विश्वास अभ्यंकर – wishwas2610@gmail.com

चीनमध्ये सुरू झालेल्या करोनाच्या थैमानाने सगळे जग आज आपल्या कवेत घेतले आहे. जग ठप्प करणे आजवर नैसर्गिक वा मानवी करणीलाही शक्य झाले नव्हते, जे करोनाने करून दाखवले. देशोदेशी करोनाने माजवलेला हाहाकार आणि तिथले शासन, प्रशासन आणि जनता त्याचा कशा तऱ्हेने सामना करीत आहे याचा प्रत्यक्षदर्शी हालहवाल! चीन, अमेरिका, दुबई, जपान, जर्मनी, नेदरलॅंडस् या देशांतील करोनाच्या सद्य:स्थितीवरील झोत..

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूनं नेदरलॅंड्सचं दार अखेरीस २७ फेब्रुवारी २०२० ला ठोठावलंच. इटलीमधील लोम्बार्डी प्रदेशातून नुकत्याच परतलेल्या एका माणसामध्ये करोना विषाणूची चिन्हे दिसून आली आणि लगेचच इटली, चीन आणि दक्षिण कोरियातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश डच सरकार, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संस्था (RIVM) यांनी स्थानिक महानगरपालिकांच्या आरोग्य विभागांना दिले. परंतु ही केवळ सुरुवात होती. स्वत: सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यासक असून परिस्थितीचं गांभीर्य ध्यानात यायला मलाही वेळ लागला, तिथे इतर लोकांमध्ये याबद्दल जागृती होणं आणि तेही केवळ एका रोग्यामुळे- हे त्यावेळी अवघडच होतं. आणि दुर्दैवानं झालंही तसंच. नेदरलॅंड्समध्ये टिलबर्ग आणि ब्रेडा या शहरांमध्ये आयोजित केल्या गेलेल्या एका सोहोळ्यामुळे या विषाणूचा प्रसार सुरू झाला.

जसजसे करोनाबाधित रुग्ण वाढू लागले तसतसे सरकारने नियम बदलले आणि प्रत्येक वेळी जनतेला त्या नियमांबद्दल प्रसारमाध्यमांद्वारे माहिती दिली. सर्वात प्रथम साबणाने २० सेकंद हात धुवा, शारीरिक स्वच्छता पाळा आणि तुम्हाला सर्दी—खोकला असेल तर पूर्ण बरे होईस्तोवर घरीच राहा असे साधारण पहिल्या काही दिवसांतले आदेश होते. परंतु तरीही विषाणूचा प्रसार न थांबल्यानं कमीत कमी ६ एप्रिलपर्यंत (आणि आता कदाचित १ जून २०२० पर्यंत) घरून काम करणं  आणि मुलांच्या शाळा-महाविद्यालये, पाळणाघरे बंद करण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली. पंतप्रधान रुत यांच्या आदेशांचं तात्काळ पालन केलं गेलं. शिक्षणसंस्थांनी इंटरनेटद्वारे ऑनलाइन वर्ग घ्यावेत किंवा तास रेकॉर्ड करून मुलांना पाठवावेत अशी योजना केली गेली. त्यातही माध्यमिक शाळांवर भर दिला गेला; जिथे लवकरच मुलांच्या परीक्षा होणार होत्या. नोकरवर्गाला घरून काम करता येईल याची पूर्ण काळजी मालकवर्गानी घ्यावी अशी सूचना सरकारने केली. त्यानुसार माझा टीम लीडर स्वत: माझ्याकरता (आणि इतर काही सहकाऱ्यांकरता) लॅपटॉप आणि मॉनिटर घेऊन आला होता. या संपूर्ण काळामध्ये सर्वाचे ९०% पर्यंत पगार दिले जातील असेही सरकारने घोषित केले. माझ्या कंपनीने ज्यांना लहान मुले आहेत त्यांच्यावर रोजचे आठ तास काम झाले पाहिजे, हे बंधन ठेवलेले नाही. आरोग्य, सुरक्षा आणि इतर अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या लोकांनाच कामानिमित्त घराबाहेर जाण्यास परवानगी आहे. त्यांच्या मुलांचा दिवसभर सांभाळ करण्यासाठी वेगळी सोय केली गेली आहे, हे कौतुकास्पद आहे. माझासारख्याच इतर सर्वसामान्य नागरिकांना ‘आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका; आणि जर पडलात तर इतर लोकांपासून १.५ मीटर अंतर ठेवा..’ अशी सूचना करण्यात आली आहे. ‘साधा सर्दी-खोकला झाल्यास घाबरून लगेच डॉक्टरला फोन करायची गरज नाही; केवळ श्वसनाला त्रास झाला किंवा खूप काळ ताप राहिला तरच डॉक्टरला फोन करा आणि मगच दवाखान्यात जा..’ अशी सक्त ताकीद सर्वाना दिली गेली आहे.

