News Flash

मॉडेर्ना-फायझर लशींची कूळकथा

कोविडवरील लस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल हे कळल्यानंतर लगोलग ट्रम्प यांचे राजकीय समर्थक, त्यांची प्रचार यंत्रणा आणि रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक जण या लशीचे श्रेय घेण्यात गुंतला.

|| राहुल बनसोडे 

अमेरिकेतील मॉडेर्ना आणि फायझर कंपनीच्या करोनावरील प्रभावी लशींची निर्मितीकथा… अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या लशींच्या निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी केलेला आटापिटा का फोल ठरला, याचाही   परामर्श…

अमेरिकेत प्रचंड यशस्वी झालेल्या मॉडेर्ना आणि फायझर-बायोएनटेक या लशींच्या जन्माची कथा अवघ्या वर्षभराची नाही, तर तिला किमान दहा वर्षांचा इतिहास आहे. या लशीच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी मॉडेर्ना कंपनीला सरकारी अनुदानाची मदत झाली असली तरी करोनावरील दुसरी लस विकसित करणाऱ्या फायझर कंपनीला मात्र सरकारी धोरणांचा काही विशेष उपयोग वा फायदा झालेला नाही. फायझरने सरकारकडून एक कपर्दिकही न घेता आपली लस तयार केली आहे असे या कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘सिक्स्टी मिनिट्स’ व ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. फायझर कंपनी कधीही ‘ऑपरेशन वार्प स्पीड’चा भाग नव्हती असेही फायझरच्या वरिष्ठ उपाध्यक्ष कॅथरीन जेन्सन यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे. या लशीचे संशोधन आणि उत्पादन यासाठी फायझरने पदरचे दोन बिलियन डॉलर्स लावले होते. आणि लस यशस्वी झाल्यास त्याचे पहिले एक कोटी डोस १.९५ बिलियन डॉलर्सला अमेरिकन सरकारला विकण्याचा करार केला होता. हा करारही का? तर लशीच्या संशोधन आणि उत्पादनात काही कच्चा माल लागला तर सरकारने उगीच आडकाठी करू नये म्हणून. बाकी सर्वच बाबतींत फायझर स्वयंनिर्भर होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या फिलीप बम्प यांनी फायझरच्या लशीच्या यशाचे श्रेय अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ला का दिले जाऊ शकत नाही याविषयी ९ नोव्हेंबर २०२० च्या अंकात यथोचित विश्लेषण केले आहे.

तर मग अमेरिकेचा लसीकरण कार्यक्रम यशस्वी होण्याची नेमकी कारणे काय?

