संदीप दीक्षित – dixsan@gmail.com

चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने सगळे जग आज आपल्या कवेत घेतले आहे. जग ठप्प करणे आजवर नैसर्गिक वा मानवी करणीलाही शक्य झाले नव्हते, जे करोनाने करून दाखवले. देशोदेशी करोनाने माजवलेला हाहाकार आणि तिथले शासन, प्रशासन आणि जनता त्याचा कशा तऱ्हेने सामना करीत आहे याचा प्रत्यक्षदर्शी हालहवाल! चीन, अमेरिका, दुबई, जपान, जर्मनी, नेदरलॅंडस् या देशांतील करोनाच्या सद्य:स्थितीवरील झोत..

सध्या चर्चेत असलेला आणि संपूर्ण जगाला घाबरवून सोडणारा एक विषय म्हणजे करोना व्हायरस. साथीचा रोग जेव्हा पसरायला लागतो तेव्हा तो जातपात, धर्म, देश बघत नाही; तो तितक्याच निर्दयीपणे सगळ्यांना आपलं भक्ष्य बनवत सुटतो. जानेवारी महिन्यात या व्हायरसचं वुहानमध्ये निदान झालं, त्या दिवसापासून एका महिन्यातच तो वुहानमध्ये दिवसाला साधारण १००० व्यक्ती असा पसरत हळूहळू संपूर्ण चीनमध्ये पसरत गेला. आणि आज अडीच महिन्यांत चीन सरकारने अवलंबिलेल्या धोरणांनी, मेडिकल स्टाफच्या दिवसरात्र मेहनतीनं आणि जनतेने केलेल्या सहकार्यानं तो जवळजवळ नाहीसा होत चालला आहे. हे कसं शक्य झालं?

मी गेली सात र्वष चीनमध्ये जियांगशी राज्यात (वुहानपासून ३५६ कि. मी. अंतरावर) नानचांग या शहरात राहतोय. (माझी बायको चिनी आहे.) आज मला अगदीच राहवत नाही म्हणून माझा अनुभव आपल्यासमोर मांडावासा वाटतोय.

WHO रिपोर्टस्नुसार, करोना व्हायरस हा एका व्यक्तीपासून साधारण तीन व्यक्तींमध्ये आणि असं करत काही दिवसांतच १००० लोकांना आपल्या विळख्यात घेऊ  शकतो. आणि म्हणूनच चिनी सरकारने सगळ्यात आधी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.. लॉकडाऊन! संपूर्ण शहरात कर्फ्यू!! ट्रेन्स, बस, टॅक्सी सगळं बंद. जीवनावश्यक गोष्टींशिवाय सगळी दुकानं, शॉपिंग मॉल्स बंद. शाळा-कॉलेजे बंद. कारखाने बंद. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयांना घरून काम करण्याचे आदेश दिले गेले.

प्रत्येक कॉम्प्लेक्सच्या सिक्युरिटीज्ना लोकांच्या जाण्यायेण्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले गेले. त्यासाठी वेळेची बंधनं घातली गेली. प्रत्येक घरातून दोन दिवसांतून फक्त एकच माणूस भाजी आणण्यासाठी सकाळी ७ ते १० या वेळेतच जाण्याची आणि १० नंतर फक्त परत येण्याची परवानगी दिली गेली. तसंच Center for Disease Control and Prevention तर्फे प्रत्येक वेळी बाहेर जाणाऱ्या व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाचं चेकिं ग केलं जाई आणि त्याची नोंद, नाव, पत्ता, मोबाइल आणि नागरिकता कार्ड नंबर अशा तपशिलांसह एका QR code मध्ये करून ते कार्ड त्या व्यक्तीला दिलं जाई; जे कोणत्याही सुपर मार्केट, फार्मसीमध्ये जाण्यापूर्वी दाखवणं बंधनकारक होतं. आणि असं असूनसुद्धा तिथेही त्यांची फेरतपासणी व्हायचीच. नित्यनेमाने रस्ते धुण्याबरोबरच दिवसातून तीन वेळा प्रत्येक इमारतीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी र्निजतुकीकरणाचे फवारे मारले जात आहेत. आणि हे सगळं केल्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे हजारो लोकांचे जीव वाचले. आता चीनबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एअरपोर्टवरूनच १४ दिवसांसाठी आयसोलेशन सेंटरमध्ये निगराणीसाठी ठेवलं जात आहे.

आता काही ए व बी ग्रेड रेस्टॉरंट्सना फूड डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. पण तिथेही मोजक्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतरच प्रवेश दिला जातो. जेव्हा फूड डिलिव्हर केलं जातं तेव्हा त्यावर

एक लेबल लावणं बंधनकारक आहे, ज्यावर ज्याने ते फूड बनवलंय त्याचं नाव, त्यावेळचं त्याचं तापमान,  ज्याने ते पॅक केलंय त्याचं नाव, त्यावेळचं त्याचं तापमान आणि ज्याने ते डिलिव्हर केलंय त्याचं नाव आणि त्यावेळचं त्याचं तापमान आणि याशिवाय प्रत्येकाचा मोबाइल नंबर आदी तपशील असतो.

