14 August 2020

News Flash

आपण असेच असू!

फ्रान्सेस्का मेलँद्री या प्रख्यात इटालियन लेखिकेनं सध्याच्या करोनाबाधित प्रलयंकारी संकटाच्या काळातील अनुभवांवर आधारित लिहिलेल्या उत्कट पत्रावरील तितकंच तरल चिंतनभाष्य..

एक भारतीय नागरिक म्हणून खरंच करोना-प्रलयोत्तर काळात आपण बदललेले असू की असेच असू?

निशांत मल्हारराव सूर्यवंशी – brandnishant@gmail.com

फ्रान्सेस्का मेलँद्री या प्रख्यात इटालियन लेखिकेनं सध्याच्या करोनाबाधित प्रलयंकारी संकटाच्या काळातील अनुभवांवर आधारित लिहिलेल्या उत्कट पत्रावरील तितकंच तरल चिंतनभाष्य..

इटलीची लेखिका फ्रान्सेस्का मेलँद्री यांनी इटलीहून इंग्लंडला उद्देशून लिहिलेलं पत्र वाचनात आलं. सध्या करोना महाप्रलयाने केलेल्या संहाराचे प्रत्ययकारी दर्शन आणि तद्नंतर बदलले जाणारे मानवी संबंध याची भविष्यवेधी मांडणी हा या पत्राचा आशय. या पत्राच्या अभिवाचनाची मुक्ता बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली प्रभावी ध्वनिचित्रफीतही पाहण्यात आली.

या पत्राचा समारोप मेलँद्री ‘आपण खूप बदललेले असू’ अशा काहीशा संदिग्ध सुरात करतात. समारोपाच्या त्यांच्या या विधानावर विचार करताना मला प्रश्न पडला की, एक भारतीय नागरिक म्हणून खरंच करोना-प्रलयोत्तर काळात आपण बदललेले असू की असेच असू?

मला वाटते, आपण असेच असू.

मॅक्डीमध्ये पाचशेचा बर्गर बिनदिक्कत रिचवून कोथिंबिरीची जुडी घेताना पाच रुपयांसाठी शेतकऱ्याशी घासाघीस करणारे

आपण असेच असू..

एरवी वाहतुकीचे नियम स्वत: सर्रास धाब्यावर बसवत असूनही चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या वेळी का उभारलो नाही म्हणून शेजारच्यावर डोळे वटारणारे

आपण असेच असू..

‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या मुलीला देशद्रोहाखाली तुरुंगात डांबले म्हणून आणि आपल्याच लोकांवर ‘गोली मारो’ म्हणणाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली म्हणून खूश होणारे

आपण असेच असू.

विकासाच्या सबबीखाली एका रात्रीत बेरहमपणे वृक्षकत्तल करणारे

आपण असेच असू.

स्त्रीवेशातील पुरुष पात्राच्या निव्वळ वावरास विनोद म्हणून दाद देणारे आपण असेच असू.

ज्ञानसंपादनातून होणाऱ्या गुणवृद्धीचा अदमास घेण्यापेक्षा गुणांची गणितं मांडणारे

आपण असेच असू.

कोणत्याही समस्येच्या व्यामिश्रतेचे आकलन न करता सोपी उक्ती उत्तरे स्वीकारणारे

आपण असेच असू.

आपल्याही नकळत उपद्रवमूल्य आणि उपयुक्ततामूल्य यांच्या ताजव्यात तोलून नातेसंबंध जोडणारे

आपण असेच असू.

एखादा गुन्हा घडला तर सर्वात आधी गुन्हेगाराचा धर्म आणि नंतर जात पाहणारे आपण असेच असू.

देशावर प्रेम म्हणजे देश चालविणाऱ्यांवर प्रेम अशी श्रद्धा असलेले आपल्यापैकी काही बेमालूमपणे शोषकांच्यात मिसळून जातील, तर काही अपरिहार्यपणे शोषितांच्यात सामील होतील.

आपण असेच असू.

बालिश, बेजबाबदार, बेफिकीर, बेमुवर्तखोर आणि काहीसे बेशरम.

हे सारे मी कृतक उद्वेगातून अथवा स्वान्त सुखाय वैचारिक अभिनिवेशातून लिहीत नाहीए, पण आपल्यामध्ये फार बदल होईल असे मला वाटत नाही.

आपल्या अस्तित्वाला समूळ बसणारे हादरे नेहमीच एका मूलगामी बदलाची शक्यता नक्कीच निर्माण करीत असतात. पण त्याकरता मुळात अशा हादऱ्यांची र्सवकष जाणीव झाली पाहिजे. आणि अशा जाणिवेचे वहन करते तरल संवेदनक्षमता. आणि अशा संवेदनक्षमतेचा सार्वत्रिक अभाव हे आजच्या आपल्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.

