वाणिज्य वा अर्थकारण या विषयांना सध्या खूपच महत्त्व आले आहे, हे ओळखून पुण्याच्या डायमंड पब्लिकेशन्सने पाच खंडांतील वाणिज्यकोशाची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वाना उपयुक्त ठरणारा हा मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच संदर्भकोश म्हणावा लागेल. डायमंड पब्लिकेशन अलीकडच्या काळात सातत्याने संदर्भकोशांची निर्मिती करत आहे. नवा वाणिज्यकोश हा त्याचाच एक भाग आहे. वाणिज्यकोशाचे महत्त्व, त्याची उपयुक्तता आणि त्यावर प्रत्यक्ष काम करताना आलेल्या नानाविध अडचणी याविषयी प्रकाशक दत्तात्रेय पाष्टे यांचे अनुभवाचे बोल..

मराठी प्रकाशन व्यवसायाला मोठी परंपरा लाभली आहे. अनेक दिग्गज प्रकाशकांनी मौल्यवान ग्रंथनिर्मिती करून ही परंपरा आपापल्या परीने समृद्ध केली आहे. मराठीत उत्तम कोशनिर्मितीही झालेली आहे. पण वेगवेगळ्या प्रकारचे कोश, त्यांच्या अद्ययावत आवृत्त्या यांची बदलत्या काळानुसार मागणी आणि उपयुक्तता सतत वाढते आहे. त्यादृष्टीने पाहता मराठीमध्ये संदर्भकोशांची वानवा आहे असेच म्हणावे लागेल. इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांशी तुलना करता कोश, संदर्भग्रंथ, तसेच शैक्षणिक साहित्यनिर्मितीत आपण बरेच मागे आहोत, ही खंत अनेकांनी व्यक्त केली आहे आणि मलाही ही गोष्ट गेली अनेक र्वष खुपत होती.
गेली २५-३० र्वष पुस्तक प्रकाशन व्यवसायाच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरतो आहे. या काळात विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांशी वरचेवर संपर्क आला असता विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांची संदर्भग्रंथांबाबतची नेमकी गरज लक्षात आली. तांत्रिक विषयांतून मराठी हद्दपार झाली असली तरीही महाराष्ट्रात कला आणि इतर सामाजिक शास्त्रांचे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरचे ऐंशी टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतात. परंतु मराठी संदर्भग्रंथांचा दुष्काळ असल्यामुळे या विद्यार्थ्यांना अनेकदा इंग्रजी ग्रंथांवरच अवलंबून राहावे लागते. आणि मराठीत असे काही संदर्भसाहित्य उपलब्ध असलेच तरी ते पुरेसे आणि अद्ययावत नसते. त्यात विद्यार्थी इंग्रजी-मराठीच्या पेचात सापडतात. या समस्येची तीव्रता लक्षात घेऊन आणि मूलत: कोशाच्या विक्री व्यवस्थापनाची आणि त्यासाठी लागणाऱ्या चिकाटीची पुरेपूर कल्पना असल्याने संदर्भग्रंथ आणि कोशवाङ्मय यांच्या निर्मितीसाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले. त्यादृष्टीने वेळोवेळी पाठपुरावाही केला. परिणामी आजमितीला डायमंड पब्लिकेशनने विविध प्रकारचे साधारण ४० कोश प्रकाशित केलेले आहेत.   
