डॉ. अविनाश सुपे – avisupe@gmail.com

करोनाने सध्या सर्वत्र विक्राळ स्वरूप धारण केले आहे. महाराष्ट्र आणि मुंबईही यास अपवाद नाही. तथापि शासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याच्याशी दोन हात करण्याची सिद्धता केली आहे आणि त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. मात्र, एक गोष्ट आता आपण लक्षात घ्यायला हवी, की आपल्याला यापुढे करोनासोबत जगायचे आहे. त्यासाठी आवश्यक ते बदल आपल्या जीवनशैलीत करावे लागतील. मुख्य म्हणजे आपल्या सार्वजनिक आरोग्यसुविधा अत्याधुनिक आणि सक्षम करणे याकरता अत्यंत निकडीचे झाले आहे.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत

आज सर्वत्र करोनाबद्दल चर्चा व चिंता आहे. महाराष्ट्रात, प्रामुख्याने मुंबई व सभोवतालच्या परिसरात करोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतील करोनाच्या केसेस इतर शहरांपेक्षा जास्त आहेत. याची अनेक कारणे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रवासाचे व व्यवसायाचे मुख्य केंद्र आहे. मुंबईमध्ये ५०% पेक्षा जास्त जनता ही झोपडपट्टीवजा घरांत राहते आणि तिथे लोकांना दाटीवाटीने राहावे लागते. तिथे एका छोटय़ा घरात अनेकदा ८ ते १० व्यक्ती राहतात. अशा ठिकाणी सामाजिक विलगीकरण करणे कठीण असल्याने करोनाचा प्रसार तिथे वेगाने होऊ शकतो. जानेवारीत केरळमध्ये तीन रुग्ण सापडले तेव्हा आपल्याला असे वाटले होते की इबोला व निपाह हे विषाणू जसे आपल्या मुंबईत आले नाहीत, तसेच या विषाणूचाही आपल्याला फारसा त्रास होणार नाही. परंतु जेव्हा १० मार्चच्या सुमारास प्रथम पुण्यात व नंतर मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण दिसू लागले तेव्हा या आजाराचे रौद्र स्वरूप आपल्या लक्षात आले. सरकारने पहिले दोन-चार दिवस अंदाज घेऊन लॉकडाऊन महाराष्ट्रात प्रथम सुरू केला. या लॉकडाऊनमुळे करोनाचा उद्रेक नक्कीच कमी झाला. अमेरिका, युरोप व इतर देशांच्या मानाने आपल्या इथे करोनाबाधित रुग्णसंख्या व त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असण्याचे हे एक कारण आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांमुळे आरोग्य क्षेत्रावर जेवढा ताण अपेक्षित होता, तेवढा आला नाही. खरे तर लॉकडाऊनमध्ये सरकारच्या सूचनांचे सर्वानी तंतोतंत पालन करणे आवश्यक होते. परंतु काही भागांत या काळात काही सामाजिक, धार्मिक प्रथा-परंपरा असतील किंवा थोडासा बेफिकीरपणाचा भाग असेल; सामाजिक विलगीकरण करायला अपेक्षित होते तेवढे पाळले गेले नाही. सुरुवातीस आंतरराष्ट्रीय प्रवाशांनीही योग्य सूचना देऊनसुद्धा त्यांनी त्या पाळल्या नाहीत. त्यामुळेच करोना-रुग्णांची संख्या काही विभागांत वाढायला लागली. तसेच काही asymptomatic रुग्णांद्वारे करोनाबाधितांची संख्याही वाढली. करोनाच्या टेस्ट करण्याची सेवासुविधा सक्षम करण्यातही काही काळ गेला.

