

‘युग’ ही भारतीय सांस्कृतिक धारणाविश्वातील एक अतिशय महत्त्वाची संकल्पना. मानवी स्मृतींतील काही विशिष्ट घटना, महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या काही व्यक्तींचा, कुळांचा, समुदायांचा कार्यकाळ, राजकीय- धार्मिक- सांस्कृतिक घडामोडी आणि घटनांच्या अनुसार ज्ञात इतिहासाची किंवा सामुदायिक अवकाशात जपल्या गेलेल्या विशिष्ट स्मृतींची विशिष्ट रीतीने केलेली कालविभागणी म्हणजे ‘युग’ अशी ढोबळ व्याख्या आपण करू शकतो. युग हा शब्द युज् : जोडणे या धातूपासून बनला आहे. ‘दोन वेगवेगळ्या मानल्या गेलेल्या काळांना जोडणारे परिमाण म्हणजे युग’ ही कल्पना या शब्दातून व्यक्त होते. एखादा काळ किंवा एखाद्या काळात घडलेली कुठलीही घटना ही पूर्णत: स्वतंत्र नसते. तिच्यावर भूतकाळातील वेगवेगळ्या घटना व घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे स्वाभाविकत: कोणतेही युग हे स्वतंत्र नसून त्यावर आधीच्या युगांचा किंवा पूर्वी घडलेल्या घटनांचा/ परिस्थितीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव साहजिकच असतो, हे भान परंपरेच्या शिल्पकारांना अभिप्रेत असणार असे म्हणायला जागा आहे. युरोप खंडाचा भारत किंवा दक्षिण आशियाई जगताशी व्यवहार सुरू झाल्यापासून पाश्चात्त्यांनी या प्रदेशाच्या, इथल्या समुदायांच्या बहुपेडी संरचनांविषयी वेगवेगळी आकलने जगासमोर आणली. इथल्या समुदायांविषयीच्या त्यांच्या अतिशय वैविध्यपूर्ण, जटिल अशा धारणा कधी अतिशय गूढ, अद्भुतरम्य रीतीने समोर येतात, तर कधी आत्यंतिक हिणकस, तुच्छतापूर्ण रीतीने मांडल्या गेल्याचे दिसून येते. वसाहतपूर्व, वासाहतिक आणि वसाहतोत्तर अशा तिन्ही काळांतील भारतीय संस्कृती, इतिहास आणि धर्म याविषयीचं लेखन वसाहतवादाशी घट्टरीत्या जोडलं गेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. वसाहतवादाशी जोडलं गेलं आहे असं म्हणताना त्याद्वारे युरोपातील प्रबोधनकाळ, आधुनिकतेची संकल्पना, त्यातून दृढ झालेल्या एकसाची, एकरेषीय संकल्पनांचा प्रभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परामर्श घ्यावा लागतो. अर्थात वसाहतवाद ही केवळ भारत किंवा उपखंडापुरती मर्यादित अशी संकल्पना नाही. जगभर युरोपीय सत्तांनी स्थापन केलेल्या वसाहती आणि तेथील स्थानिक राजकीय, सांस्कृतिक घडामोडी यांतून संबंधित प्रदेशाच्या वासाहतिक इतिहासाचे वेगवेगळे पलू आणि स्वरूप जगासमोर आले आहे. वासाहतिक राजकारणाचे अभ्यासक जॉन मॅकलिओड यांनी दाखवून दिल्यानुसार, ‘‘पाश्चात्त्य, विशेषत: युरोपीय देशांनी इतर देशांत व्यापारी बस्तान बसवून त्या- त्या देशांचे आर्थिक शोषण करत आपापल्या देशात तिथली साधनसंपत्ती आणि पैसा ओरबाडण्याचा किफायतशीर उद्योग म्हणजे वसाहतवाद होय.’’

