21 October 2020

News Flash

कोविडोस्कोप : भीतीची बाजारपेठ!

‘लोकसंख्या बॉम्ब’, स्कायलॅब, Y2K पासून मोबाइल-पट्टय़ा किंवा पवनचक्क्य़ांपर्यंत आणि याआधी आलेल्या, पण आजवर लस न मिळालेल्या साथरोगांपर्यंत.. अनेक प्रकारच्या भीतीचे अनुभव आपण घेतले.

जेव्हा केव्हा हा करोनाकाळ संपेल, किंवा खरं म्हणजे आपण त्याच्यासमवेत जगायला शिकू त्या वेळेस इतिहासात या काळाचा उल्लेख ‘एका भीतीचं भव्य यश’ असाच केला जाईल.

गिरीश कुबेर – girish.kuber@expressindia.com / @girishkuber

‘लोकसंख्या बॉम्ब’, स्कायलॅब, Y2K पासून मोबाइल-पट्टय़ा किंवा पवनचक्क्य़ांपर्यंत आणि याआधी आलेल्या, पण आजवर लस न मिळालेल्या साथरोगांपर्यंत.. अनेक प्रकारच्या भीतीचे अनुभव आपण घेतले. त्यातला सर्वाधिक ‘यशस्वी’ अर्थातच करोना..!

जेव्हा केव्हा हा करोनाकाळ संपेल, किंवा खरं म्हणजे आपण त्याच्यासमवेत जगायला शिकू त्या वेळेस इतिहासात या काळाचा उल्लेख ‘एका भीतीचं भव्य यश’ असाच केला जाईल.

पत्रकारितेचा अभ्यासक्रम संपवून ८४-८५ साली या व्यवसायात यायची वेळ झाली त्यावेळी एक वयाने ज्येष्ठ पत्रकार म्हणाले होते, ‘काय पुस्तकबिस्तकं वाचायला पाहिजेत असं नाही. हिंदी सिनेमा.. म्हणजे बॉलीवूड, सेक्स, क्रिकेट किंवा भीती यातला एक जरी घटक विकायची क्षमता असेल तर या व्यवसायात सहज यशस्वी होता येतं.’ तसं करून किती जण यशस्वी झाले हे मोजलं नाही; पण या करोनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर अत्यंत यशस्वी ‘उत्पादन’ म्हणून विकल्या गेलेल्या भीतीच्या अनेक गोष्टी आठवायला हव्यात.

ऐंशीच्या दशकाच्या तोंडावरती दिला गेलेला स्कायलॅब कोसळण्याचा इशारा अनेकांना आठवत असेल. माणसं त्यावेळी घराबाहेर पडणं टाळायला लागली होती. आपण बाहेर पडायचो आणि न जाणो, अवकाशातनं ती प्रयोगशाळा पडायची डोक्यावर.. असं अनेकांना त्यावेळी वाटत होतं. आताच्या करोनासारखी टाळेबंदी लादायचा विचार करणारे राज्यकर्ते त्यावेळी नव्हते. पण तरी रस्ते ओस पडायला सुरुवात झाली होती.

त्यानंतर जागतिक स्तरावर विकली गेलेली अत्यंत यशस्वी भीती म्हणजे Y2K या भीतीवर अनेकांची पोटं भरली. एकविसावं शतक सुरू होताना- म्हणजे ३१ डिसेंबर १९९९ या दिवशी रात्री १२ वाजता सर्व संगणक आज्ञावली ००.००.०० अशा होतील. म्हणजे २००० साल उगवलं आहे हे लक्षात न घेता सर्व संगणक जणू १९०० साल सुरू झालं असं वागतील.. परिणामी जगात हाहाकार उडेल.. विमानांचे संगणक बेशिस्त होतील.. बँकांच्या नोंदींतील चुकांनी अब्जावधींचं नुकसान होईल.. आणि हे सर्व सुधारण्यासाठी आणखी काही अब्ज खर्च करावे लागतील.. असं बरंच काही त्यावेळी सांगितलं गेलं होतं. अशी आंतरराष्ट्रीय भीती घालणारी प्रकरणं आणखीही काही सांगता येतील. बम्र्युडा ट्रँगल वगैरे.

