हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

करोनाचा वाढता संसर्ग आणि जगभरातील त्याविषयीची भीती लक्षात घेता भारत सरकारने सबंध देश आज लॉकडाऊन केलेला आहे. एरवी चौकाचौकांत गप्पा मारत उभी राहणारी टोळकी, मित्रांचे कट्टे, शहरांतील जथ्थे सारं सारं गायब झालं आहे. मानवी समूह सलग काही आठवडे किंवा महिने घराबाहेर न पडण्याचे नजीकच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण असावे. आपण समाजशील, समूहप्रिय असल्याचा दावा करणारे सामान्य लोक असोत की तत्त्वज्ञ.. सारेच या संसर्गग्रासक विषाणूच्या भीतीने घरात कोंडले गेले आहेत. अशावेळी समूहवादावर चर्चा करणे हे विरोधाभासाचा उत्तम नमुना ठरू शकतो. पण तसे पाहता आपला समाज किंवा दक्षिण आशियाई समाजसमूहांच्या अस्तित्वाच्या वैशिष्टय़ांपैकी विरोधाभास हे लक्षण जितके प्रकर्षांने समोर येते, तितके इतर कुठले लक्षण क्वचितच समोर येत असावे. ते असो. इतिहासाचे चष्मे वापरून वर्तमानातील घडामोडी आणि राजकारण व समाजकारणविषयक धारणांचा परामर्श घेताना आपल्याला या विरोधाभासांची लक्षणेच अधिक ठळकपणे जाणवू लागतात. त्यामुळे आपल्या आजच्या जगण्याला इतिहासाचे मापदंड लावायची सवय असलेल्या आपल्या समाजाला या विरोधाभासात राहणे क्रमप्राप्त ठरते.

‘‘हडप्पा संस्कृतीतील लोकांचे जे जे काही आपल्याला सापडले, ते सारे त्या संस्कृतीसोबत गडप झाले का?..आज सौराष्ट्रामध्ये आपण जी लोकसंस्कृती पाहतो आहोत, त्यात बहुधा या संस्कृतीचीच एखादी पुरवणी, एक्स्टेन्शन किंवा अलीकडचं रूप असू शकेल. तसे नसेल तर सिंधू संस्कृतीने तिच्या वारसांना केवळ तात्त्विक मीमांसा किंवा चर्चा करण्यासाठी पुष्कळ ऐवज दिला असला तरी भौतिक रूपात दिसेल असा सांस्कृतिक वारसा या संस्कृतीच्या वारसदारांना मिळाला नाही असेच म्हणणे क्रमप्राप्त ठरेल..’’ – हे उद्गार आहेत भारतीय पुरातत्त्वशास्त्राचा पाया घालणाऱ्या सर मॉर्टिमर व्हीलर यांचे! जेम्स प्रिन्सेप यांनी अशोक स्तंभावरील लिपीचा उलगडा केल्यावर भारतीय इतिहासाच्या भौतिक अवशेषांचे अध्ययन सुरू झाले आणि पुढे सिंधू संस्कृतीच्या अवशेषांच्या शोधानंतर भारतीय पुरातत्त्वीय संशोधनाला अधिक गती मिळाली. त्यानंतर भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या काळांतील मानवी वसाहतींचे अवशेष, मानवी अस्तित्वाच्या खुणा पुरातत्त्वीय संशोधनांतून अधिक प्रकर्षांने पुढे येऊ लागल्या. स्वातंत्र्यानंतर या अध्ययन क्षेत्राने आणखीन उत्तम प्रगती केल्याने गेल्या काही दशकांत दक्षिण आशियाई भूप्रदेशांतील मानवी समूहांच्या पुसटशा किंवा सुस्पष्ट अशा खुणा आज आपल्याला ज्ञात होऊ लागल्या आहेत.

समूह हा मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाचा मुख्य आधार. अगदी ढोबळमानाने पाहिलं तर जीवनासाठी आवश्यक अशी भौगोलिक अनुकूलता मिळाली की मानव आपल्या समूहासोबत त्या प्रदेशात वस्ती करीत असावा. जगण्यासाठी आवश्यक अशा गोष्टींच्या प्राप्तीसाठी करावे लागलेले स्थलांतर आणि अनुकूलता मिळाल्यावर संबंधित जागी केलेली वस्ती- वसाहत हे वेगवेगळ्या मानवी समूहांच्या संस्कृतींचे आदिम स्वरूप असावे. त्यामुळे समूहवादावरची चर्चा आपल्याला कळत-नकळत मानवी संस्कृतीच्या अनेक आयामांवरच आणावी लागते. त्याअर्थी आपले हे संपूर्ण सदर समूहवादाच्या आयामांचीच चर्चा ठरू शकेल. तरीही प्रस्तुत लेखात आपल्याला समूहावादाच्या वेगवेगळ्या आयामांना इतर लेखांसाठी बाजूला ठेवून स्पर्श करताना समूहाचे समाजकारण व राजकारण हा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे.

