News Flash

अंतर्नाद : डमरू  हर कर बाजे..

तिबेटी बौद्ध पंथातही घंटेसह डमरूचे महत्त्व मोठे आहे.

डॉ. चैतन्य कुंटे

तांडव नृत्य करणाऱ्या नटराज शिवाच्या प्रतिमेत भारतीय प्रतीकात्मकतेचे व्यापक रूप दिसते. नटराज शिवाच्या एका हातात डमरू असतो. या डमरूच्या आदिनादातून केवळ ध्वनिसृष्टीची नव्हे, तर साऱ्या विश्वाची उत्पत्ती झाली असे भारतीय परंपरा सांगते. अर्थातच डमरू हे शैव पंथात आणि एकूणच भारतीय धर्मपरंपरेत एक मंगलवाद्य मानले जाते. तिबेटी बौद्ध पंथातही घंटेसह डमरूचे महत्त्व मोठे आहे.

डमरू हे एक अवनद्ध वाद्य आहे. डमरू हा मध्यभागी निमुळता झाल्याने शंकूसारखा दिसतो आणि त्याची दोन्ही मुखे दोरीने बांधलेल्या चामडय़ाच्या पुडीने आच्छादली जातात. मध्यभागी असलेल्या दोरीतून ओवलेल्या मण्यांनी ध्वनिनिर्मिती होते, तर कधी हाताच्या बोटाने, वेताच्या लहान छडीनेही डमरू वाजवला जातो. चामडे ताणलेल्या दोरीवर कमी-अधिक दाब देऊन डमरूतील आवाजाचे विविध ध्वनिभेदही तयार होतात.

प्राचीन तंत्रग्रंथांत डमरूचे ‘अइउण्, एओङ्, ऐऔच, कपय्, खफछठथ, घढधश्, चटतव, जबगडदश्, ञमङ्ण, त्रृलृक, नम्, भ्रझभञ, लण्, शषसर, हयवरट्, हल्’ इ. नादभेद दिले असून, त्यांना मंत्ररूप मानले आहे. या मंत्रांचा सर्जक आणि विनाशी असा दुहेरी वापर सांगितला आहे. त्यामुळे डमरू हा तांत्रिक पूजाविधीत वाजवला जातो. शिवाय लोकपरंपरेतही डमरूचा उपयोग होतो. डमरूसारखी दिसणारी, पण आकारमान व वादन वेगळे असलेली अनेक वाद्ये भारतातल्या विविध परंपरांत आहेत. डमरूसमान, पण अगदी लहान आकाराचे डुगडुगी हे वाद्य पिंगळा हा लोकपरंपरेतील उपदेशक करतो- त्याचे वादन फारच लक्षवेधी असते.

संबळ-दिमडी

संबळ आणि दिमडी ही अवनद्ध वाद्यांची एक खास जोडी आहे. आपल्या मराठी मुलखातल्या धार्मिक विधींशी संबंधित संगीतात, विधीगीतांत ही दोन्ही वाद्ये आढळतात. संबळ हे महाराष्ट्र, कर्नाटक या भागातले खास लोकवाद्य आहे. खानदेशात हिला ‘नडगे’ म्हणतात. यासारखेच दुक्कड हे वाद्य उत्तरेत दिसते. उभट कपाच्या आकाराची, खाली तिवईसारखे पाय असलेली संबळची दोन भांडी असतात. यांना ‘जोड-समेळ’ असेही म्हणतात. पूर्वी खैराचे लाकूड कोरून भांडे केले जाई. हल्ली पितळ वा तांब्याची भांडीही वापरतात. या भांडय़ाच्या मुखावर दोरीने कातडे ताणून बांधतात. या दोन भांडय़ांपैकी उजवे भांडे म्हणजे मादी- ही टिपेत, तर डावे भांडे म्हणजे नर- हा खर्जाच्या सुरात जुळवतात. संबळ ही वेताच्या छडय़ांनी वाजवतात. दोन छडय़ांपैकी एकीचे तोंड गोलाकार वळवलेले असते. अशा छडीचा उल्लेख प्राचीन काळी ‘कुडूप’ असा होई. संबळचा नाद हा कडक आणि चटकन् लक्ष वेधणारा असतो.

