माओवादी नेता असल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या अरुण फरेरा लिखित ‘कलर्स ऑफ द प्रिझन’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातल्या एका प्रकरणामधील काही अंश..

हौलादी नं. ३४७९
सोमवार, १३ ऑगस्ट २००७
प्रिय..
माझ्या पत्राची तू वाट बघत असशील. खूप दिवस झालेत ना. मला खूप लिहावंसं वाटतं, पण मी अजून इथल्या नियमांना सरावलो नाहीये. तू लिहिलेलं कार्ड आणि मनिऑर्डर मिळाली. तू पसे पाठवलेस ते खूप बरं झालं. मला हव्या असलेल्या पेस्ट, साबण वगरे वस्तू आता मी कँटीनमधून विकत घेऊ शकेन. तू पाठवलेल्या पशातून मला कुपन्स घेता येतील. इथं तुरुंगात कुपन्स हेच चलन. नोटांप्रमाणे १, २, ५ आणि १०ची कुपन्स मिळतात.
आणखी एक. मला इथं वारंवार भेटायला येण्यात वेळ आणि पैसा बराच खर्च होईल म्हणून वारंवार येणं टाळ. मला सध्या जिथे ठेवण्यात आलंय, त्या जागेचे दोन विभाग आहेत आणि प्रत्येक विभागात अनेक कोठडय़ा आहेत. यापकी एका भागात मला आणि माझ्याबरोबर अटक करण्यात आलेला अशा दोघांनाच ठेवण्यात आलंय. या कोठडीत केवळ आम्हीच असावेत म्हणून आम्हाला ठेवण्यात आलेल्या भागातील सगळे कैदी मुद्दामच दुसरीकडे हलवण्यात आलेत. आम्हाला कोंडण्यात आलेल्या भागाला ‘अंडासेल’ म्हणतात. कुप्रसिद्ध अंडासेल तो हाच!
अंडा बराकी या अंडाकृती भिंतीच्या आत असलेल्या आणि खिडक्या नसलेल्या कोठडय़ा. हा नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा अतिसुरक्षाव्यवस्था असलेला भाग. या अंडासेलमध्ये प्रवेश करताना लोखंडाच्या मजबूत अशा पाच दरवाजांतून जावे लागते. या दारांतून कोठडय़ांपर्यंत जाणारी वाट चक्रव्यूहासारखी आहे. अंडासेलमध्ये अनेक स्वतंत्र भाग आहेत. प्रत्येक भागामध्ये ठरावीक कोठडय़ा आहेत. यांचे बांधकाम करताना प्रत्येक कोठडी इतर कोठडय़ांपासून वेगळी राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. या कोठडय़ांत बाहेरचा प्रकाश फारसा येत नाही. तुम्ही येथून बाहेरचं काहीच पाहू शकत नाही. ना झाडंझुडपं ना आकाश! अंडासेलच्या मध्यभागी टेहळणी मनोरा आहे. त्या मनोऱ्यावरून पाहिल्यावर हा भाग काँक्रीटच्या अंडय़ासारखा दिसत असावा. पण हे काँक्रीटचे अभेद्य अंडे आहे, कधीच न फुटणारे. पण ते बनवलेय मात्र आत कोंडलेल्या कैद्यांना फोडण्यासाठी. सर्वात भयंकर अशा कैद्यांना त्यांनी शिस्तीचे नियम तोडल्याची शिक्षा म्हणून कोंडण्यासाठी अंडासेल आहे, असे मानले जाते. नागपूर तुरुंगाचे इतर भाग तुलनेने इतके कडक नाहीत. बहुतांशी कैद्यांना जिथं ठेवण्यात येतं, त्या बराकीत टीव्ही आणि पंख्यांची सोय आहे. त्या बराकीत दिवसा सगळे निवांत असते म्हणा ना! बरे असते म्हटले तरी चालेल. पण अंडासेलचे मात्र असे नाही. तिथे तुमच्या कोठडीचे दार हीच काय ती हवा येण्याची सोय आणि
तीसुद्धा समाधानकारक येते असेही नाही, कारण दाराच्या पलीकडे उघडी जागा थोडीच असते? तिथे असतो बंदिस्त कॉरिडॉर.
