|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांसी, दादासाहेब गावकरचा दंडवत. काय भौ, आमची ‘दे ढील’ तुमास्नी आवडली म्हना की! आरं, पन इथं हरभऱ्याची झाडं कडाड मोडलीत जनू. आमचं लोड झेपत नाही त्येन्ला. जमिनीवरच राहू द्या की आमाला.

उगा वरची हवा लागाया नगं. जमिनीशी नाळ तुटाया नगं. आमी फकस्त तुम्च्या-आम्च्या मनातलं लिवतो. कायआप्पाला आसलं शिंपलिडपल झ्येपत नाई. तिथं आमची आयडेंटीटी झीरो.

पर तुमी पसंतीचं शर्टफिीकेट दिलं आन् आमच्या लिवन्याला जोर आला बगा. टपालकीतून ह्य़ो दिलाचा रिश्ता आसाच मजबूत होवू दे, येवढंच मागणं हाय विठूरायाकडं.

तसं आमी सुखात हाये हिकडं. शेवटला सुख-समाधान मानण्यावरच आसतं बगा. तुम्च्या वैनीबाय बी मजंत राज्य करून ऱ्हायल्यात. समद्या घरावर त्येंची सत्ता चालते. कदी कदी आमास्नी भासेस हुतात. आमी सौताला नाना पाटेकर समजतू. कारन योकच.. तुमच्या वैनीसाब. त्ये सौताला सरकार समजून ऱ्हायल्यात. आमी त्यांचे शेवक.

शोकेसवाला डिश्प्ले आन् गोडावूनमंदी फरक आसतु सदाभौ.

पपाहुणं आलं की, ‘धनी..धनी’ म्हन्त्यात. इकडच्या स्वारीचं कवतिक करत्यात. कुनाला वाटंल, वैनीसाब रोज दादासायेबांची दमलेली पावलं काशाच्या वाटीनं चोळून देत आसनार. भाकरतुकडा खाताना त्यान्ला पदरानं वारं घालीत आसनार. गेला त्यो जमाना सदाभौ. ‘मी हाये म्हून टिकून हाये!’ असं रोज ऐकावं लागतंया. आमी त्येन्चा जुनाच गडी आन् त्यांचंच जुनं राज. ह्य़े राज आता समद्या गावाला ठावं हाये. तुम्च्या वैनीसाबच्या किरपेनं शुपर डान्सरमंदीसुदीक चान्स गावंल आमाला. इतकं भारी नाचतुया आमी.

ढोलकीच्या तालावर नव्हं, तुम्च्या वैनीसाबच्या तालावर. मिशेशच्या कोरिओग्राफीला गावाच्या अन् शेराच्या भिंती नसत्यात सदाभौ!

मिशेशचा थयथयाट नगं म्हणूनशान मिश्टर गपगुमान नाचत्यात, यात ईशेष काई न्हाई.

मघा त्ये ढोलकीच्या तालावर म्हन्लं

आन् मन वढाय वढाय झालं. सुगीचं

दिवस आसायचं ते. पीकपानी झ्याक हुयाचं. गावच्या इस्वेस्वरापाशी जत्रा भरायची. जत्रंमंदी बायकापोरास्नी घिवून हिंडायचं. समदं गाव दिलखूश आसायचं.

मंग रातच्याला नदीपल्याडहून ढोलकीची थाप ऐकू यायची. मग मर्दा, आपसूक पावलं फडाकडं वळायची. काय ते शाहीर. काय ती लावणी. नाचनाऱ्या अप्शरा. त्ये सवाल-जवाब.. घुंगरू तुटंपर्यंतचा झन्कार. काटाकिर्र्र. काय बी वंगाळ नसायचं तवा. शिट्टय़ांचा पाऊस पडायचा. फेटं उडवलं जायचं. दौलतजादा केल्यी जायची. दौलतजादा कराया दौलत जादा कुनाकडंच नसायची. पर खऱ्या कलेला, अदाकारीला दिलेली दाद असायची ती.

आता समदंच हरवलंय. पब्लिक फडावर जाऊन शिनेमाच्या गान्यांची डिमांड करतीया. आचकट विचकट डान्श पाहिजे त्येन्ला. खरी अदाकारी, खरं लोकनाटय़, ते वगसम्राट समदं आता फकस्त फोटुमंदी गावंल.

प्राईव्हेट बठका हुत्यात. तिथं दारूकाम जोरात चालतंया.