या प्रश्नाचे उत्तर शोधताना आधी मॉडेर्ना आणि फायझर-बायोएनटेक लशींची कुळकथा नीट समजावून घ्यावी लागेल. मॉडेर्ना या अमेरिकन कंपनीची स्थापना २०१० सालची! स्टेम सेल्स म्हणजेच मूलपेशींवर संशोधन करणाऱ्या डेरिक रॉस्सी यांनी मेसेंजर आरएनए तंत्र मानवी पेशींमध्ये ट्रान्सफेक्ट करून त्याचे मानवी मज्जारज्जूमध्ये रोपण करण्याचे तंत्र शोधून काढले. हे तंत्र हाती लागल्यानंतर त्याचा वापर करून मेसेंजर आरएनए प्रणालीवर आधारित अनेक औषधे आणि उपचारपद्धती शोधून काढता येणे शक्य होते. शक्यता अफाट होत्या, पण त्या नेमक्या कशा प्रचलनात येतील याबद्दल मात्र फक्त पाच टक्के शाश्वती होती. असे असूनही मॉडेर्नाने आपल्या स्थापनेनंतर या नव्या ज्ञानशाखेत पराकोटीचे संशोधन चालू ठेवले. (या तंत्रात वापरला जाणारा आरएनए म्हणजे नेमके काय, याविषयी डॉ. राजेंद्र बर्वे यांनी २२ मे २०१४ रोजीच्या लोकसत्तेत ‘आरएनए म्हणजे काय?’ हा सविस्तर लेख लिहिला आहे.) मेसेंजर आरएनए तंत्राचा वापर करून मोठ्या लोकसंख्येला टोचण्यासाठी कमी वेळात लस बनवण्याच्या तंत्रावर मॉडेर्नाने २०१४ साली काम सुरू केले होते. मॉडेर्नाच्या स्थापनेशी मिळतीजुळती कुंडली आहे ती फायझरची सहकारी कंपनी बायोएनटेकची. या कंपनीच्या नावाचा उच्चार करताना तुम्ही ‘बायो-एन-टेक’ म्हणा किंवा ‘बायोनटेक’ म्हणा- त्याने विशेष फरक पडत नाही असे बायोएनटेकचे ऑउर शाहीन यांचे म्हणणे आहे. (मुळात त्यांचे नावही ‘हौर’ आणि ‘उगूर’ असे काही जण उच्चारतात.) शाहीन यांनी बायोएनटेकची स्थापना २००८ मध्ये केली. त्यामागची प्रेरणाही औषधनिर्माणशास्त्रात होणारी कमालीची प्रगती होती. पेप्टाईडचा वापर करून औषधनिर्माणाच्या तंत्रावर काम करणाऱ्या दोन महत्त्वाच्या कंपन्या विकत घेतल्यानंतर २०१३ च्या आसपास बायोएनटेकच्या महत्त्वाकांक्षाही बदलल्या. २०१४ ते २०१८ या काळात मॉडेर्नाप्रमाणेच मेसेंजर आरएनए तंत्राचे यांत्रिकीकरण करण्याच्या विविध पद्धती बायोएनटेकने शोधून काढल्या होत्या.

२०२० च्या सुरुवातीला जगात कोव्हिडची साथ आल्यानंतर ती जवळजवळ सर्वांनाच अनपेक्षित असल्याने तिचे भयावह परिणाम जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर आणि आरोग्यव्यवस्थेवर झाले. पण जगात आता महामारीची साथ कधीही येऊ शकते असा कयास अनेक शास्त्रज्ञांनी आणि फार्मास्युटिकल कंपन्यांनी त्याअगोदरच मांडायला सुरुवात केली होती. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेकांनी त्यावर भरीव कामही सुरू केले होते आणि जबाबदार माध्यमे त्याचे वार्तांकनही करीत होती.

हे भविष्य इतके स्पष्ट असण्याचे कारण होते ते म्हणजे प्रतिजैविकांचा पराभव! कुठल्याही प्रिस्क्रिप्शनविना अँटिबायोटिक्स औषधांच्या सर्रास वापरामुळे अनेक विषाणू अँटीबायोटिक्सला जुमानेनासे झाले होते. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण जात होते. जगात उपलब्ध असणारी सर्व अँटिबायोटिक्स निष्क्रीय झाल्यास जगातील वैद्यकीय उपचार पद्धती पुन्हा एकोणिसाव्या शतकात जाऊन ठेपेल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. आणि काहींना हा धोका इतका जास्त समजत होता की, त्यांची कळकळ पाहून त्यांना ‘जगबुडीचे भविष्यवेत्ते’ म्हटले जात होते. (‘खोट्या माहितीच्या महापुरात लोकस्वास्थ्याचा बळी’ या ‘द वायर’ या ऑनलाइन माध्यमात २० जुलै २०१९ रोजी मी स्वत:ही असे भाष्य केले होते.) ‘लोकसत्ता’ने ३ सप्टेंबर २०१० रोजी सध्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. ऋग्वेदिता पारख यांची विस्तृत मुलाखत घेतली होती. त्याच डॉ. ऋग्वेदिता पारख यांनीही झिकासारख्या संसर्गजन्य साथींशी लढण्याची तयारी भारताने सुरू करायला हवी, असे आपल्या भारताच्या दौऱ्यात निक्षून सांगितले होते.