परंतु अशा बंदिस्त, गुदमरवणाऱ्या रचनेपेक्षा भयानक असतो तो तुमचा एकांतवास. तिथं तुम्हाला माणसांचा सहवासच नसतो. गार्ड किंवा बाजूच्या कोठडीतील कैद्याची झलक इतकाच काय तो माणसांचा सहवास. कणखर मनाचा माणूससुद्धा तुटला पाहिजे, याचसाठी ही रचना करण्यात आलीय. अंडासेलची भयानकता नागपूर तुरुंगातील कैद्यांना चांगलीच ठाऊक आहे. या कोठडय़ांत कोंडले जाण्याlr20पेक्षा वाईटात वाईट मारझोड ते पसंत करतील.
परंतु मी काही साधासुधा कैदी नव्हतो. त्यांच्या दृष्टीने मी एक भयानक नक्षलवादी होतो. एक माओवादी नेता होतो. ८ मे २००७ च्या वर्तमानपत्रांत माझं हेच वर्णन छापून आलं होतं. इतर कैद्यांच्या वाटय़ाला अंडासेलची कोठडी किंवा फासीयार्डची कोठडी काही दिवसच येते, पण माझ्या वाटय़ाला मात्र तब्बल ४ वष्रे ८ महिने याच कोठडय़ांचा कारावास आला.
0 0 0
ती नागपूरच्या उन्हाळ्यातली एक दुपार होती. अंगाची लाहीलाही होत होती. एरवी घराबाहेर पडण्याची इच्छाच झाली नसती. पण त्या दिवशी काही सामाजिक कार्यकत्रे मला रेल्वे स्टेशनवर भेटणार होते म्हणून त्यांची वाट बघत मी तिथे उभा होतो. मी उभा होतो, तिथे अचानक पंधरावीसजण आले. मला काही कळायच्या आत त्यांनी मला घेरलं आणि मला उचलून बाहेर उभ्या असलेल्या एका कारमध्ये कोंबलं आणि कार सुसाट वेगाने धावू लागली. चालत्या कारमध्ये ते मला लाथाबुक्क्यांनी मारत होते. पाचच मिनिटांत एका इमारतीपुढे ती कार थांबली. काय चाललंय, ते काहीच कळेना. मी पुरता बिथरून गेलो. कोण ही माणसं, काय हवंय त्यांना, माझ्यासारख्या कफल्लक सामाजिक कार्यकर्त्यांचं त्यांनी का अपहरण केलंय, मला इतकं मारण्याएवढं मी त्यांचं काय केलंय, कदाचित दुसराच कोणी समजून त्यांनी मला उचललं नसेल ना, माझ्या मनात असंख्य प्रश्न जमा झाले. पण मला इतकं मारलं जात होतं की माझे प्रश्न तोंडातच थिजून गेले.
मला त्यांनी त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नेलं. ती नागपूर पोलीस जिमखान्याची इमारत असल्याचं मला माझ्या अपहरणकर्त्यांकडून नंतर कळलं. त्यांच्या आपापसातील बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं, की ते नागपूर पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाचे लोक आहेत. त्यांनी माझ्याच पट्टय़ाने माझे हात बांधले. मला छळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मी ओळखू नये म्हणून माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. ‘मार डालो साले को. एन्काउंटर में उसे खतम करो’, त्यांच्यापकी एकजण ओरडला.
पलीकडच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज मला ऐकू येत होता. पलीकडे कोणाला तरी बडवलं जात होतं. ठोशांच्या आवाजांमध्ये प्रश्न आणि आश्वासनं ऐकायला येत होती. ‘सच सच बोलो तो छोडा जाएगा’. पोलिसाचा प्रश्न संपताक्षणी त्याची किंकाळी ऐकू येई म्हणजे त्याला उत्तर देण्याची संधी देण्याआधीच बहुतेक त्याच्यावर दुसरा ठोसा लगावला जात होता.
संपूर्ण दिवसभर मी पट्टय़ाने बांधलेला होतो. मी त्यांच्या चौकशीला त्यांना हवी तशी उत्तरे द्यावीत म्हणून ते लाथाबुक्क्यांनी मला मऊ करत होते. त्यांनी माझ्या मुंबईच्या घरी फोन केला होता. पण कोणी तो उचलला नाही. त्यांना वाटले, की मी त्यांना खोटा नंबर दिला. त्यामुळे ते अधिक चिडले. पण घडलं होतं असं, की माझं कुटुंब सुटीसाठी बाहेरगावी गेलं होतं. त्यामुळे घरी फोन उचलायला कोणीही नव्हतं. पण जे माझी मारूनमुटकून चौकशी करत होते, त्यांना मी हे कसं समजावणार?
