सुविचार, वाक्प्रचार आणि म्हणी.. मराठी भाषेचे हे साज. अगदी शाळेपासून चांगल्या वाचनाचा आणि ते आचरणात आणण्याचा संस्कार कळत-नकळत आपणा सर्वात रुजलेला असतो. पण या सुविचारांचे दृश्य रूप कसे असेल? कदाचित करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच दुबई गाठल्याने त्यांच्या दृश्य रूपांची भारतातील lok04शोधयात्रा अर्धवट राहिली. आज या परक्या भूमीत संस्कारक्षम वयात रुजलेले ते सुविचार जेव्हा दैनंदिन व्यवहारात परकीय संस्कृतीतून पुढे उभे ठाकतात तेव्हा जाणवतं, की सुखासाठी काय लागतं? तर एक कनेक्शन. कनेक्शनचा हा धागा लक्षात आला की परदेशी संस्कृतीचे विविध कंगोरे आणि आपले दैनंदिन जीवन यांची एक सुरेल माळ गुंफली जाते.
जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. मी माझ्या मुलीला घेऊन पहिल्यांदा भारताच्या सीमा ओलांडून दुबईच्या आलिशान विमानतळावर उतरले होते. आणि वातानुकूलित एअरपोर्टच्या बाहेर पडताच प्रथम जाणवला तो असह्य उकाडा. मुंबईच्या धुंद पावसातून इथल्या रणरणत्या वाळूवर पाऊल ठेवताना मनात हजारो प्रश्नांची गर्दी होत होती. हे शहर कसं असेल? इथलं घर कसं असेल? शेजारी आपली भाषा बोलतील का? मुलीची शाळा बरी असेल ना? तिला नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील ना? अशा असंख्य प्रश्नांचे ओझे सामानासह गाडीच्या डिक्कीत टाकून पुढचा प्रवास सुरू केला.
आज आठवायचा प्रयत्न केला तर तो उकाडा जसा त्या दिवशी जाणवला तसा नंतर कधीच जाणवला नाही. आणि ते प्रश्नही मनातून लुप्त झाले. हा देश सुखसोयींनी बहरलेला होता. सगळ्याची सुबत्ता होती. सगळ्या जागा स्वच्छ. वातानुकूलित. उत्तम दर्जाच्या वस्तू. उत्तम वैद्यकीय सुविधा. ‘लक्झरी’ या सदरात मोडणारी गाडी. सुखसोयीची प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध होती. पण हे सारं सुखसोयीचं नसून फक्त सोयीचं आहे, हे समजायला फार वेळ लागला नाही. कारण सुखासाठी लागतं ते कनेक्शन! जेव्हा आपण देशाबाहेर पडतो, तेव्हा हे कनेक्शन शोधायला लागतो. जसे लहानपणी भारताच्या नकाशात रंग भरले होते तसं आता यूएईला रंगवायचं होतं.. तर कधी इथल्या रंगांत स्वत: रंगायचं होतं.
४० वर्षांपूर्वी जेव्हा इथे काहीच नव्हतं तेव्हा इथल्या राजाने देशोदेशीचे इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षक, चित्रकार आणि अशा अनेक विषयांतील विशारदांना इथे पाचारित केले. त्यात भारतीयांचा वाटा लक्षणीय आहे. म्हणूनच इथल्या लोकांच्या मनामध्ये भारतीयांसाठी असलेला सन्मान, आदर त्यांच्या प्रत्येक लहान-मोठय़ा वर्तनातून कृतज्ञतेच्या माध्यमातून मनाला स्पर्श करून जातो. परंतु यातला गमतीचा भाग हा आहे की, भारत आणि यूएईमधील संस्कृतींत मुख्य कनेक्शन आहे बॉलीवूडचे आणि हिंदी भाषेचे. कलेला सीमा नसतात, याची प्रचीती देणारा हा बंध. बॉलीवूडमधील फिल्मस्टार्सच्या आकर्षणापासून ते टॅक्सीमधील एफएम चॅनलवर हिंदी चित्रपटांची गाणी सतत ऐकायला मिळण्यातून आपल्याला हे कनेक्शन सातत्याने जाणवत राहते. बॉलीवूडचे हे प्रेम फक्त यूएईतील स्थानिक लोक आणि भारतीयांपुरतेच आता मर्यादित राहिलेले नाही. जागतिक शहर असलेल्या दुबईत अनेक देशांतील लोकांचे वास्तव्य असल्याने त्यांनाही बॉलीवूडची ख्याती चांगलीच परिचित झाली आहे. गेल्याच आठवडय़ात ‘पीके’ सिनेमा बघायचा प्लॅन केला. भारतीयांसोबतच यूएईमधील स्थानिक लोक, पाकिस्तानी, श्रीलंकन, फिलिपिनो आणि तुरळक चिनी लोक यांच्या गर्दीने थिएटर फुलले होते. यापैकी काहींना हिंदी भाषा समजणार होती, तर काहींना भाषेविना त्यातली कला! त्यातल्या त्यात माझे मुंबई कनेक्शन लक्षात घेता नवा सिनेमा रिलीज होताना त्या स्टारची माहिती, आवडीनिवडी याबद्दलची चौकशी करू इच्छिणारे फोन मला आवर्जून येतात. गंमत म्हणा, आश्चर्य म्हणा किंवा काहीही.. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा विषय निघाला की इथल्या विविध वयोगटांतलं अंतर अलगद मिटतं.