मुंबईची आणखीही एक समस्या आहे. रुग्णालयांत आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सरकारी तसेच इतर कर्मचारी हे मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये (वसई, विरार, कल्याण, डोंबिवली) राहतात. त्यांच्या तसेच अन्य काही लोकांच्या चलनवलनातून हा आजार मुंबई व आजूबाजूच्या परिसरांत पसरला. त्यामुळे सरकारने योग्य वेळी बरेच चांगले निर्णय घेऊनही वाढती रुग्णसंख्या ही आता एक चिंतेची बाब बनली आहे. यातील जमेची बाजू अशी की, सुरुवातीस प्रमाणापेक्षा जास्त असलेला मृत्युदर आता काहीसा आटोक्यात आला आहे.

सरकारने घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांमध्ये विविध ठिकाणी तयार केलेले विलगीकरण कक्ष ( जिथे asymptomatic करोना रुग्णांना वेगळे ठेवले जाते.), सेव्हन हिल्स, नायर, केईएम, सायन, सेंट जॉर्जेस यांसारखी अनेक रुग्णालये करोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी सज्ज करणे, करोनाच्या रुग्णांसाठी जास्त खाटांची सोय करणे तसेच नवीन प्राणवायू स्टेशन्सची व्यवस्था करणे या गोष्टी प्राधान्याने आहेत. या सर्व तयारीव्यतिरिक्त फारच कमी माहिती उपलब्ध असलेल्या या नवीन आजारावरील उपचारांसाठी मार्गदर्शक सूचना व नियमावली तयार केली गेली. तसेच या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांच्या तीव्रतेनुसार त्यांना विविध रुग्णालयांत पाठवण्याची सुविधाही निर्माण केली गेली. गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या वाढत चालल्याने या सर्व व्यवस्थेवर कमालीचा ताण पडत आहे. परंतु त्याच वेळी नवी अधिक व्यवस्था करण्याची प्रक्रियाही जोमाने सुरू आहे. या आजारातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करीत आहेत. त्यामुळे त्या माहितीच्या आधारे उपचार पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल केल्याने रुग्णांनाही त्याचा फायदा होत आहे. मुंबईतही सरकारच्या पुढाकाराने सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन उपचार पद्धतीत एकवाक्यता आणली आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे आज केईएम, नायर यांसारख्या सरकारी रुग्णालयांतसुद्धा अत्यंत महागडी औषधे रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत व त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. मृत्युदर कमी होण्याचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. इतर देशांच्या मानाने आपल्या देशात, विशेषत: महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यानेच आपल्याकडील करोनाचा प्रसार कमी आहे. सुरुवातीस असलेला मृत्युदर कमी करण्यातही सरकारला चांगलेच यश लाभले आहे. रुग्णांची संख्या जरी वाढली तरी मृत्यूचे प्रमाण कमी असावे यासाठी सर्वच जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.

जागतिक स्तरावर व्यापक विचार केला तर गेल्या काही दशकांत तापमानातील बदल, निसर्गाचा ऱ्हास, अँटिबायोटिक्सचा होणारा अतिवापर यामुळे निसर्गातील विषाणू व जीवाणूंचे संतुलन बदलेले आहे व जगातील आजारांचे वेगळेच समीकरण तयार झाले आहे. पूर्वी समाजात प्रामुख्याने प्लेग, कॉलरा, आमांश इत्यादी आजार प्रचलित होते. गेल्या काही वर्षांत त्यांची जागा विषाणूंच्या आजारांनी घेतली. त्यामुळेच डेंग्यू, सार्स, इबोला, निपाह किंवा झिका इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव अलीकडच्या काळात जास्तकरून दिसून येतो. ‘कोविड १९’चाही उद्रेक यामुळेच झाला असण्याची शक्यता अनेक संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या उद्रेकास एका अर्थी आपण सर्वच जण जबाबदार आहोत का, असा प्रश्न मनात येतो. यावरही सर्वागीण विचार करून, आपल्या काही गरजा व सवयी बदलून आपण निसर्गाचे संतुलन कायम ठेवले पाहिजे.

पुढे काय होणार?