मला ते ठार मारतील अशी मला भीती वाटू लागली. आतापर्यंत माझ्या अटकेबाबत कोणतीच औपचारिकता पार पाडण्यात आली नव्हती, ना त्यांनी मला वॉरंट दाखवलं होतं, ना त्यांनी मला कोणत्याही पोलीस स्टेशनवर नेलं होतं. मला भीती वाटू लागली की हे माझा खून करतील आणि एन्काउंटरमध्ये मारल्याचा बनाव रचतील. मला माहीत होतं की महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत खोटय़ा चकमकीची तब्बल ३१ प्रकरणे घडल्याची नोंद राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केली होती. एन्काउंटरच्या भविष्याशी तुलना करता त्यांनी चालवलेल्या शारीरिक छळाच्या वेदना मला सुसह्य वाटू लागल्या.
मध्यरात्री मला पोलीस स्टेशनवर नेण्यात आलं. एव्हाना माझं अपहरण केल्याला ११ तास उलटले होते. तिथे मला सांगण्यात आलं की मला ‘अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेंशन) अ‍ॅक्ट २००४’ खाली अटक करण्यात आलीय. सरकार ज्यांना आतंकवादी ठरवतं, त्यांना हा कायदा लावण्यात येतो. त्या रात्री मला पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आलं. हवालदाराने एक घोंगडी माझ्या अंगावर फेकली. ती अंगावर पडताच दरुगधीचा असह्य भपकारा आला. जमिनीला एक भोक होतं. त्याच्या भोवती पान खाऊन थुंकल्याचे डाग होते. त्यातून मुतारीचा घाण वास येत होता. हीच लघवीची जागा.
मला तिथं जेवण देण्यात आलं. डाळ, रोटी आणि शिव्या. ताट-वाटी वगरे काहीच नव्हतं. प्लास्टिकच्या पिशवीतूनच डाळ देण्यात आली होती. दिवसभराच्या मारामुळे तोंड सुजलं होतं. मी भाकरीचा तुकडा तोंडात घातला. पण वेदनांमुळे भाकरी चावता येईना. शेवटी मी भाकरीचे तुकडे करून डाळीच्या पिशवीत भिजत घातले. मी ज्या भयानक छळातून गेलो होतो, त्याच्या तुलनेत हे खाणे बरेच म्हणायला हवे. मला त्या घाणीत का होईना, थोडासा वेळ मिळाला. अंग खूप ठणकत होतं. त्या घाणीतच मी थोडा कलंडलो. कुशीवर वळलं तरी अंग दुखू लागे. झोप लागली की मी ग्लानीत होतो, कोण जाणे!
काही तासांतच, मला चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी उठवण्यात आलं. सुरुवातीला चौकशी अधिकारी सौजन्याने बोलत होते, पण त्यांना हवी ती उत्तरं मी देईना म्हणून लवकरच ते लाथाबुक्क्यांवर आले. माओवाद्यांबरोबरच्या माझ्या संबंधांबाबत मी माहिती द्यावी आणि ‘हत्यारं आणि स्फोटकं कुठं लपवलीत, त्याचा ठिकाणा सांगावा’ यासाठी ते माझ्या मागे लागले होते. जे मला माहिती नाही; ते मी कसं सांगणार, पण ते थोडंच मान्य करणार होते.
त्यांनी माझं तोंड उघडण्यासाठी आणखी एक मार्ग आरंभला. त्यासाठी शरीर ताणायच्या मध्ययुगीन छळतंत्राची विकसित आवृत्ती त्यांनी वापरायला सुरुवात केली. त्यांनी माझे दोन्ही हात वर खिडकीच्या गजांना बांधले. मी अर्धवट बसलेल्या अवस्थेत होतो. मग दोन पोलीस माझ्या बाहेरच्या बाजूला ताणलेल्या मांडय़ांवर उभे राहिले. जेणेकरून माझ्या मांडय़ा जमिनीला चिकटून राहाव्यात. मला असह्य वेदना होत होत्या. मी कळवळलो. वेदनांनी किंचाळलो. पण कोणालाच माझी दया येत नव्हती. त्यांना फक्त माझ्याकडे नसलेलं उत्तर हवं होतं. या छळतंत्रात भरपूर वेदना होत असल्या तरी शरीरावर कोणतीही जखमेची खूण उरत नाही. त्यांनी मारहाणीचा काहीच पुरावा राहू नये, याची पुरेपूर काळजी घेऊनदेखील माझ्या कानातून रक्त येऊ लागले आणि माझा जबडा सुजला. संध्याकाळी माझा चेहरा एका काळ्या फडक्याने झाकण्यात आला. मला खेचून जवळच्याच कुठच्यातरी खोलीत नेऊन जमिनीवर उकीडवं बसवण्यात आलं. तिथं खूप गडबड चालू होती. आता आणखी काय करताहेत हे? तिथल्या एकंदरीत बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं, की ते पत्रकार परिषद घेताहेत. कॅमेऱ्याचे फ्लॅश त्या फडक्यामागूनदेखील मला जाणवले. मी माओवादी पक्षाचा प्रचारप्रमुख असल्याचं प्रसारमाध्यमांना सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी देशभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर हे फोटो झळकल्याचं मला नंतर कळलं. मला त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (मॅजिस्ट्रेट) पुढय़ात उभं करण्यात आलं. कायद्याच्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असतं, की ताब्यात घेण्यात आलेल्या माणसाला कोठडीत काही छळ झाला असेल तर त्याची तक्रार करण्याची संधी मिळावी या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली आहे. खरं तर माझ्या सुजलेल्या चेहऱ्यावरून, रक्त येणाऱ्या कानावरून आणि पायाच्या दुखापतीमुळे लंगडत चालण्यावरून मला ताब्यात घेतल्यानंतर माझा छळ झालाय, हे ढळढळीत दिसत होतं. त्यामुळे ते मी मॅजिस्ट्रेटला सहज सांगू शकेन असं मला वाटत होतं. पण पोलिसांनी मॅजिस्ट्रेटला सांगण्यासाठी वेगळीच कहाणी रचली होती. त्यांच्या रचलेल्या कहाणीप्रमाणे मला ताब्यात घेत असताना मी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झटापट केली. त्यामुळे मला काबूत आणण्यासाठी बळाचा वापर करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता आणि त्यात मला मार लागल्याचे त्यांनी मॅजिस्ट्रेटला सांगितले. पण आश्चर्य म्हणजे झटापट करणाऱ्या मला पकडणाऱ्यांपकी कुणाही पोलिसाला मात्र साधे खरचटलेदेखील नव्हते. पण याचे आश्चर्य मॅजिस्ट्रेटला वाटले नाही.
पण हेच काही एकमेव आश्चर्य नव्हतं. कोर्टात पोलिसांनी सांगितलं की माझ्यासोबत आणखी तिघांना अटक करण्यात आलंय. त्यांपकी एक ‘देशोन्नती’ या मराठी वर्तमानपत्राचा वार्ताहर धनेंद्र भुरुले, दुसरा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा गोंदिया जिल्ह्याचा अध्यक्ष – नरेश बनसोड आणि पूर्वी कामगार चळवळीत काम करणारा आंध्र प्रदेशचा अशोक रेड्डी. अशोक रेड्डीकडून एक पिस्तूल आणि काही काडतुसे, तर माझ्याकडून राजद्रोही साहित्य असलेला पेनड्राइव्ह जप्त केल्याचा पोलिसांनी दावा केला. त्यांनी सांगितलं की, आम्ही नागपूरच्या दीक्षाभूमीवरील स्मृतिचिन्ह उद्ध्वस्त करण्यासाठी बठक घेत होतो. दीक्षाभूमी ही अखिल दलितांच्या जिव्हाळ्याची जागा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या तीन लाखांहून अधिक अनुयायांनी १९५६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात िहदू धर्मातील दमनकारी जातिव्यवस्थेपासून मुक्त होण्यासाठी ज्या जागी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, ती ही जागा. त्यामुळे नक्षलवादी आणि दलित यांच्यात पाचर मारण्यासाठी पोलिसांनी डाव्या विचारांचे लोक डॉ. आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींशी संबंधित स्थान उद्ध्वस्त करण्याचा कट रचताहेत, असा बनाव उभा केला. परंतु केवळ आरोप करणे पुरेसे नसते. त्यामुळे त्यांना त्यांच्या दाव्यांच्या आधारासाठी पुरावे तयार करणं आवश्यक होतं. पोलिसांनी कोर्टाला सांगितलं, की आमची चौकशी करण्यासाठी आम्हाला १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवावं. कोर्टाने आम्हाला पोलीस कोठडीत पाठवलं. मला आणि धनेंद्रला नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनवर ठेवण्यात आलं, तर इतर दोघांना धंतोली पोलीस स्टेशनवर नेण्यात आलं. आमच्याविरुद्धची केस याच धंतोली पोलीस स्टेशनात औपचारिकपणे नोंदवण्यात आली होती. दिवसातून दोन किंवा तीन वेळा एक कॉन्स्टेबल ऑफिशियल रेकॉर्डात माझी माहिती भरण्यासाठी मला ठेवलेल्या कोठडीत येई. ‘नाव?, बापाचं नाव?, पत्ता?, धंदा?,’ तो विचारे. माझ्या बाजूच्या कोठडीतील माणसाला तो हेच प्रश्न विचारे. त्यावरून मला कळलं की माझ्या बाजूच्या कोठडीत गोंदियाचा पत्रकार भुरुले आहे, ज्याला माझ्याबरोबर एकाच केसमध्ये गुंतवण्यात आलंय. जेवणाच्या वेळी आम्ही एकमेकांशी एखाददुसरा शब्द बोलू शकत असू.