स्थानिक पातळीवरही असे काही नमुने आढळतील. मध्यंतरी मोबाइल फोनच्या मागच्या बाजूला धातूच्या पट्टय़ा डकवायचं फॅड आलं होतं. का असं करायचं? तर मोबाइलमधून बाहेर पडणाऱ्या अत्यंत धोकादायक कंपनलहरी या पट्टय़ा शोषून घेतात म्हणे. या कंपनलहरी (?) ना कोणी मोजल्या, ना कोणी त्याला रोखल्याचं (?) दाखवून दिलं. हे म्हणजे नमस्कार केल्यानं शरीरातून काही सूक्ष्म कंपनलहरी बाहेर पडतात, या दाव्यासारखंच थोतांड. ते बराच काळ चाललं. मधल्या मधे त्या मोबाइल पट्टय़ा बनवणाऱ्यांना चार पैसे मिळाले, हाच काय तो याचा फायदा.

पाच-सहा वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली होती. त्यावेळी त्या परिसरातल्या डोंगरांवर उभ्या राहिलेल्या पवनचक्क्या पावसाचे ढग पळवून लावतात अशी भीती घातली गेली. त्यावेळी या पवनचक्क्यांविरोधात आंदोलन करण्याची भावना काहींनी व्यक्त केली होती. पण गेल्या वर्षी या पवनचक्क्या असतानाही पश्चिम महाराष्ट्रात सणसणीत पूर आला, त्याचं काय? त्या पवनचक्क्यांमागचा कथित गैरव्यवहार हा मुद्दा वेगळा. पण त्यांच्यामुळे पाऊस जाईल, ही भीती हा सामुदायिक बिनडोकपणाचा आणखी एक नमुना होता.

अशा सामुदायिक भीतीचा अतुलनीय आविष्कार म्हणजे सध्याचे करोना संकट. चीनमधल्या एका गावात या साथीचा उगम होतो काय, ती साथ चीन सोडून अन्यत्र.. म्हणजे अगदी थेट युरोपात पसरते काय, आणि सर्व जग स्वत:ला कोंडून घेतं काय.. सगळंच अचाट. इतक्या भयावह गतीनं जेव्हा एखादा उन्माद वा भीती पसरते तेव्हा त्या वादळात विवेकाचा मिणमिणता दिवा तेवता राहणं केवळ अशक्य. त्यात या साथीत लाखो जणांचे प्राण गेल्यानं तर आपण या भीतीस शरण गेलो नाही तर आपलंही अवतारकार्य संपुष्टात येणार याचा इतका धसका जगानं घेतला, की त्यास मानवी इतिहासात तोड नाही. यातली विचारांच्या पातळीवर निसटणारी अनेक टिंबं जोडणं हा ‘कोविडोस्कोप’ सदराचा हेतू. हा लेख त्याच प्रयत्नांचा विस्तारित आविष्कार. तो समजून घेण्यासाठी काही मुद्दे आवश्यक. एक म्हणजे या करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाना कोंडणं, डांबणं हा महत्त्वाचा मार्ग आहे, हे सांगितलं वा ठरवलं कोणी? या साथीत इतक्या प्रचंड संख्येनं माणसं मरतील, या शास्त्रीय अंदाजाचा आधार काय? आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा.. ही अशी प्रचंड जीवितहानी होईल असे आधीचे अंदाज कोणते? त्यांचं वास्तव काय? या तीनही प्रश्नांना क्रमाक्रमाने भिडायला हवं.

