समीरण वाळवेकर यांच्या मनात ‘चॅनल फोर लाइव्ह’ लिहिताना काही गैरसमजुती आहेत असे दिसते. त्यांच्यासमोर अरुण साधूंची ‘सिंहासन’ होती हे तर स्पष्टच जाणवते. व्यक्तिरेखा परिचय सुरुवातीलाच देऊन त्यांनी हे सिद्धही केले आहे. शिवाय सगळी मांडणीही ‘सिंहासन’सारखीच केली आहे. साधूंचा दिगू आणि वाळवेकरांचा सलील देसाई हे पत्रकार सारखेच आहेत. याशिवाय वाळवेकरांचा मुख्यमंत्री मदनराव पाटील असो किंवा इतर व्यक्तिरेखा असोत, त्यांच्यावर ‘सिंहासन’चाच पगडा आहे. फक्त साधू छापील माध्यमाचा पत्रकार रंगवताहेत आणि वाळवेकर इलेक्ट्रॉनिक; पण वरवरच्या साम्यासोबतच सारे संपून जाते. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बदलाची घोषणा करतात आणि ती बातमी रेडिओवरून येते असा ‘सिंहासन’चा अप्रतिम शेवट जसा साधूंनी केला आहे, त्याचा मोह होऊन वाळवेकरही बातमीवर येऊन कादंबरी संपवतात. पण ते अशोक चव्हाण प्रकरणासारखेच ‘श्रीया सोसायटी’ प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व केंद्रात राज्यमंत्री असलेल्या राजवर्धन मोहिते यांना राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठविले जाते असे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रकरण रंगवतात. साधूंनी राजकीय प्रक्रिया जवळून अभ्यासली असल्यामुळे ते आपल्या कादंबरीचा शेवट अर्थपूर्ण करतात. सत्तेचे राजकारण कुठल्या दिशेने जाते याचा अंदाज साधूंना आहे. परिणामी तशी मांडणी ते करतात. याउलट वाळवेकरांना काय सांगायचे आहे तेच शेवटपर्यंत समजत नाही.
मोदी-अंबानी, तात्या खामकर-अण्णा हजारे, श्रीकांत सबनीस-अविनाश धर्माधिकारी, खामगाव-राळेगण सिद्धी, दादा सामंत-नारायण राणे, आरती बेणारे-मेधा पाटकर (कट्टर कम्युनिस्ट विचारांची कार्यकर्ती- खरे तर वाळवेकर यांना पत्रकार म्हणून समाजवादी आणि मार्क्‍सवादी यातला फरक कळायला पाहिजे होता.) लेण्याद्री-सह्य़ाद्री असा किती तरी साम्य दर्शवणारा खेळ करून वाळवेकर लेखक म्हणून आपला कमकुवतपणा सिद्ध करतात.
पसा आणि वासना यांचा खेळ म्हणजे सत्ता असे एक सूत्र वाळवेकर मांडतात. बरं मग जेव्हा मोठमोठय़ा वाहिन्या बंद पडल्या, त्यांचे प्रसारण कमी झाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून कित्येक दर्जेदार पत्रकार बाहेर पडले हे त्यांच्या लिखाणात कुठेच येत नाही, हे कसे?
वासनेबाबत तर वाळवेकरांचे काय गरसमज आहेत तेच जाणो. जवळपास प्रत्येक पुरुष किंवा स्त्री एकमेकांकडे वासना शमवायचे साधन म्हणूनच पाहतात अशी वर्णने त्यांनी केली आहेत. उदा. सलील-रावी (पृ. १०), सलील-मसाज करणारी पोरगी (पृ. ३०), मदनराव पाटील-व्हेनेझुएलन ब्युटी क्वीन (पृ. ३१), कनकलाल रामजी झवेरीचा मुलगा युवराज- कित्येक मुलींशी संबंध (पृ. १०९), अँकर अनिमिष-प्रति ठुकराल (पृ. ७५), इशा-युवी (पृ. १३५), गिरीश-बिन्नी (पृ. १५३), मोगरा बोरगावकर-मुख्यमंत्री (पृ. १७९). यातून काय सांगायचे आहे वाळवेकरांना?