‘तुला भाकरी हवीय का? मला एक पुरेशी आहे.’ तो विचारे.
‘ठीक आहे. तुम्ही माझा भात घ्या.’ मी त्याला भात देई. गोंदियाचे लोक प्रामुख्याने भात खाणारे असतात, असं मला वाटत होतं.
‘माझा जबडा दुखतोय.’ तो कण्हत म्हणाला.
आम्हाला पकडून ठेवणाऱ्यांविषयी आम्ही आपापसात उपरोधाने बोलत असू. आम्ही त्यांना उपरोधिक नावेदेखील ठेवली होती. पहिल्या दिवशी पोलीस जेव्हा माझी चौकशी करत होते, तेव्हा बाजूच्या खोलीत मारझोड होत असलेली व्यक्ती धनेंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. हाच तो इसम, ज्याला पोलीस सांगत होते की त्याने जर सहकार्य केलं तर त्याला सोडून देण्यात येईल. आम्हाला लवकरच पोलीस कोठडीच्या नित्यक्रमाची सवय झाली. रोज सकाळी चौकशीसाठी आम्हाला पोलीस जिमखान्यावर नेलं जाई. चौकशी रात्री उशिरापर्यंत चाले. वेगवेगळ्या तीव्रतेची छळतंत्रे वापरली जात. मला कधी तब्बल ३६ तास सलग जागं ठेवलं जाई, तर कधी एका जागी उभं करून हात जमिनीला समांतर हवेत वर धरायला लावत. हात खूप ठणकत. असह्य होई. वेदनेने हात खाली घेतला की पहाऱ्यावर असलेला काँस्टेबल लाठी मारे. एखाद्या वेळी अनेक काँस्टेबल येत. िभतीला टेकून बसायला लावत. मग माझे दोन्ही पाय बाजूला ताणत. मी वाकू नये म्हणून एक काँस्टेबल माझ्या मांडय़ांवर उभा राही. हात वर खेचून खिडकीच्या गजांना बांधलेले असत. यामुळे जांघांमध्ये असह्य कळा येत. कधी केस ओढत तर कधी नखांत सुया खुपसल्या जात.
प्रत्येक छळाची वेदना वेगळी असे. टोचल्याची, केस ओढल्याची वेदना तीक्ष्ण आणि तीव्र असे. परंतु शरीर अशी वेदना पटकन विसरण्याचा प्रयत्न करी आणि विसरेदेखील. परंतु शरीर ताणल्यानंतर होणारी वेदना अशी नसे. ती वेदना शरीरभर असे आणि दीर्घकाळ राही. थांबतच नसे. परंतु माझं मन मात्र शरण जायला तयार नव्हतं. माझा होणारा संताप मला जाणवे. ‘तुम्ही झक मारा. मी तोंड उघडणार नाही.’ मी ठरवे. ‘मी तुम्हाला अजिबात सहकार्य करणार नाही.’ पण नंतर माझ्या लक्षात येऊ लागलं की माझा छळ करणारे फारसे उत्सुक नाहीयेत. कदाचित माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही, हे त्यांच्यादेखील लक्षात आलं असावं आणि ते वरिष्ठांच्या आज्ञेचं केवळ पालन करत असावेत. त्यांनी रंगवलेल्या कहाणीला मी कसंही करून ‘हो’ म्हणावं यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मी गप्प राहिल्याने ते निराश होत आणि अधिक िहसक बनत. त्यांच्या वरिष्ठांची अपेक्षा ते पूर्ण करू शकत नसल्यामुळे मला तोडण्याऐवजी तेच मानसिकदृष्टय़ा तुटू लागले होते. ‘मी जिंकत आहे आणि ते हरत आहेत. लवकरच ते पूर्णपणे पराजित होतील. ती वेळ येईपर्यंत मी प्रतिकार केला पाहिजे.’ मी स्वत:शीच म्हणे.    
‘कलर्स ऑफ द प्रिझन’
मूळ लेखक : अरुण फरेरा
अनुवाद : रूपेश पाटकर
पृष्ठे : १६४