तथापि मुख्यत: ३५०० पानांचा, वेगवेगळ्या प्राध्यापकांनी लिहून संपादित-संशोधित केलेला वाणिज्यकोश म्हणजे आत्तापर्यंतच्या कामातले माझ्यापुढचे सर्वात मोठे आव्हान होते. याचे पहिले कारण असे की, इतर शाखांच्या तुलनेत वाणिज्य शाखेत अनेक उपशाखा आढळतात. त्यामुळे वाणिज्याशी संबंधित सर्व उपशाखांची एकत्रित मोट बांधून त्या विषयाचे परिपूर्ण आकलन उपलब्ध करून देणे आवश्यक होते. खरे तर सुरुवातीला बँकिंग, व्यवस्थापनशास्त्र यासाठी स्वतंत्र कोश तयार करावेत असे माझ्या मनात होते. परंतु हे सारे सहज हाताळता येईल या आकारात विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित संस्थांना एकत्रितपणे उपलब्ध करून देता येणेही गरजेचे होते. त्यामुळे हे सर्व पलू लक्षात घेऊन या कोशाची रचना अधिकाधिक सुलभ कशी करता येईल, याचा मी विचार करत होतो. त्यातून २००८ च्या डिसेंबरमध्ये वाणिज्यकोशाची कल्पना सुचली. निव्वळ अकारविल्ह्य़ानुसार कोशाची रचना केली तर त्यात विखुरलेपणा येईल आणि विद्यार्थ्यांना किंवा अभ्यासकांना त्याचे समग्र आकलन होणार नाही, म्हणून वाणिज्य विषयातल्या संकल्पनांना आम्ही प्राधान्य दिले आणि त्यांची ३४ प्रकरणांत विभागणी केली. कोशाच्या रूढ शिस्तीशी हे निश्चितच फटकून होते, पण एकेका संकल्पनेचे समग्र आकलन जिज्ञासूंना व्हावे म्हणून आम्ही हा वेगळा प्रयोग केला. शिवाय केवळ संकल्पना आणि तिची व्याख्या किंवा अर्थ असे आम्हाला नको होते. वाणिज्य हे मुख्यत: उपयोजित शास्त्र आहे आणि त्याच्यात सतत बदल होत असल्याने ते तितकेच गतिमानही आहे. त्यामुळे या सर्व दृष्टीने विचार करता एक संज्ञा, त्याच्यातली उपसंज्ञा, स्पष्टीकरण, उपयोजन, तुलना अशा सगळ्या बाजूंचा वेध त्या संकल्पनेखाली घेण्याचा काहीसा धाडसी प्रयत्न आम्हाला करायचा होता.
सलग चार र्वष चिकाटीने पाठपुरावा केल्याने वाणिज्यकोशाचे आमचे स्वप्न वास्तवात आणता आले. यातून कोशाची व्याप्ती बदलली. त्यामुळे विद्यार्थी, अभ्यासकांना तर तो उपयुक्त ठरेलच; पण संशोधक, संस्था किंवा निव्वळ जिज्ञासूंसाठीही तो उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते. नेट-सेट, स्पर्धा परीक्षा यांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा कोश संदर्भग्रंथांसारखा वापरता येईल. कारण मूलभूत, विस्तारित आणि एकत्रित असे सगळे एकाच कोशात आम्ही उपलब्ध करून दिले आहे. शिवाय त्यातली अद्ययावतता कायम राखली आहे. त्यामुळे हा ‘ज्ञानकोशा’च्या तोडीचा प्रयत्न झाला आहे असे वाटते.
वाणिज्यसारखा गुंतागुंतीचा विषय सोपा करून वास्तवात उतरवायला त्या- त्या विषयातले तज्ज्ञ आणि अद्ययावत ज्ञान असलेले लेखक मिळवणे, त्यांच्याकडून अपेक्षित लेखन करून घेणे आणि कोश आकाराला आणणे, हा एकंदर अनुभव थकवणारा होता. कोशनिर्मितीचा थोडाफार अनुभव गाठीशी असल्यानेच या व इतर अडचणींवर आम्हाला मात करता आली. एकूण पाच खंडांच्या या कोशात प्रत्येक संज्ञेसाठी वेगवेगळ्या लेखकांनी लिखाण केलेलं आहे. त्यामुळे कोशाच्या रचनेत एकंदर ३०-३२ लेखकांनी मोलाचे योगदान दिले आहे. अर्थातच एका वेळी आणि सातत्याने इतक्या तज्ज्ञ लेखकांकडून लिहून घेणे, ही बाब कसोटी पाहणारी ठरते. यामुळे अनेकदा कोशनिर्मितीसाठी लागणारा वेळ आणि आíथक गणित जुळत नाही, किंवा मग पानांचा प्रश्न निर्माण होतो आणि तिथेच आíथक गणित चुकते. सुरुवातीला वाणिज्यकोशाचा हा प्रकल्पही ४५०० पानांचा झाला होता. तेव्हा त्याची पृष्ठसंख्या किमान एक हजाराने कमी करणे गरजेचे होते. पण ते खूपच जिकिरीचे आणि त्रासाचेही होते. कारण आलेला मजकूर अतिशय नेमका असल्यामुळे सरसकटपणे कात्री लावणे शक्य नव्हते. मात्र, प्रा. जॉन्सन बोर्जेस आणि डॉ. संजय कप्तान या प्रमुख संपादकांनी हे अवघड काम मोठय़ा कौशल्याने केले. त्यांनी नेमकेपणाने मजकूर संपादित केला आणि मजकूर काय आणि कसा आला पाहिजे, याची पुरेपूर काळजी घेतली. साधारण तीन ते चार र्वष सातत्याने काम केल्यानंतर तो लिहून पूर्ण झाला. मग आम्ही तज्ज्ञांकडून त्याचे पुन:पुन्हा मूल्यमापन करून घेतले.
या कोशाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे आम्ही विद्यार्थीवर्ग समोर ठेवला खरा, पण केवळ अभ्यासक्रमातच अडकून पडलो नाही. त्यामुळेही कोशाची व्याप्ती वाढली. उदाहरणार्थ- आम्ही भारतातल्या अर्थव्यवस्थेची, उद्योगक्षेत्राची आकडेवारी कोशात दिली आहे. खरे पाहता ही आकडेवारी दरवर्षी बदलते. पण कोणती आकडेवारी महत्त्वाची असते आणि तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे असते, हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हे ती आकडेवारी देण्यामागचे आमचे मुख्य उद्दिष्ट होते. थोडक्यात- नुसताच तपशील देऊन अभ्यासूपणाला चालना मिळणार नाही, तर तपशिलातून अभ्यासाची दिशा दाखवली गेली तरच तो अभ्यासूपणा रुजेल, या भूमिकेतून आम्ही या कोशावर काम केलं. कार्बन क्रेडिट्स, ई-बँकिंग, ई-कॉमर्स यासारख्या अनेक नव्या संज्ञाही आम्ही या कोशात स्पष्ट केल्या आहेत. तसेच ‘समांतर अर्थव्यवस्था आणि स्वीस बँक’ यांसारख्या संकल्पनांचाही त्यात समावेश केला आहे.
कोशनिर्मितीमध्ये अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे निर्मितीत केलेल्या गुंतवणुकीची रक्कम वसूल व्हायलाही बरीच वर्षे जावी लागतात. शिवाय कोशाची खरेदी व्यक्तिगत पातळीवर फारशी केली जात नाही. याला आपली मानसिकता बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. संदर्भकोशाचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे ज्ञान याविषयी आपण तितकेसे जागरूक नाही. त्यामुळे प्रकाशकाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर मागणी कमी, गुंतवणूक जास्त आणि कोश तयार होण्यासाठी लागणारा वेळ व खर्चही जास्त- असा सगळा आतबट्टय़ाचा व्यवहार असतो. आमच्यासाठीही हे सगळं नक्कीच आव्हानात्मक होतं. पण सातत्याने कोशनिर्मिती करत राहिल्याने, कोशांचा प्रसार करत राहिल्याने आता चित्र बदलते आहे. नवा कोश प्रकाशित झाला तर महाविद्यालयांचे ग्रंथपाल, संस्थांचे संचालक, वाचक आणि विक्रेते यांच्याकडून त्याची दखल घेतली जाते आणि या सगळ्यांकडून वेगवेगळ्या स्तरांवर प्रतिसादही मिळतो. त्यातून पुढील आवृत्त्या वा नवीन कोश करताना कोणत्या गोष्टींचा प्राधान्याने विचार करायला हवा याचाही अंदाज येतो.
अखेरीस मला इतकेच वाटते की, मराठीत शैक्षणिक साहित्याचा विचार करता संदर्भग्रंथांची आणि कोशवाङ्मयाची कमतरता खूप मोठी आहे. ती दूर होण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असे सातत्याने लिहायला हवे. कारण जितके अद्ययावत, नेमके आणि आंतरविद्याशाखीय सकस शैक्षणिक साहित्य निर्माण होईल, तितक्या प्रगतीच्या वाटा अधिक खुल्या होत जातील.