मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

हा लेख गेल्या शतकातील अशा पाच ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यक्तींबद्दल आहे, ज्यांची मातृभाषा मराठी होती, परंतु त्यांची कर्मभूमी महाराष्ट्राबाहेर होती. आणि ते ज्या ज्या प्रदेशांत वास्तव्याला होते त्या प्रदेशांच्या राज्याच्या भाषेत त्यांनी आपल्या लेखनाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्या व्यक्ती म्हणजे (१) सखाराम देऊस्कर (बंगाली), (२) बाबूराव पराडकर (हिंदी), (३) काकासाहेब कालेलकर (गुजराती आणि हिंदी), (४) द. रा. बेंद्रे (कन्नड) आणि (५)  गजानन मुक्तिबोध (हिंदी). या पाचही लेखकांनी महाराष्ट्राचे उत्तम राजदूत म्हणून स्वत:ला सिद्ध केलं असं म्हणता येईल. यातले पहिले चार लेखक हे स्वातंत्र्य सेनानी होते, तर गजानन मुक्तिबोधांची मार्क्‍सवादी कम्युनिस्ट विचारसरणीशी पक्की बांधिलकी होती.

भारतातील भाषाशास्त्रज्ञांबद्दल- उदा. सुनीतीकुमार चॅटर्जी यांच्याबद्दल- आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल. द्वैभाषिक लेखकही आपल्या चांगल्याच परिचयाचे असतात. रवींद्रनाथ टागोर (बंगाली आणि इंग्लिश), प्रेमचंद (उर्दू आणि हिंदी) यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांपासून ते भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कमला दास (इंग्लिश आणि मल्याळी), मनोज दास (इंग्लिश आणि उडिया), अरुण कोलटकर (इंग्लिश आणि मराठी) हे लेखकदेखील आपल्या चांगल्या परिचयाचे असतील. परदेशी भाषांमधून भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणारे आणि भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये तसेच इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणारे उत्कृष्ट भाषांतरकारदेखील आपल्याला माहिती असतील. उदाहरणार्थ, भीष्म सहानी (‘तमस’चे लेखक आणि भाषांतरकार), शांता गोखले (विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर यांच्या नाटकांची भाषांतरे), सुशीला पुनिथा (यू. आर. अनंतमूर्ती यांच्या ‘भारतीपूर’चं भाषांतर), अनिता नायर (टी. एस. पिल्लाई यांच्या ‘चेम्मीन’चं भाषांतर)!

काही वर्षांपूर्वी माझ्या असं लक्षात आलं की, आपली मातृभाषा नसलेल्या एखाद्या भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांकडे मात्र आपलं सर्वाचं दुर्लक्ष होतंय. हे सूत्र घेऊन त्यांचा शोध घ्यावा असं मला वाटलं म्हणून हा लेखप्रपंच. हे करत असताना सुरुवात मराठी या माझ्या मातृभाषेपासून करावी, हे सयुक्तिकच होतं. हा लेख म्हणजे या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल म्हणता येईल. तर या पाच लेखकांची ही साहित्यिक व्यक्तिचित्रे..

१) सखाराम गणेश देऊस्कर (१८६९-१९१२) हे एक क्रांतिकारी असून ते श्री अरबिंदो यांचे सहकारी आणि बंगालीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक आणि लेखक होते. गेल्या १५० वर्षांत बंगाली भाषिकांच्या घराघरांत पोहोचलेलं हे नाव महाराष्ट्राला मात्र अपरिचित राहिलं याचा अचंबा वाटतो. देऊस्कर यांचे वाडवडील मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरीमधल्या एका लहान गावातले. सखाराम देऊस्करांचा जन्म बिहारमधल्या देवघर नावाच्या गावी झाला. (आता हे गाव झारखंड राज्यात आहे.) त्यांनी आपली कारकीर्द बंगाली भाषेतील ‘हितवादी’ या वृत्तपत्रात एक प्रूफ रीडर म्हणून सुरू केली आणि पुढे त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेवर ते या वृत्तपत्राचे संपादक झाले. ‘देशेर कथा’ हे अत्यंत प्रभावी पुस्तक त्यांनी बंगालीत लिहिलं. त्यात ब्रिटिशांनी निर्दयीपणे भारताचं व्यापारी आणि औद्योगिक शोषण कसं केलं याचं प्रत्ययकारी चित्रण केलं होतं. या पुस्तकाच्या त्याकाळी दहा हजार प्रती खपल्या होत्या आणि त्याच्या पाच आवृत्त्या निघाल्या होत्या. या पुस्तकाने स्वदेशी चळवळीला मोठी चालना मिळाली होती. हे पुस्तक इतकं प्रखर होतं की ब्रिटिश शासनाने त्यावर बंदी घातली होती. ‘स्वदेश’ हा शब्दप्रयोग देऊस्करांनी प्रथम वापरात आणला. त्यानंतर श्री अरबिंदो यांनी त्याला समतुल्य ‘कल्लीिस्र्ील्लीिल्लूी’ हा  इंग्रजी शब्द सुचवला आणि तो नंतर सर्वमान्य होऊन प्रचलित झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रदेखील बंगालीमध्ये लिहिले होते.

