03 March 2021

News Flash

मोकळे आकाश.. : कांचनमृग

मानवी मनाचं असं असतं की जे मिळालेलं नाही, पण दुरून खुणावतंय, तिकडे ते धाव घेतं.

करोनाच्या भयावह काळात येणाऱ्या प्रत्येक औषधाकडे आम्ही ‘सापडला रामबाण!’ म्हणूनच पाहायचो आणि काही दिवसांतच तो फुसका आपटबार निघायचा.

डॉ. संजय ओक – sanjayoak1959@gmail.com

डॉ. संजय ओक .. प्रख्यात सर्जन. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख. आयुष्य व्रतस्थतेनं रुग्णसेवेत व्यतीत करत असतानाच अचानकपणे उद्भवलेल्या सर्वसंहारी करोनाकाळाचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. या काळातील अनुभवांचं  मनमोकळं साप्ताहिक सदर..

मानवी मन आशेवर जगतं, हेच खरं.  करोनाच्या भयावह काळात येणाऱ्या प्रत्येक औषधाकडे आम्ही ‘सापडला रामबाण!’ म्हणूनच पाहायचो आणि काही दिवसांतच तो फुसका आपटबार निघायचा. पण मानवी मनाचं असं असतं की जे मिळालेलं नाही, पण दुरून खुणावतंय, तिकडे ते धाव घेतं. त्याची धड चौकशी नाही, त्याची व्याप्ती, परिणाम, परिमाण, प्रमाण कशाकशाचा साधा अंदाज नाही, आणि तरीही आम्ही ‘युरेका, युरेका’ म्हणून बाथरूममधून बिनाटॉवेलची धाव घेत राहतो. मानवी मनाला जे जे अतक्र्य, अगम्य आणि अप्राप्य असतं त्याचीच अनिवार ओढ लागते,  सगळ्या आशा त्यावर केंद्रित होतात आणि कधी एकदा तो इलाज सापडतोय, हेच मग एकमेव कोडं उरतं.

करोनाच्या बाबतीत हा प्रश्न पडायला कारण झालीय ती लसीची उगवती. खरं तर जगभरात दोनशेच्या आसपास कंपन्या त्यासाठी धडपडतायत. आणि ही शर्यत करोनाविरुद्ध न राहता एकमेकांशी ‘मार्केट मारण्या’साठी आहे की काय असा संभ्रम निर्माण होतो. ‘सबको लगता है हमींच पयले’ या गाण्यातल्या प्रसिद्ध ओळीसारखीच ही अवस्था. त्यातच भारतात तयार होणाऱ्या दोन नव्या लशींची भर पडली आहे. आत्मनिर्भरतेचा अभिमान आणि अप्राप्यतेशी हातमिळवणीचा आनंद अशा दुहेरी भावनांना आपण सामोरे जात आहोत.

यापूर्वीचा इतिहास पाहिला तर कोणताही नवा संसर्गजन्य रोग आल्यावर प्रतिबंधात्मक लस तयार व्हायला दीड-दोन वर्षांचा काळ गेला आहे. पण करोनाच्या बाबतीत ‘fast forwarding हा परवलीचा शब्द झाला आहे आणि Compassionate Grounds, Emergency usage ही समजूत आणि समझोता आहे. हे नुसतं forwarding नाही, तर खऱ्या अर्थानं fast forwarding आहे. उद्देश जीव वाचविण्याचा आहे, पण म्हणून अडथळे नजरेआड करून चालणार नाही.

