12 July 2020

News Flash

अवघड ‘ऑपरेशन करोना’ (दुबई)

भारतात करोना व्हायरस परदेशातून आला. त्यात इटली, चीन, इराण आणि जिथे मी राहते त्या यूएई तथा दुबईचा प्रामुख्याने समावेश आहे.

बाहेरून नोकरी-व्यवसायाच्या शोधात विविध देशांतून लोक इथे आले, ज्यांची संख्या येथल्या लोकसंख्येच्या तब्बल ८०% इतकी आहे. त्यामुळेच करोनासारख्या साथीच्या रोगाला शोधून काढणे आणि नियंत्रित करणे दुबईकरता अतिशय आव्हानात्मक आहे.

शिल्पा कुलकर्णी—मोहिते – shilooxv@yahoo.com

चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने सगळे जग आज आपल्या कवेत घेतले आहे. जग ठप्प करणे आजवर नैसर्गिक वा मानवी करणीलाही शक्य झाले नव्हते, जे करोनाने करून दाखवले. देशोदेशी करोनाने माजवलेला हाहाकार आणि तिथले शासन, प्रशासन आणि जनता त्याचा कशा तऱ्हेने सामना करीत आहे याचा प्रत्यक्षदर्शी हालहवाल! चीन, अमेरिका, दुबई, जपान, जर्मनी, नेदरलॅंडस् या देशांतील करोनाच्या सद्य:स्थितीवरील झोत..

भारतात करोना व्हायरस परदेशातून आला. त्यात इटली, चीन, इराण आणि जिथे मी राहते त्या यूएई तथा दुबईचा प्रामुख्याने समावेश आहे. यूएई उच्च गुणवत्ता आणि स्वच्छता या दोन गुणांसाठी प्रसिद्ध आहे, मग इथे करोना कुठून, कधी आणि कसा आला? यूएई या देशाची स्वत:ची लोकसंख्या खूपच कमी आहे. बाहेरून नोकरी-व्यवसायाच्या शोधात विविध देशांतून लोक इथे आले, ज्यांची संख्या येथल्या लोकसंख्येच्या तब्बल ८०% इतकी आहे. त्यामुळेच करोनासारख्या साथीच्या रोगाला शोधून काढणे आणि नियंत्रित करणे दुबईकरता अतिशय आव्हानात्मक आहे. याशिवाय पर्यटन हा यूएईचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे इथल्या पर्यटकांद्वारे इतर देशांमध्ये हा रोग पसरण्याची शक्यतादेखील अधिक आहे. यूएईमध्ये करोनाचा शिरकाव कसा झाला आणि वेळोवेळी येथील आरोग्य यंत्रणेने योग्य ते निर्णय घेऊन कशी परिस्थिती हाताळली, हे थोडक्यात पाहू.

२९ जानेवारीला यूएईमधील करोनाची पहिली केस समोर आली. चीनहून वुहान शहरातील ३६ वर्षीय आई, ३८ वर्षीय वडील, १० वर्षांचा मुलगा आणि ७३ वर्षीय आजी यांचे एक कुटुंब सुट्टीसाठी १६ जानेवारीला यूएईला आले. २३ जानेवारीला आजीला फ्लूसारखी लक्षणे दिसत असल्यामुळे डॉक्टरकडे नेले गेले, जिथे हे कुटुंब करोनासंक्रमित असल्याचे प्रथम समजले. हे कळताच यूएईमध्ये काही काळ गोंधळ उडाला आणि चेहऱ्यावरील मास्कची विक्री अचानक जोरात सुरू झाली. पुढच्या काही दिवसांत- ३१ जानेवारीला यूएईमधील करोना व्हायरसच्या पाचव्या केसची पुष्टी झाली. हा रुग्णदेखील वुहानवरून दुबईला आलेला होता. यानंतर लगेचच दुबई हेल्थ ऑथॉरिटीने सर्व डीएचए परवानाधारक रुग्णालयांना करोना व्हायरसच्या रुग्णांना विनाविलंब उपचार देण्याबाबत आणि नि:शुल्क उपचार करण्याबाबत सूचना दिल्या. ९ फेब्रुवारीला करोनाची पहिली रुग्ण- ७३ वर्षीय चिनी आजी बरी होऊन घरी गेली.