जागतिक पातळीवर पसरू शकणाऱ्या साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक शास्त्रज्ञांनी अगोदरच कंबर कसून कामाला सुरुवात केली होती. यातले काही जण हे वैद्यकीय क्षेत्रात प्रायोजित संशोधन करीत होते, तर काही फार्मास्युटिकल कंपन्यांत थेट मोबदल्यावर कामाला होते. तर काही जण  अमेरिकेच्या तीन बलाढ्य संस्था- सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (‘सीडीसी’), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (‘एनआयएच’) आणि फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन यामध्ये कार्यरत होते. अमेरिकेच्या भांडवलशाही आणि राष्ट्राध्यक्षीय राज्यपद्धतीत या संस्था लोकनियुक्त सरकारसोबत काम करणाऱ्या असल्या तरी त्यांचे स्वरूप सरकारी ‘खात्यां’सारखे नाही. या संस्थांना ‘एजन्सी’ असे म्हटले जाते; ज्याचा तात्त्विक अर्थ गहन असला तरी स्वाभाविक अर्थाने त्या अस्तित्वात आहेत. प्रत्येक संस्थेला आपली जबाबदारी आणि अधिकार यांविषयी नेमकी माहिती आणि जाण असून, आपण घेतलेले निर्णय किती दूरगामी परिणाम करू शकतात याचे आकलन त्यांना अनुभवांतून आलेले आहे. अमेरिकेत कुठल्याही प्रकारची साथ पसरू न देणे, पसरल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे आणि या दोन्ही उद्दिष्टांसाठी जगात जिथे कुठे साथ सुरू होत असेल तिथे हस्तक्षेप करणे हे ‘सीडीसी’चे काम. अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्यावर लक्ष ठेवणे आणि जैवऔषधे शोधून काढणे हे ‘एनआयएच’चे काम. सर्व प्रकारच्या अन्न आणि औषध उत्पादनांसह एनआयएचने शोधून काढलेली औषधे व लशी नियंत्रित करणे आणि त्याची सुरक्षितता तपासून पाहणे हे काम ‘एफडीए’चे.

पृथ्वीतलावर कोव्हिडची साथ येण्यापूर्वीच मॉडेर्ना ही कंपनी ‘एनआयएच’सोबत मेसेंजर आरएनए तंत्राने लस कशी उत्पादित केली जाऊ शकते यावर काम करत होती. खरे तर २०१९ मध्ये साथ आली तर लस कशी शोधून काढायची आणि तिचे उत्पादन व वापर कसा करायचा, हे शोधून काढण्यासाठी ‘एनआयएच’ने अभ्यासासाठी लुटूपुटूची काल्पनिक साथ तयार करून त्यावर मॉडेर्नाने तोडगा शोधून काढण्याची तयारी केली होती. याच समांतर काळात बायोएनटेकही मेसेंजर आरएनए तंत्राचा वापर करून फायझरसाठी फ्लूच्या लशीवर संशोधन करत होती. जानेवारी २०२० च्या सुरुवातीला चीनच्या वुहान शहरात कोव्हिडचे थैमान सुरू झाल्यानंतर ही साथ एकतर लवकरच आटोक्यात येईल, किंवा ती जगभरात पसरेल, या दोन्ही शक्यता आकारास येत होत्या. महामारीचा अभ्यास करणाऱ्यांना दोन-चार लहानशा चुकादेखील करोना व्हायरस जगभर कसा पोहोचवतील याबद्दल माहीत होते. २० जानेवारी २०२० रोजी करोना व्हायरसची आरएनए रचना नेमकी कशी आहे याची ‘सीक्वेन्स फाइल’ शास्त्रज्ञांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. अवघ्या पाचच दिवसांत, जनुकीय शास्त्राबद्दल जुजबी ज्ञान असणाऱ्या प्रत्येकाकडे ही फाइल उपलब्ध होती.