एखाद्या देशात व्यापारी बस्तान बसवून मग तिथे राजकीय अधिसत्ता प्रस्थापित करणे, हा या उद्योगाचा पुढचा हेतू. राजकीय अधिसत्ता निर्माण करून झाली की संबंधित देशांना व तिथल्या समाजाला ‘मागास’ ठरवून तिथे राहणाऱ्या समूहांना ‘सभ्य’, ‘सुसंस्कृत’ बनवण्याची आणि त्यादृष्टीने पाश्चात्य मूल्ये तिथे रुजवण्याची प्रक्रिया अर्थसत्ता व राजसत्तेच्या माध्यमातून वसाहतवादी सत्तांनी राबवली. विख्यात जर्मन संस्कृत-वेदाभ्यासक फ्रीड्रिख मॅक्स म्युलर यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात लिहिलेल्या एका पत्रात यासंबंधीचा विचार स्पष्ट दिसून येतो. म्युलर असं म्हणतात, ‘‘भारतात राजकीय सत्ताप्राप्तीचा अंतिम टप्पा साध्य केल्यावर पुढील संघर्ष तेथील धर्म-संस्कृती आणि मानसिकता यांच्या संदर्भात असणार आहे. सेंट पॉल यांच्या काळात रोम व ग्रीस होता, त्याहून सध्या भारतभूमी ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी अगदी सुपीक आहे.’’ या उद्योगाचाच एक भाग म्हणून इथली संस्कृती, प्राचीन भाषा यांचे अध्ययन या मंडळींनी सुरू केले होते. ‘सॅक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’ या ग्रंथमालिकेचे काम करत असताना म्युलर यांनी ‘संस्कृतच्या अध्ययनाचा सध्याच्या काळासाठीचा आणि येत्या काही वर्षांसाठीचा अर्थ ‘शोध व दिग्विजय’ (discovery and conquest) या शब्दांभोवती फिरणार आहे,’ असे म्हटले आहे. वेद ग्रंथांचे दोन खंड प्रकाशित करताना त्यांनी conques हा शब्द आर्थिक व्यापार, वसाहतीची स्थापना, शिक्षण आणि धर्मातर यासंदर्भात वापरल्याचे स्पष्ट केले आहे.

सबंध उपखंडावर ब्रिटिश अंमल बसण्यास काही काळ लागला असला तरीही १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाल प्रांतात वॉरन हेस्टिंग्ज याला गव्हर्नरपदी बसवून कंपनी प्रशासन सुरू झालेलं होतं. या प्रारंभीच्या काळात हेस्टिंग्जनं स्थानिक समुदायांच्या धार्मिक ग्रंथांत (हिंदू स्मृतिग्रंथ आणि कुरआन) नमूद केलेल्या व्यवस्थांना छेद न देण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतं. १७८४ मध्ये स्थापन झालेल्या एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून संशोधनपर कामांतून स्थानिक परंपरा, भाषा-साहित्याच्या अभ्यासाला गती मिळाली. अर्थात साऱ्याच प्राच्यविद्या प्रकल्पांचा हेतू वसाहतवादी होता असं म्हणणं हे अन्याय्य ठरेल हे जरी खरं असलं तरीही नॅथनील हॅल्हद यांच्या ‘ए कोड ऑफ गेंतू लॉ’ (१७७६) किंवा विल्यम जोन्स यांच्या ‘इन्स्टिटय़ूट्स ऑफ हिंदू लॉ’ (१७९४) या पुस्तकांच्या निर्मितीला मात्र राजकीय-सांस्कृतिक वसाहतवादाचा वास येतो. चार्ल्स विल्किन्स यांनी केलेला भगवद्गीतेचा अनुवाद किंवा मॅक्स म्युलर यांचा ऋग्वेदाचा सहा खंडांतला अनुवाद ही याच काळातील प्रमुख प्रकाशने.