सद्य:परिस्थितीतही संचारबंदीचे उल्लंघन करून प्रभातफेरीस बाहेर पडणारे नागरिक, पोलिसांवर होणारे हल्ले, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमोर केले जाणारे लज्जास्पद वर्तन, साध्या कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत संचारबंदीला वळसा घालण्याचे घडलेले प्रकार हे पराकोटीच्या संवेदनाहीनतेचेच द्योतक. पण संवेदनाशून्यतेच्या या घटना अपवादाने घडलेल्या म्हणून प्रातिनिधिक ठरत नाहीत, असा स्वसांत्वनासाठी प्रतिवादही करता येत नाही. कारण संवेदना-बधिरतेचे हे प्रमाण घाऊक आहे. उदाहरणार्थ, पहिली संचारबंदी लागू झाल्यावर लगेच येणाऱ्या गुढीपाडव्याला स्वत:पेक्षा तीन पट उंचीच्या काठय़ा कसरत करत घेऊन जाणारी खुजी माणसे. आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर वर्षभर कोणताही सण साजरा न करण्याचे पथ्य पाळले जाते. मग आजूबाजूस मृत्यूचे भयाण थैमान सुरू असताना गुढी उभारणे हे संवेदना विसर्जनाचेच लक्षण. त्याचबरोबर इतक्या गंभीर प्रसंगातही दिवे उजळवणी सोहळे साजरे करतानाची समाजमाध्यमांवर प्रसृत केलेली सुहास्यवदन छायाचित्रे हे आपल्या संसर्गजन्य बधिरतेचेच पुरावे.

संवेदनाक्षमतेचा असा आकस्मिक विलय होतो की टप्प्याटप्प्याने ऱ्हास होतो? माझ्या मते, हे दोन्हीही नाही. आपल्या संवेदनाक्षमता मुळातच पूर्णपणे उमलू दिल्या जात नाहीत. संवेदना-खुडीच्या या कटातील मुख्य गारदी म्हणजे आपली मेकॉलेप्रणीत शिक्षणव्यवस्था. या व्यवस्थेतून निव्वळ गुणांची समीकरणे जुळवत अर्धोन्मिलित संवेदनाक्षमता घेऊन आपल्यातील एक वर्ग जगण्याच्या रेटय़ात शिरतो, तर दुसरा बाजारपेठीय रेटय़ात! अब्राहम मॉस्लोच्या पिरॅमिडमधले अनुक्रमे तळातले आणि त्यावरच्या दोन स्तरावरचे हे लोक. यावरचा स्तर असे रेटे नियंत्रित करणाऱ्या तिसऱ्या वर्गाचा. यातील बाजारपेठीय रेटय़ात शिरलेला वर्ग तिथल्या गतीत स्वत:ला सामावून घेताना अधिकाधिक स्वकेंद्रित होत जातो. मात्र असे जगताना आपले व्यापक सामाजिक भान हरवून आपण काहीसे स्वार्थी झालो आहोत अशी धूसर जाणीव त्याची अर्धक्षम संवेदनक्षमता त्याला करून देत असते. मग अशा वर्गाच्या दुबळ्या संवेदनक्षमतेचे पृथ:करण करून तिला प्रतीकांचा टेकू देण्याचे काम व्यापक प्रमाणात राज्यसत्ता तसेच धर्मसत्ता आणि अंशत: कलासत्ताही करत असते. आणि विचारसत्ता बहुसंख्य अस्मिताभिमुख होत्सासे अशा प्रतीकांच्या प्रसूती आणि प्रसवासाठी समाजमनाची मशागत करते. हे इतिहाससहोदर,  इतिहासजन्य नव्हे, सत्य. हा वर्ग त्याच्या अनामिक अपराधगंडातून बाहेर पडून आत्मप्रतारक समाधान शोधण्यासाठी अशा प्रतीकांना कवटाळतो. मग ती प्रतीके पोकळ राष्ट्रवाद संकल्पनेची असोत वा कर्मकांडांची. आणि अशी प्रतीकांची आरास मांडणारे लोकानुनयी नेते होतात किंवा स्वयंघोषित गुरू.

त्यामुळे प्रतीकांच्या अर्थहीन खेळात गुंगलेल्या अथवा गुंगवलेल्या अर्धजागृत संवेदनक्षमतेची त्या खेळामधून सर्वप्रथम सोडवणूक केली पाहिजे. तद्नंतर समाजमाध्यमपतित होऊन बिघडलेल्या आपल्या हव्यासी संज्ञांना कसोशीने त्यांच्या मूळ लयीत आणले पाहिजे. कारण संज्ञांच्या नाद-लयीतूनच तरल संवेदनक्षमतेची सूरबांधणी होत असते; जी जाणिवेच्या बंदिशीत विस्तारते. असेही शक्य आहे- मूळ लयभान गवसलेल्या संज्ञा नवीन प्रतीकांचे सर्जन करतील. मात्र, अशी अर्थसंपृक्त प्रतीकेच नेहमी जाणिवेस सघन बनवीत असतात.

आणि म्हणूनच विश्लेषणांती इतकेच सांगेन.. महाप्रलयाने अस्तित्वाला कितीही हादरे दिले तर आपण काही काळ कदाचित थिजून जाऊ, पण जाणिवेच्या अभावी बदलणार मात्र नाही. त्यामुळे करोनोत्तर काळात आपण असेच असू. जीवनाचे क्षणभंगुरत्व विसरून अहमहमिकेने जगणे सजवणारे, सोहळेमग्न आणि प्रतीकशरण. असो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2020 12:31 am

Web Title: coronavirus pandemic francesca melandri letter on corona your future dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्रकांड विधीज्ञ
2 हास्य आणि भाष्य : लाफ्टर इज द बेस्ट..
3 इतिहासाचे चष्मे : समूहाचे समाजकारण आणि राजकारण
Just Now!
X