लस कशी बनते आहे? ती  विषाणूच्या mRNA शी कशी द्वंद खेळणार आहे?  तिची परिणामकारकता किती आहे? नुसत्या antibodies नाहीत, तर Neutralising Antibodies चे प्रमाण त्यात किती असेल? त्या पहिला डोस दिल्यावर किती दिवसांनी तयार होतील? दुसरा डोस कधी द्यावयाचा? दोन की तीन आठवडय़ांनी? Antibodies किती काळ टिकतील? या काळात व्यक्तीला करोना होणारच नाही, की गंभीर करोना होणार नाही? व्यक्ती करोनामुक्त होणार असली तरी ती Infection spreader असेल का? लशीच्या रिअ‍ॅक्शन्स काय येतील? लस दिल्यावर किती लोकांना करोनासदृश ताप येईल? मज्जारज्जू व मेंदूवर काही विपरीत परिणाम होतील का?.. असे असंख्य प्रश्न आहेत- ज्यांची उत्तरं मिळालेली नाहीत, किंवा ती संदिग्ध आहेत. आणि तरीही साऱ्या जगभरात Vaccination frenzy ऊर्फ लसीकरणाचा मॅडनेस दिसतो आहे.

लस कोणाला अग्रक्रमाने द्यावयाची याचे शास्त्रीय संकेत आणि शासकीय धोरण काहीही असो; गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या व्ही. आय. पी.ज्ना आणि सर्वसामान्यांना ती आपल्याला लवकरात लवकर कधी मिळेल, हा यक्षप्रश्न पडला आहे. समाजातल्या वर्गविग्रहाचे प्रतििबब त्यात उमटू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. ‘लस घेणं’ हा २०२१ सालचा स्टेटस सिंबॉल असेल. ‘मी घेतली बरं का!’ हे दंडाच्या नसलेल्या बेटकुळ्या फुगवून सांगणारे महाभाग निघतील. लस घेतल्यावर काय काय होते याची रसभरित वर्णनं होतील. सोशल मीडियावर स्टोरीज्चा खच पडेल. या साऱ्यात तिखटमीठ लावलेल्या या कहाण्या एका शास्त्रीय सत्याला ललकारत आहेत याचं भान मात्र सुटू नये. शेजारच्या अण्णांच्या दूरच्या भाच्याला कशी severe reaction आली, हे वर्णन ऐकायला मिळेल. लसीच्या सीरिंज आणि सुईचा दुरुपयोग होत नाही ना, याची खबरदारी घ्यावी लागेल. लस आपल्याबरोबर येताना या साऱ्या उपआख्यानांना घेऊन येईल. तुम्ही ‘सीरम’ची, तर आम्ही ‘मॉडर्ना’ घेतली असं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचाही आटापिटा होईल. किंवा ‘तुम्ही कोणती घेतलीत? देशी, विदेशी की रशियन?’ असा विनोदही होईल.

लसीकरणाच्या या नादात शासकीय आरोग्यसेवा गुंतून पडेल आणि पोलिओसकट इतर काही लसीकरणांचे कार्यक्रम मागे न पडू देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कारण तसे झाल्यास भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

लस ही अशा रीतीने एक भारून टाकणारं रसायन ठरेल. लस आली तरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन या त्रिसूत्रीला दूर करता येणार नाही. काय गंमत आहे बघा- मास्क घातल्यावर आजार होत नाही, हे सप्रमाण सिद्ध झाल्यावरदेखील आम्ही कधी कधी कळत-नकळतपणे ते टाळतोय. पण जिची उपयुक्तता समाजात अजून पूर्णपणे सिद्ध व्हायची आहे त्या लशीवर मात्र आमचा भरवसा आहे. इतिहासात डोकावलो तर लक्षात येईल की, आम्ही अनेकदा हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावलो आहोत. मृगजळामागे धावण्यातच आम्ही धन्यता मानत आलो आहोत. कालानुरूप आणि प्रसंगानुरू प मृगजळं फक्त बदलली आहेत.

जाऊ दे, कांचनमृगाचा मोह प्रत्यक्ष सीतेलाही पडला, तिथे आम्ही तर मर्त्य मानव!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 7:00 am

Web Title: coronavirus medicine vaccine mokale akash dd70
Next Stories
1 अंतर्नाद : धर्मसंगीताची अफू
2 सात पिढय़ांचा अनवट, प्रदीर्घ प्रवास
3 ध्येयवादी स्त्री-डॉक्टरचे विलक्षण अनुभव
Just Now!
X