इथल्या आलिशानतेत लक्षवेधी गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे विविध देशांतील विविधरंगी लोकांचे एकमेकांशी असलेलं कनेक्शन! हे कनेक्शन समजून घ्यायचं तर स्थानिक संस्कृती समजून घ्यायला हवी. दुबईवर प्रामुख्याने असलेला मुस्लीम धर्माचा पगडा इथे इमारतींपासून ते विविध प्रकारच्या शिस्ती-सवयींच्या माध्यमातून अधोरेखित होतो. कितीही वर्षे इथे वास्तव्य असले तरी इथल्या दैनंदिन जगण्याचे ठोकताळे मांडता येतीलच असं नाही. कारण प्रत्येक वेळी इथली संस्कृती नव्या परिप्रेक्ष्यातून उलगडत जाते. यूएई किंवा एकूणच आखाती देश आणि तिथल्या शिक्षांबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्या अधिक मीठ-मसाला लावून रंगवल्या जातात. पण या दंतकथांतील शिक्षा आणि वास्तव यात प्रचंड तफावत आहे. एक देश, तेथील संस्कृती आणि तिच्या रक्षणार्थ किंवा ती अधिक सुदृढ करण्यासाठी जे जे नियम अथवा शिस्त आवश्यक असते, ती इथेही आढळते. कामाच्या निमित्ताने युरोपसह अन्य देशांमध्ये जाण्याचा योग आला. शिस्तीचे हे नमुने तिथेही दिसले. किंबहुना, ही शिस्त नियमांत बांधलेली नसून ती नागरिकांची वृत्ती बनविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतो. त्यामुळेच नियमांचे पालन करताना आपण काही कृत्रिमरीत्या करत आहोत असे वाटत नाही. शिस्तीच्या चौकटीत राहून आणि सगळे नियम पाळूनही इथे जीवन लोकशाही देशांप्रमाणेच पूर्णपणे एन्जॉय करता येतं, हे इथल्या स्थानिकांकडे पाहून कळतं. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान आहे. ते ती कसोशीनं जपतातही. पण ती तुमच्यावर मुळीच लादत नाहीत. नियम मात्र सगळ्यांसाठी सारखेच. इथल्या इमारतींच्या रचनेतील भव्यता, नक्षीकामातील शालीनता आणि आदरातिथ्याची भावना हे सगळं प्रतिबिंबित करते असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. अर्थात याच कारण म्हणजे त्या इमारती तसंच वास्तूंचा संस्कार इथल्या लोकांच्या वर्तनातून जाणवतो. इथे, रशियन, चिनी, ब्रिटिश, फिलिपिनो, नेपाळी, पाकिस्तानी, युरोपियन.. असे दीडशेहून जास्त देशांतील लोक जेव्हा व्यापारउदीमाच्या निमित्ताने येतात, तेव्हा सोबत घेऊन येतात स्वत:च्या संस्कृतीची शिदोरी. इथे स्थिरावल्यावर प्रत्येकाने ती शिदोरी हळूहळू रिती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यापारच नव्हे, तर विविध संस्कृती, भाषा, भावना, सण या सगळ्यांचीच सरमिसळ होत गेली आणि या सर्वाचे सण आणि उत्सवांच्या सेलिब्रेशनचा ट्रेंडही रुजला गेला. प्रत्येकाची आपली भिन्न आचार-विचार पद्धती, आपापले विश्वास.. या साऱ्यांमध्ये असलेलं एक आंतरिक साम्य.. आणि तरीही अंतर्भूत असलेलं एक वेगळेपण.. हा रंगांचा जल्लोष बघायचा असेल तर इथे साकारलेल्या ‘ग्लोबल व्हिलेज’ला आवर्जून भेट द्यावी.  विविध देशांच्या पॅव्हेलियनमधून फिरताना फक्त वास्तूच नाही, तर भिन्न संस्कृतींचेही दर्शन घडते. त्या- त्या देशाचे पेहेराव, अन्न, मसाले, वस्तू.. एवढंच नाही तर संगीत, नृत्य तसंच अन्य कलांचीही झलक इथं पाहायला मिळते. इथे जाताना मोकळ्या मनानं आणि मोकळ्या हाताने जावं, म्हणजे सगळ्या संस्कृतींची भरभरून मौज लुटता येते. आणि मग बाहेर पडताना मनात घट्ट होतं ते ‘ग्लोबल कनेक्शन’!
इथल्या बहुरंगी आणि बहुढंगी सांस्कृतिक पसाऱ्यात वावरताना काही वेळा मनाचा गोंधळही होतो. पण त्यावर उत्तर शोधायलाही आजूबाजूची परिस्थितीच मदत करते. शेवटी मानवी मूल्ये सर्वत्र सारखीच असतात. ती व्यक्त करायची पद्धत वेगवेगळी असू शकते. बऱ्याच गोष्टी नवीन असतील, अपरिचित असतील.. त्यांचा अर्थ जाणून घ्यावा लागेल. कधी आपल्यापेक्षा चांगल्या गुणांची कदर करावी लागेल, तर कधी ते आत्मसातही करावेत. हे करत असताना फक्त जपायला लागते ती आपली आयडेन्टिटी.. ओळख. मग अबाया घातलेलीही मीच अन् साडी नेसलेलीही मीच. कारण सुखासाठी लागतं ते फक्त कनेक्शन!