२) बाबूराव विष्णू पराडकर (१८८३-१९५५) हे हिंदी पत्रकारितेचे भीष्मपितामह म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म वाराणसी येथे झाला. तरुणपणी ते त्यांचे नातेवाईक सखाराम गणेश देऊस्कर (ज्यांचा मी वर उल्लेख केलेला आहे.) यांच्या क्रांतिकारी, आदर्श विचारांनी भारावून गेले होते. (त्यांनी देऊस्करांच्या ‘देशेर कथा’ या पुस्तकाचं हिंदीत ‘देश की बात’ या नावाने नंतर भाषांतर केलं.) ‘बंगबंधू’, ‘हितवार्ता’, ‘भारतमित्र’, ‘संसार’ इत्यादी वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात उमेदवारी केल्यानंतर ते ‘आज’ या त्यांच्या काळातील एका महत्त्वाच्या हिंदी वृत्तपत्राचे संपादक झाले. आपल्या कारकीर्दीत बाबूरावांनी शेकडो नव्या हिंदी शब्दांची निर्मिती केली. उदाहरणार्थ, ‘राष्ट्रपती’, ‘सर्वश्री’! हिंदी संपादकांच्या पहिल्या संमेलनाचे तसंच १९३८ साली सिमला येथे झालेल्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९०६ ते १९५५ या आयुष्याच्या ५० वर्षांच्या कालखंडात बाबूरावांनी देशसेवा तसेच हिंदी भाषा व साहित्याची सेवा केली. हिंदी राष्ट्रभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. २०१८ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यतील त्यांच्या मूळ गावी त्यांचं स्मारक उभारण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.

३) दत्तात्रेय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर (१८८५-१९८१) हे एक प्रमुख गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. त्यांनी गुजराती, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये साहित्यनिर्मिती केली. काकासाहेबांचा जन्म महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये झाला. १९०२ साली फग्र्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी. ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर वर्षभर ते बंगालमधील शांतीनिकेतन येथे अध्यापक होते. १९१५ मध्ये त्यांची गांधीजींशी प्रथम भेट झाली आणि ते त्यांचे एक अग्रगण्य अनुयायी झाले. (त्याआधी त्यांनी हिमालयात पदयात्रा केली होती.) १९२८ ते १९३५ या कालखंडात अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे ते संस्थापक आणि उपकुलगुरू होते. गुजरातमधील जनतेशी ते इतके एकरूप झाले होते की गांधीजी त्यांना ‘सवाई गुजराती’ म्हणायचे. काकासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली. गुजराती, मराठी आणि हिंदी भाषेत लिहिलेली त्यांची प्रवासवर्णनं प्रसिद्ध आहेत. ‘जीवनव्यवस्था’ या त्यांच्या गुजराती भाषेतील निबंधसंग्रहाला १९६५ साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आणि त्यानंतर १९७१ साली त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली. रतिलाल त्रिवेदी, ज्योतिन्द्र दवे, लीलावती मुन्शी, रामनारायण पाठक यांच्या जोडीने काकासाहेब कालेलकर हे गांधीपर्वातील गुजराती भाषेतील एक महत्त्वाचे निबंधकार मानले जातात.

४) दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (१८९६-१९८१)  हे ‘द. रा. बेंद्रे’ या नावाने विख्यात होते. कन्नड भाषेतील ‘नवोदय चळवळी’चे (आधुनिक साहित्याची चळवळ) ते अग्रणी होते. कर्नाटकातील धारवाड इथे त्यांचा जन्म झाला. काकासाहेब कालेलकरांप्रमाणे त्यांनीदेखील पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमधून बी. ए.ची पदवी घेतली. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे संगोपन त्यांची आई अंबिका यांनी केला. त्यांच्या आईचा त्यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव होता. (‘अंबिकातनयदत्त’- म्हणजे अंबिकेचा पुत्र या टोपणनावाने त्यांनी लिखाण केले.) त्यांच्या आयुष्यावरचा दुसरा मोठा प्रभाव म्हणजे धारवाड, तिथली माणसं आणि तिथला वारसा! धारवाडमधील एका शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. पुढे १९४४-१९५६ या काळात सोलापूर येथील डी. ए. व्ही. कॉलेजात ते प्राध्यापक होते. आपल्या ८५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी १४२७  कविता लिहिल्या. ते कन्नड भाषेत ‘वरकवी’ (स्वर्गाला स्पर्श करून आलेला संत-कवी) म्हणून ओळखले जायचे. ‘कर्नाटक कवि कुल तिलक’ म्हणूनही ते ओळखले जात. १९६४ साली त्यांच्या ‘नाकु तंती’ (चार तारा) या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.