करोना व्हायरसचा संसर्ग मानवी शरीरावर नेमके काय परिणाम करतो हे कळल्यावर आणि या व्हायरसची आरएनए रचना पूर्णपणे समजल्यानंतर मॅसेंजर आरएनए तंत्राने लस बनवणाऱ्यांचे काम खूपच सोपे होते. सर्वप्रथम या व्हायरसवर असलेले काटेरी मुकुटाचे आवरण मानवी उतिकांवर घट्टपणे बसते हे निदर्शनास आल्याने व्हायरसच्या आरएनएमधल्या नेमक्या कुठल्या घटकांनी हे काटे बनलेले आहेत, ते शोधण्यात आले. एकदा काट्यांची आरएनए रचना समजल्यानंतर तशीच रचना कृत्रिम पद्धतीने तयार करून ती मानवी शरीरात टोचायची आणि शरीराला त्या काट्यांविरुद्ध कसे लढायचे ते समजल्यानंतर शरीरात त्यावर प्रतिपिंडे तयार होतील, हे इतके सरळ शास्त्र त्यामागे होते. गेल्या दहा वर्षांत मॉडेर्नाने केलेल्या संशोधनात मानवी डीएनएची विस्तृत रचना, त्यात बाह्य कारणांनी होणारे तात्कालिक आणि आनुवंशिक बदल, आरएनएचा त्यावर होणारा परिणाम हे एकत्रितरीत्या एका अत्याधुनिक संगणकीय प्रणालीत साठविण्यात आले आहेत; ज्याला मॉडेर्ना ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ म्हणते. या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित बनवलेल्या लशीला वा औषधांना मॉडेर्ना ‘अ‍ॅप’ म्हणते. मॉडेर्नाची करोना व्हायरची लस ही त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर बनविलेली एक लस आहे. मॉडेर्ना याच पद्धतीने काही तासांत दुसरी कुठलीही लस बनवू शकते आणि अगोदर बनवलेल्या लशींना अपडेटही करू शकते.

२० जानेवारी २०२० रोजी सीक्वेन्स फाइल हाती आल्यानंतर मॉडेर्नाचा प्रत्येक संशोधक त्यावर संशोधन करीत होता. पूर्ण व्हायरसच्या सीक्वेन्समधून काटेरी मुकुटाचे प्रोटीन नेमके कुठले आहेत,  हे शोधण्यासाठी मॉडेर्नाचे संशोधक स्वतंत्रपणे कामाला लागले. अवघ्या काही तासांतच त्यांना हे प्रोटीन सापडले. आणि प्रत्येक स्वतंत्र शास्त्रज्ञाचा काटेरी मुकुटाचा कयास सारखाच असल्याने, हे तेच प्रोटीन आहे हे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेचच त्याची संभाव्य मेसेंजर आरएनए लस कशी असेल, हेही समजले. हे इतक्या वेगाने घडले असले तरी करोनाची साथ त्याहून जास्त वेगाने पसरत होती. या काळात मॉडेर्नाने प्रारंभिक संशोधन नेमके कसे केले हे जाहीर आहे.

बायोएनटेकमधली सुरुवातीची अंतर्गत परिस्थिती काय होती याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. पण ज्या तंत्राने बायोएनटेक फायझरसाठी फ्लूची लस बनवणार होती त्याच तंत्राने कोविडसाठीही लस तयार करता येईल असे त्यांनी फायझरला सांगितले आणि फायझर पुढच्या कामाला लागली. २०२० च्या मार्च महिन्यात फायझर या लशीवर काम करणार आहे हे स्पष्ट झाले. आणि समांतर काळात मॉडेर्नानेही ‘एनआयएच’सोबत पुढच्या कामाला सुरुवात केली.

