News Flash

हौस

''या वर्षी माझ्या वाढदिवसाला मला गाडी पाहिजेच!'' 'च'वर जरा जास्तच ठोसपणे जोर देत भर जेवणात मी गाडीचा विषय काढला. अर्थातच आमच्या 'ह्यां'चा घास हातातला हातातच

| March 8, 2015 06:36 am

‘‘या वर्षी माझ्या वाढदिवसाला मला गाडी पाहिजेच!’’ ‘च’वर जरा जास्तच ठोसपणे जोर देत भर जेवणात मी गाडीचा विषय काढला. अर्थातच आमच्या ‘ह्यां’चा घास हातातला हातातच राहिला.
‘‘अगं, हो! पण फोर-व्हीलरचं लायसन्स तर मिळू देत!’’
‘‘हे बघ सुयश, आता मला काहीही सबब नकोय. मी रीतसर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायव्हिंग शिकतेय. lok02पुढच्या आठवडय़ात लायसन्सचं काम होईल. त्यात काय एवढं? काही झालं तरी नवी गाडी ही घ्यायचीच..’’
‘‘नवी?’’
‘‘नवी नको तर नको. पण निदान सेकंडहँड? आय् ट्वेंटी घेऊया. मला ती आवडते. नाहीतर अल्टो तरी..’’
‘‘मला विचार करावा लागेल..’’
‘‘आता विचार काय करायचाय? नाहीतर तुझी गाडी दे मला चालवायला!’’
‘‘प्रतिमा, मला तुझ्या ड्रायव्हिंगची अजूनही काळजी वाटते..’’
‘‘सुयश! हे अति होतंय हं!’’
त्याचक्षणी आमच्या संवादावर खिदळणाऱ्या बंटीच्या हातून पाणी सांडलं आणि सासूबाईंनाही जोराचा ठसका लागला. मलाच त्या हसत असाव्यात असा मला दाट संशय आहे. ‘स्त्रीहट्ट ही काय चीज आहे याची अजून कल्पना नाही तुम्हाला, बच्चम्जी!’ असा विचार करत रागाने मी तिथून उठूनच गेले. आणि गॅलरीत झोक्यावर बसून आतलं बोलणं ऐकत राहिले.
‘‘एवढं म्हणतीय् तर घेत का नाहीस गाडी?’’ सासूबाई म्हणाल्या.
‘‘हो पपा, घ्या ना! आमच्या शाळेतल्या सिमरनची आई रोज तिला गाडीने शाळेत सोडते..’’
‘‘अरे बंटी, लेका, जवळ तर शाळाय् तुझी! आणि आई, परवाच ड्रायव्हिंग स्कूलचे पाध्ये भेटले होते. हिने कुठे आणि कशी गाडी धडकवली याचं वर्णन केलं त्यांनी! फार डॅमेज झालं तर घरीच बिल पाठवणार म्हणाले..’’
‘‘हो म्हणून टाक. उगीच वाद कशाला वाढवायचा?’’ सासूबाईंनी सुज्ञ सल्ला दिला.
रात्री उशिरापर्यंत माझा अबोला संपत नाही म्हटल्यावर सुयशने यशस्वी माघार घेतली.
‘‘हे बघ प्रतिमा, माझ्या मित्राला मारुती एट हंड्रेड काढायचीच आहे. घेऊ या का ती?’’
‘‘अय्या, खरंच?’’
ही संधी दवडण्यात अर्थच नव्हता. शेवटी नवीन (म्हणजेच सेकंडहँड!) गाडी आल्यावर त्यावरच ट्रेनिंग घ्यायचं असं ठरलं.
यथावकाश माझी स्वत:ची ‘मारुती ८००’ गाडी आली. माझ्यासारखीच तीही बिचारी तिच्या ‘मध्यम’ वयातली दिसत होती. म्हटलं, ‘हरकत नाही. दोस्ती करायला अधिक चांगली! चाळिशीच्या उंबरठय़ावर दोघींच्या तक्रारी एकमेकींना प्रेमाने सांगू.’
