ऋतावरी मराठे – rutaono12@gmail.com

चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने सगळे जग आज आपल्या कवेत घेतले आहे. जग ठप्प करणे आजवर नैसर्गिक वा मानवी करणीलाही शक्य झाले नव्हते, जे करोनाने करून दाखवले. देशोदेशी करोनाने माजवलेला हाहाकार आणि तिथले शासन, प्रशासन आणि जनता त्याचा कशा तऱ्हेने सामना करीत आहे याचा प्रत्यक्षदर्शी हालहवाल! चीन, अमेरिका, दुबई, जपान, जर्मनी, नेदरलॅंडस् या देशांतील करोनाच्या सद्य:स्थितीवरील झोत..

फेब्रुवारीमधले कडाक्याच्या थंडीचे दिवस आणि त्यात या काळात दरवर्षी येणारी फ्लूची साथ जपानमध्ये अजिबात नवीन नाही. म्हणूनच या दिवसांत हात धुणे, गुळण्या करणे, खोकला झाला असल्यास मास्क वापरणे, ताप असल्यास सुट्टी घेणे हे नित्याचंच आहे.  बातम्यांमध्येही फ्लूच्या साथीची माहिती नियमितपणे दिली जाते. या सगळ्या पाश्र्वभूमीवर एक दिवस अचानक एका नवीनच शब्दाने सगळ्यांचे कान टवकारले..  करोना व्हायरस! वास्तविक सुरुवातीला हे इतकं गंभीर प्रकरण असेल असं कुणालाच वाटलं नाही.

३ फेब्रुवारीला योकोहामा बंदरावर अमेरिकन कंपनीचं एक आलिशान क्रूझ जहाज दाखल झालं. या जहाजातून काही दिवस अगोदर हॉंगकॉंगला उतरलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची बातमी आली. त्यामुळे हे जहाज पुढे न पाठवता त्यावरच्या प्रवाशांची चाचणी करायची असं ठरलं. त्यातूनच या जहाजावरील लोकांना प्रचंड मोठय़ा प्रमाणात करोनाची लागण झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. त्याचबरोबर या विषाणूच्या प्रसाराचा अतिप्रचंड वेग लक्षात आला. जवळपास १२ दिवस हा करोना विषाणू शरीरात काहीही परिणाम न दाखवता राहून झपाटय़ाने पसरतो, हे भीषण वास्तव समोर आलं.

यामुळे जपानी आरोग्य मंत्रालयाला समोर वाढून ठेवलेल्या संकटाची लख्ख जाणीव झाली. ताबडतोब या जहाजावरील रुग्णांना स्वतंत्र कक्षामध्ये हलवून उपचार सुरूझाले. मात्र, त्याचवेळी हा विषाणू बाहेरही पसरायला लागला होता.

नवीन वर्षांच्या सुटीच्या काळात चीनमधून प्रचंड मोठय़ा प्रमाणावर पर्यटक जपानमध्ये येतात. जपानी लोकसुद्धा डिसेंबरच्या शेवटी असलेल्या सुटीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बाहेर जातात. तोवर चीनने या नवीन विषाणूबद्दल अवाक्षरसुद्धा काढलेले नसल्यामुळे डिसेंबर व जानेवारी या काळात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर चिनी पर्यटक केवळ जपानमध्येच नाही, तर जगभर सर्वत्र फिरत होते.

९ जानेवारीला चीनमधल्या वुहानमधून जपानमध्ये आलेल्या एका चिनी माणसाला फ्लू झाला आणि तीच जपानमधली करोनाची सुरुवात होती. २० जानेवारीच्या आसपास जपानमध्ये राहणाऱ्या एका महिलेला या विषाणूची लागण होऊन फ्लू झाला. त्यावेळी सुरुवातीला अर्थातच नेहमीच्या साथीच्या फ्लूच्या प्रकारांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी हा विषाणू निराळा आहे हे लक्षात आलं. पण नवीन विषाणूची माहिती नसल्याने त्याचा शोध लागून तो लक्षात येईपर्यंतच्या आठवडय़ाभराच्या काळात अशाच नवीन विषाणूचे आणखीही पाचजण आढळून आले. यातील एक समान धागा म्हणजे ज्या महिलेला प्रथम हा करोना फ्लू झाला होता ती बस टूरची गाईड होती आणि ती चीनमधून आलेल्या प्रवाशांच्या बसमध्ये त्यांच्या संपर्कात होती. अशाच इतरांचा मागोवा घेताना या रोगाचा उगम लक्षात आला. तोवर चीनलासुद्धा तो लपवणे हाताबाहेर गेल्याने या विषाणूची माहिती द्यावी लागली.