संबळ ही मुख्यत: शाक्त संप्रदायात आढळते. भराड, जागरण-गोंधळ अशा विधीगीतांत संबळ वाजवली जाते. गीताच्या अनुषंगाने संबळवर मुख्यत: जलद लयीतील कहरवा, दादरा असे छंदताल वाजवतात. संबळवादक हे वाद्य दोरी किंवा कापडाने आपल्या कमरेस बांधून उभ्याने वाजवतो. भराडी देवीची गाणी गात गात संबळ वाजवतात. क्वचित याचे स्वतंत्र वादन सुंदरी, तुणतुणे अशा वाद्यांसह केले जाते. गोव्यातील धर्मसंगीतात घुमट-समेळ अशी दोन वाद्यांची जोडी वाजवण्याची खास रीत आहे.

दिमडी लाकडाच्या गोल तोंडावर- म्हणजे कडय़ावर बकरीचे कातडे बांधून बनवतात. काही प्रांतांत यासाठी घोरपडीसारख्या प्राण्यांचेही कातडे वापरतात. दिमडीसारखीच अनेक वाद्ये आहेत. जसे खंजिरी, कर्नाटकातील गंजिरा, दक्षिणेतील खंजिरा. खंजिरीला कधी कधी धातूच्या चकत्याही लावल्या जातात- ज्या दिमडीला नसतात. डाव्या पंजाने दिमडी धरून उजव्या हाताच्या बोटांनी ती वाजवतात व डाव्या हाताचा दाब कमी-अधिक करून तिची तारता बदलली जाते. मुख्यत: गायक स्वत:च दिमडी वाजवत गातो. वाघ्या-मुरळीच्या आविष्कारात मुरळी हातात छोटय़ा घंटा घेऊन नाचते तेव्हा जोडीला तुणतुणे आणि दिमडी वाजवली जाते. संत तुकडोजी महाराजांनी खंजिरीचा उत्तम वापर आपल्या गीतांमध्ये केला. हल्ली सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजिरी भजनात तिचा जोरकस आविष्कार दिसतो.

पखवाज

महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेला सुमारे ९०० वर्षांचा इतिहास आहे आणि यात टाळ-मृदंगाच्या गजराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. मृदंगाच्या गंभीर नादाने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर अधिकच खुलतो. हा मृदंग म्हणजेच प्राचीन अवनद्ध वाद्यांच्या ‘पुष्कर वाद्य’ या मोठय़ा गटातील विकसित होत गेलेले वाद्य आहे. याला प्राचीन काळी ‘मुरज’ असेही म्हणत. याच मृदंगास ‘पखवाज’ म्हणतात. ‘पखवाज’ हा ‘पक्षवाद्य’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. पक्ष म्हणजे विभाग, पंख, वाद्याची बाजू तसेच माणसाचे हातही. त्यावरून पखवाज म्हणजे दोन मुखाचे, दोन्ही हातांनी वाजवण्याचे वाद्य.

भारतातल्या विविध प्रांतीय संकीर्तन परंपरांत या प्रकारची वाद्ये आहेत, जसे ब्रजमधील मंदिलरा, दक्षिणेतील मृदंगम्, ओडिशातील मर्दल, बंगाली खोळ, मणिपुरी पुंग. एक आदिवाद्य म्हणून शास्त्रोक्त संगीतात पखवाजला महत्त्व आहेच, पण धर्मसंगीतात त्याचे स्थान अबाधित आहे.