जीवनावश्यक अनुकूलतेला अनुसरून मानवी समूह आपल्या वसाहती बनवत आले आहेत, हे आपण वर म्हटले. समूहाचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी निर्माण करण्यात येणारी किंवा निर्माण होणारी व्यवस्था वेगवेगळ्या रूपांत आकाराला येत जाते. त्यात नेता असतो, विशिष्ट आचारपद्धती असते, श्रद्धा असतात, तत्त्वज्ञान असते. तसेच त्या श्रद्धा-तत्त्वज्ञानांच्या चौकटी किंवा साचलेपणाला आव्हान देणाऱ्या, प्रतिप्रश्न करणाऱ्या व्यवस्था निर्माण होत असतात. वैचारिक निष्ठा, सामूहिक निष्ठा किंवा श्रद्धांच्या निष्ठा यांच्या आधारावर निर्माण होणारे वाद काही वेळा सकस रीतीने वाढू दिले जातात, तर कधी बळाच्या आधारे त्याचा/ त्यांचे दमन वा उद्रेक होतो. काही प्रातिनिधिक उदाहरणांतून आपण याचा आढावा घेऊ या. ‘बृहदारण्यक’ या उपनिषदामध्ये येणारी ब्रह्मवादिनी गार्गी वाचक्नवी आणि महर्षी याज्ञवल्क्य यांचा संवाद/ चर्चा प्रसिद्ध आहे. ही चर्चा, याविषयीची आधुनिक वैचारिक विश्वातील धारणा आणि त्यातील पात्रांविषयीचा विवेक-विमर्श आपण थोडक्यात पाहू. मिथिलाधिपती जनक राजाने आयोजित केलेल्या शास्त्रचर्चेत याज्ञवल्क्य ऋषी आणि वचक्नू ऋषींची विद्वान कन्या गार्गी या दोघांत घडलेली ही चर्चा. तत्कालीन वैचारिक विश्वातील आकलनानुसार, ब्रह्मस्वरूप आणि विश्वरहस्य यांचा परामर्श घेणाऱ्या या चर्चेत पाणी हे वायूमध्ये(/द्वारे?) ओतप्रोत (विणले आहे किंवा संयोगातून निर्मिले असा अर्थ), वायू आकाशात ओतप्रोत, आकाश अंतरिक्षात, अंतरिक्ष गंधर्वलोकात ओतप्रोत वगैरे प्रश्नोत्तरे सुरू होतात आणि ब्रह्मतत्त्वामध्ये ही सारी तत्त्वे आणि वेगवेगळे लोक (गंधर्वलोक, आदित्यलोक, देवलोक, प्रजापतिलोक, इत्यादी) ओतप्रोत आहेत या टप्प्यापर्यंत चर्चा येते आणि ब्रह्म कशात ओतप्रोत आहे, असा प्रश्न गार्गीने केल्यावर याज्ञवल्क्य काहीसे चिडून गार्गीला ‘‘आता यापुढे प्रश्न नकोत.. अन्यथा तुझे डोके धडावर स्थिर राहणार नाही,’’ असे उत्तर देतात व त्यावर गार्गी शांत होते. आधुनिक विचारविश्वात लिंगभावाच्या अभ्यासकांद्वारे या कथेची संभावना संकुचित पितृसत्ताक संस्कृतीचे उदाहरण म्हणून केली जाते, तर परंपरेविषयी आस्था असलेले लोक गार्गीच्या विद्वत्तेला, प्रश्न विचारण्याच्या साहसी व जिज्ञासू वृत्तीला अनुलक्षून ‘प्राचीन भारतात स्त्रियांनादेखील समान हक्क असल्याचे, त्यांना तत्त्वचर्चामध्ये सहभागी होण्याची मुभा होती.’ असे जाहीर करतात.