चॅनल फोरचा अँकर अनिमिष आणि मिताली यांची एटीएम सेंटरमधील अश्लील सीडी चॅनल फोरच्या मालकाला दाखवून कुणी मार्केटिंग अधिकारी युनायटेड बँकेत खाते उघडायला लावतो. साडेतीन हजार कर्मचारी असलेली  मीडिया कंपनी केवळ आपल्या एका कर्मचाऱ्याचा अश्लील व्हिडीओ सापडला म्हणून असे करेल? वाटले तर त्या दोघाही कर्मचाऱ्यांना काढून टाकेन. मोठय़ा समूहांची आíथक व्यवहार करण्याची पद्धत वाळवेकरांना इतकी बाळबोध वाटते का?
वाळवेकरांची राजकारणाविषयीची नेमकी काय समज आहे हेही कळत नाही. केवळ मंत्र्यांचे अनतिक संबंध कळले म्हणजे राजकारण का? वाळवेकरांचे मुख्यमंत्री स्वत: ‘लोकमानस’चे संपादक राजाभाऊ पानसेंना फोन करतात आणि ‘सांस्कृतिकमंत्री सापडले लोककलावंतिणीबरोबर’ अशी बातमी देतात. राजाभाऊ पानसे त्यांना बाणेदारपणे ‘काय छापायचे ते मला शिकवू नका’ हे सांगतात. मोठे नेते, संपादक इतक्या बालिशपणे एकमेकांशी बोलतील का? किंवा हा प्रसंग कादंबरीत असा बाळबोधपणे येईल का?
 नांदेडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इमारत जळाली हे प्रकरण जशाला तसे परभणी बँकेची इमारत म्हणून लेखकाने घेतले आहे. लोककलावंत जनार्दन नांदूर्डीकरांना मुख्यमंत्री भेटतात, मीरचंदानी बिल्डिंग अतिक्रमण असे प्रत्यक्ष घडलेल्या घटनांशी संपूर्णत: साधम्र्य असलेले प्रसंग नाव बदलून दाखवले म्हणजे वाङ्मयाची निर्मिती होते का? गोपाळराव दामले-गोिवदराव तळवलकर (पृ. ८३), गॅलेक्सी ग्रुप-रिलायन्स, इंदूभाई-धीरुभाई (पृ. ८७,) त्यांची आशीष-अमित ही मुले म्हणजेच अनिल अंबानी-मुकेश अंबानी, असे साधम्र्य दाखवल्याने काय साध्य होते?
चॅनेल फोरच्या स्टुडिओतील चंकी व सलीलची मारामारी, दादा सामंतांचा स्टुडिओतील राडा, पोलीस इन्स्पेक्टर सुजीत वळसे गुंड धोत्रेचे एन्काऊंटर करतो हे सगळे प्रसंग बाबा कदमांची कादंबरी किंवा राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटात शोभावेत असे आहेत. परळीच्या डॉक्टरांनी स्त्री-भ्रूणहत्या केल्या, त्याच्याशी साधम्र्य सांगणारा अख्खा प्रसंग या कादंबरीत वाळवेकर यांनी घेतला आहे. बरं तो लिहिताना किमान स्थळाच्या, नावाच्या चुका तरी करू नयेत. विनिता काळे ही सामाजिक कार्यकर्ती हा विषय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हाती घेते. परभणीच्या डॉक्टर्सचे पत्ते आपली वर्गमत्रीण वल्लरी कर्दळेला फोन करून ती विचारते, ‘तुला डॉ. धनाजी भोंगळे माहीत आहे का?’ आणि वरच्या परिच्छेदात लिहिले आहे की, तिला डॉ. रमेश भोंगळेची चौकशी करायची असते. रमेश की धनाजी? एकाच पानावर नाव बदलले. परभणीच्या सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरकडे एमटीपी करून घ्यायला जवळच्या पाच-पंचवीस गावांतून नागपूर, चंद्रपूर, अकोल्यापासून माणसे येतात. ही गावे परभणीजवळ आहेत? पुढे पृ. १८२ वर अमरावतीपासून विनिताची गाडी ४०-५० कि.मी.वर थांबते, िस्टग ऑपरेशन करण्यासाठी. सोनोग्राफी होते परभणीत आणि स्टिंग ऑपरेशन अमरावतीत. गाव कुठले, परभणी की अमरावती?