अर्थात गाडीने माझं हे अनुमान तंतोतंत खरं केलं. आल्या आल्याच तिने अनेक तक्रारी मांडल्या आणि लगोलाग तिच्या डॉक्टरांचं पाच-दहा हजारांचं बिल भरायची वेळ आली. सर्व दुरुस्त्या झाल्यावर माझ्या हातात किल्ल्या देत सुयशने बजावलं, ‘‘घे! पण सांभाळून हं! निदान पंधरा दिवस तरी पाध्येकाकांबरोबर चालव..’’
ड्रायव्हिंग स्कूलचं लायसन्स असूनही पुन्हा एकदा माझं ट्रेनिंग सुरू झालं.
‘‘सावकाश! समोर लक्ष द्या!’’, ‘‘स्टिअरिंग व्हील एवढं घट्ट का धरलंय? तुम्ही कुठे उडून जाणार नाही..’’, ‘‘ब्रेक.. ब्रेक.. ब्रेक.. मॅडम काय हे? दुकानाच्या सेलच्या पाटय़ा नंतरसुद्धा वाचता येतील..’’ अशा आणि इतर अनंत सूचना देत पाध्यांनी माझं शिक्षण एकदाचं संपवलं. ‘‘सुरुवातीला जवळपासच गाडीने जा..’’ हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
मग मी हट्टाने रोजच गाडी बाहेर काढायला लागले. इस्त्रीला कपडे टाकणे, गहू दळून आणणे, पेपरची रद्दी विकणे, भाजी आणणे, इ. सर्व लहान-मोठी आणि इतर वेळी कंटाळा आणणारी कामं मी आता प्रेमाने करू लागले. माझ्या चटपटीतपणावर सासूबाईसुद्धा खूश झाल्या. नाही म्हणायला गाडीच्या डाव्या दाराला एकदा एक हातगाडी घासली आणि दोन रिक्शांच्या मधून एकदा मी निसटता विजय मिळवला, एवढंच. मी पुढे गेल्यावर मागे बरेच आरडेओरडे झालेले मी ऐकले. गाडीला इंडिकेटर असतात, गाडी वळवताना ते वापरायचे असतात, समोरच्या आरशात मागची वाहने दिसतात, इ. गोष्टी मला बऱ्याच काळाने कळाल्या.
बंटी एकदा म्हणाला, ‘‘आई, तू काय सॉलिड गाडी चालवतेस गं! परवा आम्ही रस्त्यात क्रिकेट खेळत होतो, तर तुझ्या गाडीने स्टम्प तीनताड उडवला..’’
सुयशने लगेचच संधी साधली.. ‘‘बघ! सावकाश जा, असं हजारदा सांगतो मी हिला!’’
‘‘अरे पण.. यांना रस्त्यात क्रिकेट खेळू नका, हे तू का सांगत नाहीस?’’
एके दिवशी मात्र कमाल झाली. रात्री जेवताना सासूबाई म्हणाल्या, ‘‘प्रतिमा.. अगं, प्रभाच्या मुलीचं डोहाळजेवण आहे. साडी घ्यायला पाहिजे तिला!’’
‘‘अय्या, हो? मी नेते की तुम्हाला लक्ष्मी रोडवर.. गाडीने!’’
‘‘गाडी? नको.. नको. आपण रिक्शानेच जाऊ..’’
‘‘नाही! गाडीनेच जाऊया. उद्याच! अगदी आरामात जाता येईल!’’
‘‘आरामात?’’ सासूबाई घटाघटा पाणी पीत म्हणाल्या. सुयश मधे पडायच्या आतच मी माझा निर्णय ठाम असल्याचं जाहीर केलं.
‘‘वॉव! आई, मीपण येणार तुमच्याबरोबर!’’
‘‘बंटीला नको.’’ सुयश म्हणाला.