पखवाजच्या लाकडात कोरलेल्या एकसंध शरीराची चामडे बांधलेली दोन मुखे असतात. ‘सुराचे मुख’ म्हणतात त्या एका मुखाला धातूच्या मिश्रणाने बनलेली शाई लिंपलेली असते, तर ‘धूम’ वा ‘धामा’ म्हणतात त्या मुखाला कणिक लेपतात. पखवाजचा ध्वनी अत्यंत गंभीर, गुंजनयुक्त आणि मोठय़ा गरिम्याचा असतो. पखवाज बसून दोन्ही हातांच्या पंजाच्या जोरदार आघातांनी वाजवतात. तसेच कीर्तनाच्या वेळी तिवईवर ठेवून उभ्यानेदेखील तो वाजवला जातो. वारीत, दिंडीत, चक्री भजनात पखवाज गळ्यात बांधून चालत, नाचतही वाजवतात.

शिवाच्या तांडवास कधी विष्णूने, तर कधी ब्रह्माने पखवाजवर ताल दिल्याचे वर्णन सापडते. गणपतीसुद्धा मृदंगवादन करणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. बनारसचे तबला महर्षी पं. किशनमहाराज यांनी स्वत: पखवाजवादन करणाऱ्या गणेशाची महाकाय, सुरेख मूर्ती घडवली होती आणि ते अत्यंत सुंदर असे ‘गणेशपरण’ वाजवीत असत.

सनई-चौघडा

सनई हे एक पत्तीदार सुषिरवाद्य- म्हणजे हवा फुंकून वाजवण्याचे वाद्य, तर चौघडा हा त्याच्या सोबतीला असलेले अवनद्ध वाद्य. ही वाद्यांची जोडी पूर्वी केवळ मंदिरांतच नव्हे, तर लग्न-मुंजीसारख्या कौटुंबिक सणसमारंभांतही वाजे. त्यामुळे सनई म्हटले की अनेकांना एक तर मंदिरातील प्रात:आरती किंवा सायंआरती आठवते किंवा थेट लग्नातील पक्वान्नांची पंगत!

सनई या शब्दाचे मूळ आहे ‘शाहनाई’- ‘नाय’ वा ‘नेई’ म्हणजे सुषिरवाद्य. आणि शहनाई म्हणजे सुषिरवाद्यांचा राजा. एकेकाळी मंदिरांच्या महाद्वाराच्या दर्शनी भिंतीवर नगारखाना असे व त्यात संधिकाली सनई, चौघडा, नगारा यांचे वादन होई. उत्तरेतील वैष्णव पुष्टिमार्गी हवेली, वाराणसीच्या काशीविश्वेश्वरासारखी शैव मंदिरे यांत पिढीजात सनईवादक असत. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां हे असेच घरंदाज सेवेकरी होते. पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत: गुरव समाजाचे लोक मंदिरांत सनई, पखवाज वाजवत, तर घडशी, न्हावी, मांग समाजाचे लोक वाजंत्रीत सनई वाजवत. त्यांच्या घराण्यांत तो कुलपरंपरेने आलेला पेशा व कलात्मक वारसाही होता. सनई, चौघडा, संबळ, हलगी, नगारा अशी वाद्ये वाजवण्याचा त्यांना खास मान होता. ही सनईवादक घराणी धुना, पदे आणि मंदिरांतून समयानुसार रागदारीही वाजवीत. काळाच्या ओघात आता सनई-चौघडावादन करणारी पारंपरिक घराणी फार कमी उरली आहेत. बदलती सामाजिक व आर्थिक स्थिती, व्यवसाय, देवस्थानांचे बदललेले प्राधान्यक्रम, इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि ध्वनिमुद्रित संगीताच्या रेटय़ामुळे आपली ही परंपरा धूसर होत चालली आहे व पारंपरिक पद्धतीचे जिवंत कलाकारांचे सनई-चौघडय़ाचे संगीत दुरापास्त झाले आहे. ‘कालाय तस्मै नम:’ असे म्हणून निष्क्रिय राहायचे, की ही परंपरा वाचवण्यासाठी प्रयत्न करायचा, याचा विचार जाणत्यांनी करावा.