साधारण जून महिन्यात लस तयार झाली तरी तिची लोकांवरची चाचणी सुरू करण्यासाठी ‘एफडीए’कडून परवानगी आवश्यक होती आणि त्यासाठी सरकारलाही अधिकृत सूचना देणे गरजेचे होते. तोवर सरकारनेही लस बनविण्यासाठी काय करता येईल त्याची चाचपणी सुरू केली होती. मॉडेर्ना व फायझरशिवाय इतर कंपन्यांशीही त्यांची चर्चा सुरू होती. मॉडेर्नाने सुरू केलेल्या चाचण्यांमध्ये स्वयंसेवकांच्या वंशांमध्ये पुरेशी बहुविधता नाही, याविषयी ‘एफडीए’कडून मॉडेर्नाला कानपिचक्याही मिळाल्या होत्या. याच काळात या सर्व कंपन्यांशी, सर्व संस्थांशी आणि व्यक्तींशी ट्रम्प प्रशासन संपर्क साधून होते. आणि जसजशी लस यशस्वी होण्याची शक्यता वाढू लागली तसतशी ट्रम्प यांची या लशीचे श्रेय घेण्याची तगमग वाढू लागली. विज्ञानाविषयी विशेष आत्मीयता, पुरेसे ज्ञान किंवा माणसांविषयी कळकळ नसतानाही ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन वार्प स्पीड’चा घाट घातला. लवकरच अमेरिकेत निवडणुका होणार होत्या आणि निवडणुकांआधी लस आणल्यास त्याचा आपल्याला प्रचंड राजकीय फायदा होईल, हे ट्रम्प यांना माहिती होते. पण ही लस ट्रम्प ‘आणणार’ नसून, ती तिच्या तिच्या वैज्ञानिक संकेतानुसार आणि संपूर्ण पूर्वतयारीनिशी ‘येईल’ हे अनेकांनी ट्रम्प यांना स्पष्ट केले होते. ट्रम्प यांची ही बेबंद राजकीय महत्त्वाकांक्षा लशीसाठी तारक तर सोडाच, पण बरीच मारक होती. इतकी की, या कालावधीत राष्ट्राध्यक्षांचे स्वीय सचिव मार्क मिडोज हे सप्टेंबर महिन्यात एफडीएमधल्या लोकांना थेट फोन करून अद्वातद्वा भाषेत त्यांना फैलावर घेत होते. एफडीएचे प्रमुख स्टीफन हान यांच्याशी मार्क मिडोज यांनी सप्टेंबर महिन्यात केलेल्या भांडणांची माहितीही बाहेर येऊ लागली होती. प्रशासनातल्या या लोकांच्या अशा  वागणुकीमुळे की काय, फायझरचे मुख्याधिकारी डॉ. बोर्ला यांनी ट्रम्प यांच्या सर्व लोकांशी आणि संस्थांशी अलिप्ततेचेच धोरण ठेवले होते. त्यांनी ट्रम्प प्रशासनासोबत   ना संशोधन सामायिक केले, ना त्यांच्याकडून काही मदतीची अपेक्षा ठेवली, ना त्यांच्याकडून कुठला पैसा घेतला. या सगळ्यात डॉ. बोर्ला यांचा एक नाइलाज हाच होता की, ‘लस कदाचित ऑक्टोबरपर्यंत तयार असेल,’ हे त्यांनी एके ठिकाणी केलेले ढोबळ विधान!

कोविडवरील लस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल हे कळल्यानंतर लगोलग ट्रम्प यांचे राजकीय समर्थक, त्यांची प्रचार यंत्रणा आणि रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक जण या लशीचे श्रेय घेण्यात गुंतला. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी प्रायव्हेट-पब्लिक पार्टनरशिपमधून हे आम्ही कसे साधले याचा     गवगवा सुरू केला. ट्रम्प यांचा फोटो लशीकरणाच्या सॉफ्टवेअरमध्ये, त्याच्या सर्टिफिकेटवर, इतकेच काय- थेट लशीच्या बाटलीवर आणण्याचीही तयारी सुरू झाली. यापूर्वीही, कोविड आपत्तीकाळात दिलेल्या अनुदानांच्या चेकवर ट्रम्प यांची सही असावी म्हणून लाखो चेक नव्याने प्रिंट करावे लागले होते.