पहिला मुद्दा- साथप्रसार रोखण्यासाठी टाळेबंदीच्या मार्गाबाबत. या प्रश्नाचं उत्तर एकच.. ते म्हणजे वुहान. या कोटभर लोकसंख्येच्या चीनमधल्या गावात गेल्या वर्षी डिसेंबरपासून करोनाची साथलक्षणं दिसायला लागली होती. सुरुवातीला चीननं त्याकडे दुर्लक्ष केलं. ही एक नवीनच साथ आहे असा इशारा देणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडे दुर्लक्ष केलं. आणि आता ही बातमी दाबता येणार नाही असं लक्षात आल्यावर चीननं वुहानची सामुदायिक मुस्कटदाबी केली आणि या विषाणूचा प्रसार रोखला. एव्हाना हा विषाणू इटलीत पोचला होता. पण चीननं तो वुहानमध्ये ज्या पद्धतीनं नियंत्रणात आणला त्याचं कौतुक चीनमध्ये कारखाने असलेल्या अमेरिकी उद्योगपतींनी जाहीरपणे करायला सुरुवात केली. याचं साधं कारण- बहुसंख्य अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादन केंद्रं चीनमध्ये आहेत. या कंपन्यांना चीनच्या या पोलादी हाताळणीचं कोण कौतुक! गोल्डमन सॅकसारख्या सर्वात मोठय़ा बँकेच्या माजी अर्थ सल्लागारानंदेखील चीनच्या करोना हाताळणीला शाबासकी दिली.

झालं.. आता याच मार्गाने करोना हाताळायला हवा, असा सोयीस्कर समज त्यामुळे नंतर जवळपास सर्वानीच करून घेतल्याचं दिसेल. याखेरीज या टाळेबंदी उपायास कोणताही आधार नाही, हे वास्तव आहे. वास्तविक एरवीही ताप आला की सर्वसाधारणपणे चार दिवस घरातल्या घरात आपण आराम करत होतोच. पण करोना तापाला संस्थात्मक आणि सरकारात्मक अधिष्ठान दिलं गेलं आणि १४ दिवसांची टाळेबंदी पाळायची प्रथा सुरू झाली. तसंही ताप हा आजार नसतो, ते लक्षण असतं. इतके दिवस ताप आला की त्याचं चक्र कधी मोडतंय हे पाहायची प्रथा होतीच. त्याच्यावरनंच ‘मुदतीचा ताप’ वगैरे शब्दप्रयोग आलेत. पण करोनाची गोष्टच वेगळी. हा जणू काही जगावेगळा ताप आहे असं सगळे वागू लागले आणि त्याबाबतच्या सरकारी आदेशांनी जनतेच्या भीतीत भर घालायला मदतच केली.

हे असं काही झालं वा होतंय असं दिसलं की जगभरातल्या प्रलयभाष्यकारांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्याकडे दुष्काळाची चाहूल लागली रे लागली की अनेकांच्या मनात आनंदाचे अंकुर उगवू लागतात, तसंच हे. ‘दुष्काळ आवडे सर्वाना’प्रमाणे ‘साथीचे आजार आवडे सर्वाना’ हेदेखील तितकंच सत्य. त्यात ही साथ फ्लूची.. म्हणजे आपल्या साध्या तापाची.. असेल तर सर्वच जण खूश. कारण मोठय़ा गुंतवणुकीचा धोका न पत्करताही या साथीत बक्कळ पैसे कमावता येतात. साथी, लस वा औषधनिर्मिती यावर खर्च करायला सरकारं तयार असतात. सरकारांनाही तेवढंच काही केल्याचं समाधान. या अशा प्रलयभाष्यकारांचे किती दाखले द्यावेत?