हे सगळं होत असताना वसाहतवाद्यांच्या मनातील काही मूलभूत पूर्वग्रह किंवा गृहितकं लक्षात घेणं गरजेचं ठरतं. वसाहतवादी सत्तांनी, विशेषत: इंग्रजांनी आपलं राजकीय बस्तान बसवणं सुरू केलं असताना त्यांचा संपर्क इथल्या राजकीय, सांस्कृतिक व धार्मिकदृष्टय़ा उच्च स्थानी असलेल्या समूहांशी अधिक आला. अर्थातच यात मुस्लीम नवाब, त्यांनी आश्रय दिलेले उलेमा-मौलवी आणि हिंदू राजे, सरदार व त्यांनी राजाश्रय दिलेले शास्त्री-पंडित व लेखनक्षम अधिकारी वर्ग (ज्यात ब्राह्मण, कायस्थ यांसारख्या उच्च जाती मोडतात.) यांचा समावेश होता. त्यामुळे इथल्या समाजव्यवस्था, श्रद्धा आणि संस्कृती यांविषयीचे त्यांचे सुरुवातीच्या काळातील आकलन हे वर उल्लेख केलेल्या सरंजामी व्यवस्थेतील वरच्या वर्गाच्या धारणांनी प्रभावित असेच राहिले. पाश्चात्त्य प्रदेशांतून इथे येताना ज्या धारणा आणि समजुती घेऊन ते इथे आले, त्याच चौकटींत त्यांनी या आकलनाला बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून इथल्या सांस्कृतिक विश्वावर त्यांनी भाष्य केलं. युरोपीय व्यापारी आणि सत्ताधीशांसोबत आलेले ख्रिस्ती धर्मगुरू इंग्रजांच्या भारतावरील सत्तेला ‘देवाने दिलेली इथल्या मागास, अज्ञानी स्थानिक रहिवाशांना नागर संस्कृतीत आणण्याची संधी’ समजत. १७ व्या शतकात मिशनरी कार्यामुळे इथल्या व्यापारी धोरणांना खीळ बसेल, या भीतीने मिशनरी मंडळींना ईस्ट इंडिया कंपनी उत्तेजन देत नसे. मात्र, चार्ल्स ग्रँट, विल्यम विल्बरफोर्स यांसारख्या प्रोटेस्टंट इव्हानजेलिकल पुढाऱ्यांच्या दबावामुळे ईस्ट इंडिया कंपनीने १८३३ नंतर यासंबंधीचे नियम शिथिल केले. विल्यम कॅरेसारखे ब्रिटिश साम्राज्याचे सेवक म्हणवून घेणारे मिशनरी कोलकात्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजात प्राच्यविद्या आणि भाषा शिकवण्यासाठी आले. त्यातून पुढे ‘सती’सारख्या प्रथा बंद करण्याच्या प्रक्रियेस गती मिळाली. इथल्या अस्पृश्यता, जातिप्रथा, भ्रूणहत्या, बालविवाह, बहुपत्नित्व वा विधवांविषयीचे नियम किंवा मुस्लीम समाजातील पुरुषसत्ताक वर्चस्व आणि अनिष्ट संकुचित धारणा इत्यादी प्रथांवरून इथल्या समाजाविषयी क्षुद्र, हीन अशी प्रतिमा या मिशनरी मंडळींनी प्रचलित केली. १९ व्या शतकात उपयुक्ततावादी (Utilitarianist) मंडळींनी आणि थॉमस मेकॉलेसारख्या अँग्लिसिस्ट मंडळींनी इथल्या भाषा, संस्कृती व पारंपरिक अभ्यासपद्धतींना उघडपणे हीन, तुच्छ समजून संस्कृत अध्ययनाला पायबंद घालण्यास सुरुवात केली. अलेक्झांडर डफसारख्यांनी इंग्लिश शिक्षणातून, तर जेम्स मिल्ल किंवा कॅरेसारख्यांनी स्थानिक भाषांतून धर्मातर करण्याच्या धोरणांना पुढे केले.

याची दुसरी बाजू अशी, की ज्या उच्च जातींशी इंग्रजांचा संबंध आला, त्यातील उच्चभ्रू सरंजामदार, स्थानिक राजे आणि शास्त्री-पंडित आदी विद्वान पारंपरिक शासकांच्या किंवा राजांच्या पदरी असताना भाटगिरी करत तशीच इंग्रजांचीही भाटगिरी करू लागल्याचे अनेक संदर्भ मिळतात. बंगाल प्रांतात सौरिंद्र मोहन टागोर यांचे ‘गॉड सेव्ह द क्वीन’ या गाण्याचे भारतीय भाषांतील अनुवाद, व्हिक्टोरिया-गीतिमाला (बंगाली), व्हिक्टोरिया-गीतिका (संस्कृत), व्हिक्टोरिया-साम्राज्यन् (संस्कृत) अशा राणीचे स्तुतिगान करणाऱ्या रचना असोत किंवा तर्कवाचस्पती तारनाथ भट्टाचार्य यांचे ‘राजप्रशस्ती’सारखे काव्य यात विशेष प्रसिद्ध पावले. महाराष्ट्रात पी. बी. जोशी यांची राणीच्या हीरकमहोत्सवानिमित्त ‘व्हिक्टोरियामहोत्सव’ अशा शीर्षकाची रचना दिसते. सिंध प्रांतात निरबदास वासवानी यांची ‘जम्म साकी महारानीसाहिब व्हिक्टोरिया कैसर-इ-हिंद’, नरसिंहाचार्य नामक दक्षिणी पंडिताची ‘व्हिक्टोरिया प्रशस्ती’ (संस्कृत) ही काव्ये इथल्या स्थानिक पंडित व बुद्धिजीवी वर्गाने व्यक्त केलेली ब्रिटिश सत्तेविषयीची ‘राजनिष्ठा’ दर्शवितात.