तरीही, निवडणुकीच्या आधी लस आणण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रशासनाने केलेली अधिकृत ढवळाढवळ आणि त्यांच्या राजकीय पक्षाने केलेली अनधिकृत ढवळाढवळ टाळता आल्याने लशींची सुरक्षितता कायम राहिली. या लशींचे श्रेय घेण्यासाठी आणि त्यायोगे पुन्हा निवडून येण्यासाठी ट्रम्प यांनी जीवाचा आटापिटा आणि आकाडतांडव केले; तरी त्यांच्या प्रचार यंत्रणेपासून आणि रिपब्लिकन पार्टीपासून ही लस सुरक्षित ठेवण्यात तिथल्या एजन्सीज् आणि कंपन्यांना यश आले. लस पूर्णत: यशस्वी आहे आणि आता तिचे उत्पादन वेगाने केले जाऊ शकते, हा डेटा आणि त्यावरून येणारा आत्मविश्वास हा जो बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतरच आला.

ज्याप्रमाणे मॉडेर्ना आणि फायझर या कंपन्या आधुनिक लशींवर संशोधन करीत होत्या तसेच या लशी किंवा औषधे योग्य प्रकारे योग्य वेळेत देशाच्या कानाकोपऱ्यात कशी पोहोचवी यावर फेडेक्स आणि यत्नपीएस या कंपन्यांनी संशोधन करून ठेवले होते. अमेरिकेत लशीकरणाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तिथेही तुटवडा आणि वितरणाचे प्रश्न निर्माण झाले होते, पण फेडेक्स आणि यूपीएस या कंपन्यांनी वितरणाची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली.

एकूण अमेरिकेत मॉडेर्ना आणि फायझरच्या लशीकरणाची कथा ही अशी आहे. 

ट्रम्प हे आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी संपूर्ण लशीकरण कार्यक्रम वेठीस धरू पाहत होते आणि त्यांच्या यासंबंधातील कृत्यांमुळे लस लवकर येण्याऐवजी ती न येण्याचीच शक्यता जास्त होती. मुळात कुठलेही विशेष परिश्रम न करता ‘पीआर मॅनेजमेंट’च्या सहकार्याने आणि बुद्धिभेद करणाऱ्या प्रचाराने एखाद्या चांगल्या गोष्टीचे श्रेय आपल्याकडे घेऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या एकाधिकारशहांना अलीकडे बरेच यश येऊ लागले आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी सत्ता आणि सत्तेतल्या राजकीय पक्षामुळेच शक्य झाल्या आहेत असा संभ्रम निर्माण केला जातो. या संभ्रमाचा नेमका धोका असा की, जेव्हा चांगल्या गोष्टींची नितांत गरज असते तेव्हा त्या करणे ही केवळ सरकारचीच जबाबदारी आहे असे जनतेला वाटू लागते.

कुठल्याही कोविडग्रस्त देशाची लोकशाही खिळखिळी झालेली असेल किंवा तिथे छुपी अथवा उघड एकाधिकारशाही असेल तर तिथले लशीकरणाचे कार्यक्रम नेमके कितपत यशस्वी होतात किंवा होतील, हे अद्यापि तितकेसे स्पष्ट झालेले नाही. परंतु कुणी सांगावे…  जे ट्रम्प महाशयांना जमले नाही ते इतर कुणीतरी यशस्वीरीत्या करून दाखवेलही.

…आणि असे झाल्यास लशीच्या बाटलीवरही कुणाची तरी हसरी छबी आपल्याला पाहायला मिळेल!

rahulbaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 12:05 am

Web Title: corona virus vaccine genealogy of the moderna pfizer vaccine akp 94
Next Stories
1   मोकळे आकाश… : कावळे आणि करोना
2 थांग वर्तनाचा! : शॉर्टकट नको, विवेक हवा!
3 चवीचवीने… : मिठायांचा सम्राट… छेनापोडं
Just Now!
X