आपल्या देशात (खरे तर जगभरच) प्रागतिक आणि परंपरावादी अशा दोन गटांचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. इतिहासातील किंवा परंपरेतील गोष्टींना औचित्य (ंस्र्स्र्१स्र्१्रं३्रल्ल)  प्रदान करून किंवा त्यावर आजच्या आधुनिक धारणांचा अध्यारोप करून त्या घटनांविषयीच्या आजच्या स्मृतींचे विच्छेदन करत हे राजकारण पुढे जात असते. तसे पाहता वरील प्रसंगातील याज्ञवल्क्य ऋषींची भूमिका उपनिषदांतून ज्या रीतीने मांडली आहे ते पाहता ते निरुत्तर झाले असावेत, किंवा त्यांना गार्गीची जिज्ञासा हा भोचकपणा वाटून ते चिडले असावेत असे निष्कर्ष निघू शकतात. मात्र, दोन-चार सभांतून गार्गी हिला विद्वानांच्या सभेत सहभागाची संधी दिली, किंवा मैत्रेयी या पत्नीशी याज्ञवल्क्यांनी शास्त्रविमर्श केला, किंवा ऋग्वेदात बोटावर मोजण्याइतक्या ऋषिका (स्त्री-ऋषी) होत्या म्हणून तत्कालीन सबंध समाज हा लिंगभावाच्या दृष्टीने उदारमतवादी होता असे म्हणणे अतिशयोक्त ठरेल. दुसरीकडे या स्त्रियांना चर्चेत सहभागी करून घेतल्याचा संदर्भ देत याज्ञवल्क्य किंवा तत्कालीन ऋषि समाज हा उदारमतवादी असल्याचा दावा करणाऱ्या परंपरावाद्यांना याज्ञवल्क्यांचे ‘शतपथ ब्राह्मणा’तील गोमांसप्रेम मात्र मान्य करायचे नसते. याज्ञवल्क्य ऋषींचे हे गोमांसप्रेम किंवा गार्गीवर ‘डाफरणे’ किंवा तिला शांत करणे यांतून समाजातील उपयुक्ततावादी आचार समोर येतो. अनेकदा परंपरावादी वर्गाला उपयुक्ततावादी धारणांच्या दृष्टीने आपण परंपरेला सोयीने वापरत असतो ही जाणीवच होत नाही. त्यातही भारतासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि उतरंडीवर बेतलेल्या समाजात समूहाचे राजकारण फारच वेगळ्या रीतीने आकार घेत जाते. गेल्या ९०-१०० वर्षांत या समूहांच्या चलनवलनाची गती आत्यंतिक नाटय़मय आणि वेगवान झाली आहे. लिंगभाव किंवा जातविषयक जाणिवा यांची सविस्तर चर्चा आपल्याला या विषयांवरील स्वतंत्र लेखांत करायची आहे. त्यामुळे समूहवादाच्या चर्चेसाठी आपण आणखी वेगळे व ताजे उदाहरण घेऊ.

करोना विषाणूसंसर्गाच्या भीतीमुळे जवळजवळ सबंध जग लॉकडाऊन झाले असताना समाजातील वेगवेगळे घटक, स्वयंसेवी संस्था किंवा सांस्कृतिक-धार्मिक गट आपली सामाजिक बांधिलकी जपायला पुढे आलेले दिसतात. माध्यमांतून याविषयीच्या बातम्या झळकत असताना एक बातमी गेले नुकतीच अगदी ठळकरीत्या व्हायरल झालेली दिसते, ती म्हणजे- करोनाच्या या संकटकाळात पाकिस्तानातील हिंदूंना अन्नधान्य व अन्य प्राथमिक सुविधा देण्यास सरकारी यंत्रणांनी नकार दिला. डॉ. अमजद अयुब मिर्झा या पाकव्याप्त काश्मिरातील रहिवासी असलेल्या व सध्या स्कॉटलंड येथे राहून पाकिस्तानी अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी खासगी वृत्तवाहिनी चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या हवाल्याने ही बातमी आपल्या माध्यमांतून पसरवली गेली. याविषयी थोडी शोधाशोध केली असता केवळ पाकिस्तानी हिंदूच नव्हे तर अहमदिया हा पाकिस्तानातील पंथ, ख्रिस्ती, उरलेसुरले पारशी आणि निम्नजातीय व निम्नवर्गीय शिया मुस्लीम यांनादेखील अशी मदत नाकारली जाण्याचे प्रसंग पाकिस्तानात घडल्याचे दिसते. अहमदिया हा पंथ मुस्लीम नसल्याची घोषणा पाकिस्तानी सरकारने अधिकृतरीत्या केल्याने तिथल्या समाजात त्यांना बिगरमुस्लीम मानले जाते. ख्रिस्ती लोकांविरोधात पाकिस्तानमध्ये होणारे अत्याचार जागतिक स्तरावर सातत्याने पुढे आणले गेले आहेत. शिया मुस्लिमांनादेखील पाकिस्तानातील सुन्नीबहुल राजकारणी वर्तुळाकडून हीन वागणूक दिली जाते. कराची-सिंधमध्ये अहमदिया समाजाकडून सुरू झालेली प्रचंड रकमेची मदत मोहीम मूलतत्त्ववादी मुस्लीम राजकारणी आणि मौलवींनी बंद पाडल्याची बातमीदेखील पाकिस्तानी वैचारिक विश्वात चर्चेचा विषय झाली होती. भारतातील माध्यमांनी मात्र ही बातमी केवळ ‘हिंदू’केंद्री करून प्रसृत केली. फाळणीचे दु:ख आणि राग अजूनही ताजा ठेवणाऱ्या आपल्या समाजात सध्या वाढू लागलेली हिंदू राजकीय संवेदनशीलता अतिशय नाजूक होत असताना, ही बातमी केवळ राजकीय हेतुपुरस्सररीत्या पसरवली गेली नाही, असे म्हणता येणार नाही. पाकिस्तानातील सिंध प्रांतात झरदारी-भुत्तो घराण्याची मोठी व्होट बँक असलेली हिंदू जनता सिंधच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावते. बिलावल भुत्तो यांनी हिंदूंच्या संवेदनांविषयी आस्था दाखवताना शिवलिंगाचा जीर्णोद्धार, अभिषेक वगैरे उपक्रमांत स्वत: भाग घेतल्याचे व्हिडीओ इंटरनेटवर सहज उपलब्ध होतील. वरील संदर्भात पाकिस्तानात हिंदूंची स्थिती उत्तम वा निर्धोक आहे असे म्हणणे हा प्रस्तुत लेखकाचा उद्देश नाही. मात्र, आज सगळं काही सामूहिक एकारलेपणाकडे झुकत असताना हिंदू किंवा अल्पसंख्याक समूहांना चुचकारण्याचे किंवा पिडण्याचे उद्योग केवळ राजकीय स्वार्थासाठीच केले जात आहेत हे मांडणे नक्कीच आवश्यक आहे. फाळणी आणि द्विराष्ट्रवाद या दोन्हींचा हेतू मूठभर नवाब व राजकारणी मंडळींच्या राजकीय स्वार्थाची पूर्ती हाच असल्याचे लक्षात घेतले तर तेथील (आणि सगळीकडच्याच) धार्मिक, सामूहिक राजकारणाला केवळ स्वार्थाची किनार असल्याचे दिसून येईल. अशा परिस्थितीत पाकिस्तानी व्यवस्थेकडून होणारे शोषण केवळ हिंदूंपुरतेच किंवा ख्रिश्चनांपुरतेच मर्यादित असल्याचा समज पसरवणे हे व्यापक मानवी समाजहिताच्या दृष्टीने अनुचित व धोकादायकच मानायला हवे. या राजकारणाचे अंतरंग समजून घेऊन त्याविषयी विवेक जागृत करण्याची जबाबदारी माध्यमांप्रमाणे सुशिक्षित समाजाचीही आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