भारतीय राष्ट्रवादाची लोकमान्य टिळक आदी मंडळींनी मांडणी करण्याआधीच्या काळातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण यानिमित्ताने पाहायला हवी. वर उल्लेखिल्यानुसार सुरुवातीच्या पाश्चात्त्य अभ्यासकांच्या हिंदूधर्मविषयक अद्भुतरम्य कल्पना आणि एकसाची चौकटींत झालेले आकलन हा ‘भारतविद्या’ (Indology) या ज्ञानशाखेचा प्रारंभीचा पाया ठरला. इंग्रजी शिक्षणातून उच्चभ्रू वर्गाच्या धर्मपरंपरा आणि साहित्याशी संबंध आल्याने इंग्रजी शिक्षण देणाऱ्या संस्थादेखील संस्कृत व अन्य अभिजात साहित्य हेच प्रामुख्याने भारतीय साहित्य आहे असं समजून त्यानुसार अभ्यासक्रम बनवू लागल्या. त्यातून निर्माण झालेल्या धारणांतून मुख्य प्रवाहातील उच्चभ्रू हिंदू जाती, मुस्लीम सरंजामी विश्व यांतील संस्कृती-साहित्यविषयक जाणिवा याच केवळ भारतीय समाजाचे प्रतीक बनल्या. त्यातून स्थानिक प्रभावातून बनलेल्या, एकमेकांत गुंतलेल्या, आदिम अवस्थेत राहणाऱ्या किंवा ग्रामीण जीवन जगणाऱ्या बहुजन समाजातील हिंदू-मुस्लीम संवेदना आधुनिक शिक्षणाच्या चौकटीत विचारात घेतल्या गेल्याच नाहीत. त्यामुळे हिंदू किंवा मुसलमान या दोन्ही धर्मातील आदर्श जीवनशैली किंवा प्रमाण संस्कृती म्हणून संबंधित उच्चभ्रू वर्गाना अभिप्रेत असलेल्या जाणिवाच सरसकट त्या- त्या समाजाला लागू झाल्या. इंग्रजी शिक्षणाने प्रेरित झालेले, आधुनिकता आणि पाश्चात्त्य जगाशी परिचित झालेले स्थानिक नेते आणि परंपरेविषयी सहानुभूती बाळगून असलेले ु‘सुधारणावादी’ नेते त्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक चौकटीत धर्मश्रद्धा, संस्कृती आणि परंपरांची मांडणी करू लागले. राजा राममोहन रॉय किंवा दयानंद सरस्वती ही यातील अग्रगण्य नावे. या मंडळींनी संस्कृत ग्रंथांच्या आधारे आदर्श, प्रमाण असा हिंदू धर्म मांडायला सुरुवात केली आणि अनेकेश्वरवादी व एका अर्थी काहीशी मुक्तश्रद्धा प्रणाली असलेल्या अशा हिंदू धर्मविश्वाला वेदांत किंवा शुद्ध वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या नावे एकेश्वरवादी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अर्थातच मिशनरी लोकांनी केलेल्या अनेकेश्वरवादी, सलसर अशा हिंदू धर्मावर केलेल्या टीकेला हिंदूंचे प्रत्युत्तर स्वरूपाचा होता. मुस्लीम जगतात सर सय्यद वगैरे आधुनिकतावादी मंडळी उदयाला येईपर्यंत उत्तर भारतातील नवाबजादे आणि उलेमा यांनी प्रमाणित केलेल्या परंपरांना सरसकट मुस्लीम संवेदनांचे प्रतिनिधी मानले गेले. १८ व्या शतकात मराठय़ांच्या वर्चस्वामुळे उत्तरेतील मुस्लीम सत्ताधीशांचा प्रभाव कमी झाला होता. त्यामुळे त्यातून आलेल्या असुरक्षिततेच्या गंडाचा बळी ठरलेल्या सरंजामी उलेमा आणि अन्य धर्मगुरूंनी पुनरुज्जीवनवादाच्या नावाखाली धर्माच्या ‘शुद्धिकरणा’ची मोहीम सुरू केली.