एड्स हा प्रकार नवा नवा होता तेव्हा भारतासारख्या देशातही लाखो जण त्या आजाराने मरतील असं भाकित वर्तवण्यात अनेक जण आघाडीवर होते. आणि अशा भाकितांच्या आधारे धर्मार्थ कार्यासाठी टपून बसलेले बिल गेट्स यांच्यासारखे अनेक त्याही वेळी होते.. आताही तेच आहेत. कल्पनाही येणार नाही इतकी रक्कम या सगळ्यासाठी खर्च केली जाते. बरं, माध्यमांतही यांचा प्रभाव. त्यामुळे देशोदेशीची सरकारं त्यांच्या रेटय़ास बळी पडतात. एड्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू हे आजार तरी आहेत. काही प्रमाणात का असेना, त्यांची लागण होते आणि माणसं आजारी पडतात. यातल्या एकावरही इतक्या वर्षांनंतरसुद्धा लस निघालेली नाही, ही जाता जाता लक्षात घ्यावी अशी बाब.

अशीच आणखी एक यशस्वी भीती.. साठच्या दशकात तयार केली गेलेली. ‘लोकसंख्या बॉम्ब’ या नावाची. आज अनेकांना ती आठवत असेल. ‘द पॉप्युलेशन बॉम्ब’ हे स्टॅनफोर्डचे प्राध्यापक पॉल एहर्लिच यांचं तेव्हा गाजलेलं पुस्तक. या पुस्तकानं हे काळं भाकित त्यावेळी रंगवलं. सत्तरच्या दशकात जगाची लोकसंख्या इतकी वाढेल की माणसं माणसांच्या जिवावर उठतील, दुष्काळामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे सामाजिक ताणतणावांतही भयावह वाढ होईल, असा या पुस्तकाचा सिद्धांत. लोकसंख्या भूमिती श्रेणीनं कशी वाढेल हे सांगण्याची पद्धत तेव्हापासून लोकप्रिय झाली. त्याही वेळी अनेक तज्ज्ञांचं मन तिसऱ्या जगाच्या काळजीनं काळवंडलं. ‘लोकसंख्या बॉम्ब’ची अशी काही हवा तेव्हा झाली, की जगासमोर जणू हा एकच प्रश्न आता उरलाय.

अशा पद्धतीच्या लाटांवर स्वार होण्यात अनेकांचे हितसंबंध असतात. ते सर्व जण या हवानिर्मितीस हातभारच लावतात. तेव्हा त्यावेळी या सगळ्यामुळे ‘लोकसंख्या नियंत्रण’ हा जगासमोरचा एकमेव कार्यक्रम बनला. आता जसं करोनाकालीन टाळेबंदीबाबत कोणी प्रश्नही विचारत नाहीत, तसंच त्याही वेळी होतं. लोकसंख्या नियंत्रणास पर्याय नाही, यावर साऱ्या जगाचा विश्वास होता जणू. त्यातूनच कुटुंब नियोजनास मोठी गती दिली गेली. ‘हम दो- हमारे दो’सारख्या घोषणा त्याच काळातल्या आणि संजय गांधी यांचे कुख्यात नसबंदी प्रयोगही त्याच काळातले. अनेक ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली अक्षरश: नागरिकांवर अत्याचार झाले. एड्सकालाप्रमाणे त्याही वेळी लोकसंख्या नियंत्रणार्थ कार्य करणाऱ्या ‘समाजसेवी’(?) संस्थांचं पेव फुटलं. त्यांना भरघोस मदत जागतिक संस्थांनी दिली. लोकसंख्या नियंत्रण हा मुद्दा योग्यच. आपल्याकडे तो र. धों. कर्वे यांच्यासारख्यांनी प्रबोधनाच्या मार्गाने पुढे नेला. पण सत्तरच्या दशकातला प्रकार तसा नव्हता. ती जबरदस्ती होती. उद्या समजा कोणी म्हणालं, की करोनाकाळात अतिरेक झाला असेल, पण तो हात धुवायची सवय लागावी यासाठी होता.. तर ते जसं अप्रामाणिकपणाचं ठरेल, तसंच कुटुंब नियोजनाचंही त्यावेळी होतं. चीननं त्याच काळी एक अपत्याचा नियम काढला.