या करोना संकटामुळे मुंबईचे भवितव्य कसे असेल, हा प्रश्न प्रत्येकास भेडसावत आहेत. करोनाचा प्रसार यापुढे कसा होईल याबद्दल तज्ज्ञांकडून विविध अंदाज मांडले जात आहेत. काहींच्या मते, जून १५ पर्यंत रुग्णसंख्या व मृत्यूदर उच्चांक गाठेल व मग तो हळूहळू कमी होत जाईल. काहींच्या मते, पुढील चार-सहा महिने तरी कमी प्रमाणात करोना मुंबईत राहील. लस किंवा प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध झाली तर हा कालावधी कमी होईल. करोनाबरोबरचा आपला प्रवास लांबचा आहे, म्हणूनच करोनासारख्या रोगासमवेत सहजीवनासाठी आपण सर्वानी मनाची व इतर गोष्टींची तयारी केली पाहिजे.

करोनासमवेत सहजीवन..

सर्वप्रथम आपण सर्वानी वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे. यामध्ये घरातून बाहेर पडताना योग्य पद्धतीने मास्क लावणे, कुठे उगाचच कुठल्याही वस्तूंना स्पर्श न करणे, सामाजिक विलगीकरण पाळणे, समारंभ किंवा जनसमुदाय टाळणे, जोरात न बोलणे, दर दोन तासाने हात साबणाने किंवा सॅनिटायझर्सने धुणे आणि शक्यतो घरून काम करणे या गोष्टींचा समावेश करायला हवा. पुढील काळात जर आपल्याला करोनाची रुग्णसंख्या व मृत्युदर आटोक्यात ठेवायचा असेल तर हे आवश्यकच आहे. एखाद्या व्यक्तीला जर करोनाबाधा झाल्याची शंका असेल तर त्याने ताबडतोब जवळच्या आरोग्य संस्थेकडे त्वरित धाव घ्यावी. अशा वेळी तपासणी केल्यानंतर उडश्कऊ  चे निदान झाल्यास त्याच्या लक्षणांनुसार, वय व इतर व्याधींचा विचार करून रुग्णांचे वर्गीकरण केले जाते. नंतर त्यांना विलगीकरण कक्ष किंवा रुग्णालयांत दाखल करून घेतले जाते. साधारणत: ५० टक्के  रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नसतात. आणखीन ३५% रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात. यातले बहुतांशी रुग्ण हे बरे होतात. फक्त वयस्कर, मधुमेह, रक्तदाब वा हृदयविकार असलेल्या रुग्णांना जास्त धोका असतो. त्यांच्यासाठी सरकारने खास व्यवस्था केली आहे.

गेल्या ५० वर्षांत संपूर्ण जगात व आपल्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत. तंत्रज्ञान, संगणक, संप्रेषण तसेच समृद्धी यामुळे आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्यात सुबत्ता आली आहे व आयुष्य खूप सुकर झाले आहे. परंतु आजघडीला आपण गेल्या काही दशकांपेक्षा अनिश्चित काळात जगत आहोत. प्रदेशांच्या सीमा बंद आहेत. शाळा-कॉलेजेस रिकामी आहेत. रुग्णालयांत गर्दी आहे. गेले अनेक आठवडे घरांमध्ये लोक बंदिस्त आहेत. आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा जबरदस्त फटका बसलेला आहे. अगदी लॉकडाऊन काही दिवसांनी उठवला तरीही काही र्निबध हे राहणारच आहेत. त्यामुळे या परिस्थितीत आपले कामकाज, जीवनशैली व व्यवसाय यामध्ये करोनासह कसे जगता येईल याचा विचार आपण आता केला पाहिजे. शिक्षणामध्ये ऑनलाइन वर्ग, कार्यालयीन कामकाजांत व्हिडिओ मीटिंग्ज, डॉक्टरांशी टेलि-कन्सल्टेशन, याबरोबरच बिघडलेली अर्थव्यवस्था कशी सुधारता येईल याचाही विचार आपण केला पाहिजे.

