News Flash

पडसाद : विचारांची संयत मांडणी

सरस्वती ही विद्येची देवता आहे अशी समस्त हिंदू समाजाची पूर्वापार धारणा आणि दृढ श्रद्धा आहे

४ एप्रिलच्या ‘लोकरंग’मध्ये सरस्वती सन्मान पुरस्कारप्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांचा ‘समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ…’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. सरस्वती ही विद्येची देवता आहे अशी समस्त हिंदू समाजाची पूर्वापार धारणा आणि दृढ श्रद्धा आहे. या दैवताचा फोटो ठेवलेला बघून पुरस्कार नाकारणारे यशवंत मनोहर यांनी साहित्यप्रेमींच्या भावना दुखावल्या असं नाही का वाटत? साहित्यिक हे खरं तर सरस्वतीचे भक्त समजले जातात. या लेखात लिंबाळे यांनी आपलं स्वत:चं मत मांडलंय. तसेच आपले प्रकाशक,अनुवादक यांच्या प्रेमामुळेच आपण मोठा झाल्याचे मान्य केले आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे. हल्ली चार किरकोळ गोष्टी लिहून स्वत: ला मोठे साहित्यिक समजणाऱ्यांचीच संख्या जास्त दिसते. – माधव गोडबोले, सांगली

समन्वयाची भूमिका मांडणारा लेख

सरस्वती पुरस्कारप्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांचा ‘समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ…’ हा लेख वाचला. माझ्या पिढीचे साहित्यिक पोषण ‘बलुतं’ने तसेच नामदेव ढसाळांच्या समर्थ साहित्यकृतींनी झाले आहे. लिंबाळे यांचा लेख वाचून लक्षात आले की, या पुरस्कारासाठी त्यांची निवड किती यथार्थ होती.  लेखात लिंबाळे अतिशय समर्थपणे समन्वयाची भूमिका मांडतात आणि त्याचबरोबर समाजातील सर्व बाजूंच्या अनुचित गोष्टींबाबत परखड आणि संतुलित शब्दांत आपली नाराजी व्यक्त करतात. अतिशय कमी शब्दांत दलित साहित्याचा आढावा घेऊन, सामाजिक बदलांकडे डोळसपणे बघून आपली मते त्यांनी सकारात्मकरीत्या मांडली आहेत. लेखकाचे साहित्य, सरस्वती सन्मान आणि त्यांचा हा लेख हे सर्व साहित्य आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्या सर्वांसाठी निश्चिातच मार्गदर्शक आहे असे वाटते. – सुनील खेडकर

रोखठोक विचार

सरस्वती सन्मान पुरस्कारप्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांचा ‘समाजापासून वेगळे राहून दुर्लक्षिले जाऊ…’ हा लेख वाचला. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात निर्माण झालेल्या विविध प्रवाहांचा, विशेषत: दलित साहित्याच्या प्रवाहाचा अतिशय नेटका असा आढावा त्यांनी लेखात घेतला आहे. मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगून, दलित साहित्यावर होणाऱ्या टीकेचा संयतपणे यथायोग्य प्रतिवाद करून, दलित साहित्याच्या प्रेरणांचा विस्तृत असा परामर्श त्यांनी घेतला आहे.  संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या या पुरस्काराचे स्वागत होत असताना काही निषेधाचे सूरही उमटले. दलित लेखकाने ‘सरस्वती’ सन्मान स्वीकारावा का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे आपण व्यथित झालो असे सांगून त्यांनी त्यासंदर्भात आपल्या मूळ प्रेरणा, बांधिलकी व तत्त्वांशी तडजोड न करता आपली समन्वयवादी, विधायक आणि ठाम भूमिका मांडली आहे. टीकाकारांना विचारलेल्या सडेतोड प्रश्नांतून त्यांचा रोखठोक सच्चेपणा आणि निर्भीड, स्वाभिमानी, चिंतनशील मनोवृत्तीचे दर्शन घडते. – हेमंत रामदासी, नासिक

गमतीशीर आठवणींचा पट!

‘व्हिक्टोरिया माझ्या प्रीतीची!’ हा (‘लोकरंग’- ४ एप्रिल) कमलाकर नाडकर्णी यांचा लेख वाचून मन साठ-सत्तरच्या दशकांतील मुंबईच्या रम्य आठवणी वेचायला लागलं. व्हिक्टोरिया (घोडागाडी, टांगा नव्हे!), डबल डेकर बस आणि एकल पडदा चित्रपटगृहे या तिन्ही गोष्टी आता मुंबईतून इतिहासजमा होत आहेत. आणि घोडागाडी तर टपटपत केव्हाच इतिहासात निघून गेली आहे! त्याकाळी होळीच्या आसपास गाडीवान दादाच्या बैठकीखाली रचलेल्या गवताच्या पेंढ्या काही वीर बेमालूमपणे खेचून नेऊन त्यांच्या वाडीतली होळी धडधडावयाचे तेव्हा त्यांच्या नकळत घोड्यांच्या तोंडचा घास (गवतच ते!) हिरावला जायचा. शाळेतून परतणारा एखादा स्टंटबाज विद्यार्थी घोडागाडीच्या पाठीकडे असलेल्या दांड्यांमध्ये स्वत:ला अडकवून चकटफू राईड घ्यायचा. तेव्हा हे उमजलेल्या गाडीवान दादाचा चाबूक घोड्यावर न पडता पाठच्या दिशेने फिरायचा तेव्हा त्या दु:साहसी मुलाला आपला गाढवपणा लक्षात आल्यावर तो शिवी हासडून मधेच पायउतार व्हायचा. या आणि अशा गमतीशीर आठवणी जोडल्या गेलेल्या मुंबईतील व्हिक्टोरिया आता आठवणींतच आणि एखाद्या संग्रहालयात तेवढ्या उरतील! –  मिलिंद रामचंद्र देवधर, गिरगांव, मुंबई.