समूहांच्या स्मृती आणि रचना या सातत्याने बदलत असल्याने त्या समूहांचा भाग असलेल्या किंवा त्यातून बाहेर पडून वेगळी चूल मांडणाऱ्या गटांतील आपल्या वैयक्तिक किंवा सामूहिक अस्तित्वाविषयीच्या स्मृती देश, काळ आणि आपण स्वीकारलेल्या/ स्वीकाराव्या लागलेल्या परिस्थितीनुसार बदलत असतात. इसवी सनाच्या आधीपासून ते अगदी आजपर्यंत भारतीय उपखंडात प्रवेश केलेल्या समूहांतील व्यक्तींनी, व्यक्तिसमूहांनी इथल्या वेगवेगळ्या राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक किंवा जातीय वर्तुळांत आपले स्थान मिळवले. कधी बदलत्या भवतालानुसार संबंधित वर्तुळाशी असलेला संबंध अधिक दृढ होऊन विशिष्ट राजकीय/ आर्थिक वर्गात या समूहांना/ व्यक्तींना लहान-मोठे स्थान मिळाले व त्यानुसार त्यांच्या सामूहिक निष्ठा आकारल्या गेल्या किंवा बदलत गेल्या. आनुवंशिक गुणसूत्रे आणि त्यांचे मिश्रण यांच्या अभ्यासाद्वारे हल्ली माणसाचे मूळ स्थान, भौगोलिक, वांशिक स्थित्यंतर इत्यादींचा मागोवा घेता येऊ लागला आहे. त्याच्या अचूकतेविषयी प्रश्नचिन्हे असली तरी त्यातून गुणसूत्रांचा ढोबळ भौगोलिक/ वांशिक प्रवास आपल्याला समजू शकतो. हा डेटा समाजात उघड झाल्यास आपल्या आजच्या भौगोलिक, राष्ट्रीय, धार्मिक, वांशिक, विचारसरणीविषयक निष्ठा आणि त्याविषयीचा अत्याग्रह कुठे जाईल याचा अंदाज आपल्याला अजूनही आलेला नाही. अशावेळी कुठल्याही संवेदनशील माणसापुढे ज्ञानोबा-एकोबा-तुकोबांसारख्या दार्शनिकांना किंवा फुले-महर्षी शिंदे-आगरकर इत्यादी द्रष्टय़ा विचारकांना अभिप्रेत असलेली विश्वात्मकता स्वीकारण्याशिवाय अन्य पर्याय नाही.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)