News Flash

‘मुक्त विद्यापीठा’चं नसणं..

६ डिसेंबर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा महापरिनिर्वाण दिन हे समीकरण मुंबईला नवीन नाही.

‘कोविड १९’ या साथजन्य आजारामुळे आपणा सर्वाच्या सार्वजनिक जीवनाचा अवकाश गेला काही काळ बऱ्याच प्रमाणात संकोचला गेला आहे.

पद्माकर कांबळे – lokrang@expressindia.com

यंदा करोनाच्या महासंकटामुळे आज (६ डिसेंबर) रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन बाबासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या लाखो अनुयायांना करण्यात आले आहे. त्याच्या सामाजिक-वैचारिक परिणामांची चिकित्सा करणारा लेख..

६ डिसेंबर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा महापरिनिर्वाण दिन हे समीकरण मुंबईला नवीन नाही. त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून स्वयंस्फूर्तीने येणारे लाखो अनुयायी हे चित्र दरवर्षीचेच! परंतु ‘कोविड १९’ या साथजन्य आजारामुळे आपणा सर्वाच्या सार्वजनिक जीवनाचा अवकाश गेला काही काळ बऱ्याच प्रमाणात संकोचला गेला आहे. त्याचे परिणाम वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात, तसेच सण- समारंभ, धार्मिक उत्सवांवर होणे अपरिहार्यच! मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांवरही याचा परिणाम होणेही स्वाभाविकच.

शासकीय यंत्रणांनी अगोदरच ‘या वर्षी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमी परिसरात येऊ नये, घरूनच या महामानवाला अभिवादन करावे’ असे आदेशवजा आवाहन केले आहे. या आवाहनाला अनेक सामाजिक संघटनांनी व आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या वर्षी पहिल्यांदाच दादरचा चैत्यभूमी परिसर ५ व ६ डिसेंबर रोजी मोकळा असेल. तिथे नेहमीचा जनसमुदाय दिसणार नाही.

वरवर पाहता ही एका अनन्यसाधारण परिस्थितीत घडलेली साधारण घटना वाटेल; पण तिच्या अंतरंगात अनेक सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ दडलेले आहेत.

इथे येणारे कोण आहेत? तर डॉ. आंबेडकरांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन दलित, शोषित, आदिवासी, कामगार आदी व्यवस्थेशी संघर्षरत असणारा समाजघटक प्रामुख्याने त्यात आहे. दादर स्थानकातील आंबेडकरवादी अनुयायांच्या गर्दीकडे पाहणाऱ्यांच्या मनात ‘एवढे लोक जमण्याइतके इथे काय असते?’ हे कुतूहल तरी असते किंवा या गर्दीकडे पाहून नाराजी व्यक्त करणारे, पूर्वग्रह मनात बाळगून शेरेबाजी करणारे लोकही असतात.

कुंभमेळ्याला गंगा नदीच्या घाटांवर उसळणारी गर्दी अथवा पंढरपूर यात्रेनिमित्त चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांच्या होणाऱ्या गर्दीकडे समाज (या प्रसंगी होणाऱ्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करत) ज्या श्रद्धाभावनेनं पाहतो तो भाव महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर-शिवाजी पार्क परिसरात होणाऱ्या गर्दीकडे पाहताना नसतो!

वीस वर्षांपूर्वी शिवाजी पार्क आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी ६ डिसेंबरच्या दोन-तीन दिवस अगोदर स्वत:हून आपण राहतो त्या घराची/ इमारतीची टाळेबंदी करून घेणे, सामाजिक अंतर पाळणे अन् आपली ही कृती जास्तीत जास्त सामुदायिक व सार्वजनिक कशी होईल हे कटाक्षाने पाहणे, हे दरवर्षी ठरलेले असायचे. हे ‘गैरसोयीचे सत्य’ ६ डिसेंबरनंतरच्या पुढील दोन-तीन दिवसांतील वर्तमानपत्रांत वाचकांच्या पत्रव्यवहारातून प्रकटायचे! आता त्याची जागा समाजमाध्यमांतील कुचाळक्यांनी घेतली आहे.

‘या वर्षी ६ डिसेंबर नाही!’ म्हणून अनेक जण मनोमन सुखावले असतील. हा मनोमन सुखावणारा वर्ग अशा वर्गाचा भाग आहे, जो कोविड-१९ मुळे लागू असलेल्या टाळेबंदीत दणक्यात सार्वजनिक गणेशोत्सव झाला नाही, नवरात्रोत्सवात डीजेच्या तालावर गरबा झाला नाही, यात्रा-जत्रा नाही म्हणून हळहळणारा आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणारा जनसमुदाय इथे गेली ६३ वर्षे सातत्याने येतो आहे. जुन्या-नव्या पिढीतील, सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष, मुलं-मुली, मुंबई-महाराष्ट्राबाहेरील अमराठी भाषिक मंडळी इथल्या नजरांना व वर्तनाला सरावली आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या जनसमुदायाला हे माहीत आहे की, आपल्या येथे लाखोंच्या संख्येने येण्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत असेल! पण त्याला येथे येणे भाग आहे. या जनसमुदायाकडे श्रद्धेचा भाग म्हणून अथवा विभूतीपूजेचा भाग म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.