‘गृहोपयोगी गोष्टींचा साठा करून ठेवण्याची गरज नाही.. जेणेकरून सर्वाना सर्व गोष्टी उपलब्ध होतील..’ असे रुत यांनी सांगूनदेखील लोकांनी सर्वप्रथम टॉयलेट पेपर, नंतर मांस व चीज आणि त्यानंतर कांद्यावर धाड टाकली. टॉयलेट पेपरचा ढीग घेऊन चाललेली माणसे बघून भारी मौज वाटली. सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे हशिश आणि गांजा कायदेशीर असणाऱ्या या देशात अशा संकटग्रस्त परिस्थितीत लोकांनी हे अमली पदार्थ विकत घेण्यासाठी आणि त्यांचा साठा करून ठेवण्यासाठीही ‘कॉफी शॉप्स’च्या बाहेर रांगा लावल्या होत्या.

मात्र आता सर्वसाधारणपणे गर्दी कमी झाली आहे. परिणामी रेल्वे व इतर दळणवळणाच्या साधनांमध्ये कपात करण्यात आली आहे. नेहमीचे गजबजलेले रस्ते ओस पडलेले पाहून भकास वाटतं. ‘रेल्वेने जात असाल तर तिकीट तपासनिसाच्या हातात तिकीट देण्याऐवजी स्वत: तुमचे तिकीट त्याच्याकडे असलेल्या मशीनवरून तपासून घ्या,’ अशी विनंती नागरिकांना केली जात आहे. अन्न वितरण (फूड डिलिव्हरी) करणाऱ्या माणसांना त्यांच्या कंपन्यांकडून ग्राहकांच्या दरवाज्यापाशी पार्सल ठेवून जाण्याचे आदेश मिळाले आहेत. सर्व आर्थिक व्यवहार शक्यतो कार्डने करण्याची विनंतीदेखील नागरिकांना केली गेली आहे. या सर्व विनंती व सूचनांमागचा हेतू एवढाच, की मनुष्यसंपर्क कमी व्हावा. आठवडा बाजारदेखील बंद आहेत. शंभरपेक्षा जास्त लोक एकत्र येतील अशा जागा व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्यामुळे रेस्टॉरंट्स, संग्रहालये, सिनेमा व प्रेक्षागृहे, समुद्रकिनारे तसेच वाचनालये इथे जाण्यास बंदी आहे. दरवर्षी साजरा होणारा पुस्तकांचा आठवडा, राजाचा वाढदिवसदेखील यावर्षी साजरे होणार नाहीत. या सर्व खबरदाऱ्यांच्या मागे सरकारचा विचार अतिशय साधा आहे. रोग्यांच्या संख्येत एकदम वाढ होण्यापेक्षा करोना विषाणूचा प्रसार कमी व्हावा, म्हणजे हा विषाणू उत्तम प्रतिकारशक्ती असणाऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत पीडित रुग्ण बरे होतील आणि आरोग्य सेवांवरचा भार कमी होईल व एकंदर समाजाची रोगप्रतिकारक शक्ती (ग्रुप इम्युनिटी) वाढेल.

तथापि चांगलं हवामान असेल तर घराबाहेर पडण्याचा मोह लोकांना आवरत नाही आणि अचानक कधी कधी गर्दी होते. दुर्दैवाने त्याचा परिणाम म्हणून इथे रुग्णांची संख्या आता ६००० च्या वर गेली आहे आणि यामध्ये रोज कमीत कमी ५०० रुग्णांची वाढ होते आहे.

नेदरलॅंड्ससारख्या कमी लोकसंख्येच्या देशातही जर अशी अवस्था होत असेल तर भारतामध्ये किती हाहाकार माजेल याची कल्पनाच करवत नाही. म्हणून सर्व भारतीयांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून, पण घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं आणि त्यांनी दिलेल्या सर्व आदेशांचं तंतोतंत पालन करावं, त्यातूनच या संकटावर मात करणं सोपं जाईल अशी कळकळीची विनंती.