शिस्तीचा टोल!

डॉ. संजय ओक यांचा ‘टोल की टाळाटाळ’ हा ‘लोकरंग’ (२८ एप्रिल) मधील लेख वाचला. तो खूप अर्थपूर्ण आहे. शेवटचे दोन परिच्छेद तर कळसच. खरंच, आज किती लोक शिस्त पाळतात? किती लोक आपल्या संपर्कात येणाऱ्यांचा माणूस म्हणून विचार करतात? परिणामत: सगळीकडे अशांतता, असमाधान पसरले आहे. आजची पिढी म्हणे आम्ही ‘मल्टी-टास्किंग’ आहोत! म्हणजे काय, तर काम वा पुस्तक किंवा इतर वाचन करताना मोबाइलवर गाणी ऐकणे, चालताना कानात ईअर प्लग घालून गाणी किंवा स्टोरी ऐकणे, जेवताना मोबाइल व टीव्ही बघणे… अशाने एकही काम धड होत नाही. माणसाने एका वेळी एकच काम पूर्ण एकाग्रतेने करावे, अशाने ते काम चांगले होते, काम केल्याचे समाधान मिळते आणि समोरच्याही आनंद मिळतो. पण आज बऱ्याच जणांना हे पटत नाही. सगळीच पळापळ, ओढाताण, चिडचिड आणि नैराश्य! – कृष्णा जाधव, मुंबई.

भाषिक प्रारूपं व्यापक हवीत!

‘लोकरंग’मधील संहिता जोशी यांचा ‘भाषेचं राजकारण आणि विदाविज्ञान’ हा लेख वाचला. भाषेच्या प्रारूपांवर, विशेषत: तंत्रक्रांतीने होत असलेल्या भाषांतरात उच्चवर्गीय, पुरुषप्रधान संस्कृतीचा बोलबाला आहे, हे सहज लक्षात येत नाही. मुळात वापरकत्र्यांना एखाद्या पोस्टचे परभाषेत किंवा स्वभाषेत भाषांतर हेच अप्रूप वाटते. तंत्राधारित भाषांतर अजूनही बाल्यावस्थेत आहे. अशा वेळी या भाषेच्या प्रारूपांवर योग्य संस्कार होणं गरजेचं आहे. विविध भाषांमध्ये भाषांतर करणारी प्रारूपं तयार करणे हे मोठेच आव्हान आहे. गुगल, फेसबुक यांसारख्या बलाढ्य तंत्रकंपन्या यात व्यापक प्रमाणात गुंतवणूक करू शकतात हे वास्तव आहे. ओपन सोर्स माध्यमातून विविध भाषिक समूहांद्वारे वेगवेगळी प्रारूपे तयार करण्यात आली तर ते अधिक सुयोग्य होईल. अर्थात विविध भाषिक प्रारूपांमुळे भाषांतरात काहीसा विस्कळीतपणा येऊ शकतो. अशा वेळी परत प्रमाणभाषेचा आग्रह आणि त्यावरची अभिजनांची मक्तेदारी असे वर्तुळ निर्माण होईल. सद्य:परिस्थितीत जगभरात धुव्रीकरणाची व्याप्ती भाषा-प्रांतापलीकडे पोहोचवणारी भाषिक प्रारूपं पुढील काळात जास्त व्यापक होतील. ती सर्वसमावेशक आणि भेदभावविरहित असावी, ही अपेक्षा आहे.     – नकुल संजय चुरी, विरार पूर्व

लहानपण आठवले…

डॉ. संजय ओक यांचे ‘मोकळे आकाश’ हे सदर नेहमीच वाचतो. त्यांची एखादा विषय सोपा करून लिहिण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. ‘टोल की टाळाटाळ’ या लेखावरून मला माझे लहानपण आठवले. सांताक्रूझ येथील मिलिटरी कॅम्प परिसरात कॅम्पमधील घंटेचे टोल स्पष्टपणे ऐकू यायचे आणि मजा वाटायची. तसेच हातावर बांधायच्या रिस्ट बँडच्या वापराचे कारण मला अगम्य वाटते. कारण हार्टबीटवर वास्तव समजूनही ते बांधणारा सामान्य माणूस त्यावर काय उपाययोजना करणार ?  –  वासुदेव हर्डीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:00 am

Web Title: consequences lokrang poll opinion reader akp 94
Next Stories
1 पाडवा आणि गोडवा
2 इस्पिकची राणी!
3 रफ स्केचेस :  पाण्यावरची सही
Just Now!
X