५) गजानन माधव मुक्तिबोध (१९१७-१९६४) यांचा जन्म मध्य प्रदेशातील शिवपूर या गावी झाला. ते हिंदी भाषेतील एक महत्त्वाचे प्रख्यात कवी, निबंधकार, लेखक आणि पत्रकार होते. भारतातील आधुनिक कवितेचे एक जनक म्हणूनही ते ओळखले जात. ते हिंदी भाषेतील सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ यांच्यानंतरचे एक महत्त्वाचे प्रमुख कवी मानले जातात. त्यांच्या लिखाणावर मार्क्‍सवाद आणि समाजवाद यांचा मोठा प्रभाव आहे. तसंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अस्तित्ववादाचा फार मोठा प्रभाव जाणवतो. ‘ब्रह्मराक्षस’, ‘चांद का मुँह टेढा’, ‘अंधेरे में’ आणि ‘भूरी भूरी खाक धूप’ या त्यांच्या दीर्घकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत बा. सी. मर्ढेकर यांचं जे स्थान आहे ते हिंदी कवितेत मुक्तिबोधांचं आहे असं म्हणता येईल. (दोघेही अल्पायुषी ठरले. मुक्तिबोध ४७ व्या वर्षी, तर मर्ढेकर ४५ व्या वर्षी निधन पावले.) माझ्या आवडीचं त्यांचं एक वाक्य इथे देण्याचा मोह आवरत नाही.. ‘‘सच्चा लेखक जितनी बडी जिम्मेदारी अपने सर पर लेता है, स्वयं को उतनाही अधिक तुच्छ अनुभव करता है.’’ २००४ साली मध्य प्रदेश सरकारने त्यांचे स्मारक छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथे बांधले आहे. (एक महत्त्वाचा खुलासा : मराठीतील प्रख्यात कवी, कादंबरीकार, मार्क्‍सवादी समीक्षक आणि १९७९ सालचे साहित्य अकादमी पुरस्कारविजेते शरच्चंद्र माधव मुक्तिबोध हे त्यांचे धाकटे बंधू. महाराष्ट्राला ते त्यांचे थोरले बंधू गजानन माधव मुक्तिबोध यांच्यापेक्षा जास्त परिचित आहेत.)

जाता जाता सोपानने मला विचारलं की, ‘‘पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पत्रकार हिरण्मय कार्लेकर हे देऊस्कर यांच्यासारखेच मराठी- बंगाली पत्रकारितेतील एक दुवा आहेत असं म्हणता येईल का?’’ यावर माझं उत्तर ठामपणे ‘‘नाही!’’ असं आहे. ‘‘तू असं का म्हणतोस?’’ असं जेव्हा त्याने मला विचारलं तेव्हा मी म्हणालो, ‘‘कार्लेकरांची मातृभाषा बंगाली असून त्यांना मराठी मुळीच येत नाही.’’ मग सोपानने मला विचारलं की, ‘‘या लेखातल्या पाच महाराष्ट्रीय लेखकांसारख्या व्यक्ती भारताच्या इतर प्रांतांमध्ये झाल्या आहेत का?’’ मी ‘‘नाही!’’ असं उत्तर दिलं. ‘‘परंतु यावर नव्याने संशोधन होणं गरजेचं आहे,’’ अशी पुस्तीही मी जोडली. मला असं कळलं की ‘मैला आँचल’चे कर्ते फणीश्वरनाथ रेणू (यांच्या एका लघुकथेवर ‘तिसरी कसम’ हा प्रसिद्ध सिनेमा आधारीत होता.) हे मूळचे बंगाली होते. पण त्यांनी बंगाली भाषेत लिखाण केले आहे की नाही हे मला माहीत नाही. तसेच प्रसिद्ध हिंदी लेखक डॉ. रंगेय राघव यांनी तमिळमध्ये (त्यांच्या मातृभाषेत) लिखाण केलं आहे की नाही तेदेखील मला माहीत नाही.

शब्दांकन : आनंद थत्ते