बोला पुंडलिका वर्दा हारी विठ्ठल
श्रीज्ञान्देवतुकाराम.. पंढरीनाथ महाराज्कीजय..
तर मंडळी, काय वर्णावा तो प्रसंग?
मुळामुठेचिया काठी।  जाहली बघियांची दाटी।
एकचि रेटारेटी। चाललिया..
पावसाळ्यात मुठेचा पूर पाहायला लकडी पुलावर जशी दाटी होते, शनवार-ऐतवारी डेक्कनवर हाटेलांच्या आत-बाहेर जशी गर्दी जमते, तशीच गर्दी येथे जमलेली आहे. मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही. कशी असणार मंडळी? म्हटलंच आहे-
पवित्र ते पुणं पावन तो देश
जेथे साहित्यिक जन्म घेती..
पुणे तेथे लेखक, कवी, साहित्यिकांना काय उणे? पुनवडीतली ही सगळी मंडळी तिथं झाडून आलेली. पण आवाज?
मुंगीने पंख हलवला तरी त्याची फडफड ऐकू येईल अशी शांतता!
अवघा कोलाहल.. शांततेचा!!
बोला, विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!
अवघा कोलाहल शांततेचा! हूं नाही की चूं नाही. सगळे चिडीचूप. तिकडं आनंदमाऊली नेसत्या बंडी-धोतरानिशी मुळा-मुठेच्या पाण्यात उभे. डोईवर उपरणं. तोंड उतरलेलं. मस्तक झुकलेलं.
मनात एकच विचार की, काय करता काय झाले?
माऊलींनी अक्षरांचा श्रम करून करून दोन कादंबऱ्या लिहिल्या. बऱ्या होत्या. बऱ्या खपल्या.
इथं मंडळी, माऊलींचा विनय पाहा. ते म्हणतात-
‘माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार
मज भगवंत बोलवितो
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल
विनवितो कोपाल संत झणी’
बोला, विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!
मंडळी, लेखकाचा भगवंत कोण? तर प्रकाशक. त्यांनी स्वप्नात येऊन कवित्व करावयाची आज्ञा केली. म्हणून माऊलींनी कादंबऱ्या लिहिल्या. आणि संत कोपले. विप्र कोपले. म्हणाले, ‘‘संतांची विटंबना झाली. तरी यासी निषेधावे. सर्वथा भय न धरावे.’’
माऊली बिचारे हबकले. विटंबना? म्या पामरे तर संतांची वाहवा केली. हेतू तर तोच होता. कुठं चुकलं की काय? जाऊ  दे. बोभाट नको, असं म्हणून माऊलींनी पहिल्यांदा संमेलनाध्यक्षपद इंद्रायणीत बुडवून टाकलं. वारकरी धकाबुकी करते झाले. आता वारकरी म्हणजे कोण मंडळी?
मायबापाहूनी बहु मायावंत..
वारकऱ्यांच्या मनात अपार माया! भले तर लंगोटी देतील.. नाही तर नाठाळांचि काठी देऊं  माथा. म्हणूनच तुकोब्बारायांनी म्हटलेलं आहे-
मायबापाहूनी बहु मायावंत
करू घातपात शत्रुहूनि
तेव्हा आनंदमाऊली पुन्हा म्हणाले, उगा बोभाट नको. त्रिवार क्षमस्व!
अक्षरांसाठी केवढे हे दिव्य त्यांचे!
त्यांना बहुधा वाटलं असेल, दया-क्षमा-शांती, तेथे देवाची वसती!
पण कसलं काय? प्रकरण अखेर न्यायासनी गेलं. आणि माऊलींना आज्ञा झाली..
यालागी कवित्व फाडून
टाकी नेऊन उदकात
बोला, विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठाल.. हो!
मंडळी, आभाळ कोसळलेलं आहे. माऊलींना आदेश झालेला आहे. तुमची ही बाडं घ्या आणि ती फाडून टाका. त्यांचा लगदा लगदा करा.
काय करणार माऊली?
घेतली बाडं. आले मुळा-मुठेच्या काठी. उतरले पाण्यात.
एकेक पान टर्रकन् फाडायचं, पाण्यात सोडून द्यायचं. पान फाडायचं, सोडून द्यायचं.
पानांवरच्या शाईने सारी मुळा-मुठा ‘रात्र काळी, घागर काळी’ मधल्या यमुनाजळासारखी काळी झाली..
गर्दी एवढी; पण कोणाच्या तोंडातून अवाक्षर नाही.
कोणाच्या मुखातून ब्र नाही.
हू नाही की चू नाही.
आविष्कार नाही, की उच्चार नाही!
चुकून त्याचं स्वातंत्र्य घ्यावं आणि त्या नाठाळपणासाठी माथी काठी पडावी. नकोच ते- असं म्हणून सगळी साहित्याची भूमी थंडगार पडली होती.
तिकडं कादंबरीची पानंही मुळा-मुठेच्या तळाशी चालली होती.
मंडळी, पुरावा नाही; पण सांगणारे सांगतात, की त्यावेळी ज्ञानदेवीच्या गळ्याशी पुन्हा एकदा अश्वत्थाची मुळी लागली होती..
बोला पुंडलिका वर्दा हारी विठ्ठल
श्रीज्ञान्देव तुकाराम..
पंढरीनाथ महाराज्की जय..