परंतु एव्हाना जगातल्या अनेक देशांमधून हा विषाणू हातपाय पसरत होता. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे त्याच्या प्रसाराचा प्रचंड वेग! त्याचे अस्तित्व लक्षात येऊन त्याच्यावर काही उपाययोजना करेपर्यंत करोनाग्रस्तांचा आलेख भराभर वर चढत होता. जपानमध्ये पहिल्या आठवडय़ात बोटावर मोजण्याइतकी करोनाग्रस्तांची संख्या असताना पुढच्या आठवडय़ात त्यात एकदम चौपट वाढ झालेली दिसून आली.

जपानमध्ये या विषाणूचा अवतार प्रयोगशाळेत पाहण्यात आला. त्यातून या विषाणूभोवती काटेरी कवच असून त्याद्वारे हा माणसाच्या शरीरावर रोवून राहतो, तोंडावाटे घशात जाऊन तिथून फुप्फुसांपर्यंत पोचतो आणि त्यामुळे न्यूमोनिया होतो अशी माहिती बातम्यांमध्ये ऐकली. यात वयस्कर व्यक्ती किंवा उच्च रक्तदाब, दमा, मधुमेहाचे रुग्ण यांना जास्त धोका आहे अशी माहितीसुद्धा समोर आली.

हा विषाणू झपाटय़ाने पसरण्याची कारणं समजून घेऊन त्यानुसार उपाययोजना करायचं सरकारने ठरवलं. माणसाकडून माणसाकडे याचा प्रसार होत असल्याने बंदिस्त ठिकाणी करोना विषाणूचा प्रसार खूप लवकर होतो. या पाश्र्वभूमीवर कॉन्सर्टस्, सभा-समारंभ टाळण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलं.

स्पर्शातून होणाऱ्या प्रादुर्भावामुळे लोकांनी या विषाणूचा संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी काय उपाय करावेत याची मुद्देसूद माहिती बातम्यांमधून सतत देण्यात येते. आधी म्हटल्याप्रमाणे फ्लूची साथ या दिवसांत असतेच, त्यामुळे करायचे प्रतिबंधात्मक उपाय तर अत्यावश्यकच आहेत. कारण करोनाचा विषाणू हा याच कुळातला आहे. मुळात जपानमध्ये खोकला किंवा सर्दी असताना मास्क अतिशय नियमितपणे अगदी शाळकरी मुलांपासून मोठय़ांपर्यंत वापरला जातो. ‘खोकला एटीकेट’ ही संज्ञा जपानमध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे आपण जसे वागण्या-बोलण्याचे संकेत पाळतो, तसेच शिंकताना किंवा खोकताना समोरच्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे हासुद्धा एक मॅनर्सचाच भाग मानला जातो. पण करोनाच्या बातमीमुळे एक दुष्परिणाम असा झाला की, मास्कची खरेदी अतोनात झाल्यामुळे रातोरात मास्क संपून गेले. विषाणूच्या भीतीने लोकांनी गरजेपेक्षा जास्त मास्कचा साठा करायचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्या मास्क मिळेनासे झाले आहेत. त्यात काही अपप्रवृत्ती यातूनच जन्माला येतात; त्या म्हणजे- इंटरनेटवर सोन्याच्या भावाने मास्कविक्री सुरू झाली. पण जपान सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन इंटरनेटवरील मास्कविक्रीला आणि साठेबाजीला संपूर्ण बंदी केली. मोठय़ा प्रमाणावर एकत्र  येण्याचं टाळावं, गरज नसताना घराबाहेर जाऊ नये आणि गर्दी करू नये अशा सूचना सर्व नागरिकांना देण्यात आल्या आहेत. या कारणाने शाळा आणि महाविद्यालये यांना तात्पुरती सुट्टी देऊन केवळ प्रवेश परीक्षा आणि ग्रॅज्युएशन हे कार्यक्रम आवश्यक ते खबरदारीचे उपाय घेऊन पार पाडले गेले.