‘अहो दाजीबा, गावात हुईल शोभा, हे वागणं बरं न्हवं..’  कुनाला फिकीर न्हाई. ‘शोभे’ची दारू पाटाच्या पान्यावानी झुळुझुळु वाहतीया. ढोलकीचा नाद हरवलाय जनू. लोककला ‘पिंजऱ्या’मंदी अडकलीया.

ह्य़े दारूकामावरनं आठिवलं. तुमी आमाला शंतमानूस नायतर जंटलमन समजून ऱ्हायलंय की काय वं?

मजबुरी हाय सदाभौ. गावात न्हाई, पर घरात १०० टक्के दारूबंदी हाय. पयलं आमी आसं नव्हतो. त्येचा बी एक किश्शा हाय. सांगतूया. लगीन होवून पंदरा दीस झालं हुतं. तुम्चं वैनीसाब नवीन हुतं घरात. आमी योकदम रोशनसिंग सोढी झालेलं. दोस्त लोग आलेलं घरी. पार्टीशार्टीचा माहौल. पयला राऊंड झाला. तुम्च्या वैनीसाबनं गरम कांदाभजी पाठिवलं. चकना, चिवडा रेड्डी ठेवलेला. दोन-चार राऊंडा झाल्या. तुमच्या वैनीसाबनं झटका जेवन पाठिवलं. समदं दोस्तलोग खूश. देर रात भिरभिरत त्येन्ची ईमानं आपापल्या घरला गेली. मग शेवटला झटका.

‘‘आवं, ह्य़े आस्लं पुन्यांदा मी खपवून घेनार न्हाई. तुमास्नी सुपारीच्या खांडाचं व्यसन न्हाई, आसं म्हन्लं होतं मामंजी. माझ्या दादाला खबर लागली तर योक घाव दोन तुक्डं करत्याल. आमच्या दाजींना ईचारा, दादाचा गुस्सा कसा आसतू ते. जावा तिकडं.’’

सदाभौ, तुमच्या वैनीसाबचं दादा हिंदकेसरी हाईत. नशामुक्तीचं अभियान चालवितात त्येन्च्या गावात. दात घशात घालतील आम्चं. ‘मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणे..’ आमी चार हात लांबच राहतुया. तवापासून घरला दारूबंदी यशश्वी. कंदीमंदी तुम्चं वैनीसाब माहेरी गेलं की बसतुया तुमच्यासारखे दोन-चार जानी दोस्त घिवून. ‘जब मिल बठेंगे चार यार..’ देयाचा कोरडय़ा घशाला थोडा शेक.

त्या शराबी मेमरीला संगट घेवून जिंदगी रेटायची. ‘मर्द का दर्द’ तुमी समजून घेशीला सदाभौ!

डान्शबार ही काय ममईवाल्यांची प्राईव्हेट प्रॉपर्टी वाटून राहिली की काय तुमास्नी? आमीर खानचं ‘सरफरोश’ पाह्य़लं, तवाच डान्शबारची कन्शेप्ट समजली आमाला. ‘ऑल इज पनवेल’ ह्य़े माहीत पडलं. गाडय़ा भरभरून गावाकडनं लोकं पनवेलास जायची. डान्शबारची खाणावळ लावलेलं मंथली मेंबरच जनू. पशाचा पाऊस पडायचा तिकडं पनवेलात. आन् इथं संसार उघडय़ावर. आविष्याचा इस्कोट. बापजाद्यांची इश्टेट पोरं बाईवर आशी उधळायची. जमिनीचा तुकडा तुकडा इकून काळ्या आईचा जीव घेयाची. तुमचं वैनीसाब आन् त्येंचं दादासायेब.. धाकानं का हुईना, आम्चं पाऊल वाकडं पडलं न्हाई. पर सदाभौ, येक आख्खी पिढी बरबाद झाली या डान्शबारपाई. ते आर आर आबा रिअलमंदी देवमानूस. डान्शबार बंद झालं आन् इथ्थल्या बायामानसांचे संसार सुखाचे झाले. शेंटीमेंटल होतु आमी डान्सबारची आठवण काहाडल्यावर. डोळं भरून येतं बगा.

तुमास्नी म्हणून सांगतू. कुटं बोलू नगा.