करोना संकटात आपण अनेक चांगल्या-वाईट गोष्टी पाहिल्या. अनुभवल्या. स्वत:चे काम स्वत: करणे, गरजा कमी करणे तसेच बऱ्याच बाबतींत आत्मनिर्भर कसे व्हायचे, ते करोनाने आपल्याला शिकवले. आरोग्य क्षेत्रात तर सर्व संशोधक, तज्ज्ञ एकत्र येऊन ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे जिंकू करोना’ या भावनेने काम करत आहेत. कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी खरोखरच कठोर परिश्रम करणारे साहाय्यक, पोलिसांना व रुग्णालयांमध्ये मास्कवाटप करणारे लोक आणि आसपासच्या क्षेत्रातील गरजू लोकांना मदत करणारे तरुण हेही मानवतेचे रूप आपण या काळात पाहिले. त्याचबरोबर करोना विषाणूची लागण होण्याची भीती बाळगून एखाद्या व्यक्तीचा मृतदेह उचलण्यास व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुणी तयार होत नाहीत हेदेखील या काळात दिसले. अशा भीषण परिस्थितीतही काही राजकारणी एकमेकांशी भांडण करीत आहेत आणि परस्परांना दोष देत आहेत. सामान्य लोकांच्या भल्यासाठी  लढण्याऐवजी सद्य:परिस्थितीचा लाभ आपले राजकारण करण्यासाठी घेत आहेत.

करोनाच्या या काळात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्या आपण चालू ठेवल्या पाहिजेत. परंतु यानिमित्ताने एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात आली, ती म्हणजे आपल्या देशातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. गेल्या काही दशकांमध्ये आरोग्य क्षेत्रात खाजगी रुग्णालये वाढली व सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कमकुवत झाली. काही ठिकाणी तर ती पार कोलमडली. मुंबईची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था तशी देशाच्या मानाने खूप चांगली आहे. तथापि या काळात आरोग्यव्यवस्थेचा बहुतांशी भार हा सरकारी रुग्णालयांनीच घेतल्याने त्यांच्यावर खूपच ताण आला. अशाही परिस्थितीत सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्यसेवक व अत्यावश्यक सेवेतील अन्य कर्मचारी (यांत पोलीस, बँक, महानगरपालिका, बेस्ट कर्मचारीही आलेच.) यांनी जबाबदारीने काम केले याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले आहे की, देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी एकूण जीडीपीच्या १०% रक्कम खर्च करण्यात येणार आहे. हे स्वागतार्ह आहेच; परंतु पुढील विचार करताना सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिकाधिक कशी सक्षम करता येईल याचा प्राधान्याने सखोल विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा देशात आरोग्य संकट येते तेव्हा हीच सार्वजनिक आरोग्यव्यवस्था त्याविरोधात लढण्यासाठी खंबीरपणे उभी राहते. तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नवीन अद्ययावत रुग्णालये उभारणे, रुग्णालयांतील सर्व रिक्त पदे त्वरित भरणे, लोकांसाठी आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे याकरता सरकारने युद्धपातळीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे आणि हीच येणाऱ्या काळाची पहिली गरज आहे. ज्या देशांत किंवा राज्यांत अशी सक्षम आरोग्यव्यवस्था आहे तिथे करोनावर लवकर मात करणे शक्य झाले आहे. सुदैवाने आज आपल्याकडे अनेक वैद्यकीय महाविद्यालये आहेत व उपयुक्त मनुष्यबळही उपलब्ध आहे. परंतु इतर सुविधा व साथीच्या रोगांचा कसा सामना करावयाचा याचे प्रशिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे.