पाश्चात्त्य सत्ताधीश आणि मिशनरी इत्यादींच्या भारतीय समाजाविषयीच्या टीकेला उत्तर देण्यासाठी त्या- त्या समाजांनी आपली आदर्श तत्त्वज्ञाने आणि प्रतीके निर्माण केली. पाश्चात्त्य इतिहासकारांना उत्तर देताना इथला गौरवशाली इतिहास, पराक्रमी राजकुळे, विद्वत्तेची प्रतीके यांची नव्या रूपात आखणी करण्यात आली. मराठय़ांचा गौरवशाली इतिहास, राजपुतांचे शौर्य, राजपूत महिलांचा स्वाभिमान, अकबराचे उदात्त तत्त्वज्ञान, सुलतानांचे पराक्रम इत्यादी रूपात ही प्रतीके अधिकाधिक लोकप्रिय करण्यात आली. हे सारं होत असताना राष्ट्रवादाचं तत्त्वज्ञान उपखंडाच्या उंबरठय़ावर आलेलं होतं. टिळकांच्या नेतृत्वातून त्याला बळ मिळताच या प्रतीकांचा वापर अधिक जोमाने संबंधित समूहांनी सुरू केला. सरकारी नोकऱ्यांपासून मुस्लीम वर्ग वंचित असल्याच्या भावनेतून वाढलेल्या असुरक्षिततेतून मुस्लीम लीगसारखी विशिष्ट समुदायाच्या राजकीय हक्कांसाठी झगडणारी संस्था आकाराला आली, तर दुसरीकडे हिंदू राष्ट्रवाद वाढीस लागत असताना पंजाबात आर्य समाजाच्या प्रभावातून पुढे हिंदू महासभा आकाराला आली. पुढील इतिहास थोडय़ाफार मतभिन्नतेच्या फरकाने आपण सारे जाणतोच. आणि अर्थातच त्याविषयी पुढील भागांत आपल्याला चर्चाही करायची आहेच.

एकूण वसाहतवादाचे प्रमुख तीन परिणाम ठरवायचे झाल्यास साधारणत: पुढील पर्याय सयुक्तिक ठरू शकतात. १) पाश्चात्त्य संस्कृती, आधुनिकता आणि औद्योगिकता यांचा भारतीय उपखंडात प्रवेश, २) इथल्या समुदायांचे अभिजन वर्गाच्या धारणांनुरूप एकसाचीकरण आणि त्याच्या परिणामस्वरूप- ३) संकुचित जमातवादाची वाढ. या तीन प्रमुख गोष्टींमुळे इथल्या बहुपेडी, अनेकात्मवादी अशा स्थानिक, भाषिक, सामूहिक, श्रद्धाविषयक, सांस्कृतिक धारणा प्रमाणत्वाच्या आग्रहापोटी अधिकाधिक संकुचित आणि कडव्या होत गेल्या. त्यांच्यातील प्रवाहितता आणि लवचीकता कमी होऊन त्या कर्कश आणि एकारलेल्या होत गेल्या. त्यामुळे त्याचे पडसाद केवळ उपखंडाची फाळणी होण्यापर्यंतच थांबले नाहीत, तर आज फाळणीनंतर ७० वर्षांनीही उपखंडातील तिन्ही देशांना या एकारलेपणाची, संकुचित जमातवादाची भुतं भेडसावत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 4:16 am

Web Title: colonialism track of eternity lokrang itihaasa che chasme article abn 97
Next Stories
1 खेळ मांडला.. : कोबी ब्रायंट समजून घेताना..
2 नंदनवनाला पर्यटकांची प्रतीक्षा
3 स्वप्नाचा कणाच मोडला..
Just Now!
X