‘‘नाही बाबा! मी जाणार.. जाणार.. जाणार!’’
शेवटी मी आणि बंटी जिंकलो आणि आमचा बेत ठरला. नाही तरी मला सासूबाईंना माझं ड्रायव्हिंग कौशल्य दाखवायचंच होतं! प्रत्यक्ष आमच्या खरेदीच्या दिवशी मात्र सुयशने माझ्यावर सूचनांचा भडिमार केला. ‘सा-सू’ म्हणजे ‘सारख्या सूचना’ हे खरं तर त्याचंच नाव असायला हवं होतं.
‘‘दुपारीच निघा.. आणि चारच्या आत परत या. तेव्हा गर्दी कमी असेल. टिळक रोडने नको. वन् वेच बघ. सिग्नल तोडू नकोस. लायसन्स घेतलंस का? नीट सांभाळ ते! आपण ‘एल्’ची पाटी लावू या का?’’
‘‘पुरे रे! किती सूचना?’’ मी खरंच वैतागले.
शेवटी दुपारी जेवण आटोपून साडेबाराच्या कडक उन्हात आमची गाडी लक्ष्मी रोडच्या दिशेने निघाली. बंटीच्या शाळेला कसलीशी सुटीच होती. त्याची उत्साहाने अखंड बडबड चालू होती.
‘‘बंटी, आईचं लक्ष वेधू नकोस. गप्प बैस बघू!’’ सासूबाई बंटीवर ओरडल्या. मी समोरच्या आरशातून हळूच घाम टिपणाऱ्या सासूबाईंना पाहिलं. पहिल्याच लाल सिग्नलला मी रीतसर थांबले, तर मागून एक स्कूटरवाला जोरात येऊन आदळला.
‘‘रिकाम्या रस्त्यावर मधेच कुठे थांबता हो बाई?’’ तो माझ्यावर वस्सकन् खेकसला.
‘‘लाल सिग्नल दिसत नाही?’’
‘‘पुण्यात नवीन दिसताय! पोलीस नसताना सिग्नलला कुणी थांबतं का?’’
‘‘छान!’’ गाडीला किती डॅमेज असेल, असा विचार करत मी गाडी पुढे काढली. आणि आरशात पाहिलं तर ‘साधा कॉमनसेन्स नाही!’ असे भाव चेहऱ्यावर घेऊन सासूबाईंचं घाम टिपणं चालूच होतं.
नंतर एक बस जवळून धडधडत गेली. त्यामुळे माझ्यापेक्षा सासूबाईंनाच जास्त धडधडलं असावं. कारण घाम टिपता टिपता त्यांचं काहीतरी पुटपुटणंही सुरू झालं. बहुधा मारुती स्तोत्रच!
‘‘एसी लावू का?’’
‘‘नको..’’
‘‘कुठल्या दुकानात जाऊ या? मानिनी, शोभिनी की..?’’
‘‘जिथे गाडी नेणं सोयीचं असेल तिथे चल!’’
सुयशच्या सूचना आठवत मी एका दुकानापाशी गाडी उभी केली. त्या बाजूला सर्व रस्ता रिकामाच होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दाटीवाटीने वाहनं लावली होती. ‘किती वेडे लोक आहेत! इथली मोकळी जागा सोडून तिकडे काय ही गर्दी!’ असा विचार करत मी दुकानात शिरले.
साडीचं दुकान म्हटलं की माझं आणि सासूबाईंचं अगदी सख्य असतं. शीतयुद्धाला काही काळापुरता तरी विराम मिळतो. ‘अ‍ॅक्सलरेटर, क्लच, ब्रेक, इंडिकेटर’ असे अगम्य शब्द विसरून मी आता कांजीवरम्, धर्मावरम्, जरदोसी अशा साडय़ांच्या घनदाट जंगलात शिरले होते. बंटीची कटकट नको म्हणून त्याला शेजारच्या दुकानातून ‘कुरकुरे’ आणायला पिटाळलं. पण थोडय़ाच वेळात तो धावत-पळत परत आला.