ही कादंबरी दूरदर्शन वाहिन्यांशी संबंधित आहे. साहजिकच या वाहिन्यांचे जे बलस्थान आहे, ग्रामीण भागातील निरक्षर वर्ग किंवा आता नव्याने साक्षर असलेला, पण फारसा विचार करू न शकणारा वर्ग, याला काहीच तोशीस न लागता हे मनोरंजन आयते मिळते. साहजिकच अतिशय थोडय़ा काळात वाहिन्यांचा प्रभाव वाढला. याची कुठल्याही प्रकारची जाणीव लेखकाला दिसत नाही.
पत्रकारितेला जोडून यात राजकारण आणि थोडय़ा प्रमाणात उद्योगविश्व येते. सारे काही सरकारने करायचे या भूमिकेमुळे सत्तेचे महत्त्व वाढले आणि उदारीकरणाच्या काळातही मोकळी हवा काही उद्योगांनाच लाभली. यातून धीरुभाऊ अंबानी, सुब्रोतो रॉय, विजय मल्ल्या यांची साम्राज्ये उभी राहिली. यांच्या दोऱ्या परत सत्ताधाऱ्यांच्या हाती एकवटल्या. यातून ही भ्रष्ट युती तयार झाली. याची खोलवर चिकित्सा न करता लेखक वरवर बायका, दारू, पसा यांच्या वर्णनात अडकून पडतो.
या कादंबरीत पत्रकारितेच्या बाजूने केवळ कोकण रेल्वेच्या अपघाताची बातमी (पृ. ३५-४४) येते, एवढाच काय तो अपवाद. एरवी कुठेही या क्षेत्राबद्दल काही मांडलेले नाही. मंत्रालयात अद्ययावत सभागृह पत्रकार परिषदेसाठी उभारले गेले म्हणजे पत्रकारिता क्षेत्राची माहिती दिली असे होते का? एका वाहिनीच्या उंच इमारतीवर हेलिकॉप्टर उतरायची सोय कशी आहे याचे वर्णन केले म्हणजे पत्रकारितेने किती उंची गाठली हे स्पष्ट होते का?
मजकुराची मांडणी करताना दोन दोन, तीन तीन ओळींचे परिच्छेद करत उगीच तुकडे पाडले आहेत. परिणामी मजकूर बेढब वाटतो. नेमाडे किंवा पठारे यांच्या मोठय़ा कादंबऱ्यांची सलग मोठमोठय़ा परिच्छेदात मांडणी करून एक सौंदर्यदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा चांगला परिणाम अक्षरजुळणी करताना साधला गेला आहे. त्याच्या नेमके उलट इथे होते आहे. या मांडणीचा विपरीत परिणाम होऊन वाचकाची एकाग्रता भंगते.
मजकुरावरून संपादकाचा हात फिरला नाही असे दिसते आहे. हा संपादक बाहेरचाच असला पाहिजे असे नाही. लेखक स्वत:ही हे काम स्वप्रेमातून थोडा बाहेर येऊन करू शकतो. कादंबरीमध्ये आशय महत्त्वाचा. नुसती वर्णने करून कादंबरी कशी तयार होणार?    
‘चॅनल फोर लाइव्ह’ – समीरण वाळवेकर, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे – ३८६, मूल्य – ४०० रुपये.