News Flash

मोकळे आकाश.. : कोव्हिडायझेशन

कॅनडामध्ये क्षयरोगावर संशोधन करणाऱ्या भारतीय वंशाच्या मधुकर पै यांनी नवा शब्द बहाल केलाय- COVIDIZATION. 

(संग्रहित छायाचित्र)

 

डॉ. संजय ओक

कोविडच्या संदर्भात छापून किंवा दृक्श्राव्य माध्यमात येणारी प्रत्येक ओळ वाचण्याचा शिरस्ता मी गेले वर्षभर पाळतो आहे. व्हायरसपासून व्हॅक्सिनपर्यंतचा हा प्रवास बहुतांशी उद्विग्न करणारा, तर कधी दिलासा देणारा ठरला आहे. खूप काही बदलते आहे. शास्त्र आणि शस्त्र यांत भर पडते आहे. नव्या संज्ञा उदयाला येत आहेत. यापूर्वी Webster मध्ये एखादा शब्द विद्वत्संमत होऊन शिरायचा म्हणजे मोठे दिव्य असे. आता मात्र नवे शब्द सहजी रुळू लागले आहेत. कॅनडामध्ये क्षयरोगावर संशोधन करणाऱ्या भारतीय वंशाच्या मधुकर पै यांनी नवा शब्द बहाल केलाय- COVIDIZATION.  कोविडने सारं काही भरलं आहे;  नव्हे भारलं आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या संशोधनाच्या दिशा बदलल्या आहेत. सर्जन्सनी आता मागच्या बाकावर बसायचं आहे. रोबोटिक्सनेही आपले यंत्रहात ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या अवस्थेप्रत न्यायचे आहेत. संशोधनाच्या दशा आणि दिशा बदलू लागल्या आहेत. कोणत्याही वैद्यकीय विषयात संशोधन करायचे म्हणजे अमाप धनराशी लागते. उत्तम संशोधनालाही धनाचे स्रोत मर्यादित असतात. काही शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्था, सामाजिक आरोग्यात कार्यरत असणारे काही न्यास आणि काही औषध कंपन्या हे धनाचे मुख्य स्रोत असतात. धनराशी आपल्या विषयाकडे वळवण्यासाठी शास्त्रज्ञांमध्ये नेहमीच चुरस लागलेली असते. करोनाने संशोधनाचा कॅनव्हासच बदलला. आता संशोधन होत आहे व्हायरसला अधिक जाणून घेण्यासाठी, निदान चाचण्यांचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी, नव्या औषधांच्या प्रयोगासाठी आणि ‘जिसकी तलाश दुनिया के सभी मुल्कों को है’ अशा डॉनसदृश करोनाच्या लसीसाठी!

कोव्हिडायझेशनने इतर क्षेत्रांतील संशोधनाला ब्रेक लावला. पैकी काही प्रकल्प अर्धवट बंद झाले, काही पूर्णत्वाच्या जवळ होते; पण या सर्वाना पशाची दारे बंद झाली. उद्योग संस्था आपला CSR Fund करोनाकडे वळवू लागल्या.  प्रत्येक देशाच्या शासनकर्त्यांनी मोठय़ा धनराशीच्या घोषणा करोनासाठी केल्या आणि परिणामत: करोनावरचे संशोधन हेच मुळी शास्त्रज्ञांचे आद्यकर्तव्य किंवा इतिकर्तव्य बनून गेले. याचा मोठा धक्का वैद्यक क्षेत्राला बसला.  प्रौढ व्यक्तींमध्ये मेंदू आणि मज्जारज्जूमध्ये होणारे बदल यावर अमेरिकेत एका प्रख्यात विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या एका संशोधक विदुषीने म्हटले आहे.. ‘‘मला अचानक माझे काम फोल वाटू लागले. माझ्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आणि आता यापुढे मानवजातीसाठी तारणहार म्हणजे एकच गोष्ट- करोनावरचे संशोधन- अशी भावना माझ्यात निर्माण झाली.’’

‘उडदामाजि काळे-गोरे’ या न्यायाने काही वैद्यकीय संशोधकांमध्येही वारा पाहून शिडे हलविण्याची वृत्ती होतीच. आपली मूळची शाखा कोणती आहे? आपला संसर्गजन्य रोगांशी कधी संबंध आला आहे का? जनुकीय उतरंड आपल्या परिचयाची आहे का? याचा कसलाही विचार न करता मंडळी करोनाच्या संशोधनाकडे वळली.  अर्धवट शिजलेल्या कच्च्या कणीच्या भातासारखे शोधनिबंध प्रसिद्ध होऊ लागले. यापूर्वी वैद्यकीय नियतकालिकांत एखादे ‘आर्टिकल’ छापून येणे म्हणजे खूप दुर्मीळ बाब होती. त्याला मोठा मानही होता. कोव्हिडायझेशनने सारेच बदलले. पशाला पासरी वैद्यकीय जर्नल्स निघू लागली. त्यातही डिजिटल युगाने वेग आणला, आवेग आणला; पण असत्याच्या प्रतिमाही उमटू लागल्या. निष्कर्ष सत्याच्या कसोटीवर खरे उतरण्यापूर्वीच पडद्यावर झळकू लागले. काही संशोधनांच्या ट्रायल्सची रचना (Designs) सदोष होती, तर काही ठिकाणी कोणते अनुमान काढायचे, हे ठरवून प्रकल्पाची रचना झाली होती. सरासरी १७ पैकी ११ शोधनिबंध सदोष निघत आणि कालांतराने हळूच मागे घेतले जात. ‘लँसेट’सारखे जगन्मान्य जर्नलही या नामुष्कीला सामोरे गेले. ज्यांना विषाणूशास्त्राची पूर्वबैठक नव्हती असे शास्त्रज्ञ आणि संशोधक जेव्हा या विषाणूचा शोध घेऊ लागले आणि नवनव्या उपायांचा मागोवा घेऊ लागले तेव्हा असंख्य औषधे शास्त्रीय ठोस पुराव्यांशिवाय वापरली गेली. त्याचे दुष्परिणाम रुग्णांना आणि पर्यायाने वैद्यक क्षेत्राला भोगावे लागले. जगाला उत्तरे हवी होती आणि येनकेन प्रकारेण ती देण्याचा प्रयत्न कोव्हिडायझेशनने होत होता.

माझ्या मते, कालचक्र फिरेल. काही काळानंतर व्हॅक्सिन स्थिरावेल. सामुदायिक प्रतिकारशक्ती अर्थात् Herd Immunity येईल आणि करोनाचा बागुलबुवा संपेल. तो एक ‘जनता की आम बीमारी’ बनून जाईल.  वैद्यकसत्तेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा येत्या पंचवीस वर्षांनंतर एकच शब्द मागे उरेल.. ‘कोव्हिडायझेशन’!

sanjayoak1959@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 12:35 am

Web Title: covidization article by dr sanjay oak abn 97
Next Stories
1 अंतर्नाद : प्रार्थनेतील संगीत
2 पुस्तक परीक्षण : स्त्रीचे माणूसपण अधोरेखणाऱ्या कथा
3 भूलोकीच्या स्वर्गाची सफर
Just Now!
X