डॉ. संजय ओक

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने करोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्सची रचना झाली आणि त्याचे अध्यक्षपद मला देण्यात आले. टास्क फोर्सचे बाकीचे सदस्य वैद्यकाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये रथी-महारथी होते. कोणी एन्डोक्रायनॉलॉजिस्ट, कोणी छाती व फुप्फुस रोग तज्ज्ञ, कोणी इमर्जन्सी स्पेशॅलिस्ट, तर कोणी संसर्गजन्य रोग तज्ज्ञ. या सगळ्या चमूमध्ये सर्जन मी एकटाच; आणि तोही लहान मुलांचा. आमचे थोरले बंधू लहाने सर थोडय़ा दिवसांनी सदस्य झाले. मला पूर्ण तयारी करावी लागे. पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, ई-मेल्स डोळ्यांखालून घालावे लागत. शाश्वत सत्य करोनामध्ये काहीच नव्हते. आज ज्या औषधाला डोक्यावर घेऊन नाचलो, तेच औषध कुचकामी असल्याचा निर्वाळा पुढच्या काही महिन्यांत  मिळत असे. टास्क फोर्सचे सर्व सदस्य प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढणाऱ्या वीराप्रमाणे रुग्णशुश्रूषा करीत होते. त्यांची स्वत:ची ठाम मते होती. प्रत्येकाचे वाचन, मनन अफाट होते. प्रत्येकाच्या अनेक आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांबरोबर रोज चर्चा घडत होत्या. या पार्श्वभूमीवर मला सर्जकिल स्ट्राइक न करता ‘न धरी शस्त्र करी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ या भूमिकेत शिरावे लागे. दर सोमवारी रात्री टास्क फोर्सची बैठक होई. दोन तासांत अनेकदा वादविवादाचे प्रसंग घडत. काही जणांना प्लाझ्मा, नवी औषधे यांच्या वापराचा आग्रह आवश्यक वाटे, तर काही जण Double Blinded Placebo Controlled Trial Results च्या शास्त्रीय निष्कर्षांचा आग्रह धरीत. मध्यम मार्ग काढण्याची जबाबदारी माझी असे. प्रत्येक मुद्दा हा सरतेशेवटी एकमताने मंजूर होऊन शासनाला दुसऱ्या दिवशी Advisory च्या स्वरूपात कळविला जात असे. कधी कधी मी माझ्या मनाशी विचार करे.. माझं नेमकं स्थान काय? माझी खरोखरच आवश्यकता आहे का? आपण अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवावी का?

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
How much added sugar does your Favorited packet
तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखरेचे प्रमाण किती असते? ते कसे ओळखावे घ्या जाणून…
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

आणि एक दिवशी मला या पद्यपंक्ती गवसल्या..

‘मोतियों को तो आदत है,

बिखर जाने की

ये तो बस धागे की जिद है

कि सबको पिरोये रखना है!

माला की तारीफ तो

करते है सब,

क्यों कि मोती सबको

दिखाई देते है

काबिलें तारीफ

धागा है जनाब,

जिसने सबको जोड रखा है!’

मला टास्क फोर्समधल्या माझ्या अस्तित्वाचा नेमका अर्थ त्या दिवशी गवसला. मी धागा होतो. अध्यक्षपदाची महिरप दर्शनीय होती, पण सगळ्यांना एकत्र ठेवणे यासाठी धागा होणेच गरजेचे होते. ‘I’पेक्षा ‘We’ आणि ‘ME’पेक्षा ‘US’ कधीही सशक्त आणि दूरवर टिकणारे. संघनेता कसा हवा? तर तो धाग्यासारखा हवा. स्वत: न चमकणारा, काहीसा पाठीमागे रेंगाळणारा, चमकदमक नाही, धमक मात्र भरपूर. शक्ती आंतरिक, ताकद मानसिक.. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची. प्रत्येक सदस्याचा भाव नाही, पण मूल्य जोखणारी. प्रत्येकाचे SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities, Threats)काळजीपूर्वक आणि कौशल्याने करणारे, रुळावरून घसरणारी गाडी पुन्हा रुळावर आणणारे आणि वैफल्याचा लवलेशही नसलेले संघनेतृत्व हे नेमके असेच असावयास हवे. उत्तम नेता हा सुहृद झाला की त्याचा ‘मितवा’ होतो.  मित्र.. तत्त्वज्ञ आणि वाटाडय़ा.

मोत्यांचा हार धाग्यामुळे एकसंध राहतो हे जितके खरे, तितकेच कोणतेही बुद्धिमंतांचे कार्यदल विचारी नेत्यामुळे कार्यप्रवाही राहू शकते, हेही खरे. प्रत्येकाने आपापले स्थान ओळखावे आणि जपावे.

मोत्यांनी माज करू नये

आणि धाग्याने त्रागा करू नये.

sanjayoak1959@gmail.com