‘‘आई, आपली गाडी हवेत तरंगतेय..’’
‘‘काय?’’
माझ्या किंचाळण्याने सेल्समनच्या हातातल्या साडय़ांचा ढिगारा धाडकन् कोसळला. त्या सगळ्या साडय़ा तिथंच सोडून नेसत्या साडीनिशी मी बाहेर धावले. सासूबाईसुद्धा त्यांच्या वयाला लाजवेल अशा वेगाने माझ्यामागे आल्या. पाहते तर काय, पोलिसांची क्रेन माझी गाडी उचलून निघाली होती. पुढची चाकं हवेत धरलेली माझी गाडी केविलवाणी दिसत होती.
‘‘अहो..अहो..’’ असं काहीसं म्हणेपर्यंत ती क्रेन आमच्या समोरूनच धूळ उडवत निघून गेली. त्यातल्या पोलिसाने माझ्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला. मला ब्रह्मांड आठवलं. सासूबाई जवळच्याच खुर्चीत मटकन् बसून पुन्हा एकदा घाम टिपायला लागल्या.
‘‘आई, कुठे नेली आपली गाडी?’’
झाल्या प्रकाराने बंटीही भांबावला होता.
‘‘तुम्हाला मी विचारलं होतं- गाडी नीट पार्क केलीत का, म्हणून?’’ दुकानदार मलाच ओरडला, ‘‘आज २६ तारीख.. म्हणजे पी. टू.! रस्त्याच्या त्या बाजूला गाडी लावायची..’’
माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला!
‘‘जा आता फरासखाना पोलीस चौकीत..’’ तो म्हणाला.
दुकानदाराने चपळाईने एक रिक्षा थांबवली. सासूबाई रिक्षात बसता बसता मारुती स्तोत्र म्हणत असल्याचा मला भास झाला. बुधवारपेठेत फरासखाना पोलीस चौकी सापडायला वेळ लागला नाही. रिक्षावाल्याला त्याची सवय असावी.
‘‘या बाई इकडे! साडेतीनशे रुपये..’’ खर्जातल्या आवाजात इन्स्पेक्टर गुरकावला. आता घाम टिपायची माझी पाळी होती. कारण निघताना पैसे घेतले होते खरे, पण.. नेमकी दुसरीच पर्स आणली गेली की काय? मी बराच वेळ पर्स उचकतेय असं पाहून सासूबाई संथपणे खुर्चीतून उठल्या. साडी घ्यायची म्हणून आणलेल्यातले पाचशे रुपये त्यांनी पोलिसांजवळ सरकवले आणि पावती घेतली. हे सर्व करताना माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकायलाही त्या विसरल्या नाहीत. गाडी सोडवून थेट घरचीच वाट धरावी लागली. खरेदी शक्यच नव्हती.
दारातच सुयश उभा होता. आम्हाला पाहून त्याला हायसं वाटलं.
‘‘काय, झाली खरेदी?’’
‘‘नाही. जाईन मी रिक्षाने नंतर..’’ सासूबाईंनी परस्पर उत्तर दिलं. पाठोपाठ बंटीने ‘‘बाबा, आज किनई..’’ म्हणत त्याला घडलेला सर्व वृत्तान्त ऐकवला.
आजकाल माझी गाडी गॅरेजमध्येच पडून असते. मधेच कधीतरी मी तिच्याकडे पाहिलं की ती हळूच एखादी जांभई देतेय की काय, असा मला भास होतो. चाळिशीच्या उंबरठय़ावर आळस जरा जास्तच चढत जातो, नाही?   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 6:36 am

Web Title: comedy story
टॅग : Story
Next Stories
1 मराठी.. राष्ट्रीय संवेदन-भाषा!
2 सच्चे ‘शब्दचित्र’
3 गायतोंडय़ांची कुटुंबप्रमुख
Just Now!
X