आमी बी येक डाव गेलं होतू पनवेलाला. डान्शबारमंदी. खिशात धा रूपायाचं कोरं बंडल घिवून. तिथं गेल्यावर आमी येकदम सराट झालं की वो. शेंटर स्टेजवर जावून बोटान्ची कात्री क्येली, आन् धा रूपयाच्या नोटांचा पाऊस. तिथल्ल्या बाया येकदम डान्श करायच्या थांबल्या. डोळ्यामंदी अंगार त्येन्च्या. आमच्याच हातात पाचशं रूप दिलं. ‘परवडत नसंल तर पुन्यांदा यियाचं न्हाई..’ आसं म्हन्ल्या. लई मनाला लागलं आम्च्या. त्याच पशाची चिल्ड बिअर ढोसली. ईन्शल्ट नशेमंदी बुडीवला, आन् पुन्हा डान्शबारच्या वाटंला गेलो न्हाई.

सदाभौ, तुमी सांगून ऱ्हायलायत की डान्शबार पुन्हा सुरू होनार. आता वं काय करायचं? ‘‘जाऊ देना वं..’’ आसं कित्यांदा म्हन्लं तरी तुम्चं वैनीसाब आमाला ममईला पाठविनार न्हाई. आन् आमाला परवडायचं बी न्हाई. तुम्च्यासारखं स्पॉन्शरर गावलं तर आमी येतो ममईला. सांगतू तुम्च्या वैनीसाबला- ‘अभ्यास दौरा’ हाये म्हून. येवढं जमवाच कसं बी करून.

आमी म्हन्तो, त्या बारमालकाला कॅरेक्टर शर्टफिीकेट कशाला द्याया होवं? तो खरा शंतमानूस. हार, फुलं, अगरबत्ती दावल्याबिगर बारचा दरवाजा उघडत न्हाई तो. आल्या-गेल्याची प्रिमानं चौकशी करतू तो. तो सौता दारूच्या थेंबाला शिवत न्हाई. तिथल्ल्या समद्या मोहमायेपासून दूर आसतुया गडी. रेनकोट घालून आंघुळ करनारा धर्मात्मा त्यो. आजूबाजूला दारूचा बदादा धबधबा वाहत असताना कोरडाठाक राहनं येरागबाळ्याचं काम न्हाई. सरकारनं अशा चारित्र्यसंपन्न मान्साला परेशान कराया नगं.

तिथं जानारं तुमी-आमी जंटलमन न्हाईच मुळी. आपन समदे ‘मी टू’वालं. दिवसा येकदम जंटलमन. रातच्याला डान्शबारमंदी ह्य़ो शरीफपनाचा बुर्का टरारा फाटतुया. ह्य़ो डबल गेम न्हाईतर काय? आन् आमी त्या बारमालकासारक्या शंतमान्साला कॅरेक्टर शर्टफिीकेट देनार? देव माफ करील का आमास्नी?

मागच्या महिन्यात तुम्चं वैनीसाब माहेरी गेलेलं. आम्ची येक पार्टी झालीच. आल्यावर त्येंनी इचारलंच..

‘‘ढोसली का? आमी म्हन्तो का पिवाशी वाटते तुमास्नी?’’

आमी म्हन्लं, ‘‘पुरषाच्या जातीला लई गनगन आसतीया. दोन थेंब घशाखाली ग्येलं की ताकद येती लडायला.’’

तुम्चं वैनीसाब काय म्हन्लं ठाव हाये?

‘‘येक डाव बाईच्या जन्माला येवून बगा. दिवस पुरत न्हाई. समद्यांची मनं राखताना, आमच्या मनाचा कोळसा हुतूया. तुमच्या बायकूला बी द्या ते अमृत आनून.’’

काय बोलनार? व्हेलेन्टाईनच्या प्रॉमिश डेला प्रॉमीश दिलं त्येन्ला.. ‘‘यापुढे समदं बंद. डान्शबार न्हाई की दारूकाम न्हाई.’’

काय स्माईल दिलं तुम्च्या वैनीसाबनं आमास्नी.आमी जागच्या जागी खल्लास. जिंदगीची आशी नशा कंदी चढलीच नव्हती.

तरीबी तुमी बोलीवलं तर आमी येवू. पापड, चकना खायाला. बाकी दारूकाम, नाचकाम आन् पेमेंट तुमच्याकडं.

‘डान्स इन्डिया डान्स..’

तुम्च्या आवताणाची वाट बघतुया.

तुम्चा जिवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गावकर

kaukenagarwala@gmail.com