१० फेब्रुवारीला पहिला भारतीय रुग्ण करोनापीडित असल्याचे आढळून आले. अलीकडेच निदान झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात हा भारतीय प्रवासी आला होता असे कळले. २८ फेब्रुवारी रोजी यूएईमध्ये झालेल्या उच्चस्तरीय सायकलिंग शर्यतीत भाग घेतलेल्या दोन इटालियन तंत्रज्ञांच्या चाचणीमधून ते करोनाबाधित झाल्याचे समजले. त्यानंतर मात्र अजिबात वेळ न दवडता या शर्यतीत सामील झालेले ६१२ जण अबूधाबीमधील ज्या हॉटेलांमध्ये राहत होते त्या दोन्ही हॉटेलांना लॉकडाऊन करून सर्व लोकांची तपासणी केली गेली. अशा प्रकारे तात्काळ आपत्कालीन सेवा कार्यरत झाल्याने मोठे धोके टाळण्यात प्रशासन यशस्वी झाले.

तोवर काहीशा धिम्या गतीने वाढ होत असलेल्या रुग्णसंख्येमध्ये जेव्हा शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा समावेश झाला तेव्हा सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शाळांमध्ये मुलांमध्ये अंतर ठेवणे खूप अवघड असते. सर्व शाळाच बंद केल्याने मोठय़ा प्रमाणात होणारा करोनाचा प्रसार काही प्रमाणात रोखता आला.

इथल्या करोनाग्रस्तांमध्ये यूएईव्यतिरिक्त चीन, इटली, इराण, युरोपीय देश, इंग्लंड, अमेरिका, भारत, बांगलादेश, पाकिस्तान, फिलिपिन्स अशा असंख्य देशांच्या नागरिकांचा समावेश होता. हा व्हायरस जातपात, देश, धर्म काही न पाहता वेगाने मनुष्याचे जगणे कठीण करत होता. त्यामुळे एअरपोर्टवरील सतर्कता वाढवण्यात आली. जागोजागी ताप असलेल्या लोकांना शोधण्यासाठी थर्मल स्कॅनर बसवण्यात आले. हॉटेल्स, पब्स आणि पर्यटनस्थळे बंद केली गेली. सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि मेळावे रद्द करण्यात आले. इतकेच नाही तर मशिदींमध्ये- जिथे प्रार्थनेसाठी अनेक लोक एकत्र येतात, त्यादेखील बंद करण्यात आल्या. १७ मार्चपासून यूएईमध्ये येण्यासाठी लागणारा व्हिसादेखील रद्द केला गेला. त्यामुळे करोनाचा आंतरराष्ट्रीय प्रसार थांबायला मदत होत आहे.

२२ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, करोनाच्या ३३३ केसेस यूएईमध्ये आढळल्या आहेत. यातील ५२ रुग्ण बरे झाले असून, दोन मृत्यू नोंदवले गेले आहेत. सतत वर्दळ आणि गजबजाट असलेले हे शहर काहीसे शांत आणि स्तब्ध वाटू लागले आहे. पर्यटक गायब झाल्याने मॉल्स भकास दिसत आहेत. रेस्टॉरंट्स, दुकानांमध्ये जाऊन मनसोक्त खरेदी करणारे लोक ऑनलाइन शॉपिंगकडे वळताना दिसत आहेत. ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी दुकाने कार्यरत आहेत. सर्वासाठी पुरेसा साठा आहे. घरी पार्सल पोहोचवताना योग्य ती स्वच्छता पाळली जात आहे आणि कुणीही घाबरायची गरज नाही, अशा प्रकारची आश्वासने ई-मेलद्वारे पाठवून विक्रेते ग्राहकांना दिलासा देत आहेत.

