News Flash

कॉम्प्रेसर

पूर्वीपासून कारखान्यांमध्ये एकाच ऊर्जास्रोतामार्फत अनेक यंत्रे चालवण्याची पद्धत रूढ आहे. तेव्हा ते एकाच मोटरला लावलेल्या दांडय़ाला अनेक पट्टे, चक्र किंवा गीअर लावून यांत्रिकी (mechanical) पद्धतीने

| March 1, 2015 01:01 am

पूर्वीपासून कारखान्यांमध्ये एकाच ऊर्जास्रोतामार्फत अनेक यंत्रे चालवण्याची पद्धत रूढ आहे. तेव्हा ते एकाच मोटरला लावलेल्या दांडय़ाला अनेक पट्टे, चक्र किंवा गीअर लावून यांत्रिकी (mechanical) पद्धतीने होत असे. आता बहुतेक ठिकाणी पट्टे आणि चक्रांची जागा हवेने घेतलेली आहे. शक्ती एकाच ठिकाणी तयार करून उच्च दाब असलेल्या हवेमार्फत ती कारखान्यात सर्वत्र पोहोचवली जाते. तिथे काय किंवा पेट्रोल पंपावर असलेले हवा भरणारे यंत्र काय.. वातावरणातील सामान्य दाबाच्या हवेला उच्च दाबाखाली साठवून, हवे तेव्हा उपलब्ध करून देण्याचे काम हे ‘कॉम्प्रेसर’ नावाचे यंत्र करते.
हवेची शक्ती वापरत असल्याचा मुख्य फायदा म्हणजे प्रत्येक मशीनला वेगळी मोटर लावायचे वाचते. विद्युत ऊर्जेचे गतिज (Kinetic) ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम मोटर करते आणि त्याच ऊर्जेमुळे यंत्रे चालतात. हेच काम ‘कॉम्प्रेसर’मध्ये एकाच ठिकाणी होते आणि ती ऊर्जा सर्वत्र उच्च दाबातील हवेमार्फत पोहोचवून यंत्रे चालवली जातात. यामुळे अर्थातच ही  यंत्रे/ उपकरणे छोटी, वजनाला हलकी आणि सोपी तर होतातच; पण शिवाय वापरून झिजणारे भागही कमी लागतात. कसा चालतो हा ‘कॉम्प्रेसर’?
‘कॉम्प्रेसर’ चालवण्याची विविध तंत्रे आज वापरात आहेत; पण मुख्यत्वेकरून दोन प्रकारे हा ‘कॉम्प्रेसर’ चालतो. १. दट्टय़ा (piston) वापरून किंवा २. मळसूत्र (screw) वापरून.
 १. दट्टय़ा वापरून चालणारा ‘कॉम्प्रेसर’
lr10या प्रकारच्या कॉम्प्रेसरमध्ये विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या मोटरचा दांडा पट्टे आणि चक्रे वापरून कॉम्प्रेसरच्या दांडय़ाला जोडलेला असतो. हा दांडा केंद्रच्युत (eccentric) असतो. म्हणजेच या दांडय़ाचा काही भाग दांडय़ाच्या केंद्ररेषेत फिरत नसतो. चित्र क्रमांक २ आणि ३ मध्ये दाखवल्याप्रमाणे मुख्य दांडय़ाच्या या केंद्रविस्थापित भागाला दट्टय़ाचा दांडा जोडलेला असतो. जसा मुख्य दांडा फिरू लागतो तसा दट्टय़ाच्या दांडय़ाचे एक टोक दांडय़ाबरोबर फिरू लागते आणि दट्टय़ाला जोडलेले दुसरे टोक खाली-वर होऊ लागते. दट्टय़ा खाली येत असताना त्याच्या वरच्या भागात दाबविरहित पोकळी (vaccum) तयार होते आणि त्यामुळे बाहेरील हवा एका एकदिशीय झडपेमधून आत खेचली जाते. ही आत खेचलेली हवा जसा दट्टय़ा वर जातो तशी दुसऱ्या एकदिशीय झडपेमधून कॉम्प्रेसरच्या टाकीत ढकलली जाते. (चित्र क्रमांक ४) जसजशी टाकीत हवा ढकलली जाऊ  लागते, तसतसा टाकीतील हवेचा दाब वाढत जातो. कारण हवा आकुंचनशील आणि प्रसरणशील आहे.
lr12 भौतिकशास्त्रामध्ये वायूच्या संदर्भात दाब, आकारमान आणि तापमान यांच्यातील परस्परसंबंध उलगडणारे चार नियम आहेत. त्यातील पहिला बॉइलचा नियम म्हणून प्रसिद्ध आहे. बॉइलने १६६२ मध्ये वायूच्या संदर्भात दाब (pressure) आणि आकारमान (volume) यांच्यातील परस्परसंबंध सांगणारा नियम सिद्ध केला. त्यानुसार स्थिर वजनाच्या वायूचे तापमान स्थिर असले तर त्याचे आकारमान आणि दाब यांचे एकमेकांशी व्यस्त प्रमाण असते. म्हणजेच तापमान स्थिर ठेवले,ृ तर आकारमान न बदलणाऱ्या टाकीत आपण वायू भरत गेलो तर त्या वायूवरील दाब वाढत जातो.
हे सूत्ररूपाने असे मांडले जाते- PV=  K
P = Pressure (दाब),  V = Volume (आकारमान)  K =  Constant (स्थिरांक )
lr11टाकीवर दाब नियंत्रक सुरक्षा झडप (Pressure Safety Valve) बसवलेली असल्याने टाकीतील हवेचा दाब विशिष्ट पातळीवर जात नाही आणि त्या पातळीपर्यंत दाब गेला, की मोटरला संदेश जातो आणि कॉम्प्रेसर थांबतो. या टाकीतील साठवलेली हवा पुढे हव्या त्या ठिकाणी नळीमार्फत उपलब्ध करून दिली जाते.
कॉम्प्रेसर चालवण्याचे दुसरे तंत्र- मळसूत्र तत्त्वाचा वापर करून चालणारा कॉम्प्रेसर-
या प्रकारच्या कॉम्प्रेसरमध्ये हवा खेचण्याचे आणि पुढे ढकलण्याचे काम एकात एक अडकवलेले दोन मळसूत्रे करतात. हे मळसूत्र असलेल्या केसिंगमध्ये खेचलेली हवा  मळसूत्रावरील दात्यांमध्ये अडकते आणि मळसूत्र फिरत असताना दात्यांबरोबर पुढे ढकलली जाऊ लागते. या मळसूत्रांमधील अंतर कमी कमी होत गेल्याने आत अडकलेल्या हवेवरील दाब वाढत जातो आणि ती वाढीव दाबाने हवेच्या टाकीत ढकलली जाते.
या दोन्ही प्रकारच्या कॉम्प्रेसरमध्ये हवेवरील दाब वाढवणाऱ्या सर्व भागांचे तापमान वाढू नये म्हणून बाहेरून खेळणारी हवा, आतील भागातून फिरवलेले पाणी किंवा तेल यांचा वापर करतात. या कॉम्प्रेसरचा आपण रोज वापर करतो तो घरातील शीतकपाटात (Refrigerator) आणि वातानुकूलन (Airconditioner) यंत्रणेमध्ये! त्याबद्दल माहिती
घेऊ  पुढील भागात.    
दीपक देवधर – dpdeodhar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2015 1:01 am

Web Title: compressor
टॅग : Technology
Next Stories
1 प्रेशर कुकर अर्थात पेपिनचे पाचकपात्र
2 पंप
3 उद्वाहक (elevator / lift)
Just Now!
X