कॉर्पोरेटच्या बाबतीत जपानमध्ये ‘घरून काम’ ही संकल्पना आत्ता कुठे हळूहळू चर्चेत आली आहे. मात्र त्यासाठीची तयारी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हे करणे मोठय़ा प्रमाणावर शक्य नाही. त्यामुळे ऑफिसची जायची-यायची वेळ अर्धा किंवा एक तास मागेपुढे करून ट्रेन, बसमधली गर्दी कमी करणं, बिझनेस ट्रिप रद्द करून शक्यतोवर टेलिमीटिंगने काम करणं, जेवताना कॅन्टीनमध्ये दोन लोकांमध्ये अंतर ठेवून खुच्र्या मांडणं, जेवणाची वेळ मागेपुढे करून एकाच वेळी तिथे गर्दी होणार नाही याची काळजी घेणं हे उपाय केले जात आहेत. याशिवाय घर, ऑफिस अशा बंदिस्त जागी शक्य तेव्हा दारं, खिडक्या उघडून मोकळी हवा खेळती ठेवणं हासुद्धा प्रभावी उपाय आहे.

याशिवाय आरोग्य खात्याने दिलेली महत्त्वाची सूचना म्हणजे घसा दुखणे, ताप येणे अशी फ्लूची लक्षणं आढळल्यास लगेच दवाखान्यात धाव घेऊ नये. किंवा नुसती शंका वाटते म्हणून तपासणीसाठी जाणे हेसुद्धा अजिबात योग्य नाही. दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेऊन गर्दी केली तर तिथे विषाणूचा प्रादुर्भाव होऊन उलट रुग्णांची संख्या वाढेल आणि संसर्ग नसलेल्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे काही हेल्पलाईन दिल्या आहेत. त्यानुसार लक्षणं आढळल्यास तिथे संपर्क करून सल्ला घेणं योग्य आहे. याशिवाय परदेशप्रवास करून आलेल्या मंडळींनी पुढचे दोन ते तीन आठवडे रोज ताप मोजून नोंद करणं आवश्यक आहे. आणि करोना संसर्ग आढळला तर आरोग्य खातं त्या व्यक्तीची मागच्या दोन आठवडय़ांतली सगळी माहिती घेऊन संसर्गाचा उगम आणि त्याचा धोका असलेले इतर लोक यांचा मागोवा घेतं.

या सगळ्याचा अर्थातच समाजाच्या वेगवेगळ्या घटकांवर परिणाम झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा ऑलिम्पिकचं यजमानपद जपानकडे आहे. सद्य:परिस्थिती पाहता त्याच्या आयोजनाबद्दल फेरविचार करावा लागणार आहे.

याखेरीज लोक फारसे बाहेर जात नसल्याने अर्थव्यवस्था अशक्त होते आहे. शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट्स यांचा व्यवसाय मंदावल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कामावर गदा आली आहे. मार्चमध्ये जपानमध्ये साकुरा म्हणजे चेरीच्या फुलांचा बहर असतो. या काळात अनेक जत्रा, पर्यटन यामुळे खूप उत्साह असतो. यंदा हे सगळं नसल्यामुळे त्यावर मदार असलेले अनेकजण रोजगार गमावून बसले आहेत.

जपानमध्ये शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू होतं. मार्चमध्ये अचानक शाळा-महाविद्यालयं बंद झाल्याने मुलांना सक्तीने घरी राहावं लागतंय. एप्रिलमध्ये नवीन वर्षांची शाळा-महाविद्यालये  सुरू होणार का, ती नेमकी कधी होणार याबद्दल अजून निर्णय झालेला नाही. ज्या राज्यांमध्ये करोनाची लागण झालेली नाही त्यांनी सगळे व्यवहार पुन्हा सुरळीत करावे का, या विषयावर सध्या चर्चा चालू आहे.

एक मात्र नक्की, की जपानी जनतेने हे सगळं अतिशय धीराने घेतलं आहे. कोणताही कायदा, कडक र्निबध न लादतादेखील केवळ आवाहनाद्वारे जवळपास सगळ्या जनतेने सरकारला सहकार्य केलं आहे.

शेवटी मनापासून हे सांगावंसं वाटतं की, मला काही झालेलं नाही किंवा मी निरोगी असल्याने सुरक्षित आहे अशा भ्रमात काळजी न करणारे बेफिकीर लोकसुद्धा आजूबाजूला दिसतात. पण तुम्ही विषाणूचे वाहक असू शकता, त्यामुळे तुमच्याकडून दुसऱ्याकडे हा विषाणू पसरू नये यासाठी योग्य ती काळजी सर्वानीच घेऊ या.