देवता आणि वाद्ये

अनेक धर्मानी देवता आणि वाद्ये यांचा अनुबंध मानलाय. मूर्तिशास्त्रात देवतांचे लांछन, लक्षण म्हणून वाद्यांचा उल्लेख आहे. मरुतगण या वैदिक देवता वीणावादक असून, त्यांच्या वीणावादनामुळे उषादेवतेचे आगमन होते असा वैदिक संदर्भ आहे. सरस्वतीखेरीज कार्तिकेय, वीरभद्र, नारद, तुंबरू, गंधर्वगण हेही वीणाधारी आहेत. तसेच जांगुली ही बौद्ध देवता आणि श्रुतदेवी, सिद्धदेव या जैन देवताही वीणावादक आहेत. शिवाबरोबरच शितलादेवी, यल्लम्मा, ज्योतिबा, रवळनाथ या हिंदू देवता आणि प्रत्यांनीर, कपाल या बौद्ध देवता डमरूधारी आहेत. वरुण, विष्णू, लक्ष्मी, हयग्रीव, गरुड, गणेश, भद्रकाली, कामदेव अशा हिंदू देवता, तसेच विजया ही जैन देवता, बोधिसत्त्व, गंधास्ती या बौद्ध देवताही शंखधारी आहेत.

वेणू वा वंशी आणि कृष्णाचे नाते तर सर्वविदित आहेच. विष्णूने कृष्णावतार धारण केला असता शिवाने वंशीरूप घेतले असे कृष्णोपनिषदात म्हटलंय. त्यामुळे ही वंशी जीवात्म्याच्या, हरिहरांच्या अद्वैताचे प्रतीक मानली आहे. वंशीनाद हा पापनाशक, पुण्यदायक मानलाय. कृष्णाच्या बासरीने गोप-गोपीच काय, पण गुरे-वासरेही डोलतात. एवढंच काय, यमुनाही स्तब्ध होते असे काव्यमय उल्लेख मिळतात.

हिंदुस्थानी संगीताच्या अनेक बंदिशींत वाद्यधारी देवतांचे वर्णन आहे. कृष्ण हा देव सर्वच संगीतकारांचा प्रिय. (आग्रा घराण्याचे उ. खादिम हुसेन खां म्हणत, ‘कान्हा के बिना गाना नहीं.’) कृष्णाच्या वेणूनादाचे मनोज्ञ वर्णन करणाऱ्या बंदिशींना काय तोटा? ‘डमरू हर कर बाजे’सारख्या पारंपरिक ध्रुपदात शिवाच्या पंचवदन भूतनाथ रूपाचे वर्णन आहे. पं. कुमार गंधर्वानी ‘घुंघरा बांधे झूमे हो भैरूजी’ असे नृत्यमय भैरवाचे वर्णन बंदिशीत केले आहे. तर डॉ. प्रभा अत्रे यांनी ‘बाजे डमरू हर कर नाचे रे’ असा ‘नटभैरव’ गायला आहे. कुमारजींनी ‘सोहत हाथमा बीन’ या बागेश्री (म्हणजे वागीश्वरी म्हणजे सरस्वती) रागातील बंदिशीत वीणावादिनी शारदेचे सुंदर रूप उभे केलेय. मृदंगवादन करणारे गणेशाचे रूपही बंदिशी, परणांतून मिळते. मीही चंद्रकंस रागातील बंदिशीत असे वर्णन केले आहे..

‘जय मूषकवाहन हे गजमुख

मृदंग बजावत लंबोदर,

शंकर फणिवरधर नंदीश्वर

डमडमत डिं डिमिकी डमरू हाथ।

हंसारूढा वागीश्वरी जय

वीणावादिनी जय हे सुरसती

गरुडासन श्रीगोविंद बिराजे

मुरली बजावत सुमधुर धुन

नारद तुंबरू सुर मुनी सकल

नादब्रह्मरत सब होत जगत॥’

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:30 am

Web Title: damaru of shiva importance of damaru lord shiva and his damru zws 70
Next Stories
1 अपरिचित काकोडकर
2 ओरखडे आणि आठवणी…
3 रफ स्केचेस : बेनज़ीर
Just Now!
X