आज त्यावेळच्या अतिरेकी लोकसंख्या नियंत्रणाचा फटका अनेक देशांना बसलाय. वास्तविक जास्त लोकसंख्या हेच गरिबीचं कारण असतं असं अजिबात नाही. उलट, गरिबी लोकसंख्यावाढीस जबाबदार असते. पण इतका विचार कोणालाही करायचा नव्हता. त्याही वेळी नाही आणि आताही नाही. या अशा अतिरेकी प्रचाराचा परिणाम इतका असतो की अजूनही अनेक जण आपल्याकडे आपल्या धोरणदारिद्रय़ाचं पाप हे वाढत्या लोकसंख्येवर फोडताना दिसतात. त्यास परत धर्माची असलेली किनार हा सोयीस्कर आधार आहे, ही बाब वेगळीच. यातलं सत्य हे की, त्यावेळचे लोकसंख्या प्रस्फोटाचे सर्व अंदाज पूर्णपणे खोटे ठरले. नंतरचे एड्सचे अंदाज खोटे ठरले. स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, एबोला अशा सर्व आजारांचे अंदाज खोटे ठरले. तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीतील साम्य लक्षात घेता करोनाबाबतचा अंदाजही त्याच मार्गानं गेल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही.

तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीतही बरीच साम्यस्थळं आहेत.

मरणांची अतिरेकी भाकीतं, या आजारामुळे आलेल्या अस्थिरतेचा फायदा घेत अधिकार वाढविणारी देशोदेशींची सरकारं- ही त्यातील काही. ‘द इकॉनॉमिस्ट’सारख्या साप्ताहिकानं अनेक देशांत करोनाच्या निमित्तानं सरकारनं अतिरिक्त अधिकार कसे हाती घेतले, याचा सविस्तर आढावा नुकताच सादर केला. अनेक शास्त्रज्ञांनी करोनासंदर्भात निर्माण केली जात असलेली भीती अवास्तव असल्याचं नमूद केलं आहे.

यावरून भीती ही कशा प्रकारे पसरवता येते आणि ती सारासार विवेकास कशी झाकोळून टाकते, हे लक्षात येईल. अलीकडेच विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. कौशिक बसू यांनी एका अर्थ- नियतकालिकातील लेखात नोबेलविजेते जॉर्ज अकेरलॉफ यांच्या एका अर्थमानसोपचार विश्लेषणाचा आधार घेत ही बाब दाखवून दिली. अत्यंत जागरूकपणे, सर्व माहिती मिळवून एखादा इसम मोटार कोणती घ्यायची हे निश्चित करतो. पण पैसे भरण्याच्या आदल्या दिवशी ही मोटार रस्त्यावरून कशी घसरली याचा किस्सा कानावर आल्यावर त्याचा हा निर्धार डळमळतो. अशा वेळी शास्त्रीय पाहण्या, प्रमाण आदी मुद्दे मागे पडतात आणि ती व्यक्ती आपल्याच निर्णयाबाबत साशंक होते.

करोनाबाबत नेमकं हेच झालं आहे. यात अमेरिकेतल्या बळींच्या बातम्या निर्णायक ठरल्या. त्या पाहणाऱ्यांना हे माहीत नाही की, वास्तविक अमेरिकेपेक्षा बेल्जियम या देशात करोनाबळींचं ‘प्रमाण’ जास्त आहे. दर दशलक्ष नागरिकांमध्ये करोनास बळी पडण्याची शक्यता ही अमेरिकेपेक्षा बेल्जियममध्ये तीन पटीने अधिक आहे. पण सर्वसाधारण व्यक्ती ही तपशिलांत न पाहता केवळ वरच्या संख्येवर पाहते. याच युक्तिवादाचा विस्तार केल्यास

हे लक्षात येईल की, युरोप वा अमेरिकेत करोनामुळे एखादी व्यक्ती मरण पावण्याचं प्रमाण आशिया वा आफ्रिका या देशांच्या तुलनेत तब्बल दोन हजार पटींनी अधिक आहे. इतकंच काय, पण भारत आणि जर्मनीची तुलना केली तरी जर्मनीत करोनामृत्यूची शक्यता भारतापेक्षा किमान शंभर पटींनी जास्त आहे. पण बरोबर याउलट बेकारी, गरिबी, भूकबळी, रस्त्यावरचे अपघात यांमुळे एखाद्याचा जीव जाण्याचं प्रमाण भारतात अर्थातच जर्मनीपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे, हे डॉ. बसू यांनी स्पष्ट केलं आहे.