अजूनही अनाकलनीय असलेल्या करोना या सर्वसंहारी आजाराचा युएईच्या अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. मात्र, त्याचा सर्वसामान्य माणसांना फार फटका बसू नये म्हणून अनेक कंपन्या आता पुढे येऊन मदतीचा हात पुढे करीत असल्याचे दिसत आहे. त्यात एमिरेटस् एअरलाइन या मोठय़ा एअरलाइन कंपनीने तिकिटे बदलताना घेतली जाणारी ‘चेंज फी’ पूर्णपणे माफ केली आहे. तसेच इतिहाद आणि एअर अरेबिया या एअरलाइन कंपन्यांनी फ्लेक्झिबल बुकिंगची सेवा उपलब्ध केली आहे. बाहेरून आलेल्या प्रवाशांवर १४ दिवसांची घरी राहण्याची सक्ती केली गेली आहे. या काळात अशा व्यक्ती बाहेर आल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात कायद्याने कारवाई केली जाईल असे जाहीर केले गेले आहे. बऱ्याच खासगी कंपन्यांनी घरून काम करण्याची परवानगी कर्मचाऱ्यांना दिली आहे. साहजिकच सर्व जण घरी असल्याने लोकांचे विजेचे, पाण्याचे बिल तसेच इतर खर्च वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन दुबई सरकारने बऱ्याच सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वीज आणि पाण्याच्या बिलावर तीन महिन्यांसाठी दहा टक्के सूट, नगरपालिकेच्या विविध शुल्कांमध्ये सवलत, छोटय़ा उद्योगांच्या परवाना फीमध्ये सूट इत्यादी लक्षवेधी निर्णय घेतले गेले आहेत. दुबई सरकारने शहरातील स्वच्छतादेखील वाढविली आहे. मॉलमधील शॉपिंग ट्रॉली पुन:पुन्हा साफ केल्या जात आहेत. मेट्रो किंवा बससारख्या सार्वजनिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. इतकेच नाही तर सगळ्या रस्त्यांचे र्निजतुकीकरण करण्याचे काम सुरू केले गेले आहे.

केवळ सरकारच नाही, तर इथले नागरिकसुद्धा मदतीला धावून येताना दिसत आहेत. एमिराती व्यावसायिक खलाफ अल हबतूर यांनी जाहीर केले आहे की, ते यूएईमध्ये करोनापीडित रुग्णांसाठी ५० अत्याधुनिक रुग्णवाहिका आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीयदृष्टय़ा सुसज्ज इमारत देणगीदाखल देणार आहेत. अल हबतूर यांनी करोना व्हायरसविरुद्धच्या लढय़ात जागतिक प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी वैद्यकीय संशोधनाकरता  विषाणू प्रयोगशाळा स्थापन करण्याचीदेखील घोषणा केली आहे.

येत्या काळात सुरू होणाऱ्या यूएई अंतराळवीर कार्यक्रमाकडे आणि ‘दुबई एक्सपो- २०२०’कडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याआधी या अचानक उद्भवलेल्या आपत्तीला सरकार, स्थानिक संस्था, उद्योजक, नागरिक सगळे एकत्रितरीत्या तोंड देताना दिसत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांना यशदेखील मिळताना दिसत आहे. उद्योजकांची संवेदनशील वृत्ती, सरकारने वेळेत घेतलेले निर्णय, स्वच्छतेबाबत लागू केलेले नियम आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे लवकरच करोनाविरुद्धची लढाई मनुष्य नक्कीच जिंकू शकेल यात काहीच शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:32 am

Web Title: coronavirus difficult operation corona in dubai dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाचा शिस्तबद्ध सामना (जपान)
2 वेळीच सावधानता! (नेदरलॅँड)
3 नव्या जीवनमूल्यांचे धडे (जर्मनी)
Just Now!
X