या वर्षी महापरिनिर्वाण दिन/ ६ डिसेंबर नाही म्हणजे नेमकं काय नाही, हे मुंबईकरांना जाणवेल का?

इथे जमणारी गर्दी ही वास्तव भारताचे प्रातिनिधिक रूप आहे. हाच तो कष्टकरी बहुजन समाज आहे; जो कोविड-१९ मुळे तडकाफडकी लागू केलेल्या जगातील सर्वात कठोर आणि निष्ठुर टाळेबंदीत घर गाठण्याच्या ओढीने हजारो मैल अंतर भर उन्हात पायी तुडवत गेला! या प्रयत्नांत कोणी रस्त्यात, कोणी रेल्वे रुळांवर आपला जीव गमावला. आणि ज्यांनी कसंबसं घर गाठलं, त्यांना ‘सामाजिक अंतरा’च्या नावाखाली गावकुसाबाहेर राहावं लागलं. पोलिसांच्या लाठय़ा खाव्या लागल्या. भररस्त्यात समूहाने बसवून अग्निशमन दलाच्या पाइपाने र्निजतुकीकरणाच्या नावाखाली केलेली विषारी कीटकनाशक फवारणी अंगावर घ्यावी लागली. हाच तो समाज आहे, ज्यांची मुलं-मुली गेले आठ महिने ‘ऑनलाइन’ शिक्षणाच्या नावाखाली वास्तवात ‘शाळाबा’ झाली आहेत.

डॉ. आंबेडकरांनी शतकानुशतके अपमान व अन्याय सोसणाऱ्या लाखो गरीब आणि निरक्षर लोकांना स्वाभिमानाने जगण्यास तसेच अन्याय आणि अत्याचार यांच्याविरुद्ध लढण्यास शिकवले. डॉ. आंबेडकरांविषयी अपार आदर बाळगणाऱ्या खेडय़ापाडय़ांतील लाखो गरीब अनुयायांची दु:स्थिती आजही फारशी बदललेली नाही. तरीही ‘आंबेडकर’ या नावाभोवती असलेली ताकद आणि वलय यातून खेडय़ापाडय़ांतील डॉ. आंबेडकरांचे अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर स्वत:साठी एक जागा शोधण्याचा, स्वत:ची एक नवी ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात. निळा रंग, पंचशील ध्वज, अशोकचक्र, गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या मूर्ती- प्रतिमा- प्रतीकांचा ते यासाठीच आधार घेतात.

सुसंघटित नेतृत्वाचे वैचारिक अधिष्ठान नसतानाच्या आजच्या काळात प्रबोधन परंपरेचा वैचारिक वारसा टिकवायचा की अस्मितावादच वाढवायचा, हा प्रश्नदेखील याच परिसरात ठायी ठायी दिसतो. चैत्यभूमी- शिवाजी पार्कच्या परिसरात जमलेल्या जनसागरामध्ये कायम त्या-त्या वेळच्या सामाजिक, राजकीय विचारांचे प्रतिबिंब पडलेले जाणवते. विविध पुरोगामी संघटनांतर्फे केली जाणारी पथनाटय़े, कविसंमेलने, शाहिरी जलसे, गायन पार्टी, पत्रके आदींमधून याचे प्रतिबिंब उमटत असते.

इथली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या किंवा आंबेडकरी चळवळीला नव्या दिशा देणाऱ्या प्रबोधन परंपरेचा वारसा सांगणाऱ्या पुस्तकांची विक्री! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहून परत जाताना या ठिकाणी आलेले अनुयायी एक तरी पुस्तक येथून घेऊन जातात. इथे येणाऱ्या अनेक स्त्रियांच्या हाती पुस्तकं दिसतात, ती त्या चाळतानाही दिसतात, हेही विशेष! केवळ डॉ. आंबेडकरांच्याच नव्हे, तर प्रबोधनकार ठाकरे, राहुल सांकृत्यायन ते आ. ह. साळुंखे, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या पुस्तकांना एकाच दिवशी सर्वाधिक मागणी असण्याचा प्रसंग हाच असतो. शिवाजी पार्कमध्ये शेकडो लहान-मोठय़ा, नामांकित वा नव्या प्रकाशन संस्थांचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील पुस्तकांचे स्टॉल्स असतात. ५ आणि ६ डिसेंबर या दोन दिवसांत दरवर्षी येथे किमान एक कोटीची पुस्तकविक्री होते. विशेषत: उत्तर भारतातील पंजाब आणि उत्तर प्रदेश अन् दक्षिण भारतातील तमिळनाडू येथूनही आता पुस्तक विक्रेते येतात. इथे अशी पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ विक्रीस असतात, की जे एरवी वाचकाला, अभ्यासकाला शहरांतील इतर नामांकित पुस्तकांच्या दुकानात सहज मिळणार नाहीत. काही दुर्मीळ पुस्तके इथे अचानक कुठल्या तरी पुस्तकाच्या स्टॉलवर नजरेस पडतात. विचारवंत नेत्याची स्मृती विचारातून आणि अभ्यासातून जपणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच असते.