हा व्हायरस पसरायला लागला तसतशा मास्कच्या किमती वाढायला लागल्या आणि त्यांचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा चीन सरकारने हस्तक्षेप करून त्यावर अंकु श लावला. खाजगी कं पन्यांना मास्क बनवण्यावर बंदी घातली गेली आणि सरकारी कं पन्यांनी मास्कचे उत्पादन करून सामान्य लोकांना वाजवी दरात मास्क उपलब्ध करून दिले.

आज चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी योग्य ती खबरदारी घेण्यात सरकार आणि जनता दोघंही तेवढेच तत्पर आहेत. या लॉकडाऊनमुळे चीनच्या आर्थिक व्यवस्थेला साधारणपणे ४२% इतका फटका बसलाय. चीन जगातल्या बऱ्याचशा देशांना आपली उत्पादनं निर्यात करतो, पण तेही आता ठप्प झालंय. चीनमध्येच नाही तर जगभरात याचे पडसाद उमटत आहेत. भारतासह जगभरातले शेअर मार्केट्स अक्षरश: कोसळले आहेत. ‘न भूतो न भविष्यती’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण याही परिस्थितीत चीन सरकार आपल्या जनतेला सांभाळते आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन चालूच आहे, तसंच खाजगी कंपन्यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेण्याचं आवाहन केलं गेलंय; जे बहुतांश लोकांनी पाळलंय.

आपल्याकडे काही जण म्हणतील की, हे असं करणं म्हणजे लोकशाहीला तडा देणारं आहे, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर घाला आहे, वगैरे वगैरे. पण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आणि ठळकपणे नमूद करावंसं वाटतं की, सगळ्या चिनी जनतेने या रोगाचं गांभीर्य ओळखून सर्व गैरसोय व त्रास सहन करत सरकारला शंभर टक्के सहयोग दिला.

मी १३ फेब्रुवारीला भारतात परतलो आणि एअरपोर्टला पोहोचल्यावर आपल्या सरकारने घेतलेल्या खबरदारीने काहीसा सुखावलोही. परंतु जसा भारतात करोनाचा शिरकाव झाला तसा काहीसा घाबरलोही. या विषाणूच्या सर्वत्र पसरण्याच्या शक्यतेमुळे नव्हे, तर चीनप्रमाणे अत्यंत कठोरपणे आपल्याकडे आपण करोनाचा सामना करू शकू का, या विचारानं! त्यासाठी आपलं सरकार, वैद्यकीय सेवा आणि जनता मानसिक व आर्थिकदृष्टय़ा तयार आहे का, या शंकेनं!

अर्थात आपल्या राज्य आणि केंद्र सरकारने तप्तरतेने केलेल्या उपाययोजनांचं कौतुक करायला हवं. २१ दिवस लॉकडाऊनचा निर्णय स्वागतार्ह आहे. करोनावर विलगीकरण हा एकमेव उपाय आहे. पण या आणीबाणीच्या प्रसंगी सरकारवर टीका करणारे आपण सारेच खूपच अयोग्य पद्धतीने वागतोय. वारंवार वृत्तपत्रांतून, सरकारी आणि खाजगी वाहिन्यांवरून आवाहन करूनसुद्धा आपण सगळे बेफिकीर आहोत. बऱ्याच जणांना या आपत्तीचं गांभीर्यच लक्षात येत नाहीये. सरकारने दिलेली सुट्टी दिवाळीची सुट्टी असल्यासारखे पिकनिककरता वापरली जात आहे. जो-तो ‘गुगल ज्ञान’ वापरून करोनाबद्दल आपलं अगाध ज्ञान पाजळतोय. जॉगिंग ट्रॅक्स, बागा, बस, ट्रेन्स सगळीकडे जत्रा भरलेली दिसतेय. कोणीही मास्क वापरत नाहीएत. काही जे मास्क वापरताहेत, ते योग्य ती निगा राखत नाहीएत. सार्वजनिक ठिकाणी जिथे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी गर्दीचे लोंढे दिसताहेत.

आपल्या सुदैवाने आपण अजून करोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यावरच आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. कारण नसताना घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे. आत्ताच जर आपण करोनाला वेसण घालू शकलो नाही तर ही साथ इटलीसारखी आपल्याकडेही फोफावली तर त्याला जबाबदार कोण? आपण येणाऱ्या जैविक, आर्थिक व सामाजिक नुकसानीला सामोरे जाऊ शकतो का?