दृष्टिकोन बदलण्याची गरज

सर्वात महत्त्वाचे म्हणजे करोनाबद्दल आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. अशा साथीत आरोग्यसेवक, डॉक्टर, नर्सेस किंवा सामान्य जनता यांची काय भूमिका असते? गेल्या काही दिवसांत रुग्णालयांत काम करताना किंवा इतर ठिकाणी करोनाबद्दल कमालीच्या भीतीचे वातावरण आहे. एखादी तरुण व्यक्ती साथीच्या रोगात एकाएकी मृत्युमुखी पडली की अशा बातम्या ऐकून भीती वाटणे साहजिकच आहे. १९९९ च्या कारगिल युद्धाबद्दल अनुभव लिहिताना एका जवानाने लिहिले आहे.. ‘आम्हाला माहीत नव्हते की गोळ्या कुठून येत आहेत. आम्ही शत्रूला पाहू शकत नव्हतो. आमच्याकडे आयुधे अपुरी होती. प्रचंड थंडी होती. तरीही अत्यंत प्रखर इच्छाशक्ती, कौशल्य व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ‘ऑपरेशन विजय’मध्ये आपण यश मिळवले. तशीच आज आपल्याला या करोनारूपी शत्रूची संपूर्ण माहिती नाही. आवश्यक त्या साधनांची गरज आहे व परिस्थिती चिंताजनक आहे. परंतु सकारात्मक भावनेने व एकमेकांच्या साहाय्याने करोनाशी लढत दिली पाहिजे. आजही अनेक तरुण डॉक्टर तहानभूक, झोप, कुटुंब सर्व विसरून अहोरात्र   मेहनत करत आहेत. अशा वेळी जेव्हा आजूबाजूला मृत्यू होताना दिसतात आणि आरोग्यसेवकांनाही त्या विषाणूची लागण होते तेव्हा साहजिकच मनात उदासीनताही डोकावू लागते. परंतु जेव्हा आजूबाजूला लोकांची हतबलता, दु:खं दिसू लागतात तेव्हा आरोग्य क्षेत्रातील सर्व व्यक्ती एकत्र येऊन त्या साथीविरोधात अविश्रांतपणे ईष्र्येने लढा देतात. अमेरिकेतील एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले की, ‘सुरुवातीस आमचे सगळे निवासी डॉक्टर या साथीच्या रोगाला घाबरून गेले होते. काम करण्यास टाळत होते. परंतु जेव्हा न्यूयॉर्कमध्ये प्रत्येक रुग्णालयात अनेक मृत्यू झाले तेव्हा तेच डॉक्टर तळमळीने, सर्वस्व पणाला लावून आज लढत आहेत. त्या डॉक्टर पुढे म्हणाल्या, ‘या सर्व मुलांना मी एकदम मोठे झालेले पाहिले.’

अशा साथीच्या रोगामुळे डॉक्टर, नर्सेस व इतरांचा आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतो. मुंबई शहरावर आलेल्या अनेक संकटांच्या वेळी लोकांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्या परिस्थितीत मानवतेचे एक वेगळेच रूप दाखवून दिले आहे. समोर धोका दिसत असूनही आपला जीव पणाला लावून समाजातील गरजू व्यक्तींना वाचवणे हेच खरे समर्पण होय. आणि तिथेच मानवतेचे खरे रूप दिसते.

हल्ली ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ टीव्हीवर पुन्हा दाखवले जात आहे. महाभारतात युद्धाच्या वेळी अर्जुन संभ्रमावस्थेत पडला होता. त्याने कृष्णाला सांगितले, ‘अहं युद्धं न करोमि.’ त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला धर्मयोगाबरोबरच कर्मयोगाचेही पालन करायला सांगितले, हे सर्वज्ञात आहेच. मुंबई ही आपल्या देशाची शान आहे. बॉम्बस्फोट, दंगली, महापूर, पावसाळी आजार अशा अनेक संकटांना आजवर सामोरे जाऊन मुंबई व मुंबईची जनता विजयी झालेली आहे. सरकारी यंत्रणा, आरोग्यव्यवस्था व इतर कर्मचारी आपले प्राण पणाला लावून आज एक घनघोर लढाई लढत आहेत. आपण सर्वानी त्यांना सहकार्य व आधार देऊन या युद्धपरिस्थितीवर मात करण्यात यशस्वी होऊ या. मुंबईचा सन्मान राखू या.