पण याचा कोणताही विचार धोरणकर्त्यांकडे नाही. करोनाला अमेरिका व युरोपातले देश ज्याप्रमाणे हाताळत आहेत त्याच पद्धतीनं आपणही हाताळत आहोत. त्यांच्याकडे टाळेबंदी.. मग आपल्याकडेही टाळेबंदी. पण या काळात त्या देशांत एकही भूक वा अपघात बळी नाहीत. आपल्याकडे शेकडय़ाने असे बळी गेले आणि तरी गणती अजून सुरूच आहे. टाळेबंदी का लादायची? कारण जीव वाचवायचे आहेत म्हणून. पण या मार्गाने जीव वाचवताना अन्य मार्गानी हकनाक जीव जात आहेत याचा विचारच नाही. सत्तरच्या दशकात नसबंदीत असे अनेक जीव गेले. आता टाळेबंदीत जातायत.

याचा अर्थ करोनाला कमी लेखावं असा अजिबातच नाही. ज्यांना लागण होते त्यांच्यासाठी तो गंभीरच आजार आहे. डॉक्टर, परिचारिका वगैरेंना तर त्याचा धोका आहेच. पण म्हणून सरसकट टाळेबंदी हा त्यावरचा उपाय असूच शकत नाही. किमान साधनांनी, उपायांनी हा आजार रोखता येतो असं अनेक तज्ज्ञ सांगतात. दुसऱ्या बाजूला मार्च महिन्याच्या उत्तरार्धात टाळेबंदीचा सल्ला देणारे नोकरशहा आता म्हणतायत जून-जुलैतच करोनाचा खरा उद्रेक होईल. मग तसं जर असेल तर मार्च महिन्यातल्या टाळेबंदीने ही विषाणू प्रसारसाखळी भंगणार होती त्याचं काय झालं?

हा प्रश्न आपण विचारणार की नाही?

याचं उत्तर बहुधा ‘नाही’ असंच असेल. त्यासाठी विचार करावा लागेल. त्यापेक्षा भीतीस शरण गेलेलं बरं. आणि शरणागतीनंतरही काही झालंच, तर आपलं प्राक्तन असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. ते अधिक सोपं आणि सुरक्षितही. भीतीमुळे ‘ब्रेग्झिट’ घडतं. भीतीमुळे निवडणुका जिंकता येतात. भीतीच समोर नसेल तर मात करायची कोणावर? ‘दुसरों की जय से पहले खुद को जय करे..’ वगैरे गाण्यात ठीक. प्रत्यक्ष जगताना समोर दुसऱ्याच्या विजयाची भीती नसेल तर आपल्याला जिंकता कसं येईल? कोणा देशाची, धर्माची, आजाराची किंवा आणखी कसली.. पण भीती हवीच. सोयीचं असतं भीतीचं असणं.

पस्तीस वर्षांपूर्वी सल्ला देणारा पत्रकार ज्येष्ठच म्हणायचा. भीती तयार करण्यात मोठंच यश असतं. ते जमलं की भीतीची बाजारपेठ मुठीत ठेवता येते. भीतीवरच्या विजयापेक्षा ते जास्त महत्त्वाचं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 1:27 am

Web Title: coronavirus pandemic market of fear covidoscope dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना आणि उद्या
2 हास्य आणि भाष्य : सेकंड ओपिनियन
3 इतिहासाचे चष्मे : पुरोगामित्वाचे वर्तमान
Just Now!
X