‘सरकारी प्रकाशने वाचतो कोण?’ असा प्रश्न कुणालाही पडेल; पण शिवाजी पार्क परिसरातील सेनापती बापट चौकात महाराष्ट्र शासनाच्या चर्नी रोड येथील शासकीय मुद्रणालय प्रकाशनाच्या ट्रक भरून आणलेल्या पुस्तकांची ६ डिसेंबर या एकाच दिवसात तडाखेबंद विक्री होते. यात महात्मा फुले समग्र वाङ्मय ते भारतीय संविधानाची प्रत यांना सर्वात जास्त मागणी असते. शासकीय, निमशासकीय विभागांचे स्टॉल्स, त्याचबरोबर बँका, खासगी आस्थापने यांचे स्टॉल्स आपल्या परीने संबंधित विभागांची कामे पत्रके, हस्तपुस्तिका यांच्या माध्यमातून जनतेला माहिती करून देत असतात. गेल्या काही वर्षांपासून तर स्पर्धा परीक्षांचे कोचिंग देणाऱ्या पुण्या-मुंबईतील नामांकित कोचिंग क्लासचेही स्टॉल्स इथे लावलेले दिसतात.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जमणारा जनसमुदाय काबूत ठेवणे सोपे काम नाही. पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजपर्यंत महापरिनिर्वाणदिनी  शिवाजी पार्क परिसरात कधीही अप्रिय घटना घडलेली नाही.

डॉ. आंबेडकरांना अखेरच्या दिवसांत, आपण आपले कार्य पूर्ण करू शकलो नाही, ही एक खंत होती. त्याचबरोबर आपला वारसा चालवू शकेल अशी व्यक्ती जवळपास दिसत नाही हीदेखील खंत होती. अशाच एका प्रसंगी ३१ जुलै १९५६ रोजी डॉ. आंबेडकर आपले खासगी सचिव नानकचंद रत्तू यांना म्हणाले, ‘‘नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की, मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकटय़ाच्या बळावर मिळवले आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. हा काफिला आज जिथे दिसतो आहे तिथे त्याला आणता आणता मला खूप सायास पडले. हा काफिला असाच त्यांनी पुढे.. आणखी पुढे चालू ठेवावा. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफिला पुढे नेण्यास असमर्थ ठरले, तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी राहू द्यावा!’’

पंचवीस वर्षांपूर्वी दादर चौपाटीच्या विस्तीर्ण वाळूवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जनसमुदाय जमत असे. शिवाजी पार्कवर फक्त आंबेडकरी राजकीय विचारधारा मानणाऱ्या पक्षांच्या, संघटनांच्या अभिवादन सभा होत. गेल्या काही वर्षांत दादर चौपाटीची बरीच धूप झाल्यामुळे शिवाजी पार्क परिसरात महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन केले जाते.

या वर्षी महापरिनिर्वाणदिनी समतेचे ‘अखंड’ (महात्मा फुलेंनी स्वत: केलेल्या काव्यरचनांना ‘अखंड’ असे म्हटले आहे.) शिवाजी पार्कवर गायले जाणार नाहीत. परिणामी निदान या वर्षी तरी एका वैचारिक वारशाचा प्रेरणादायी माहोल अनुभवता येणार नाही.

भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य आंतरराष्ट्रीय स्मारक इंदू मिलच्या जागेवर उभे राहील. मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत त्याचा समावेशही होईल. परंतु ५ डिसेंबरच्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबरला शिवाजी पार्कला ‘मुक्त विद्यापीठा’चे जे जिवंत, भव्य स्वरूप प्राप्त होतं, त्याचं महत्त्व भविष्यातही अबाधित राहील. सरकार ज्या उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे ते नक्की साथजन्य आजार रोखण्यासाठी आहे की इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टींसाठी, अशी शंका यावी असं भोवतालचं वातावरण आहे. पण या वैचारिक वारशाचं जतन आणि संवर्धन करणं अखेर आपल्याच हातात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 1:00 am

Web Title: coronavirus pandemic covid 19 chaityabhoomi dd70
Next Stories
1 या मातीतील सूर : लोकप्रिय!
2 ‘वाडा चिरेबंदी’चे भाषांतर माधुरी पुरंदरे यांचे!
3 ‘क्रीमी लेयर’ची कोंडी
Just Now!
X